सत्याची स्विकृती म्हणजे शिक्षण

jalgaon-digital
9 Min Read

आपल्या समोर एखादा अन्याय होतो. चुकिची गोष्ट घडते. मनाला जे भावत नाही ते ऐकायला आणि करायला भाग पाडले जाते. समोरच्याची विचाराची पाऊलवाटेने आपल्या स्वातंत्र्य गमावले जाण्याची शक्यता असते. आपला आतला आवाज दाबला जातो. कदाचित त्यांच्या विचारात स्वातंत्र्याचा अभाव असतो. आपले स्वातंत्र्य दाबले जाण्याची शक्यता असते. अशावेळी माणूस शांत राहात असेल तर त्याचे शिक्षण झाले आहे असे कसे म्हणता येईल..?

शिक्षण तर विचार करायला शिकविते. शिक्षण म्हणजे संवाद असतो. शिक्षण म्हणजे दुस-याला जाणणे असते. मला जसा विचार आहे तसा समोरच्यालाही काही विचार आहेत हा भाव निर्माण होणे असते. शिक्षणातून स्वातंत्र्याची प्रेरणा जागृत होत असते. अन्यायाची जाणीव होत असते. अशावेळी अन्याय सहन करणे आणि आंतरिक मनाची बंडखोरीची भाषा न स्विकारणे म्हणजे अशिक्षितपणाच आहे. आत्मा गहान ठेवून कार्यरत राहाणे काय कामाचे.? शिक्षणाने आतला आवाज ऐकायला शिकविणे महत्वाचे असते. व्यक्तिचे स्वातंत्र्य, आतला आवाज दाबण्याचा विचार मनात जेव्हा येतो तेव्हा आपण अशिक्षित असतो. अर्थात ज्याचा आवाज दाबला जातो तोही आणि ज्याला आवाज दाबावे वाटते ते दोघेही अशिक्षितच म्हणायला हवे. मग आपण जे काही पदवी मिळविलेली असते ती काय असते तर तीली केवळ माहिती जमा केल्याचे प्रमाणपत्र इतकेच तिचे स्वरूप राहाते. आपल्याला आतून जे वाटते ते न स्विकारता केवळ समाज, रूढी, अधिकार नसलेला आवाज, अधिकाराचा आवाज व्यक्त करणे म्हणजे स्वार्थांने शब्दाचे फुलोरे फुलवत राहाणे हा स्वतःशी आणि शिक्षणाशी केलेला द्रोहच असतो आणि माणूस पणाचा प्रवास थांबविणे असते. तो प्रवास माणूसपणाचा थांबतो त्या प्रमाणे ज्ञानाचाही थांबतो.

रूढी, मानवात भेद करणा-या पंरपरा आणि अधिकारशाहीच्या भिंती पाडून बाहेर पडायला शिक्षणाने भाग पाडायला हवे. मनाला बध्द करणारे संस्कार झटकून टाकून स्वतंत्र्य विचाराचे पंख लेवून गरूड भरारी घेणे महत्वाचे असते. मात्र दुर्दैवाने शिक्षणाने स्वातंत्र्याचा विचार पेरण्याऐवजी अनुकरणाची वाट चोखाळणे पंसत करते. आंतरिक प्रेरणेतून भरारी घेण्याबाबत कधीच सांगितले जात नाही मात्र खरे शिक्षण तर तेच आहे. सध्या आपण शिक्षणाचा विचार जेव्हा करतो तेव्हा काय दिसते याचा विचार करायला हवा. शिक्षण म्हणजे घोकून तयार केलेल्या विषयाची परीक्षा उत्तीर्ण होणे नव्हे किंवा तोंडपाठ केलेल्या गोष्टी उतरून काढणे नव्हे. बाहेर येणा-या दबावाचे रूपांतर हळूहळू अंतरिक दबावातून होत जाते आणि आत जे काही लपले आहे ते तसेच दडवून राहाते. अनेकदा आम्ही मोठे आहोत. अनेक उन्हाळे खाले आहेत. ज्यांनी ही मांडणी केली आहे ते मोठे आहेत. अशा दबावातून देखील स्विकारणे भाग पाडले जाते. खरेतर जोपंर्यत आतून स्विकारणे होत नाही. तोपर्यत शिकलेला आशय त्यांच्या मनात पोहचत नाही. कोणताही आशय मनाच्या तळाशी पोहचत नाही तोपर्यंत तो आशय पाठ करावा लागेल. जो मनाचा ठाव घेईल तो लक्षात ठेवणे, पाठ करणे, शिकलेले विसरणे अशा समस्या येत नाही. शिकणे यात विवेक असतो. अंतरिक विचार असतो. आणि सत्य स्विकारण्याची हिम्मत निर्माण होत असते. सत्याची स्विकृती म्हणजे शिक्षण असते.

अनेकदा शिकलेला समाज देखील परिवर्तनाच्या वाटेवर चालत नाही. अनेकदा शिकलेला माणूस आणि अशिक्षित माणूस यांची तुलना केली जाते, तेव्हा अनेकदा अशिक्षित माणूस नेमकेपणाने भूमिका घेतो. आपले स्पष्ट मत नोंदवितो आणि शिकलेला माणूस भूमिकाच घेत नाही. त्याच्या प्रत्येक भूमिकेत भविष्य असते. त्या भविष्यात स्वतःच्या स्वार्थाच्या सजलेल्या भिंती असतात. बाहेरचे ऐकायला शिकलेला हा माणूस, दुस-यांने लिहिलेले वाचायला शिकलेला हा माणूस कधीच स्वतःचा आवाज आणि स्वतःच्या अंतकरणात गुंजन करणा-या शब्दांचे हुंकार ऐकत नसतो का? जणू शिकल्यानंतर स्वातंत्र्याचे प्रेरणा मरते का? असा प्रश्न पडतो. स्वातंत्र्य भोगण्यापेक्षा “एस बॉस आणि ओके बॉस ” यातच आपली उर्जा खर्च होते असे दिसते. स्वातंत्र्याची प्रेरणा आतून असेल तर आदराचा भाव आपोआप येतो. त्या भावात कोणत्याही प्रकारे मुखवटा असत नाही. मात्र स्वातंत्र्याची भावना मेली की आदर, सन्मान मिळविण्यासाठी धावाधाव करावी लागते. शिकलेल्या माणंसाच्या आंतरिक शक्तीवर काहींना काही बाहय दबाव असतो. अनेकदा स्वार्थाचा विचार असू शकेल म्हणून शब्द मुके होतात. विचार थांबतो. पण जेव्हा स्वतःच्या विचारात प्रामाणिकपणाचा अभाव असतो तेव्हा त्याला आतला आवाज असत नाही, हदय बोलत नाही तर मस्तकातील शब्दच केवळ धावाधाव करीत असतात. न शिकलेल्या माणंसात राष्ट्र, समाजाच्या हिताचा विचार असेल तर तो अधिक व्यापकतेने व्यक्त होत जात असतो. मुळात शिक्षणाची व्याख्या करतांना सांगण्यात येते, की “शिकणा-या व्यक्तीच्या मस्तकाच्या आत जे काही आहे ते बाहेर काढणे म्हणजे शिक्षण”. पण वर्तमानात डोक्यातून बाहेर काढण्याची संधी शिक्षणात दिसत नाही. सतत बाहेरून आत कोंदण्याचा विचार अधिराज्य करीत आहे. मुळतः बाहेर काढण्यासाठी विश्वास, वेळ आणि प्रक्रिया यांची गरज असते. त्याच बरोबर ती प्रक्रिया दबावमुक्त असेल तर आत दडलेले बाहेर निघेल. माणंसाच्या नात्यात देखील एकमेकाबददल विश्वास नसेल तर माणूस अविश्वास असलेल्या माणंसाशी मनातील काही सांगत नाही. जेथे नात्यात घटट वीन असेल तेथेच व्यक्त होणे आणि मुक्त संवाद होत असतो. विश्वासात स्वातंत्र्याते वर्तन घडते. आईच्या भोवती स्वतंत्र्य विचार असतो. तेथे मनातील भावनाचे प्रगटीकरण असते. ते विचार इतर नात्यात असते का? तर त्याचे उत्तर नाही असते. कारण आईच्या नात्यात विश्वास आणि स्वातंत्र्याचा भाव असतो. त्यामुळे विद्यार्थ्याला त्या दृष्टीने व्यवस्थेने विश्वास द्यायला हवा असतो. पण ते विचाराच साधन व्यवस्थेत डोकावतांना दिसत नाही. त्या दृष्टीने प्रक्रिया पुढे घेऊन जाणे महत्वाचे आहे.

सध्या शिक्षणात पाठयपुस्तक पूर्ण करणे, परीक्षा आणि निकाल एवढाच विचार केंद्रीभूत आहे. परीक्षेतही अधिक मार्कांसाठीची स्पर्धा सुरू आहे. त्या मार्कांचा शिक्षण प्रक्रियेवरती प्रचंड दबाव आहे. त्या दबावाने शिकणे व्यापक होण्याऐवजी संकुचित बनत आहे. परीक्षेला काय येणार आहे, त्यावरती शिकणे काय आणि कसे करायचे ते ठरत आहे. शिकल्यानंतर काय शिकला, काय रूजले याची पडताळणी करण्यासाठी परीक्षा हव्यात, मात्र घडत तर उलटेच आहे. परीक्षेकरीता शिकण्याचा प्रवास सुरू आहे. परीक्षा तर मार्कांसाठीच आहे. त्यात आशयांचा विचार आहे, मात्र व्यक्तीच्या विकासाचा विचार अधोरेखित होत नाही. लेखन, वाचन आणि गणित करता येणे या पलिकडे शिक्षणाचा व्यापक हेतू आहे मात्र सध्यातर शिक्षण साक्षरतेच्या एका अंगाभोवती फिरत आहे. शिक्षणाच्या मुळ हेतूला स्पर्श देखील होत नाही. जेथे कोठे होतो तेथे अंतरिक तळमळीने आणि जाणीव पूर्वक प्रयत्न केले जात आहे. सध्या पाठयपुस्तकातील आशय पोहचविणे या एकाच उददेशाने शिक्षण सुरू राहिले तर गाभाघटक, जीवनकौशल्य आणि मूल्यांचा विचार रूजत नाही. खरेतर ती एकात्म प्रक्रिया असली तरी त्यांचा विचार परीक्षेला नाही. जे परीक्षेला नाही ते शिकवायचे नाही. अहो संत तुकारामांचे अभंग विचार अभ्यासक्रमात आहे, पण तो अधिक दीर्घ आहे म्हणून पाच मार्काकरीता संत साहित्य ऑप्शनला टाकण्याच्या जमान्यात संत विचार रूजण्याची प्रतिक्षा करावी लागणार आहे. ते परीक्षेला नसले तरी त्यात जीवन विचार आणि दृष्टीकोन आहे हे विसरता येत नाही. पण आमची व्यवस्था माणूस उभा केला का? याची परीक्षा घेत नाही तर पुस्तकातील आशय किती कळाले हे विचारते आणि अवतीभोवती माणूस झालास का? यापेक्षा परीक्षेला किती मार्क मिळाले असा सवाल करते. त्यामुळे खरंतर शिक्षण प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह आहे. जे परीक्षेला आहे त्याचा जीवनांशी फारसा संबंध नाही. त्यामुळे जीवन व शिक्षण यांच्या नात्यात पडत चाललेल्या अंतरामुळे समाजात प्रश्न निर्माण होता आहेत. त्यामुळे शिक्षणाच्या हेतूलाच धक्का बसत असल्यांने शिक्षणातून अपेक्षित विचाराची, प्रतिमा आणि प्रतिभेची माणंस निर्माण होतांना दिसत नाही. त्यामागे शिक्षणातील हरवत चाललेल्या गाभ्याचा विचार. तो गाभा हरवल्यांनेच शहाणपणाची पेरणी थांबली आणि स्वातंत्र्याचा भाव संपुष्टात येऊ लागल्याचा अऩुभव येतो आहे. हा अनुभव असाच राहिला तर शिक्षण केवळ साक्षरतेपुरते उरेल आणि माणूस निर्माण करण्यासाठी पुन्हा नव्या वाटा निर्माण कराव्या लागतील. अशा पध्दतीने प्रत्येक गोष्ट वेगळ्या वाटेने घेऊन जाण्यासाठी वेगळे प्रयत्न करण्याची गरज निर्माण झाली तर त्या वाटा चालणे कठिण होत जाईल. त्यामुळे शिक्षणाचे असलेले महत्वही कमी होईल. शिक्षणाने व्यापक विचार करून चालण्याची गरज आहे. तंत्रज्ञानाशी जोडून असलेल्या शिक्षणाच्या वर्तमानातील जाहिराती सारख्या आम्ही माणूस घडवितो अशा जाहिराती भविष्यात बाजारपेठेत लागल्या तर नवल वाटायला नको. त्यामुळे काय ते एकदा ठरवायला हवे. शिक्षणाची मूलगामी विचार जो पर्यंत केला जात नाही तोपर्यत शिक्षणातून परिवर्तनांच्या अपेक्षा करणे चूकिचेच आहे.

_संदीप वाकचौरे

(लेखक शिक्षण क्षेत्राचे अभ्यासक आहेत.)

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *