समाज व राष्ट्र कसे हवे!

आपण काही तरी बनण्याच्या नादात स्वतःवर पंरपरा, परंपरागत असलेली विचारसरणी लादत असतो. शिक्षणातून माणूस घडवायचा आहे म्हणजे काय हे जाणून न घेता केवळ एकाच छाप्याची माणंस निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहोत का याचा विचार करायला हवा. त्यासाठी एकाच दिशेन गेले पाहिजे असे समजून आपण मुलांवरती अनेक पारंपारिक विचार लादत असतो. खरतेर शिक्षण म्हणजे लादणे नाहीच... शिक्षणक्षेत्राचे अभ्यासक 'संदीप वाकचौरे' यांची ‘शिक्षण भवताल’ ब्लॉगमालिका...
समाज व राष्ट्र कसे हवे!

शिक्षणाचा मूळ हेतू हा विद्यार्थ्याना स्वतःच्या आस्तित्वाची जाणीव करून देणे. मी कोण आहे ? माझे स्वरूप कसे आहे ? माझी बलस्थाने कोणती ? माझ्या मर्यादा कोणत्या ? याची ओळख शिक्षणातून करून देण्याची गरज असते. मात्र वर्तमानात पुस्तके ,परीक्षा आणि मार्क या पलिकडे पाहिले जात नाही. शिक्षणातून माणूस उभा करायचा असतो म्हणजे केवळ हाताला केवळ काम नाही, तर त्याच्या व्यक्तिमत्वाची स्वतंत्र्य ओळख निर्माण करायची असते. ती ओळख आत लपलेल्या गुणांच्या परिपोषणावरती अवलंबून असते. ते सुप्तगुण कोणते याची ओळख होणे, त्या गुणांच्या परिपोषणासाठी शिक्षणाने हातभार लावणे महत्वाचे असते. वर्तमानात आपण या मूळ हेतू पासून दूर चाललो आहोत. आपल्याला कोण व्हायचे आहे ? याचा विचार आतून यायला हवा असतो.किंबहूना तो येतो ही.. तो विचार आत असलेल्या गुणांनी फुलत जातो. व्यक्तिच्या आत असलेल्या सात्विकतेच्या गुणांचे भरण केले तर व्यक्तिमत्व आकार घेते. व्यक्तित दडलेल्या गुणांचा विकास त्याला एका उंचीवर घेऊन जात असतो.तो फुलण्यासाठी करावा लागणा-या पाठलागाची शक्ती शिक्षणाने भरायची असते. ती शक्ती न भरता केवळ अनुकरण प्रियतेच्या दिशेने प्रवास घडविण्यासाठी विद्यार्थ्यांवर परंपरा आणि विचार लादत गेलो, तर त्यांचा स्वतंत्र्य नागरिक निर्माण होण्याचा प्रवास थांबतो.तो प्रवास थांबणे हे कोणत्याही राष्ट्र व समाजासाठी घातक आहे.कारण त्यातून केवळ नागरिक पदवीधर होतात,शिक्षित होतात पण त्यातून प्रगतीचा आलेख उंचावत नाही. शेवटी समृध्द आणि सर्जनशील व्यक्तिंचा समूहच समाज व राष्ट्राचे भले करीत असतो.

शिक्षणाने मूळ हेतूकडे लक्ष दिले नाही आणि सोपे पर्याय शोधण्याचा प्रयत्न केला , तर चांगला समाज घडविण्यासाठी अनुकरणांची पाऊलवाट चालणे सोपे वाटते. अनुकरणाचा पाठलाग करत गेल्यांने विद्यार्थ्यांच्या जीवनातील आनंद गमावत आहोत. धोत-याच्या फुलांने गुलाब होण्यापेक्षा आपल्या मूळ आस्तित्वाची ओळख करून घेतली तरी आपले सत्व जपता येते. या जगात काहीच टाकाऊ नसते. प्रत्येकाचा काहिंना काही उपयोग असतो हे लक्षात घ्यायला हवे. प्रत्येक गोष्ट महत्वाची आणि लोकहिताची असते. पण आपण काय आहोत यापेक्षा आपल्याला काय व्हायचे आहे हा विचार केंद्रस्थानी ठेऊन आपण चालत राहिल्यांने नुकसान होत आहे हे लक्षात घ्यायला हवे. योग्य दिशेने प्रवास सुरू न ठेवल्यांने वर्तमानात नसलेल्या गोष्टी शिक्षणातून उगवता आहेत.जे आपण नाहीच ते होण्याच्या प्रयत्नात आपण जे आहोत तेही गमावणे होते आणि जे नाही तेही गमावणे होत हे लक्षात घ्यायला हवे.

आपण काही तरी बनण्याच्या नादात स्वतःवर पंरपरा, परंपरागत असलेली विचारसरणी लादत असतो. शिक्षणातून माणूस घडवायचा आहे म्हणजे काय हे जाणून न घेता केवळ एकाच छाप्याची माणंस निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहोत का याचा विचार करायला हवा. त्यासाठी एकाच दिशेन गेले पाहिजे असे समजून आपण मुलांवरती अनेक पारंपारिक विचार लादत असतो.खरतेर शिक्षण म्हणजे लादणे नाहीच..आत जे काही आहे ते बाहेर काढणे हे शिक्षण आहे.सध्या शिक्षणातून बाहेर काढण्याचा प्रश्न निर्माण होत नाही.मुलांवर आपण संस्कार करण्याच्या नावाखाली अनेक विवेकाला न पटणा-या गोष्टी लादत असतो.त्यामुळे करीता एकाच दिशेचा प्रवास सुरू राहातो. त्या प्रवासाने विद्यार्थ्यांचे मने आतून खदखदत असतात.ते स्विकारण्यासाठीची हिम्मत आपण ,समाज दाखवत नाही. पण नाही स्विकारले तर या प्रश्नाच्या मूळाशी असणा-या भितीने ते लादणे घडते..जेव्हा कोणतीही गोष्ट लादली जाते तेव्हा ती मनाला, विचाराला आकार देत नाही. तर केवळ भितीने अनुकरणाची पाऊलवाट चालत जाणे घडते .पण ते चालणे अंतकरणापासून नसल्याने धकणे होते आणि त्या चालण्यातील आंनद हरवला जातो. त्यात निसर्ग अनुभवणे नसते.निरिक्षण नसते. अवतीभोवतीचे स्विकारणेही नसते.त्यामुळे त्या प्रक्रियेत विचाराची प्रक्रिया घडत नाही.विचार नाही म्हणून चिंतन आणि मननाची प्रक्रिया होतांना दिसत नाही.चिंतन, मननाशिवाय विचाराची आंतरिक स्विकृती शक्य नाही. जो पर्यंत विचार स्विकारले जात नाही,तोपर्यंत ते विचार प्रत्यक्ष जीवन व्यवहारात स्वतंत्र्यपणे येण्याची शक्यता नाही. लादण्याने वरवरची स्विकृती होते पण आंतरिक स्विकृतीचा अभाव असतो. त्यातून केवळ अनुकरणाकडे ओढा वाढतो.त्यामुळे आपल्यात या खोटया स्वप्नांच्या पेरणीच्या भावना ,संस्काराचे साचे अधिराज्य गाजवत असतात. व्यक्तिच्या आत्मप्रकटिकरणाचे ,प्रकटीकरणाकडे जाणारी आंतरिक धाव थांबते आणि त्यापेक्षा संस्काराच्या पारंपारिंक लादलेल्या विचाराने अनुकरण प्रियतेकडील ओढा वाढत जातो.अनुकरणाने आतला आवाज आणि आतली दडलेली खरी उर्मी बाहेर पडत नाही. जीवनावर स्वातंत्र्या ऐवजी गुलामीची धारणा अधिक राज्य करते. गुलामीने अनुकरणप्रियता अधिक राज्य करते. ती अनुकरणप्रयिताच आपला मूळ स्वभाव आणि धारणा बनून जाते.अनुकरणात स्वतःची विचारधारा नसल्यांने स्वतःला विसरणे घडते. त्यामुळे अनेकदा स्वतःत दडलेल्या उर्मीचा शोध लागत नाही.स्वतःची शक्तीचा अंदाज येत नाही.एका अर्थांने गुलामीमुळे आपण आपला शक्तीपात करून घेत असतो.त्यातून स्वतःच्या भावना संपुष्टात येतात.स्वतंत्र्य विचारही राहात नाही.आपण व्यक्ति असतो पण व्यक्तिमत्व गमावून बसतो.आपण विचार करणारे असतो पण विचारशून्य बनून जातो.त्यामुळे स्वतःचे विचार हरवून गेल्यांने अनुकरणातून खोटया प्रतिमा आणि प्रतिभा दिसतात.समोरच्याला काय हवे याचा अधिक विचार मनात घर करतात.त्यासारखेच वागण्याकडे कल वाढत जातो.त्यातून आपला आवाज हरवला जातो.आपण जीवंत असतो पण त्यात स्वतःचा आत्मा नसतो..आपल्याला काय वाटते हा विचार अपंग होतो आणि दुस-याची मने जपण्यात रस वाढत जातो..खोटया प्रतिष्ठेची हाव माणंसातील सत्व आणि तत्वाची होळी करून जाते.

खरेतर आपण अनुकरण का करतो ? तर आपल्यावर काही तरी परंपरंने लादलेले असते.त्या अनुकरणाच्या कुबडया आपल्याला त्या विचारशुन्य आदर्शाच्या मागे धावत घेऊन जात असतात.त्या नसलेल्या अंतरिक गोष्टीमुळे आपण आदर्शाच्या प्रतिमा निर्माण करतांना स्वतःत दडलेली प्रतिभा साथ देत नाही .त्यामुळे चेहरा हरवतो आणि मुखवटेच निर्माण होत राहातात. तत्वहिन व सत्वहिन माणसांचे आयुष्य यशाच्या शिखरावर जात नाही.अनेकदा माणंस उच्च पदावर बसतात पण ते पद पेलवत नाही .त्या पदावर जाऊनही व्यक्तिला प्रतिष्ठा मिळत नाही, मग जो सलाम होतो तो त्या खूर्चीचा सन्मान असतो आणि कमी उंचीच्या माणंसाला त्या सलामाचे भारी कौतूक असते.त्या खोटया प्रतिष्ठेत समाधान फार काळ टिकत नाही. अशा माणंसाचा समाज -हासाला जातो हे लक्षात घेण्याची गरज आहे.इमर्सन यांनी असे म्हटले आहे की जेव्हा छोटया माणंसाच्या सावल्या मोठया पडू लागतात तेव्हा -हास जवळ आला आहे असे समजावे.त्यामुळे समाजाला उंचीसाठी स्वतःच्या आस्तीत्वाच्या वाटा शोधणारी माणंस हवी आहेत.स्वतःच्या स्वतंत्र्य प्रज्ञेची माणसात शहाणपण आणि ज्ञान सामावलेले असते.अशी लहान माणंसाच्या मोठया सावल्यांच्या समाजात समाजाला प्रगतीचे आणि महानतेचा रस्ता सापडत नाही.त्या वाटेने जातांना अपय़श येते.त्या अपयशाने मनात भिती निर्माण होते.न्युनगंड निर्माण होतो.त्या न्युनगंडाने व्यक्ति सतत पराभवाच्या छायेत जगत असते.जगात अनेक संगितकार आहेत पण त्या प्रत्येकाची स्वतःची गायन शैली आहे.त्यांनी आपल्यातील असलेल्या मूळ बीजाचा विचार केला.त्यांमुळे त्यांना स्वतःची पाऊलवाट निर्माण करता आली.त्यांनी कोणाचे अनुकरण केले असते तर त्यांना संगिताच्या क्षेत्रात स्वतःचा ठसा निर्माण करता आला नसता.आनंद शिंदे ,लता मंगेशकर,भिमसेन जोशी,लोकशाहिर विठठल उमप या प्रत्येकाच्या शैलीत भिन्नता आहे.त्यांनी तो जोपासली नसती तर काय झाले असते याचा अंदाज करून पाहा असे म्हटल तरी आपल्याला यातील काहींना संगितकार म्हणून स्वतःला सिध्द करता आले नसते हे सहज लक्षात येते.

समाज व राष्ट्रासाठी शिक्षणाच्या मुळहेतूचा विचार करून स्वतंत्र्य प्रज्ञेची माणंस घडवायला हवी आहेत.केवळ छापांची गर्दी उपयोगाची होत नाही.छापांनी रांगेत चालल्या सारखे वाटेल पण तो भास असेल.त्या भासातून अंतर कापले जाणार नाही.नवसर्जनशीलतेची दिशा मिळणार नाही.या वाटा निर्माण झाल्या तर समाजाला वैज्ञानिक,संशोधक,कलाकार,प्रतिभा संपन्न लेखक मिळत असतात.या सारख्या विविध क्षेत्रातील प्रज्ञावतांनी समाज गतीशील होतो हे लक्षात घ्यायला हवे.त्यातून शांततेच्या वाटा निर्माण होतात..छाप्याच्या गर्दीत शांतता दिसत असते पण हदयात प्रत्येकजन अशांत असतो .त्या अशांततेच्या वाटा आनंदाचा कडेलोट करतात...आपणाला काय हवे आहे..समाज व राष्ट्र कसे हवे याचा विचार करायला हवा..

संदीप वाकचौरे

(लेखक- शिक्षण क्षेत्राचे अभ्यासक आहे)

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com