Thursday, April 25, 2024
Homeब्लॉगसंवाद ही गरज

संवाद ही गरज

शाळेची सकाळची घंटा झाली की मुलांचे पाय शाळेच्या दिशेने हळूहळू चालू लागतात आणि शाळा सुटण्याची घंटा झाली की वेगाने धावत सुटतात. असे साधारण सर्वदूर चित्र असते. मग ती शाळा खाजगी असू दे नाहीतर सरकारी. साधारण प्रत्येक मुलाच्या बाबतीत हेच घडते. येतांना संथ पावले आणि जाताना धावणे घडते.

याचा विचार करायला हवा. मुलांना जेथे स्वातंत्र्य असते तेथे पावले धावतात आणि जेथे मनाच्या विरोधात काही घडत राहाते तेथे पावले संथ होतात. त्यामुळे शाळा जो पर्यंत विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी स्वातंत्र्य देत नाही, तोपर्यंत मुलांची पावले शाळांकडे धावणार नाही आणि स्वातंत्र्य नसेल तर सृजनशीलतेने नवे काही घडणार नाही.

- Advertisement -

शाळेत मुलांसाठी जे काही करायचे असते ते त्यांच्या मनाप्रमाणे घडण्याची संधी निर्माण करण्याची गरज आहे. अनेकदा मुले शिकत असली तरी त्यांना ना त्यांच्या मनासारखा संवाद साधता येतो, ना त्यांना त्यांच्या मनातील भावनाचे प्रगटीकरण करता येते. याचा अर्थ मुलांना आपल्या मनातील भावनाचे, विचाराचे प्रगटीकरण संवादात, लेखनात करता येत नाही का? खरेतर माणूस हा समाजशील प्राणी आहे. त्याची संवाद ही गरज आहे.जन्माला आलेले बालक प्रथम रडते हे देखील भावनाचे प्रगटीकरणच असते. मग जेथे जन्मजात प्रगटीकऱणाची भावना असते तेथे शाळेत गेल्यावर ती भावना मरते का ? असा प्रश्न पडतो.

मुळतः शाळेत कोणते विषय शिकायचे? कसे शिकायचे? कोणी शिकवायचे? हे तर मोठेच ठरवत असतात. मुलांना काय हवे याबाबतचा विचार मोठी माणंस करतात. मुलांना स्वतःला काही ठरविण्याचा अधिकारच नाही. वर्षभरात किती निबंध आणि कोणते निबंध घ्यायचे हे शिक्षक ठरवितात. असेच एकदा विद्यार्थ्यांना शिक्षकांनी निबंधाचा विषय दिला होता. विद्यार्थ्यांनी तो विषय ऐकला आणि ते खूष झाले. शिक्षकांना वाटले हा विषय सोपा आहे, म्हणून त्यांना आनंद झाला असावा,पण विद्यार्थी म्हणाले “ सर, तुम्ही जो काही विषय दिला आहे तो विषय निबंधाच्या पुस्तकात आहे.आता फक्त तो उतरून काढले की झाले ” .म्हणजे कोणत्याही प्रकारे विचार करण्याची गरज नाही.उद्याच निबंधाची वही जमा करतो.

खरेतर आपण निबंध, प्रश्न मुलांना जे काही देतो त्या प्रश्नाची उत्तरे लिहितांना त्यांना स्वतःच्या मनातील भावभावना ,विचार प्रक्रियेला किती संधी मिळते हा प्रश्न आहे. अनेकदा प्रश्नांमध्ये लेखकाला काय वाटते ? कवीला काय वाटते ? असे प्रश्न असतात.मात्र त्यात पाठातील,कवितेतील आशया अनुसरून तुला काय वाटते ? याचा विचार करून प्रश्न विचारला जात नाही. त्या स्वरूपाचे प्रश्नच शिक्षणाच्या प्रक्रियेतून हददपार झालेले आपणास दिसतात. त्यामुळे पुस्तकातील आशय आणि त्यावरील प्रश्न असल्यांने मुलांना स्वअभिव्यक्तीला संधी नाही. त्यामुळे पुस्तक हे परीक्षेचे साधन वाटते.मुलांना सिनेमातील गाणी पाठ होतात.ती आनंदाने गातात.सिनेमाच्या कथा ते सांगतात, पण पुस्तकातील दोन पानाचा पाठ त्यांना अवघड जातो.दोन तीन चरणाची कविता त्यांना नको वाटते. याचे कारण त्यांना त्यात स्वातंत्र्य असत नाही.त्यामुळे शिक्षणात मुलांना स्वतःचे विचार प्रगट करण्याची संधी नाही. अशा स्थितीत मुलांना शिक्षणात फारसे रमण्याची संधी नाही.

मुलांना जेव्हा स्वअभिव्यक्तीचा विचार शिक्षणात अधोरेखित होतांना दिसेल तेव्हाच आनंद वाटू लागेल. खरेतर सृजनशील असणे हे कोणत्याही व्यक्तीची नैसर्गीक गरज असते.त्या नैसर्गीक गरजांचा शिक्षणात विचार केला जातो का ? आपण मुलांना रोज अशा सृजनात्मक लेखनाची संधी उपलब्ध करून देतो का ? ती संधी का नाही देत..? तर आपले नेहमीचे वेळापत्रक आहे.शिकविलेल्या पाठाचे प्रश्नोत्तरे, ठरलेले विशिष्ट निबंध,किंवा इतर निश्चित केलेले लेखन हा नेहमीची वाट आहे.मात्र मुलांना त्यांच्या रोजच्या जीवनातील अनुभवाचे कथन करण्याची, लेखन करण्याची संधी देण्याची गरज असते.आपण अशा किती संधी उपलब्ध करून देतो याचा विचार करण्याची गरज आहे.

विद्यार्थी अनेकदा आपले अनुभव घेऊन शाळेत येत असतात.ते अनुभव लिहिण्याची संधी द्यायला हवी असते.त्यांच्या मनात एखाद्या घटने बददल ,आशयाबददल भावना असतात.त्या त्यांना मांडण्याची संधी हवी असते.ती संधी मिळत नाही . त्यांना शिकता शिकता मनात प्रश्नाचे घर असते, अनेक संकल्पना बाबत त्यांना काही सांगायचे असते.मात्र त्यांना असे काही स्वातंत्र्य असत नाही. मात्र त्यांना गृहित धरले जाते. त्यामुळे शाळेत आपले काही आहे असे त्यांना वाटत नाही.अगदी एखाद्या दिवशी विद्यार्थी काहीतरी कारणाने अनुपस्थित असतो.त्याचे कारण घरात कोणी तरी आजारी असते,कधी यात्रेला,जत्रेला जाणे घडते.कधी कधी कौटुबिंक कार्यक्रम असतो.कधी लग्न,कधी बाजार,कधी इतर काही कारणाने विद्यार्थी अनुपस्थित असतात.अशावेळी एकतर अर्ज देऊन अनुपस्थित राहाण्याची अनुमती घेण्याचा आग्रह शाळांच्या नियमावलीत केला जातो.

कधी तरी पालकांचा अर्ज आणण्याची सक्ती केली जाते.पण या अर्जाने काय घडणार असते हा प्रश्न आहे.अर्ज देणे म्हणजे एक व्यवस्था उभी राहिलेली असते तीच्या चौकटीत काम करण्याचा आग्रह असतो. त्यातून शिस्त लागते अशी धारणा असते.मात्र त्या संधीचे शिकण्यास मदत होईल असा विचार करीत विद्यार्थ्याला व्यक्त होण्याची संधी दिली तर बरेच काही साध्य होईल.तो ज्या कारणाने गैरहजर असेल त्या कारणाच्या निमित्ताने जे काही अनुभवले आहे . ते व्यक्त करण्याची संधी ,लेखनाची संधी आपण उपलब्ध करून दिले तर विद्यार्थ्यांना स्वअभिव्यक्ती करण्यास संधी मिळेल. विद्यार्थी जेव्हा आपले अनुभव लिहित जातात तेव्हा ते अत्यंत प्रांजळ पणे लिहिती असतात.त्या प्रगटीकरणात प्रामाणिकपणा असतो. त्यांच्या आरंभीच्या लेखनात निव्वळ भाव असतात पण हळूहळू त्या लिखिणात साहित्याच्या दिशेने प्रवास घडण्यास मदत होत असते. त्याच प्रमाणे आपण ज्या वयोगटातील विद्यार्थ्यांसोबत काम करतो त्या विद्यार्थ्यांचा वयोगट लक्षात घेऊन विषयांची निश्चिती करावी.

अगदी शेत,प्राणी,कुंटुबातील सदस्य, पक्षी, झाडे,निसर्ग, मित्र,पुस्तक, नाते, आपल्या अवतीभोवती घडणा-या घटना या सारखे हजारो विषय आपल्याकडे आहेत.असे अनेक विषयांच्या चिठठया केल्या आणि त्या एका बॉक्समध्ये टाकल्या,त्यातील रोज एक प्रत्येक विद्यार्थ्यांने स्वतःच्या इच्छेप्रमाणे चिठठी निवडून त्या विद्यार्थ्यांना संबंधित विषयावरती व्यक्त होण्याची संधी उपलब्ध करून दिली तर प्रत्येक मुल आपल्या परीने आपली मांडणी करीत जाते.यासाठी रोज नवा विषय त्यांना मिळत जातो.त्या विषयांचे लेखन कधीकधी त्यांना आव्हानात्मक वाटते. विद्यार्थ्यांना नेहमीच सोप हवे असते असे नाही तर त्यांना आव्हानात्मकता हवी असते.त्यामुळे या संधी खूप महत्वाच्या आहेत.यातून विद्यार्थ्यांना कदाचित प्रथम लिहितांना अडचणी जाणवतील,कदाचित लिहिता येणार नाही. पण त्यातून ते निराश न होता विद्यार्थी संबंधित विषयाचे संदर्भ शोधतील,त्यातून त्यांना अवांतर वाचनाची अभिरूची विकसित करतील. यात एकच विषय अनेक वर्गातील विद्यार्थ्याना दिले गेले तरी त्यात विषयाची समानत वगळली तर त्यातील आशय,भाषा,अनुभव, मांडणी,भाषेचे सौंदर्य, शब्दांचे उपयोजन, व्याती यात निश्चित फरक पडतो.तो फरक विद्यार्थी जसे जसे पुढे जातात त्या प्रमाणे त्यातील सहगणता वाढत जाते.विदयाथी जेव्हा गरजेतून शिकू पाहातात तेव्हाच खरे शिक्षण सुरू होत असते.त्यामुळे नव्या वाटा निर्माण होण्यास मदत होईल.

या वयात जेव्हा विद्यार्थी सृजनशीलतेने व्यक्त होतील तेव्हा त्याचा लाभ समाजाला होईल.शेवटी समाजाला उत्तम इंजिनिअर,वकिल,पत्रकार,ड़ॉक्टर,साहित्यिक हवेच आहे.पण ती जितकी सृजनशील असतील तितके त्यांचे योगदान त्या क्षेत्रात असेल.साहित्यांतून व्यक्त झाल्यांने त्यातून मस्तके घडली जातात.त्यामुळे उद्यासाठी ती मुले आपल्या उत्तम नागरिक म्हणून जबाबदारी पेलतांना दिसतील.अभिव्यक्त होणे याचा अर्थ तणावमुक्त समाज निर्मितीचा भाग असेल.वर्तमानात लिहिते हात कमी होता आहेत.विद्यार्थ्यांना आपल्या भावना व्यक्त करतांना वाढत जाणारी विचार धारा आपल्याला भविष्यासाठीचे साहित्यिक देतील यात शंका नाही.समाज उत्तम निर्माण करायचा असेल तर आपल्याला साहित्यिक हवे आहे.साहित्याने मस्तक घडतात आणि त्यातून घडणारी मस्तके राष्ट्र निर्माण करीत असतात हे लक्षात घ्यायला हवे.त्यामुळे शाळांमध्ये सृजनशीलतेचा प्रवास किती प्रयोगशीलतेच्या,उपक्रमशीलतेच्या दिशेने घडतो यावरच आपल्या समाजाचे व राष्ट्राचे भविष्य अवलंबून आहे.

_संदीप वाकचौरे

(लेखक- शिक्षण क्षेत्राचे अभ्यासक आहे.)

- Advertisment -

ताज्या बातम्या