चित्र वाचूया... शिक्षण करूया...

विज्ञानाच्या जगात अनेक लागलेले शोध हे निरिक्षण शक्तीवरती लागले आहे हे आपण वाचतो. मुलांना ज्यात आनंद मिळतो त्यात मोठयांसाठी काहीच नसले तरी मुले त्यात तासंनतास त्याच कृतीत हरवून जातात. शिकण्यासाठी फार महागाच्या गोष्टी, वस्तूंची गरज नाही. मुलांना स्वातंत्र्य मिळाले आणि त्यांच्यावरती असलेला शिकण्याचा दबाव संपवला, की शिकणे सुरू होते... शिक्षणक्षेत्राचे अभ्यासक संदीप वाकचौरे यांची ‘शिक्षण भवताल’ ब्लॉग मालिका...
चित्र वाचूया... शिक्षण करूया...

परवा घरासमोरील कुंडयामध्ये लावलेल्या रोपटयाला आलेल्या फुलांचे लहान मुले अत्यंत तन्मयतेने निरिक्षण करीत होते. एकटक त्या फुललेल्या फुलांकडे इतक्यावेळ काय पाहात असतील? असा प्रश्न मनात घर करून होता. त्यांच्या त्या फुलांच्या निरिक्षणाच्या कृतीकडे मी देखील देखील पाहात राहीलो. मला कळेना ही मुले काय बर पाहात असतील..? वर्षानुवर्ष मी फुले पाहात आलो आहे.

घराच्या समोर ती फुलतात.. बहरतात.. आणि त्यांना कोणी तोडले नाही तर काही दिवसांनी ती कोमजून जातात. पण लहान मुलांसाठी अवतीभोवतीचा परीसर देखील शिकण्याचा भाग असू शकतो. त्या फुलात, झाडात, पानात आपल्यासाठी फार काही नसेल, पण त्या मुलांसाठी जिज्ञासावर्धक बरेच काही असू शकते. शिकण्यासाठी मुलांच्या हाती जे काही दिले जाते ते त्यांच्यासाठी शिकण्याचा भाग बनू शकते. आज मुले अंगणात बसून जे काही करीत होते तेच तर शिक्षणासाठी आवश्यक आहे.

विज्ञानाच्या जगात अनेक लागलेले शोध हे निरिक्षण शक्तीवरती लागले आहे हे आपण वाचतो. मुलांना ज्यात आनंद मिळतो त्यात मोठयांसाठी काहीच नसले तरी मुले त्यात तासंनतास त्याच कृतीत हरवून जातात. शिकण्यासाठी फार महागाच्या गोष्टी, वस्तूंची गरज नाही. मुलांना स्वातंत्र्य मिळाले आणि त्यांच्यावरती असलेला शिकण्याचा दबाव संपवला, की शिकणे सुरू होते. ज्या तन्मतेने ती मुले बसली होती ते पाहिल्यावर ही मुले शिक्षणात पराभूत होऊ शकत नाही हे जाणवत राहते.

गेले काही वर्ष शिक्षणात चित्रवाचन, चित्रवर्णन आणि चित्रगप्पा अशा घटकांचा समावेश करण्यात आला आहे. चित्र हे बालकांचे भावविश्व असते. त्या चित्रात मुले अनेक गोष्टी शोधत असतात. त्यात ते त्यांचा बालप्रवास शोधत असतात. त्यातील चित्राशी ते बोलत असतात. चित्रातील पात्रांशी बोलता बोलता, पात्रही एकमेकाशी बोलतील असे काही त्यांचे सुरू असते. म्हणून अगदी प्रारंभिक स्तरावरती मुलांना पुस्तक हाती देतांना अगदी अधिक रंगीत चित्र असलेली पुस्तके दिली जातात. ग्रंथालयात या मुलांना जेव्हा स्वातंत्र्य दिले जाते, तेव्हा ही लहान मुले सर्वात प्रथम चित्रांच्या पुस्तकांची निवड करतात. म्हणून आरंभीच्या सर्वच पाठयपुस्तकात मजकूरापेक्षा चिंत्रावरती अधिक भर दिलेला असतो.

मुले जेव्हा आरंभी पुस्तके वाचू लागतात, तेव्हा त्या मजकूरापेक्षा मुलांना अधिक साद तर चित्रच घालत असतात. त्या चिंत्राशी होणार संवाद हा मुलांच्या सृजनशक्ती विकासाला अधिक मदत करत असतो. चित्र एक पानाचे असले तरी तासंनतास त्या चित्रातून मुले काहींना काही शिकत असतात. त्यातून निरिक्षण शक्ती, भाषिक विकास, कल्पनाशक्ती, कार्यकारणभाव यांचा विकास होत असतो. एका अर्थाने मजकूरातून ते जितके शिकत नाही त्यापेक्षा एका चित्रातून अधिक शिकत असतात. माध्यमांच्या भाषेत एक हजार शब्द जे काम करू शकणार नाही त्यापेक्षा एक चित्र अधिक काम करीत असते. त्यामुळे भवतालचे निरिक्षण आणि चित्राचा उपयोग अधिकाधिक व्हायला हवा.

पूर्वी शाळेत पाठयपुस्तके मोफत मिळत नव्हती. त्यात आर्थिक परीस्थिती चांगली असणा-या विद्यार्थ्यांचे प्रमाण देखील कमी असायचे, त्यामुळे नवे पुस्तके विकत घेऊन वर्गात येणारी विद्यार्थी संख्या तशीच कमी. फार तर पहिली, दुसरीत सर्वांना नवी पुस्तके हौशेने घेतली जायची. बालभारतीच्या पुस्तकांच्या किंमती देखील फार नव्हत्या. तरी पण अनेकांना ते परवडत नव्हत्या. पुढच्या वर्गात मात्र सातत्याने जुनी पुस्तके वापरली जात होती. त्यामुळे पुस्तकांची काळजी घेणे यायचे. शिक्षक आणि पालक पुस्तकाच्या मुखपृष्ठाला पहिल्या दिवशी आवरण घालण्यास सांगत. अनेकदा पालक किंवा घरातील मोठे भावडें ते काम हक्काने करायचे. आताही ती परंपरा कायम आहे. त्यामुळे मुखपृष्ठ वाचण्याची संधी फारशी मिळाली नाही.. पण त्या चित्रातील भावंडे मात्र कायम खुणावत राहिली.

आता मुलांनी पुस्तके फाडू नये, खराब करू नये म्हणून आवरण घातले जाते. गेले काही वर्ष राज्यात महाराष्ट्र शासन दरवर्षी विद्यार्थ्यांना नवीकोरी पुस्तके मोफत देत आहेत. खरेतर पुस्तक हाती पडल्यावर पहिले काही दिवस आवरण घालण्याच्या फंदात पडताच कामा नये. पुस्तकाचे मुखपृष्ठावर असलेल्या चित्राशी मुलांचे काही नाते असते. त्या चित्रातील पात्र मुलांना भावत असतात. त्या चित्राशी गप्पा मारणे व्हायला हवे असते. खरेतर पुस्तकात पूर्वी मजकूराशी नाते सांगणारी चित्र असायची, पण अलिकडे मात्र स्वतंत्र्यपणे चित्र देण्यात येत आहेत. त्या चित्राशी कोणताही मजकूर जोडलेला नसतो. ते चित्र स्वतंत्र्यपणे वाचायला हवे असते.

अनेकदा चित्र आहे त्यात काय एवढे असे मोठयांच्या नजरेने वाटणे साहजिक आहे. मात्र आरंभी जे चित्र असते त्या चित्राचे वाचन मुल करीत असते. त्यात त्या चित्रात काय काय दिसते ते सांगते. अगदी वरवर चित्र वाचले गेले तर मोठया मोठया वस्तू, प्राणी, पक्षी यांची नावे सांगेल, पण मुल जसे जसे चित्रवाचत जाते आणि त्याच्या वाचनासाठी शाबासकीची थाप मिळत जाते त्या प्रमाणे मुले चित्राचा विचार अधिक करत जातात. बाजारातील हातगाडीवर दिसणारे फळे, भाज्या यांची देखील नावे सांगत जाते. साधारण जे दिसते ते सांगण्याचा प्रयत्न मुल करीत असते. पण त्यापुढचा टप्पा म्हणून त्या चित्रात जे पात्र आहेत त्या पात्रा बददल बोलणे करू लागले. चित्रात जे दिसते त्याचा आकार, रंग, उंची याबददल देखील बोलते. वस्त्र, अंगावरील आभूषणे, नाक, डोळे, हात, पाय, विविध अवयव, आकार या बददल देखील बोलत असते.

मात्र हे सांगणे बालकासाठी महत्वाचे असते. त्याच बरोबर या वर्णनानंतर चित्रगप्पांमध्ये मुल अधिक रंगतांना दिसते. यात चित्रात जे पात्र असतील ते एकेमकाशी काय बर बोलत असतील? असा प्रश्न केला तर मुल अंदाज लावायला शिकते. त्यातून ते त्याच्या पूर्वानुभवाशी जोडून संवाद जोडण्याचा, सांगण्याचा प्रयत्न करीत असते. त्यामुळे बालक नकला देखील सादर करतांना दिसते. मुले चित्राचे निरिक्षण करीत हावभाव युक्त बोलण्याचा प्रयत्न करतात. त्यातून अप्रत्यक्ष भाषेच्या दृष्टीने महत्वाचे असणारे साभिनय, उच्चार, स्वराघात, लय, गतीचा विचार अधोरेखित होतो. त्याच प्रमाणे बोली भाषेतील शब्दांचा परीचय देखील होण्यास मदत होत असते. वर्गात अशा प्रकारे वाचन, वर्णन, गप्पांचा तासाचे आयोजन केले तर वर्गात आलेल्या विविध भाषेतील विद्यार्थ्यांची शब्द, भाषेची लय, उच्चाराची विविधता मुलांच्या कानी पडते. त्यातून मुलांची भाषा समृध्द होत जाते. शब्दसंपत्ती देखील वृध्दींगत होते.

चित्र वाचनातून अनेक अवकाशिय संबोध स्पष्ट होण्यास मदत होत असते. त्याच बरोबर एकाच चित्रात विविध विषयाचे अनेक घटक पूर्णत्वाला जात असतात. चित्र म्हणजे केवळ भाषिक विकास असे नाही तर त्यात एकात्मिक स्वरूपाचा विचार केला तर शालेय स्तरावरील अनेक विषयांचे नाते जोडले जाते. चित्र वाचनासाठी विद्यार्थी तयार असतात तेव्हा ते आपल्या पूर्वानुभवाशी जोडण्याचा प्रयत्न होतो. त्यामुळे जीवनातील अनुभव आणि शिक्षण यांचे एक नाते असते. हे प्रत्यक्ष अनुभवाला मिळते. त्यामुळे जीवन आणि शिक्षण यांचे नाते पक्के होण्याच्या दृष्टीने याची मदत होते. खरेतर चित्र वाचनाचा तास सातत्याने नियोजित करायला हवा. या तासिका केवळ प्राथमिकला उपयोगी आहेत असे नाही उच्च प्राथमिक स्तरावरती देखील त्याचा उपयोग होतो.आपण चित्र वाचनासाठी कशा स्वरूपाचे प्रश्न विचारून चित्रवाचनाची दिशा देऊन जातो हे महत्वाचे आहे.

आरंभी विद्यार्थी स्वतःहून वाचत जातील मात्र आपल्याला त्यांना योग्य दिशेने घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहे. या प्रकारे चित्र वाचनाची सवय लावली गेली तर मुलांमध्ये आपोआप निरक्षणाची सवय लागते. त्यातही सुक्ष्म निरिक्षणाची सवय जोडली गेल्याने शिकणे परिणामकारक होण्यास मदत होत असते. या स्वरूपाचे वाचन करतांना सुक्ष्मभेद, साम्यता या गोष्टी सहजतेने लक्षात येण्यास मदत होईल. त्याच बरोबर या निमित्ताने विद्यार्थी भाषण कौशल्य, विचाराची मांडणी, अनुभवाची मांडणी करण्यास शिकत असतात. अनेकदा आरंभी पूर्ण वाक्य मुल बोलू शकत नाही. मात्र या सारख्या अनुभवाने मात्र मुल हळूहळू पूर्ण वाक्यात संवाद साधन्याचे कौशल्य प्राप्त करू शकते.

अर्थात आरंभ हा नेहमी छोटया चित्रापासून केला जातो. एक चित्र मग दोन चित्र आणि त्यानंतर मोठे चित्र असा साधारण क्रम असावा. त्यातून चित्र वाचनासाठी लागणारी दृष्टी तयार होण्यास मदत होते. चित्र वाचनाकडून आरंभी अक्षर वाचनाकडे जाता येते. त्यामुळे अनेकदा मुल जेव्हा पुस्तक उघडते तेव्हा जर ते चित्र वाचत असेल तर त्याला आपण अभ्यास समजत नाही. मात्र मुलांच्या प्रत्येक कृतीचा संदर्भ शिक्षणाशी असतो. त्याला आपण अभ्यास म्हणत नाही इतकेच. मुले अक्षरे वाचण्यापूर्वी शिकण्याची सुरूवात चित्र वाचनापासून करतात. त्यामुळे लहान वयात शाळेत जाण्यापूर्वी अंगणवाडी, बालवाडीच्या वयात असणा-या बालकांसाठी घरात आणि परिसरात अशा स्वरूपाचे चित्र असलेली पुस्तके उपलब्ध असायला हवीत. त्याच बरोबर बिनभिंतीच्या शाळेत मुलांना मुक्त संचार करू देण्याची गरज आहे. शेवटी पुस्तकातील मजकूराचे अध्ययन म्हणजे शिक्षण असे नाही. तर भवताल वाचता येणे म्हणजे शिक्षण आहे. त्या अर्थांने शिक्षणाचा प्रवास घडवायला हवा.

- संदीप वाकचौरे

(लेखक शिक्षण क्षेत्राचे अभ्यासक आहे)

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com