शिक्षणामुळे बदल व्हायला हवा...

शिक्षण घेतल्यामुळे माणंस अधिक हिंस्त्र बनत चालली आहेत. माणंस बुध्दीवादी झाली. बुध्दीच्या जोरावर त्यांने मोठमोठी साम्राज्य प्रस्थापित केले. स्वतःला इतर प्राण्यापेक्षा त्याने वेगळे अधोरेखित केले. पण त्या वेगळेपणात शांतता, सहकार्य, सुखाचा विचार आहे का..? स्वतःच्या सुखात इतराच्या सुखाचा विचार नसेल तर त्या शिक्षणांचा काय उपयोग आहे...शिक्षणक्षेत्राचे अभ्यासक संदीप वाकचौरे यांची ‘शिक्षण भवताल’ ब्लॉगमालिका...
शिक्षणामुळे बदल व्हायला हवा...
शिक्षणामुळे बदल व्हायला हवा...

शिक्षण घेतल्यानंतरही जीवन प्रवासात परिवर्तन होत नाही. जगण्याचा प्रवास आंनदाच्या वाटा तुटवत नाही. मानवी बंधाची वीन घटट होत नाही. मनात संवेदना निर्माण होत नाही. दुस-या बददल असणारी तिरस्काराची भावना संपुष्टात येत नाही. सप्तपिढयांची संचयी वृत्ती संपत नाही. ज्ञानाची निर्मितीची ओढ लागत नाही. शहाणपणाची पेरणी होत नाही. भ्रष्टाचाराचा विचार घर करून राहातो. त्या पाऊलवाटा तुटविणे घडत राहाते. अधिकाराची मस्ती मस्तकावर शिरजोर होते. त्यातून माणूसपणाच्या विचारापेक्षा अधिकाराचा विचार केंद्रस्थांनी राहातो. या दिशेचा प्रवास म्हणजे शिक्षणांचा परिणाम नाही. मग आयुष्यात जे घडते त्याला शिक्षण तरी कसे म्हणायचे.. ? माणूस आय़ुष्यात जे काही पंधरा वीस वर्ष शिकल्यासारखे दिसते ते काय असते.. ? असा प्रश्न पडतोचा ना..! मग शिक्षण कसे होत राहाते.. ? शिक्षण घेऊनही माणंस माणंसासारखे वागत नाही. अनेकदा शिकलेल्या माणंसांबददल सामान्य, अशिक्षित माणंसाच्या मनात शिक्षणाकडून ज्या काही अपेक्षा असतात त्या फोल ठरतात..तेव्हा त्यांचा चक्क शिक्षित माणंसावरचा विश्वास उडतो.

माणंसावरचा विश्वास उडणे याचा अर्थ शिक्षणावरील विश्वास उडणे असते. शिकलेल्या माणंसाच्या हाती शब्दांचे चातुर्य येते. त्या शब्दांनी आणि अधिकाराने तो पुढे जात राहातो. त्यांचा प्रवास घडत राहातो..पण तो केवळ चालल्याचा भास असतो..सोबत कोणीच नसते..त्यामुळे जीवन फुलत नाही. स्वतःच्या सोबत कोणीच नाही. किंबहूना स्वतःचाच आतील विचार देखील सोबत असत नाही. कारण अनेकदा आपण समाजातील एखाद्या विचारासोबत प्रवाहपतीत होतो आणि आपणच आपल्या स्वतःच्या विचारा बरोबर देखील राहात नाही. अशा स्वरूपात सतत बदलत राहाणे हे कितीही चांगले असले तरी किंमान जगण्यासाठी माणूसपणाच्या तत्वज्ञानावर विश्वास असणे आणि जीवन तत्वज्ञानाने स्वतःचा प्रवास घडविणे हे शिक्षण आहे. कोणत्याही तत्वज्ञानाशिवाय माणसाचे जगणे हे शिक्षणशुन्य आहे. जेव्हा माणंसाच्या जगण्याशी ना निसर्गाचे नाते असते, ना माणूसपणाचे नाते असते. तेव्हा केवळ स्वतःच्या विश्वात जगणे हे कोरडे जगणे आहे. असे जगणे म्हणजे शिक्षणशुन्यत्व आहे. त्यामुळे वर्तमानात शिकलेली माणंस देखील शिकल्यासारखी वाटत नाही. शिक्षणाचे प्रतिबिंब जेव्हा शिकलेल्या व्यक्तिच्या प्रतिमा आणि व्यवहारात दिसत नाही तेव्हा समाजाचाही शिक्षणावरती विश्वास हळूहळू कमी होतो .

शिक्षण घेतल्यामुळे माणंस अधिक हिंस्त्र बनत चालली आहेत. माणंस बुध्दीवादी झाली. बुध्दीच्या जोरावर त्यांने मोठमोठी साम्राज्य प्रस्थापित केले. स्वतःला इतर प्राण्यापेक्षा त्याने वेगळे अधोरेखित केले. पण त्या वेगळेपणात शांतता, सहकार्य, सुखाचा विचार आहे का..? स्वतःच्या सुखात इतराच्या सुखाचा विचार नसेल तर त्या शिक्षणांचा काय उपयोग आहे. माणंसाने बुध्दीच्या जोरावर लावलेल्या शोधाने माणंसात, समाजात आणि राष्ट्राराष्ट्रात शांतता प्रस्थापित होण्याची गरज असते. माणसाच्या प्रत्येक कृतीत समाज, राष्ट्रहित जोपासायला हवे असते. आपण जो काही प्रवास सुरू ठेवतो त्याचा इतर कोणाला त्रास तर होत नाही ना! याचा विचार करायलाच हवा. जैन तत्वज्ञानात अहिंसाचा विचार किती पराकोटीचा केला आहे हे सहजपणे लक्षात येईल. हवेतील सजीव देखील आपल्यामुळे मृत होऊ नये हा विचार किती महत्वाचा आहे. मानवी बुध्दीच्या शोधातून होणारा विकास हा मानवी शांततेचा पाया असायला हवा. निसर्ग संवर्धनाचा विचार त्यात असायला हवा. निसर्गावर मात करून केलेला विकास हा एकूण सजीवांच्या -हासाला कारणीभूत होण्याची शक्यता आहे. किंबहूना सध्या जग त्याचा अनुभव घेत आहे. करोना हा त्यातील सर्वात मोठा अनुभव आहे. सत्ता गाजविण्याची महत्वकांक्षा ही जगाच्या विनाशाकडे घेऊन जाते. माणस महत्वकांक्षी होतात तेव्हा स्वतःच्या पलिकडे त्यांत दुसरा कोणताही विचार नसतो. ती महत्वकांक्षा स्वतःच्या सुखासाठी असत्याची पाऊलवाट चालत जाणे घडते. मत्सर,लोभ,फसवणूकीचा विचार केंद्रस्थांनी असतो. त्यामुळे दुस-याच्या सुखाचा विचारच उरत नाही.महत्वकांक्षेत व्देष,मत्सर ठासून भरला जातो. त्यामुळे शहाणपण उरत नाही. या महत्वकाक्षेमुळे जग तिस-या महायुध्दाच्या व्दारात उभा ठाकले आहे.हे युध्द निसर्गाने लादले नाही. निसर्ग तर आपापल्या परीने सजीवांना सर्व काही देत आहे. मात्र त्याला ओरबडून घेण्याची हाव निर्माण झाल्यांने निसर्ग कोपतांना दिसत आहे. मानवावरती आक्रमन करणे हा निसर्गाचा स्वभाव नाही. त्यामुळे निसर्गाचे आक्रमन म्हणजे मानवाच्या विकासाचासाठी असलेल्या लोभाचे प्रतिबिंब आहे. आत्मिक तृप्ततेचा भाव रूजला नाही. शिक्षणाने अतृत्प्ता निर्माण केली. ज्ञानासाठी ही अतृप्तता महत्वाची आहे. तेथील अतृप्तता ज्ञानाच्या पूर्णत्वाचा प्रवास घडवित असते. सत्याचा शोधाचा प्रवास घडविते. मात्र त्याचवेळी स्वतःच्या सुखासाठीची ही अतृप्तता माणसाला -हासाकडे घेऊन जाते. आपण सुखी व्हावे यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावेत पण माझ्या प्रयत्नाने कोणाचे तरी नुकसान होते आहे. माझ्या हितात कोणाच्या तरी हिताला बाधा येते आहे. माझी भूक भागविण्यासाठी कोणाला तरी उपाशी राहावे लागणे ही गोष्ट म्हणजे मानवी विकृती आहे. या देशातील नागरिकांना पोटभर अन्न मिळत नाही म्हणून आपण एक दिवस उपवास करावा म्हणजे त्यातून अन्नाची बचत होईल आणि त्याचा फायदा उपाशी असलेल्या व्यक्तिला होईल. या उददात्त विचाराने उपवास करणारे आणि तसे आवाहन समाजाला करणारे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री हे शहाणपणाचे उदाहरण आहे. हे शहाणपण शिक्षणाने आले असेल तर ते शिक्षणाची साध्यता झाली आहे असे मानता येईल. संस्कृतीचे रक्षण शिक्षणातून व्हायला हवे असे म्हणताना त्यात मानवी जीवनाच्या विकासाची प्रक्रिया आहे. विनोबांनी म्हटल्याप्रमाणे आपणास एका भाकरीची भूक असतांना आपण अतिरिक्त भाकरी खाणे ही विकृती. एका भाकरीची भूक असतांना भूकेएवढे अन्न सेवन करणे हे प्रवृत्ती आहे आणि आपल्या शेजारी कोणी तरी उपाशी आहे तेव्हा आपल्या भाकरीतील अर्धी भाकरी इतरांना देणे ही संस्कृती असते. या अर्थाने शिक्षणातून संस्कृतीची पेरणी असते. पण दुर्दैवाने हा विचार रूजण्याऐवजी आपण मानवी विकासापेक्षा भौतिक विकासाच्या दिशेचा चुकीचा विचार रूजविण्याकडे अधिक प्रवृत्त होत आहे. ज्या विचाराच्या केंद्रस्थानी माणूस असत नाही.तो विचार टाकाऊच म्हणायला हवा.जेथे वर्तमानात धर्म, जात, पंथ, विषमता माणंसाच्या विचारावर राज्य करते. त्या ठिकाणी शिक्षण कूचकामी ठरले असे समजावे. जगातील कोणताही धर्म श्रेष्ठ कनिष्ठ नसतो. जेथे माणूस केंद्रस्थानी असतो आणि त्याच्या उन्नतीचा विचार सामावलेला असतो ते शिक्षण सर्वोच्च म्हणायला हवे. विनोबांनी जेव्हा भूदान चळवळ सुरू केली तेव्हा कोणत्याही उच्च, निच्च, श्रेष्ठ, कनिष्ठ विचाराशिवाय केवळ मानवी विचार केंद्रस्थानी ठेऊन लाखो एकर जमीन मिळाली. आपण जर शिक्षणातून श्रेष्ठ कनिष्ठतेचा विचार घालवू शकलो नाही, तर ते शिक्षण कूचकामी ठरण्याची शक्यता अधिक आहे.

शिक्षणातून विचार पेरला गेला तर समाजातील अनेक प्रश्न आपोआप सुटू शकतील. प्रत्येकांने जीवन व्यवहारात समाज व राष्ट्र केंद्रस्थानी ठेवले तर संघर्षाचा विचारच निर्माण होणार नाही. माझ्या हितात मानवाचे कल्याण सामावले आहे हा भाव जगातील युध्दे , शस्त्रांची स्पर्धा, तसेच मानवा मानवातील संघर्षाला मुठमाती देईल. त्यामुळे समाजातील न्यायालये, पोलीसबल, सैनिक, तुंरूगांची संख्या कमी होईल. ही संख्या कमी होणे हे शहाण्या समाजाचे लक्षण आहे. शहाण्या समाजाच्या निर्मितीत भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचार, फसवणूक उरणार नाही. सामाजिक विषमता देखील नष्ट होऊन एका नव्या समाजाच्या निर्मितीची प्रक्रिया सुरू होईल. असा समाज एकमेकाचा हात हातात घेऊन प्रगतीचे पंख लेवून विकासाची गगनभरारी घेईल. प्रत्येकजन आपले काम प्रामाणिकपणे करेल. जेव्हा माणसात प्रामाणिकपणा भरलेला असेल तेव्हा पैशासाठी कोणाचीच अडवणूक होणार नाही. अशा प्रामाणिक समाज म्हणजे राष्ट्रविकासाचा पाया असतो.अशी नेते राष्टाला पुढे नेत असतात. कोरियाचे राष्ट्रपती रोहमून यांनी आत्महत्या केल्याची घटना वाचली तर ती राष्ट्र पुढे का याचे कारण मिळते. रोहमून यांनी कोरीयाचे राष्ट्रपती म्हणून प्रामाणिकपणे काम केले होते. त्यांनी पदाचा कालावधी संपल्यानंतर नेहमी प्रमाणे आपल्या गावी आले आणि सामान्य माणंसाप्रमाणे जगू लागले. सामान्य माणंसात फिरू लागले. एक दिवस त्यांच्या कानावरती आले आपल्या राष्ट्रपतीच्या काळात पत्नीने एका उद्योग समूहाची लाच घेऊन आपल्या पदाचा गैरवापर केला होता. खरेतर त्यांनी लाच घेतली नव्हती. त्यांना त्या संदर्भात काही माहित नव्हते. मात्र त्यांना कानी आलेल्या आरोपामुळे स्वतःच्याच जगण्याची लाज वाटू लागली. आतून अस्वस्थ झाले. एके दिवशी सकाळी उंच टेकडीवर गेले आणि आत्महत्या करीत स्वतःला संपविले. राष्ट्राशी केलेला अप्रामाणिकपणा त्यांच्या जीव्हारी लागला म्हणून त्यांनी स्वतःला संपविले. अशी माणंस त्या देशाच्या विकासाचे मार्ग निर्माण करतात. अशा नेत्यांमुळे राष्ट्र प्रामाणिक माणसांचा समूह बनते.त्यातून आनंदाच्या वाटा निर्माण होतात.

एकूणच शिक्षणामुळे बदल व्हायला हवा.. मानवी प्रवासात जीवन सौंदर्य़ांने नाही फुलले तरी चालेल, पण जीवन सोज्वळ बनायला हवे. सुगंध नसला तरी गंधाचा दरवळ असायला हवा ना ! माणंसाच नात नाही जपले तरी आपुलकी जपायला हवी. प्रेमाचे शब्द नसला तरी आपुलकीचे शब्द असायला हवेत.पण शिक्षणामुळे शब्द कठोरता आणि हिंस्त्रता भरली जाणार असेल तर त्या शिक्षणावरती प्रश्नचिन्ह निर्माण होणार आहे. शिकल्यानंतर दुस-याच्या सुखाचा विचार हरवणार असेल..दुस-याच्या दुःखाचा विचार केला जाणार नसेल,शिक्षण स्वतःच्या पलिकडे विश्व उभे राहाणार नसेल तर त्या शिक्षणाचा खरच काय उपयोग आहे. मदतीचा हात ही देखावा ठरणार असेल..सहानुभूतीचा विचारही प्रदर्शनीय ठरणार असेल , दुःखाची फुंकरही जाहीरातीत दर्शित होणार असेल तर साराच प्रवास उलटा ठरू लागला आहे का ? याचा विचार करायला हवा.

संदीप वाकचौरे

(लेखक-शिक्षण क्षेत्राचे अभ्यासक आहे)

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com