Friday, April 26, 2024
Homeब्लॉगखेळता खेळता शिकूया..

खेळता खेळता शिकूया..

करोनाच्या काळात मुले सतत ऑनलाईन नावाच्या नव्या शैक्षणिक प्रक्रियेशी जोडली गेली आहेत. जे टाळायचा संदेश दिला जात होता तेच आता मुख्य साधन बनले आहे. करोना विषाणूच्या भितीने घराच्या आणि नात्याच्या भिंती अधिक भक्कम होत चालल्या आहेत. करोना झालेल्या रूग्नाला आपण जगात एकटेच आहोत असे वाटू लागावे असे अनुभव येता आहेत. त्याला आधार देणारे शब्दही हळूहळू हरवत चालल्याचा भास होतो आहे.सध्याचा काळ वेगवेगळे अनुभव देणारा ठरत आहे.

ज्या अपेक्षांनी जीवन फुलत होते त्या अपेक्षा ही भासमान वाटू लागल्या आहेत. नात्याची वीन तर अगदीच सैल झाली आहे. एकीकडे जीवन व्यवहाराचे असे चित्र आहे आणि दुसरीकडे शिक्षणाबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण होते आहे. लहान मुलांना तर घराच्या बाहेर पडू दिले जात नाहीत. पूर्वी विद्यार्थ्यांचे पुस्तक आणि शाळेशी असणारे नाते आता मोबाईल आणि दूरदर्शनशी जोडले जात आहे. घराच्या भोवतालची मैदाने,गावातील मैदाने आता तर हरवत चालली आहे. शिक्षण हक्क कायद्याने निश्चित केलेल्या निकषात खेळाचे मैदान सक्तीचे केले आहे. त्यामागे केवळ मैदानाचा निकष पूर्ण करणे अपेक्षित नाही तर त्याचा उपयोजन महत्वाचे आहे.

- Advertisement -

शाळेत पाय ठेवण्यापूर्वीच मुले मैदानावरती खेळत असतात. मात्र गेले काही वर्षात मुलांच्या आय़ुष्यातील मैदाने हददपार झाली आहेत. मुले शाळेत शिकता आहेत काही शाळांनी मैदाने नाहीत मात्र काही शाळांना मैदाने आहेत पण त्याचा किती उपयोग होतो याचाही विचार करण्याची गरज आहे. ज्यांचे नाते मैदानाशी आहे अशा थोडया फार विद्यार्थ्यांचे देखील वर्षभरात कोरानाच्या भितीने मैदानाशी नाते तुटले आहे. शहरात मैदाने आता दिसेनाशी होता आहेत. खरेतर मैदाने ही मुलांच्या विकासातील महत्वाचा दुवा आहे. विद्यार्थ्यांचे नाते जितके अधिक मैदानाशी असेल तितका व्यक्तीचा विकास अधिक होत असतो. तितकाच सामाजिक विकासाचा पाया देखील भक्कम रोवला जातो.

अलिकडे मैदानाशी नाते दूरावत चालल्यांने आता बरेच काही गमावतो आहोत असेच चित्र आहे. आपण जगभरातील विविध क्रीडा स्पर्धांमध्ये पराभूत झालो, की मग चर्चा सुरू होते ती शालेय स्तरावरील क्रीडांगणाची आणि क्रीडा विषयाची. पदके नाही मिळाली की आपणाला मग चिंता वाटते. त्या चिंतेतून चर्चा झडतात. पुन्हा नव्याने धोरणाची अपेक्षा व्यक्त होते.. काही काळ गेला की आपण त्याकडे फारसे गांभिर्य़ांने पाहाणे सोडून देतो.. आणि पुन्हा पराभव झाला की पुन्हा चिंता व्यक्त होते. मुळतः शालेय शिक्षणात देखील क्रीडा विषयाचे मोल जितके आहे तितके गंभीरपणे आपण त्याकडे पाहात नाही. सध्याच्या बौध्दिक स्पर्धेच्या वातावरणामुळे पालकही खेळाकडे गंभीरपणे पाहात नाहीत. खेळ खेळणे म्हणजे अनेकदा टाईमपास वाटतो. खेळाचा संबंध शिक्षणाच्या बौध्दिक प्रक्रियेशी असतो असे वाटणे देखील होत नाही.

खरेतर कधीकाळी मुलांच्यासाठी खेळ हा नेहमीच अग्रक्रमाचा भाग राहिला होता. खेळासाठी मुलांना काहीच नको असते. मुले स्वतःच खेळ खेळत असतात.त्यांचे खेळ ते शोधून काढतात. त्याचे नियम ते तयार करतात. त्यांचे ते खेळत असतात. पण त्यात ते जीव ओतत असतात. त्यातून त्यांची एकाग्रहता उंचावण्याबरोबर सामाजिक जीवनाच्या विकासाचा पाया घातला जातो. त्यामुळे खेळ म्हणजे व्यक्तिमत्व विकासाबरोबर इतर विषय शिकण्याच्या दृष्टीने महत्वाचा विषय आहे. रवींद्रनाथ टागोर यांनी म्हटले आहे की मुलांना महागाचे खेळणे नको असते, तर त्याला जे खेळणे मिळते त्याच्याशी खेळण्याचे स्वातंत्र्य हवे असते. ते खेळणे मोडून, तोडून, जोडून खेळता यायला हवे असते आणि पालक म्हणून आम्हाला महागडे खेळणे हवे असते. त्यात आमच्या दृष्टीने त्यात सौंदर्य हवे असते.

त्या खेळण्यात आपली प्रतिष्ठा सामावलेली असते. त्यामुळे ती महागडी खेळणी खरेदी करून त्यांना शोकेसमध्ये ठेऊन त्यांना देखणे पण प्राप्त करून दिले जाते. पण त्यातून विद्यार्थ्यांचे नाते मात्र जुळत नाही. त्यामुळे खेळणे घरात असले तरी मुलांच्या विकासात त्याचा सहभाग असत नाही. त्यामुळे मुले घरातच टाकाऊ असलेल्या वस्तूंचा उपयोग करीत खेळ खेळत असतात. खाऊच्या कागदाचा चेंडू करतील, पंतग करतील. मातीच्या चिखलाचा बैल करतील आणि देव करतील.अथवा चिंचोके एकत्रित करून खेळ खेळतील. त्यात त्यांना आनंद असतो.कारण त्यात त्यांना स्वातंत्र्य असते.

कधीकाळी मोठयांसोबत गप्पा मारताना ते आजही ज्या खेळांची नावे सांगतात. त्या खेळांची नावे तर क्रीडा शिक्षणाच्या यादीत असत देखील नाहीत, पण ते पारंपारिक खेळ सातत्याने खेळली जात आहेत. त्यात कदाचित नियमात बदल होता आहेत. अगदी गावात सुरपारंब्या, आबाधोबी, चंपलपाणी, टायर खेळणे, सागरगोट्या, विटीदांडू, गोटया, मडक्याचे खापर एकमेकावर ठेऊन चेंडूने पाडण्याचा लगोरीचा खेळ असू दे, नाहीतर खडे खेळणे असू दे. कवडयांचा खेळ असूदे. लहान वयातील अनेक खेळ मुलांनी स्वतः विकसित केलेली आहेत. त्यासाठी फारशी गुंतवणूक नाही आणि साहित्य देखील लागत नाही.

मात्र त्या खेळातून मिळणारा आनंद इतरत्र पैसे देऊनही मिळणे अशक्यच आहे. आज शहरी भागात खेळ खेळण्यासाठी जागाच उरलेल्या नाहीत. सिमेंटच्या जंगलात आपण मुलांच्या विकासाच्या वाटा बंद केल्या आहेत. त्याच बरोबर सुरक्षा आणि चिंता या कारणाबरोबर अभ्यासाची प्रगतीची चिंता यामुळे चार भिंतीच्या आत मुलांना राहावे लागत आहे. त्यामुळे शारीरिक विकासाची प्रक्रिया आटत चालली आहे. गेले काही वर्षापासून शाळेच्या आवारात मुल दाखल झाले की त्याच्याकडून आंरभी खेळ खेळून घेण्याकडे शाळा आणि शिक्षकांचा कल वाढत चालला आहे. आरंभीची बारा आठवडयांना शाळा पूर्व तयारीचा कालावधी म्हणून ओळखले जाते. त्यात विविध खेळांसह, भाषा कौशल्यांच्या विकासासह विविध उपक्रमाचे आयोजन करणे अपेक्षित आहे. त्यामुळे अगदी शाळेत टायर खेळणे, गोटया खेळणे, काचपुरणी खेळणे यासारखे खेळ सुरू करण्यात आले आहे.

चालणे,कागदाचे गोळे करणे, कागद फाडणे, माती खेळणे, मातीचे विविध आकार तयार करणे. सागरगोटे खेळणे, रांगोळी काढणे, मातीत बोटे फिरविणे, खड्यांच्या मदतीने विविध आकार तयार करणे या गोष्टी घरात होत नसल्यांने शाळेत करून घ्यावी लागत आहे. विविध प्रकारच्या भाज्या निवडणे, तांदूळ दाळ निवडणे यासारखे खेळ खेळण्याची सुविधा निर्माण केली जात आहे. त्यातून मुलांच्या स्नायूंचा विकास होतांना पाहावयास मिळत आहे. या प्रकारची छोटी छोटी खेळ खेळणे म्हणजे हस्त नेत्र समन्वय साधन्यासाठीची तयारी करणे असते. त्यामुळे मुलांची एकाग्रहता वाढण्याबरोबर बैठक क्षमता वाढविणे आहे.

अक्षर चांगले व्हावे यासाठीची तयारी करणे असते. वय वाढत जाईल त्याप्रमाणे खेळातही बदल होत जातो.अनेकदा मुले बैठे खेळा बरोबर मैदानी खेळातही मुलांची अभिरूची वाढत जाते.या खेळाकडे आपण विकासाची प्रक्रिया म्हणून देखील पाहाण्याची गरज असते.ती जशी शारीरिक विकासाची गरज आहे त्या प्रमाणे मानसिक विकासासाठी देखील महत्वाचे आहे.

खेळणे ही बालकांची गरज असते. अगदी लहान वयापासून मेंदू विकासाची गरज म्हणून खेळण्याकडे पाहायला हवे. मानवी मेंदूमध्ये डावा मेंदू आणि उजवा मेंदू असतो. त्यांच्या मध्यमागी कॉर्पस क्लोझम हा भाग असतो. तो भाग मेंदूचा समतोल साधण्याचे काम करीत असते. त्याच्या सक्षमतेसाठी बालकाची हालचाल महत्वाची ठरते. मेंदूची मागणी म्हणून खेळाकडे पाहाण्याची गरज आहे. खेळणे म्हणजे हालचाल असते. त्यामुळे अगदी लहान वयात मुलांना खेळू देणे म्हणजे मेंदूची मागणी पूर्ण करणे असते. त्यादृष्टीने आपण खेळाचे महत्व जाणायला हवे. आपण त्यांना एका जागी बसून ठेवणे, त्याच्यासाठी मोबाईल, दूरदर्शन वाहिन्यावरचे कार्यक्रम लावून देत त्याला खेळापासून दूर सारणे म्हणजे मुलांच्या विकासावर परिणाम करणे आहे हे लक्षात घ्यायला हवे.

बालकाचा विकास होताना त्याची खेळणे खूप महत्वाचे आहे. मात्र आपण अभ्यासाच्या दबावाखाली त्याच्या हालचाली आणि खेळांवरती बंधन आणून त्याचे नुकसान करीत असतो. त्यांतून त्याच्या वर्तनात बदल होतांना पाहावयास मिळतो. तो वर्तन बदल कधीच सकारात्मक असणार नाही, तर त्यातून अधिक नकारात्मकता निर्माण होत असते. त्यामुळे बालकांवरती संस्कार करणे म्हणजे शब्दांचे सुविचारी सुमने उधळणे नाही, तर त्याच्या विकासाची प्रक्रिया जाणून त्या वाटा निर्माण करणे असते. मुलांना मनसोक्त खेळू द्या.. त्यांना विकासाच्या दृष्टीने हव्या त्या संधी निर्माण करून द्या. त्याच्यात निर्माण झालेल्या उर्जेचे या मार्गाने दमन होऊदे.. मग ती उर्जा योग्य दिशेने प्रवाहित झाली तर बालकाच्या विकासाची प्रक्रिया गतीमान होण्यास मदत होत असते.

अन्यथा शरीरात साठवलेल्या उर्जेचा योग्य उपयोग झाला नाही तर ती उर्जा अयोग्य दिशा धरते आणि मग पालक म्हणून पश्चाताप करण्याची वेळ येते.आजच्या स्थितीत मैदाने बंद आहेत. शाळा बंद आहेत आणि मुले घरात आहेत. अशा वेळी पालकांनी त्यांच्या उर्जेचा उपयोग होईल असे खेळ अंगणात तरी खेळायला संधी निर्माण करायला हवी. शेवटी शिक्षणात देखील मैदानाशी नाते असायला हवे. केवळ एक तास नाही तर इतर विषय शिकण्याच्या, विकासाचा प्रक्रियेतील महत्वाचा तास म्हणून त्याकडे पाहायला हवे. खेळाचे महत्व शिक्षणातून जितके अधोरेखित होईल तितकी विकासाची प्रक्रिया गतीमान होईल. अन्यथा पराभव आणि चर्चा तर सातत्याने होत राहील. पालक व शाळांनी मैदानाशी नाते कायम ठेवण्यासाठी मार्ग काढायला हवा.. त्यातच सर्वांचे हित सामावले आहे. त्या दृष्टीने शाळा तेथे मैदाने हवेत पण गाव आणि सोसायटी तेथे देखील मैदानाची निर्मिती व्हायला हवी.

- Advertisment -

ताज्या बातम्या