शिक्षकीपेशाची तुटवू वाट....

शिक्षकीपेशाची तुटवू वाट....

शिक्षकीपेशा ही नोकरी नाही. तो सामाजिक दायित्वाचा, समाजसेवेचा, राष्ट्र निर्मितीचा, समाज घडविणारा आणि नैतिक मूल्यांची पेरणी करणारा पेशा आहे. समाजाला सुयोग्य वाटेने घेऊन जाण्यासाठी परिवर्तनांचे दूत असलेला आणि अवघ्या समाजासाठी वाटाडया ठरणारा हा पेशा आहे. शिक्षक हा नेहमीच भूतकाळ आणि वर्तमान यांचे बंध निर्माण करीत भविष्याची निर्मळ वाट निर्माण करीत असतो... शिक्षणक्षेत्राचे अभ्यासक संदीप वाकचौरे यांची ‘शिक्षण भवताल’ ब्लॉग मालिका...

शिक्षकीपेशा कोणी स्विकारावा असा प्रश्न विचारला गेला तर वर्तमानात त्याचे उत्तर अत्यंत सहज,सोपे मिळण्याची शक्यता आहे. सध्या शिक्षकी पेशा हा नोकरीचा भाग म्हणून स्विकारला जात आहे. पदवी मिळविल्यानंतर जेथे संधी मिळेल तेथे नोकरी करण्याची वृत्ती आहे. किंबहूना हाती पदवी आहे म्हणून शिक्षक व्हायचे आहे असेही सांगितले जाते.

शिक्षकीपेशा ही नोकरी नाही. तो सामाजिक दायित्वाचा, समाजसेवेचा, राष्ट्र निर्मितीचा, समाज घडविणारा आणि नैतिक मूल्यांची पेरणी करणारा पेशा आहे. समाजाला सुयोग्य वाटेने घेऊन जाण्यासाठी परिवर्तनांचे दूत असलेला आणि अवघ्या समाजासाठी वाटाडया ठरणारा हा पेशा आहे. शिक्षक हा नेहमीच भूतकाळ आणि वर्तमान यांचे बंध निर्माण करीत भविष्याची निर्मळ वाट निर्माण करीत असतो. समाज व राष्ट्राची निर्मिती त्याच्या सकस विचाराच्या पेरणीतून होत असते. त्यामुळे शिक्षकांची शक्ती व्यवस्थेने मान्य केली आहे.

शिक्षकांच्या प्रति वर्तमानात अधिक अपेक्षा केल्या जात आहेत. त्याबददल निश्चित मत मतांतरे असतील, पण वर्तमानातही समाज केवळ शिक्षकांकडूनच अपेक्षा ठेऊन आहे. याचे कारण त्या पेशाचे मोठेपण समाजाने मान्य केले आहे. शिक्षक चुकला तर त्यावर मोठी चर्चा होते याचे कारण मूल्यांचा तो प्रेरक आहे. त्यामुळे ते घडत राहाते आणि घडत राहाणार आहे. ज्या दिवशी शिक्षणातून चांगला शिक्षक संपुष्टात येईल त्या दिवशी समाजातील सामाजिक, राजकिय, सांस्कृतिक, धार्मिक विचारांचा सदमार्गांचा प्रवास थांबेल. तो प्रवास थांबला की मानवी जीवनाचा प्रवासही पशुत्वाच्या दिशेने घडू लागेल. समाजाला चांगले शिक्षक हवे आहेत आणि समाजाच्याही त्यांच्याकडून अपेक्षाही आहेत.

Title Name
खेळता खेळता शिकूया..
शिक्षकीपेशाची तुटवू वाट....

खरेतर वर्तमानात ज्या काही अपेक्षांचे ओझे वाटते आहे, त्या प्रमाणे भूतकाळात देखील शिक्षकी पेशांकडून मोठया प्रमाणावर अपेक्षा होत्या. गिजूभाई बधेका या शिक्षणतज्ज्ञाने आपल्या जीवन प्रवासात बालशिक्षणाबददल जितके म्हणून चिंतन केले आहे, तितकेच चिंतन शिक्षकी व्यवसायाबददल देखील केली आहे. शिक्षक कोणी व्हावे? या संदर्भाते त्यांनी निश्चित दिशादर्शक मते व्यक्त केली आहेत. ती मते म्हणजे हा अत्यंत कठिण पेशा आहे. शिक्षकी पेशा स्विकारणे म्हणजे स्वतःला त्या पेशासाठी समर्पित करणे आहे. भूतकाळात त्यांनी व्यक्त केलेले मते वर्तमानात देखील लागू होतात. त्यांनी म्हटले आहे, की “ज्याला शिक्षक व्हायचे आहे त्याला त्या पेशाची आवड असली पाहिजे” खरेतर ती आवड अंतकरणातून असायला हवी. ती दिखाऊ स्वरूपात किंवा इतर लाभासाठी असून चालत नाही.

त्याच बरोबर “शिक्षक होण्यासाठी लागणारी योग्यता आणि क्षमता देखील त्याच्यात सामावलेली असायला हवी” या अपेक्षा आहेतच. या कालही होत्या आणि आजही आहेत उद्याही असणार आहे. गिजूभाईच्या मते शिक्षणांचे कार्य हे आत्मोन्नतीचे साधन आहे. शिक्षक हा शिक्षकी पेशातून सातत्याने स्वतःला उन्नत करीत असतो आणि त्याच प्रमाणे विद्यार्थ्यांचे आयुष्य देखील आत्मोन्नत करण्याच्या दिशेने प्रवाहित करीत असतो. शिक्षणातून माणूस घडविला जात असतो. शिक्षकीपेशा म्हणजे केवळ सरकारी नोकरी, उपजीवेकाचे साधन नाही यावर त्याचा ठाम विश्वास असतो. माणूस निर्मितीची शक्ती शिक्षणात आहे अशी त्यांची धारणा असते. त्यादिशेचा प्रवास घडविणारी शक्ती ज्यात सामावलेली आहे अशी व्यक्ती शिक्षक होऊ शकेल असे गिजभाईंना वाटत होते.

त्याच बरोबर ज्याला शिक्षक व्हायचे आहे अशा प्रत्येक व्यक्तीची परिश्रम करण्याची तयारी असली पाहिजे. शिक्षक म्हणून फारसे शारीरिक परीश्रम नसले तरी बौध्दिक परीश्रमासाठी सातत्याने प्रयत्नशील राहाण्याची गरज आहे. खरेतर शिक्षक म्हणजे सातत्यपूर्ण अखंड परिश्रम आहेत. जो माणूस केवळ पदवी घेतो आणि त्या पदवीच्या ज्ञानावरती आपला शिक्षकीपेशाचा प्रवास सुरू ठेवतो. तो शिक्षक कसा होऊ शकेल? शिक्षक होणा-या व्यक्तीने सतत ज्ञानाची साधना करण्याचा प्रयत्न करायला हवा. जिथे ज्ञानाची साधना थांबते तेथे शिक्षकीपेशाची योग्यता दूर पावते. ज्ञानाची साधना करणे, ज्ञानाचे उपयोजन करणे, नवनविन जे काही असेल त्याची स्विकृती करणारी मानसिकता असणारी व्यक्ती शिक्षकी पेशाला पात्र आहे.

Title Name
चित्र वाचूया... शिक्षण करूया...
शिक्षकीपेशाची तुटवू वाट....

खरेतर शिक्षण हे सातत्यांने परिवर्तनशील असते. त्या परिवर्तनांच्या वाटेवर आपण चालत राहायला हवे. ज्ञानाचा प्रवाह सतत वाहत असेल तर त्या प्रवाहात डुंबायला हवे. जेव्हा पाणी साठलेले असते तेव्हा त्या पाण्याचे डबके होते. त्या पाण्याला दूर्गंधी येते आणि ते पाणी टाकाऊ होते. जी गोष्ट साठवलेली असते ती कधीच प्रवाहित आणि शुध्द राहू शकत नाही. त्यामुळे ज्ञानाच्या बाबतीत देखील आपण प्रवाहित राहायला हवे. ही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली होती. जो शिक्षक ज्ञानाची साधना करीत नाही तो कधीच चांगला शिक्षक होऊ शकत नाही.

एक चीनी प्रवासी आपल्या जीवनाच्या अखेरच्या क्षणी भारताचा प्रवास करीत होता. तेव्हा त्याचे वय 98 होते. या वयात तो प्रवासी जहाजावर हिंदी भाषा शिकण्यासाठीचा अभ्यास करीत होता. तेव्हा त्या वयात भाषा शिकण्याची साधना पाहून एका तरून विद्यार्थ्याला वाटले आता या प्रवाशाचे आयुष्य तरी किती उरले आहे. येत्या काही वर्षात या माणंसाल मृत्यू शिवेल तरी हा माणूस नविन भाषा शिकतो आहे. त्याला तरूणाला आश्चर्य वाटले म्हणून त्यांने त्या वृध्द व्यक्तिला प्रश्न विचारला, आता हिंदी भाषा शिकून काय करणार आहात..? तेव्हा तो चिनी भाषिक उत्तर देतांना म्हणाला “मरणाच्या दारात जातानाही मी शिकत होतो याचा मला अधिक आनंद मिळत राहावा. मी शेवटच्या क्षणापर्य़ंत शिकत आहे याचे मला कितीतरी समाधान आहे” हे ऐकूण त्या तरूणाला स्वतःचीच लाज वाटू लागली.

या वृध्दाचे प्रयत्न म्हणजे अखंड ज्ञानाची साधना आहे. आय़ुष्याच्या प्रवासाचे रूपांतर तर जीवनात करावयाचे असेल तर ज्ञानवंताशी मैत्री,पुस्तकांशी संगत करावी लागते. ज्ञानोध्दरासाठी अखंड साधनेचा प्रवास सुरू ठेवावा लागतो आणि आयुष्य काढण्यासाठी कोहीही नाही केले आणि कोणाशीही संगत केली तरी चालते. जीवनातील दुःखे ज्ञानाने कमी होतात म्हणून पूर्वी महाकाव्यात प्रतिबिंबीत झालेले शिक्षक कधीच दुःखी दिसत नव्हते. त्यांना शिक्षकीपेशाची प्रकाशमय पाऊलवाट सापडली होती. त्यामुळे त्यांना आदरही मिळत होता. राजसत्ता त्यांच्या चरणावरती नतमस्तक होत होती. ज्ञानातील अंतर जितके अधिक असेल तितका आदर अधिक असतो.

Title Name
हमारी स्टाईल भी अलग है...
शिक्षकीपेशाची तुटवू वाट....

शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या ज्ञानातील अंतर अधिक असायला हवेच असते. त्यासाठी सतत ज्ञानाचा उपासक म्हणून शिक्षकांला तयारी दर्शविण्याची गरज आहे. ते जितके अंतर अधिक असेल तितका शिक्षक आदराला पात्र ठरत असतो. शिक्षक म्हणून आपल्या कामात अधिक गुंतून जाणे त्याला आवडत असते. शिक्षकीवृत्ती असणारी माणंस स्वतःला गाढून घेतात. त्यांची पाऊलवाट निश्चित असते. ते काम करतांना आपली कोणी निंदा करते आहे, कोणी स्तुती करते आहे याचा विचार शिक्षक करीत नसतो. आपले काम निष्ठेने आणि प्रामाणिकपणे करीत राहाणे यावरती त्याचा विश्वास असतो. जेव्हा एखादी व्यक्ती त्याचे काम स्तृतीसाठी आणि हेतब ठेऊन करीत असते तेव्हा त्यातील आनंद, समाधान हरवलेले असते.

समाधान हे तर हे आंतरिक असते.ते मिरविण्यासाठी कधीच असू शकत नाही. कोणालाही समाधान तेव्हा मिळते, जेव्हा आपण आतल्या आवाजाने आपला प्रवास सुरू ठेवतो. स्वतःच्या कामावर त्याची निष्ठा असते. खरेतर कोणत्याही व्यवसायात य़श प्राप्त करायचे असेल तर त्या व्यवसायावरती निष्ठा असायला हवी. ती निष्ठा तर तेव्हा हदयीत असते जेव्हा त्या व्यवसायाची प्रतिष्ठा प्राप्त करण्यासाठी अखंड ज्ञानाची साधना सुरू असेल. शिक्षकी पेशाबाबतची निष्ठा किती असते हे इतिहासातील अनेक शिक्षकांच्या जीवन प्रवासावरून दिसते.

सानेगुरूजींचा अखंड जीवन प्रवास त्याचा साक्षीदार आहे. स्वामी विवेकांनद यांनी त्यांच्या जीवन प्रवासाच्या अखेरच्या दिवशी आपले सहकाही, गुरूबंधू यांच्यासाठी एक संस्कृतचा त्रास घेतला आणि आपल्या खोलीत जाऊन ते आराम करू लागले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. अर्थात त्यांना त्यांचा मृत्यू दिन अगोदरच माहित होता असे त्यांच्या चरित्रकारांनी लिहून ठेवले आहे. मृत्यूत्या शेवटच्या क्षणापर्यत शिक्षक म्हणून अध्यापनाचे काम करीत राहाणे ही व्यवसायावरील निष्ठा होती. आजही समाजात अनेक शिक्षक या मार्गाने जात आहेत. समाजात कै,प्राचार्य मधूसुधन कौंडीण्य, मा.प्रा.रावसाहेब कसबे, मा.प्रा.अलिम वकिल, कै.मा.प्रा.दिलीप धर्म, प्रा,श्रीनिवास हेमाडे, प्रा.मारूती लामखडे यासारखी अनेक माणसे मी अनुभवली आहेत.

अनेकांच्या आय़ुष्यात अशी शिक्षक असतातच. त्यांना समाजाने स्विकारले. पण ती माणंस आपल्या ध्येयाने चालत राहिली. ही माणंस म्हणजे गिजूभाईच्या स्वप्नातील शिक्षकांचे प्रतिबिब असते. समाजात जे काही उत्तम घडते आहे त्याचे कारण शिक्षणाची पेरणी असते. आणि जे काही नको असलेले दिसते आहे त्यामागे देखील शिक्षणच असते.त्यामुळे भविष्य उज्वल करण्यासाठी आणि त्या दिशेचा प्रवास घडवून आणण्यासाठी पदवी नाही तर ज्ञानसाधकांची गरज अधिक आहे. ती गरज भागली की समाज ज्ञानमय बनेल. समाज ज्ञानमय असेल तर अर्थव्यवस्था आणि प्रगती ही देखील ज्ञानमय बनेल.. त्यातून एका चांगल्या राष्ट्राचा आणि समाजाचा प्रवास सुरू होतो.. शेवटी पैसा हे विकासाचे साधन आहे पण जगण्यासाठी आनंद आणि समाधान हवे असते.. तो प्रवास शिक्षणाच्या प्रक्रियेतून होतो.. त्यासाठी शिक्षणाची दृष्टी आणि मनुष्यबळाची वृत्ती विकसित करण्याची गरज आहे.

_संदीप वाकचौरे

(लेखक शिक्षण क्षेत्राचे अभ्यासक आहे.)

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com