हमारी स्टाईल भी अलग है...

एकांत असेल तर अभ्यास चांगला होतो. मुलांनी काहीच न करता केवळ पुस्तकाशी संगत करावी हाच खरा अभ्यास आहे. अशी काहीशी आपली धारणा असते. कधीकाळी घरातील जेष्ठांचा अभ्यासासाठी एकांत असावा असा आग्रह असायचा.. पण अशा एकांतात बसून अनेक विद्यार्थी अभ्यास करतात पण तरीसुध्दा मुलांना मार्क फारसे मिळत नाही.. तर काही मुले सारे उद्योग करूनही त्यांचा मार्कांचा आलेख मात्र चांगला उंचावलेला पाहावयास मिळतो. असे कसे घडते?..... शिक्षणक्षेत्राचे अभ्यासक संदीप वाकचौरे यांची ‘शिक्षण भवताल’ ब्लॉग मालिका...
हमारी स्टाईल भी अलग है...

दूरदर्शनचा संच समोर सुरू आहे.. आणि मुले अभ्यास करता आहेत. घरात रेडीओ ,टेपरेकॉर्ड सुरू आहेत विद्यार्थी गाणे ऐकता आहेत आणि तरी विद्यार्थ्याचा अभ्यास सुरू आहे. कोणीतरी चित्र काढते आहे, रंग भरता आहेत आणि तरी त्यांचा अभ्यास सुरू आहे.कसा काय होतो या मुलांचा अभ्यास? काही वेळा तर मुले खेळायला जातात आणि तेथून थोडावेळ अभ्यासाचे नाटक करतात.

अशा अशांत वातावरणात मुळीच अभ्यास होत नाही मुळी. अहो अभ्यासच करायचा असेल तर कसे पहाटे उठावे, वातावरण शांत असते.. त्या शांत वातावरणात अभ्यास चांगला होतो. अभ्यास करायचा म्हणजे जेथे कोणी वारंवार जात नाही तेथील खोलीत जाऊन स्वतःला अलिप्त करीत अभ्यास करायला हवा, म्हणजेच एकांतात अभ्यास करायला हवा. नाहीतर अशा गोंधळाच्या वातावरणात अभ्यासाला बसणे म्हणजे केवळ नाटकच..

एकांत असेल तर अभ्यास चांगला होतो. मुलांनी काहीच न करता केवळ पुस्तकाशी संगत करावी हाच खरा अभ्यास आहे. अशी काहीशी आपली धारणा असते. कधीकाळी घरातील जेष्ठांचा अभ्यासासाठी एकांत असावा असा आग्रह असायचा..पण अशा एकांतात बसून अनेक विद्यार्थी अभ्यास करतात पण तरीसुध्दा मुलांना मार्क फारसे मिळत नाही..तर काही मुले सारे उद्योग करूनही त्यांचा मार्कांचा आलेख मात्र चांगला उंचावलेला पाहावयास मिळतो. असे कसे घडते..? याचे कारण प्रत्येक मुलांची अभ्यासाची एक स्टाईल असते..त्याला ज्यात अभिरूची असेल त्या दिशेचा प्रवास केला गेला तर त्याचा अभ्यास चांगला होत असतो..त्यामुळे आपण मोठयांनी आपला पारंपारिक विचार सोडून देत त्यांच्या स्टाईलने अभ्यास करू देण्यांचे स्वातंत्र्य द्यायला हवे.

शाळेत अनेक विद्यार्थी असतात. त्या सर्व विद्यार्थ्यांना एकच शिक्षक शिकवत असतात.मात्र प्रत्येक विद्यार्थ्यांचे समान मूल्यमापनाच्या साधनाने मूल्यमापन करण्यात आल्यावर मिळणारा प्रतिसाद भिन्न असतो.हा प्रतिसाद पाहून आपण विद्यार्थ्यांवरती शिक्का मारत असतो.त्यातून कोणी तरी हुशार ठरते कोणी तरी मठठ ठरते.पण यात त्या विद्यार्थ्यांचा दोष काय ? प्रत्येक विद्यार्थ्यांचे शिकण्याची पध्दती वेगवेगळी असते.

अगदी हेच पाहाना एखाद्या विद्यार्थी असा असतो , की शिक्षक जे काही बोलता आहेत त्यांचे बोलणे आहे ते पुन्हा जसे आहे तसे सांगतो. हे पाहून शिक्षक त्या विद्यार्थ्यांचे कौतूक करतांना म्हणतात , की याने कसे लक्षपूर्वक ऐकले.त्याचे कसे लक्षात राहिले असे म्हणत असतात. खरेतर ऐकून शिकणारे काही मुले असतात.त्यांनी जे काही ऐकले आहे ते त्यांच्या आहे तसे लक्षात राहाते. याचे कारण त्या मुलांची शिकण्याची ही स्टाईल असू शकते..पण ती एकाच स्टाईलने सर्व विद्यार्थ्यांनी शिकावे असा आग्रहच मुळी चुकीचा आहे.प्रत्येक मुल भिन्न आहे.प्रत्येकाची बुध्दीमत्ता भिन्न आहे.प्रत्येकाचा आर्थिक,सामाजिक,सांस्कृतिक परीसर,पूर्वानुभव भिन्न आहे. त्यामुळे त्यांचे शिकणे देखील भिन्न असणार हे साहजिक आहे.

शाळेत तर अगदी कधी कधी विद्यार्थ्यांना पाढे पाठ करण्यास सांगितले तर ते सहजतेने पाठ होत नाही,मग शिक्षक कधीकधी संगीत पाढे ऐकवितात.कधी टाळी वाजवत तालावरती पाढे म्हणत जातात. कधी अगदी नृत्य करीत काही विद्यार्थी पाढे म्हणत असतात.काही जन त्या पाढयांच्या पाठांतरला चाल लावतात. कोणी कधी भजनाच्या चालीवर तर कोणी अगदी सिनेमाच्या चालीवर पाढे म्हणताना दिसतात.या सा-या मार्गाने मुले शिकत असतात.त्यांना जी स्टाईल प्रिय असेल त्या दिशेने अधिक चांगले शिकणे होत असते. प्रत्येक मुलाची शिकण्याची पध्दती भिन्न असते.

मात्र आपण केवळ एकाच मार्गाने शिकवत राहिलो तर शिकणे होण्याची शक्यता नसते. कधी कधी शिक्षक वर्गात किती प्रभावी शिकवितात त्यावरती मुलांचे शिकणे अवलंबून असते.अगदी काही मुलांना शिक्षकांने केवळ वाचले तरी समजते.पण त्या शिक्षकांच्या वाचनात अभिनय असतो, त्यात चढ उतार ,आवाजाची गती, स्वराघात,लय हावभाव,हातवारे असतात.त्यात विविध प्रकारच्या अवयवाची भाषा असते.अशा स्वरूपाचे शिकविणे असेल तर ते भावते.त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शिकण्यावरती होत असतो. वाचनाचा पण परिणाम आकलनावरती होत असतो.प्रकट वाचन करतांनाच मुळात विद्यार्थ्यांना अनेक गोष्टी आकलन होत असतात.मात्र ते प्रकट वाचन जर परिणामकारक नसेल तर त्यातून फार काही आकलन होण्याची शक्यता नाही.

वाचन याचा अर्थच समजपूर्वक वाचन असा अर्थ आहे.आपण जरी वाचनाचे टप्पे करीत असलो तरी तो केवळ समजपूर्वक वाचनापर्यंत जाण्याचा प्रवास आहे.मात्र जेव्हा विद्यार्थ्यांच्या कानावरती केवळ एकसुरी वाचन जाते तेव्हा ते अधिक कंटाळवाणे बनण्याची शक्यता असते.त्यात विद्यार्थ्यांना फारसा रस राहात नाही.ते ऐकून शिकणा-या विद्यार्थ्यांवरती देखील परिणाम करीत असते. त्यामुळे काही विद्यार्थ्यांना ऐकूण शिकण्याची क्षमता असते.त्या क्षमतेनुसार विद्यार्थ्यांना शिकण्याची किती संधी आपण देतो त्यावरती विद्यार्थ्याचा गुणवत्तेचा आलेख अवलंबून असतो.

जसे काहीजन ऐकूण शिकत असतात तसे काही विद्यार्थी पाहून शिकत असतात.त्यात त्यांच्या निरिक्षण शक्तीची अधिक प्रभाव असतो.त्यामुळे वर्गात केवळ व्याख्यान पध्दतीने शिकण्यात त्यांना रस असत नाही.त्यामुळे एखादा घटक शिकतांना त्यांना प्रत्यक्ष समोर काय काय आहे त्या गोष्टी शिकण्यात मदत करीत असतात. त्यामुळे शिकवितांना अनेकदा शिक्षक शैक्षणिक साहित्याचा वापर करतात.त्याच बरोबर काही जन प्रत्यक्ष भेटीतून शिकत असतात.त्यासाठी सहशालेय उपक्रमाचे आयोजन करण्यात येत असते. क्षेत्रभेटीच्या माध्यमातून परिणामकारक शिकत असतात.त्याच बरोबर काही विद्यार्थी एखादा घटक शिकतांना त्यासंबंधीची कृती करून पाहण्याने अधिक चांगले शिकत असतात.

खरेतर अनेकदा आपण म्हणत असतो , की आपण जो घटक ऐकून शिकत असतो ते फार काळ लक्षात राहात नाही.आपण जे ऐकून आणि पाहून शिकतो ते ऐकून शिकण्यापेक्षा अधिक काळ लक्षात राहाते.मात्र आपण जे करून पाहातो ते मात्र दीर्घ काळ लक्षात राहाते.याचे कारण आपण जेव्हा एखादी गोष्ट करून पाहातो तेव्हा ती करतांना आपल्या शरीराचे अधिकाधिक इंद्रीये उपयोगात येत असतात.शिकण्याच्या प्रक्रियेत जितके इंद्रीय कामी येतील तितके शिकणे परिणामकारक होत असते.त्यामुळे काही मुले करून चांगली शिकत असतात.ती त्यांची शिकण्याची पध्दती असते.

करून पाहाणे या स्वरूपाने शिकणे होत असतांना त्यांच्या नैसर्गिक हालचाली होत असतात.मुळात वर्गात तासंनतास बसणा-या विद्यार्थ्यांना या स्वरूपाच्या हालचालींची निंतात गरज असते.अशा स्वरूपाची संधी वर्गात जेव्हा मिळत जाते तेव्हा विद्यार्थ्यांच्या शिकण्यास निश्चित मदत होते.आपल्या शाळेच्या वेळापत्रकात त्या दृष्टीने विषयांची रचना करायला हवी. त्याच बरोबर शिक्षकांनी आपल्या तासिकेत देखील विविध अनुभवाची रेलचेल करायला हवी.त्या तासिकेत अधिक अवयव गुंतून राहातील त्या दृष्टीने नियोजनाची आवश्यकता आहे. त्या नियोजनात विद्यार्थ्यांच्या नैसर्गिक गरजांचा विचार केला जाण्याची गरज आहे. त्याच बरोबर वर्गात सर्व प्रकारे शिकणारी विद्यार्थी असतात.

त्या सर्वांचा विचार करून त्यांना शिकण्याची संधी देण्याची गरज आहे. त्याच प्रमाणे प्रत्येक विद्यार्थ्यांची नैसर्गिक शिकण्याची शैली जाणून घेण्याची गरज आहे.ती शैली जाणून घेत ,त्यासाठी अध्ययन अनुभवाची रचना केली तर विद्यार्थ्यांचा शिकण्यांचा, संपादनाचा स्तर उंचावण्याची शक्यता अधिक आहे.अशी संधी म्हणजे शिकणे आनंददायी करणे असते.जितके अवयव शिकण्याच्या प्रक्रियेत कामी येतात तेवढे शिकणे पक्के होत असते हे लक्षात घ्यायला हवे.त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैलीचा अभ्यास महत्वाचा आहेच..पण त्या करीता त्या दिशेने शिक्षक,पालकांनी प्रयत्न करणे देखील महत्वाचे असणार आहे.विदयार्थ्यांना जाणून घेणे याचा अर्थ त्याच्या शिकण्याची दिशा जाणून घेणे असते.

आपण त्यांच्या शिकण्याच्या शैलीचा अभ्यास न करता एकमार्गी शिकविण्याचा प्रयत्न करीत राहिलो तर मूल्यमापनातील प्रतिसाद भिन्नच मिळत राहाणार आहे.विद्यार्थ्यांची गुणवत्ता उंचावण्याकरीता केवळ जादा तास घेऊन आणि सातत्याने सरावाच्या तासिका व स्वाध्यायाने फार काही साध्य होत नाही तर त्या करीता शिकण्याच्या संदर्भाने अधिक व्यापक विचार करण्याची गरज आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांच्या नोंदी सातत्यपूर्ण सर्वंकंष मूल्यमापनात होत राहतील पण त्या पलिकडे विद्यार्थी शिकते राहाण्यासाठी शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या शैलीच्या नोंदी महत्वाच्या ठरणार आहेत.त्या किती सुक्ष्मतेने करतो त्यावरच वर्गाची गुणवत्ता अवलंबून असणार आहे.त्यामुळे प्रत्येक मुल भिन्न आहे..आणि हर एक छात्र की लर्निग स्टाईन अलग अलग होती है..एवढे लक्षात घ्यायलाच हवे.

_संदीप वाकचौरे

(लेखक शिक्षण क्षेत्राचे अभ्यासक आहे.)

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com