Friday, April 26, 2024
Homeब्लॉगशिक्षणाचा प्रवास, एक आनंदयात्रा

शिक्षणाचा प्रवास, एक आनंदयात्रा

जीवनात आंनंद निर्माण करण्यासाठी शिक्षण असते. शिक्षणाचा प्रवास म्हणजे आनंदयात्रा आहे. शिक्षण घेतले की आनंद मिळतो. पण तो आनंद शिक्षणातील पदवीने की ज्ञानाने हे शिकणारा कसे समजून घेतो यावरच जीवनाचे यश अवलंबून असते. अनेकदा शिक्षण का? असा प्रश्न विचारला तर गोंधळ उडतो, कारण शिक्षण घेतांना का? असा प्रश्नच मुळात कोणी कोणाला विचारत नाही आणि विचारला तर तो पाठयपुस्तकाच्या आशयाभोवतीचा असतो.

शिक्षण का घ्यायचे असा प्रश्न स्वतःच स्वतः विचारला तरी मनात प्रश्नच असतो ना ! स्वतःभोवती देखील या प्रश्नाचे गारूड असतेच. जन्माला आला की घरातील माणंस शिक्षणाच्या दारात मुलांने वयाची अट पूर्ण केली का धाडतात. शाळेच्या आवारात जाताच वय लक्षात घेऊन त्याला योग्य त्या इयत्तेचा उंबरा ओलांडायला सांगितले जाते. तो ओलांडला की त्या इयत्तेचा निर्धारित पाठयपुस्तकाचा विचार लादला जातो. त्याला काय हवे याचा विचार नसतो..? त्याला शिकण्याची इच्छा आहे काय..? शिकायचे आहे मात्र का शिकवायचे आहे..? याचा कोणताही विचार नाही..किंबहूना तसा विचार करण्याची प्रक्रिया आपल्याकडे उपलब्ध नाही.

- Advertisement -

एकूण ज्याला शिकायचे आहे त्याला काय हवे..? कोण हवे..? कसे हवे..? का हवे..? याचा काही विचार नाही. शिक्षण म्हणून मोठयांना काय हवे.. त्याला कोठे घेऊन जायचे आहे हे ठरवितात आणि त्या दिशेने प्रवास सुरू ठेवतात. मुल केवळ शिकत राहाते.. पण का याचे उत्तर नसते.. योग्य वय झाले की शिक्षण थांबते. हातात पदवी मिळते… नोकरी,व्यावसायाची पाऊलवाट निर्माण होते. त्या पाऊलवाटेने प्रवास सुरू होतो…आणि एका क्षणी आनंदाच्या पाऊलवाटा हरवत जातात.. निराशेची वाट सापडते.. शिक्षण घेतल्यानंतरही आनंद कोठे आहे हे दिसत नाही. आणि शिक्षण घेतांना जे काही मिळावे असे मोठयांना वाटते ते सर्व मिळाल्यानंतर देखील स्वतःला आंनंद मात्र मिळत नाही.. आनंदापेक्षा जीवन दुःखांने भरलेले दिसते. मग शिक्षण कुचकामी आहे का असा प्रश्न कोणालाही पडतोच.. शिक्षण आनंदाचा प्रवास असूनही आनंदाची वाट सापडत नाही कारण शिक्षणाच्या हेतू शिवाय हा प्रवास सुरू असतो.

मुळतः आनंद कोठे असतो. तर ज्याचा हेतू ठाऊक असतो आणि तो हेतू साध्य झाला की आनंद मिळतो. जेव्हा एखादा प्रवास सुरू करतो तेव्हा तो प्रवास जर आपल्याला कोठे जायचे आहे हे ठाऊक नसेल तर तो कितीही काळ चालू राहिला तरी उददीष्टाची साध्यता नाही, म्हणून तो प्रवास घडतो पण दुःखद असतो. शिक्षणचा प्रवासही असाच काही आहे का? असा प्रश्न पडतो. माणूस शिक्षण का घेतो? हा प्रश्न आहे.. शिक्षणाची चर्चा जेव्हा जेव्हा होते, तेव्हा तेव्हा शिक्षण हे शहाणपणाची पेरणी करण्यासाठी, ज्ञान मिळविण्यासाठी अशा उददात्त हेतूचा विचार अधोरेखित केला जात असतो. पण खरच तस काही शिक्षणाच्या प्रक्रियेतून अधोरखित होते का? तर त्याचे उत्तर नाही असेच येते. शिक्षणातून मुलगामी परिवर्तन अपेक्षित आहे. पण शिकलेली माणंस आपल्या भोवती जेव्हा जेव्हा दिसतात तेव्हा तेव्हा वरवरचा प्रतिसाद सकारात्मक असला, तरी आंतरिक प्रतिसाद सकारात्मकतेने असलेली माणंसाची संख्या तशीच फारच कमी दिसते. शिक्षणाने माणंसात माणूसपणाची पेरणी अपेक्षित असेल तर सर्वाधिक संघर्ष आणि हिंसा तर शिकलेल्या माणंसात भरलेली दिसून येते.

जग अधिक साक्षर होते आहे. समग्र विश्व शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणासाठी प्रयत्न करीत आहे. अनेक राष्ट्र त्यासाठी कोटयावधी रूपये खर्च करीत आहे. साक्षरतेचे प्रमाण वाढत आहे. शिक्षित संख्येचा आलेख जसा उंचावत आहे त्याप्रमाणे जग महायुध्दाच्या जवळ जात आहे. सध्या जगभरात प्रगतीच्या सोबत शस्त्रास्त्रांची मोठी स्पर्धा सुरू आहे. त्या स्पर्धेत दिवसेंदिवस वाढ होतांना दिसत आहे. ज्या प्रमाणे जग एका हिंस्त्रतेच्या आणि दहशतवादाच्या टोकावर उभे ठाकले आहे. त्या प्रमाणे मानवी जीवनात देखील हिंस्त्रतेचे अनुभव सातत्यांने आपल्या अवतीभोवती दिसतो आहे. मानवी संबंधात देखील नकारात्मकता भरली आहे. त्यामुळे शिक्षणाचा विचार रूजला नाही हे लक्षात येते. शिक्षणाच्या व्दारातून शांततेचा मार्ग जातो असे सुविचार वाचूनही ते कोठे दिसत नाही. शिक्षण घेतलेली माणंस अधिक अस्थिर दिसतात. शिक्षणातून त्याग उंचावणे आणि लोभ कमी होणे अपेक्षित आहे. मात्र सध्यात तर न्यायालयातील प्रकरणांची वाढती संख्या. पोलीस स्थानकातील उंचावलेला गुन्हयांचा आलेख.. भ्रष्टाचाराचा पावलोपावली येणारा अनुभव शिक्षणाच्या तत्वज्ञानाच्या विरोधी अनुभव देतांना दिसत आहे. जे पेरायचे ठरविले होते ते विसरून दुसरे काही पेरले गेले का असा प्रश्न पडतो. शिक्षणाच्या हेतूशिवाय बरेच काही उगवले गेले असे अनुभवाला येते.

शिक्षण आनंददायी तेव्हा होते जेव्हा त्याचा हेतू नेमकेपणाने अधोरेखित केलेला असतो. एकदा विद्यार्थ्याला शिक्षणाचा हेतू जाणता आला, की त्याच्या प्रवास योग्य दिशेन सुरू होतो. मी का हा प्रवास करतो आहोत हे विचार विचाराच्या केंद्रस्थानी असला, की त्या प्रवासात आपल्याला जे जे दिसते आणि भेटते त्याकडून शिकणे आपोआप घडत राहाते. मग या प्रवासात काय शिकायचे असा प्रश्न पडत नाही. यशवंतराव चव्हाण यांना वर्गात शिक्षकांनी विचारले होते “तुला काय व्हायचे आहे?” तेव्हा त्यांनी मला “य़शवंतराव” व्हायचे आहे, उत्तर दिले. जीवनाचा हेतू इतक्या लहाणवयात कळाला असेल का? पण यशवंत ते यशंवतराव हा प्रवास शिक्षणातून अधोरेखित झाला, म्हणून जीवन साध्यता जाणता आल्यांने हा माणूस एका उंचीवर पोहचू शकलो. ती उंची शिक्षणाने लाभली असे म्हणता येईल का..? पण शिक्षणाने अधिक चांगले काय हे कळण्यास मात्र निश्चित मदत झाली आहे. त्यामुळे यशाच्या शिखरावर पोहचल्यानंतरही पाय जमिणीवर राहीले.

मुळतः शिक्षणाचा हेतू काही देणे, काही लादणे हा नाहीच आहे. माणंसात आत जे काही आहे ते बाहेर काढणे हा हेतू आहे. सुप्त शक्तीचा शोध घेणे. त्या सुप्त गुणांचा परिपोष करण्याचे काम शिक्षणातून व्हायला हवे असते. शिक्षणाचा हा हेतू लक्षात आला, तर प्रत्येक मुल त्या दिशेने प्रवास करू लागेल. पण शिक्षणातून हेतूच नाही तर केवळ साक्षरतेचा विचार पेरला जाणार असेल तर आपण माणूस कसा निर्माण करू शकतो..? जेव्हा शिक्षण दडलेले बाहेर काढण्यात अपयशी ठरते तेव्हा प्रज्ञावान मुले शिक्षणाच्या बाहेर पडतात. ती मुले मग स्वतःच्या प्रवासाच्या वाटा स्वतः निर्माण करतात. ऍपल कंपनीचा मालक स्टीव्ह जॉब्ज हा विदयार्थी काही पदवीधर नाही. त्यांच्याकडे शिक्षणाची पदवी नाही. आर्थिक परीस्थिती नाही. जेवनासाठी हा माणूस पायपीट करीत होता, पण त्याच्या आत जे काही ठासून भरलेली प्रज्ञा आणि शहाणपण होते. त्याच्या जोरावरती त्यांनी संगणक निर्मितीत पाऊल टाकले. ते त्यांचे पाऊल वेडेपणाचे होते. कोणतीही पदवी नाही..अनुभव नाही ,आर्थिक पाठबळ नाही तरी हे धाडस होते. पण ते यश हे त्यांच्या प्रज्ञेचे होते. शिक्षणाने दडलेले बाहेर काढण्यासाठी केलेल्या प्रयत्नात त्यांना यश मिळाले नाही, त्यामुळे शिक्षण अपयशी ठरले होते. पण हे मुल जीवनाच्या प्रवासात प्रचंड य़शस्वी झाले होते. असाच अनुभव कितीतरी यशाचे शिखर चढलेल्या अनेकाच्या आयुष्याला आलेला पाहावयास मिळतो. फेसबुक स्थापन करणारे झुबेनबर्ग, डेलचे संस्थापक, आईन्स्टाईन ही सर्व मंडळी शाळाबाहयच होती. त्यांना शिक्षण व्यवस्थेने जाणून घेतले नाही किंवा त्यांना वर्तमानातील शिक्षण व्यवस्था सामावू शकली नाही. त्यामुळे त्यांच्या जीवनावर अपयशाचा शिक्का बसला नाही मात्र शिक्षण अपय़शी ठरले हे अधोरेखित झाले.

सध्या शिक्षणाचा उददेशत मुळतः तात्कालिक असा अधोरेखित होतांना दिसत आहे. शिक्षणाने समग्र जीवन आनंददायी व स्मरणीय ठरविण्याचा हेतू नाही. अनेकदा शिक्षण घे असे शाळेच्या चार भिंती आणि घराच्या भिंतीत सतत सांगितले जाते. ते सांगतांना का? अशा प्रश्नाचे उत्तर हे नोकरी मिळेल चांगली. मग छोकरी मिळेल चांगली. असेच असते. त्यामुळे शिक्षणातून या गोष्टी साध्य करण्यासाठी शिकणे सुरू राहाते. त्या घडाव्यात म्हणून आणि चांगले गुण मिळविण्याचा प्रवास म्हणून अभ्यास केला जातो.. त्यात मार्क मिळाले, की पदवी मिळते आणि मग नंतर नोकरी आणि त्यानंतर हवे ते मिळाले की शिक्षणाचा हेतू थांबतो. आणि मग शिक्षणही थांबते. निरंतर मानवी उन्नतीकरीता असते याचा विचार थांबतो…आणि आनंदाचा प्रवासही रोखला जातो. त्यामुळे शिक्षणाचा हेतू जो पर्य़ंत उदात्त आणि उन्नतीच्या दिशेने घडत नाही तोपंर्यत शिक्षणातून संघर्ष, व्देष, मत्सर पेरला जाणार हे निश्चित आहे.

_संदीप वाकचौरे

(लेखक शिक्षण क्षेत्राचे अभ्यासक आहेत.)

- Advertisment -

ताज्या बातम्या