धर्माने जगायला हवे..

धर्माने जगायला हवे..

धर्म हा माणसांला माणूसंपणाच्या उंचीवरच घेऊन जात असतो. त्यामुळे आपण धर्म शिकवायला हवा. धर्माच्या नावाखाली आपण व्देष पसरविणार असू तर आपण धर्म भ्रष्ट आहे. असा प्रचार करणार असू तर आपण धर्म बुडवे ठरण्याची शक्यता अधिक आहे. विवेकानंद हे धर्म जीवन जगणारे महापुरूष होते. ते... शिक्षणक्षेत्राचे अभ्यासक संदीप वाकचौरे यांची ‘शिक्षण भवताल’ ब्लॉग मालिका...

आपला देश धर्मनिरपेक्ष आहे. माणसं आणि त्यांची जीवन व्यवस्था मात्र धार्मिक आहे. देश कायदयाने चालतो आहे. कायद्याने प्रत्येक धर्मीयाला आपल्या धर्माप्रमाणे वर्तन स्वातंत्र्य बहाल केले आहे. मात्र सार्वजनिक जीवनात तुम्हाला तुमच्या धर्मासंदर्भाने इतरांना त्रास होईल असे वर्तन करता येणार नाही. तुमचे धर्म तत्वज्ञान आणि वर्तनाची कोणावरही सक्ती करता येणार नाही. खरेतर धर्म ही व्यक्तीची खाजगी जीवन प्रणाली आहे. प्रत्येकाला धर्माचा विचार महत्वाचा असतो. पण त्याचा अर्थ जगात कोणा एकाचा धर्म श्रेष्ठ असतो असे होत नाही. प्रत्येक व्यक्तीसाठी स्वतःचा धर्म श्रेष्ठ असतोच. तो असला पाहिजे पण तो धर्म मुळच्या तत्वज्ञानाच्या पायावरती उभा असलेला असायला हवा.

आपण जन्माला आल्यावर आपल्याला सर्वप्रथम काय मिळते? तर तो धर्म, जात, पंथ, भाषा मिळत असते. धर्माप्रमाणे आपणावरती संस्कार सुरू होतात.त्या पंरपरेने माणसं जीवन प्रवास सुरू करतात. व्यक्तीगत जीवनात धर्म असला तरी शिक्षणात मात्र कोणताही धर्म असत नाही. शिक्षण नेहमीच धर्मनिरेपक्ष आणि मनुष्याच्या उन्नत केंद्रीत असायला हवे. धर्माने मानवाचे मनुष्यात रूपांतर होण्याची प्रक्रिया अपेक्षित आहे. मानवात असलेल्या पशुत्वासारखे हिंस्त्र विचार, दूराचार, षडरिपू यांना नष्ट करण्याचे काम धर्माने करायचे असते. धर्म तत्वज्ञान जीवनभर पालन करणे महत्वाचे आहे.

धर्माने जगायला हवे..
मुलं हाच आरसा..

मात्र आपल्याकडे धर्माचे पालन म्हणजे विचारापेक्षाही बाहयांगाने होणारे वर्तन, वेशभूषा, केशभूषा यांना अधिक महत्व आले आहे. जीवनात धर्म जर सुधारणा करू शकत नसेल तर तो धर्म काय कामाचा? धर्म हा प्रत्येक माणसांच्या जीवनात महत्वाचा आहे. धर्माने मानवी जीवन अधिक व्यापक करण्याची गरज आहे. धर्माने भेदाभेद संपुष्टात आणून अधिक उदारतेचा स्विकार करणे महत्वाचे आहे. वर्तमानात आपले अधिकाधिक सामाजिक संघर्ष हे धर्माशी निगडीत आहे. सार्वजनिक जीवनात “खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे” यापेक्षा कोणताही धर्म मोठा नाही. जगातील सर्व धर्माच्या मुळ तत्वज्ञानाचा पाया, सत्य, प्रेम, करूणा, माणूसकी, अहिंसाच आहे. मात्र आपण धर्माच्या पलिकडे असलेल्या जीवन व्यवहारात कसलाही धर्म विचार डोकावताना फारसा दिसत नाही. धर्म तत्वांचा विचार न केल्याने मोठयाप्रमाणावर समाजाचे व राष्ट्राचे नुकसान होते आहे.

मुलांच्या अंतकरणात धर्म रूजवायचा असेल तर धर्माचे मुळ तत्वे आणि विचार रूजविण्याची गरज आहे. अनेकदा तत्वे आणि विचारापेक्षा कर्मकांडात गुंतवून ठेवणे म्हणजे धर्म ही धारणाच आपल्याला अधोगतीने घेऊन जाणारी वाटते. अनेकदा आपण ज्या धर्माचे आहोत तो धर्म कसा श्रेष्ठ आहे हे सांगण्याचा प्रयत्न पाहिला की आपल्याला धर्म तरी कळाला आहे का? असा प्रश्न पडतो. जगातील सर्व धर्म श्रेष्ठच आहेत. जेव्हा एखादा धर्म माणसांमाणसात भेद करण्यास सुरूवात करतो तेव्हा तो धर्म विचार नसतो. धर्ममार्तंडानी धर्मविचारात मोडतोड करून स्वतःच्या स्वार्थाकरीता त्यात काही घुसडलेले असते. जगातील कोणताही धर्म माणसांच्या विनाशाकरीता आस्तित्वात आलेला नाही. तो माणसांला उन्नत, प्रगत व अधिक प्रेमळ बनविण्यासाठी आलेला आहे.

धर्माने जगायला हवे..
आपण मुलांना गृहित का धरतो?

मुलांवरती धर्माचे संस्कार करायला हवे असे वाटत असेल, तर त्यांच्या समोर धर्माबददल बोलून फारसे काही साध्य होणार नाही. बोलून आणि केवळ पूजा अर्चा करून मुले धार्मिक बनण्याची शक्यता नाही. अनेकदा आपण मुलांवरती धार्मिक संस्कार व्हावेत म्हणून धार्मिक परंपरा जोपासत असतो. त्या पंरपरा जितक्या प्रामाणिक असतील तितका परीणाम अधिक साधला जात असतो. मात्र धार्मिक पंरपरांमागे जर तुमची अंधश्रध्दा किंवा भिती असेल तर ते धार्मिक परंपरा फारशा उपयोगाच्या नाहीत. धर्म हा जीवन विकासाकरीता आहे तो भिती, दहशत किंवा सक्तींने लादण्याचा अथवा केवळ पंरपरा जोपसण्याची गोष्ट नाही. आपल्या जीवन व्यवहारात आपण जे काही करतो आहोत त्या प्रत्येक कृतीमध्ये विवेकाचा विचार असायला हवा.

पंरपरेने एखादी धर्मकृती चालत आली असेल तर वर्तमानातील वैज्ञानिक सिध्दांतानंतर आपण विवेकाच्या पातळीवरती विचार करीत पंरपरा टाकून देण्याची हिम्मत ठेवायला हवी. जे चांगले आहे त्याची स्विकृती धर्म करीत असतो. चांगला विचार आणि कृती हाच धर्माचा विचार असतो. धर्माच्या नावाखाली आपण बकरी कापणे, नवस करणे, अंधश्रध्देचा विचार पुढे नेणे. अंगात देव येणे या गोष्टी जर वाईट आहेत त्या टाळायला हव्या. त्याचा संबंध धर्माशी संबंध जोडू नये. आपण धार्मिक कृत्ये जर ढोंगानी भरलेली असतील तर आपल्या त्यातून हाती फार काही लागण्याची शक्यता नाही.

धर्माने जगायला हवे..
आत्मनिर्भयतेच्या दिशेने..

तुकाराम महाराज म्हणाले होते की, “नवसे कन्या पूत्र होती मग का करणे लागे पती..” कपाळाला गंध, अंगात भगवे वस्त्रे घालून आणि गळ्यात माळा घालून कोणी संत होत नाही हे अंत्यत परखडपणे तुकोबाराय सांगतात. तुकोबांचा विचार हा ख-या अर्धाने सत्याच्या धर्माकडे जाणारा आहे. कबीरही तेच सांगतात.. केवळ देवासाठी आपण मोठयांने ओरूडून भजन केले आणि त्यात भाव नसेल तर ते भजन आणि हाक देवापर्यंत पोहचणार नाही. देवाला मुंगीच्या पायातील बांधलेल्या घुंगराचे देखील आवाज ऐकू येतो. देवासाठी फार सोंग करण्याची गरज नाही. देव फक्त भावाचा भुकेला आहे. त्यामुळे आपण मुलांपर्यंत जो धर्म घेऊन जाण्याचा प्रयत्न करणार आहोत त्याचा विचार करतांना वर्तन विचाराला अधिक महत्व आहे.

आपल्याकडे संत गाडगेबाबांसारख्या प्रबोधनकारांनी समाजात सत्य धर्माची विचारपंरपरा निर्माण केली. त्यांनी समाजाला कर्मात धर्म पाहण्याची वृत्ती विकसित करण्यासाठी किर्तने केली. त्यातून खरा धर्म सांगितला. महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सत्याचा धर्म स्विकारला. गांधीजीना आपले संपूर्ण जीवन धर्म तत्वज्ञानाने व्यापून टाकले होते. त्यांनी सत्य, अहिंसा, अस्तेय, अपरिग्रह, ब्रम्हचर्य या तत्वांचे पालन त्यांनी केले. आपण एकाच ईश्वराची लेकरे असू तर जातीभेद, चातुरवर्ण व्यवस्था तरी कशी असेल. जो धर्म माणसांमाणसांत भेद करतो तो धर्म गांधी नाकारत होते. म्हणून त्यांनी स्वातंत्र्याच्या राजकिय चळवळी बरोबर सामाजिक चळवळीला बळ देण्याचे काम केले आहे. त्यातून त्यांनी अस्पृश्यता निर्मूलनाकरीता केलेले प्रयत्न महत्वपूर्ण ठऱतात. त्यांची अहिंसा तत्वज्ञान देखील टोकाचे होते. माणसांत धर्म विचार जितका म्हणून प्रकाश टाकू शकेल तितके जीवन प्रकाशमान बनेल. त्या तत्वज्ञानावरती मानवाचे मनुष्यात्वात रूपांतर होणार आहे हे लक्षात घ्यायला हवे.

धर्माने जगायला हवे..
तुम्ही फक्त इतकेच करा..!

या देशात पंढरपूरच्या पांडूरगांचे दर्शन दलितांना खुले व्हावे याकरीता साने गुरूजी यांनी उपोषण केले होते त्याला आता 75 वर्ष पूर्ण होता आहेत. त्या उपोषणात जातीयता संपुष्टात यावी आणि ख-या अर्थाने धर्माचे पालन व्हावे अशाच विचार होता. त्यांनी धर्माची व्याख्या करताना म्हटले होते, की जगाच्या पाठीवर केवळ एकच खरा धर्म आहे तो म्हणजे फक्त प्रेमाचा. माणसांला माणसांवरती प्रेम करता यायला हवे. माणूस एकमेकावर प्रेम करू शकला तर त्या पलिकडे कोणताही धर्म विचार असू शकत नाही. प्रेम करण्यासाठी संवेदनशीलता हवी असते. जेथे संवेदनशीलता असते तिथे व्देष, मत्सर, भेदाभेद उरत नाही म्हणून जगातील सर्व धर्माचा पाया हा प्रेम आहे. दुर्दैवाने आपण प्रेमाची भाषा करतो; पण ते प्रेम मानवी जीवनात प्रतिबिंबीत करीत नाही. बाबा आमटे सारख्या माणसांचा संपूर्ण प्रवास कुष्ठरोंग्यावरील प्रेमाचा धर्म सांगणारा आहे. त्यामुळे ते जीवनभर त्या वाटेने चालत राहिले आणि आज ते माणूसंपणाच्या एका उंचीवर पोहचल्याचे आपल्याला दिसता आहेत.

धर्म हा माणसांला माणूसंपणाच्या उंचीवरच घेऊन जात असतो. त्यामुळे आपण धर्म शिकवायला हवा. धर्माच्या नावाखाली आपण व्देष पसरविणार असू तर आपण धर्म भ्रष्ट आहे. असा प्रचार करणार असू तर आपण धर्म बुडवे ठरण्याची शक्यता अधिक आहे. विवेकानंद हे धर्म जीवन जगणारे महापुरूष होते. ते धर्म परीषेदत भाषण करताना समोर बसलेल्यापैंकी ना जातीचे, ना धर्माचे, ना पंथाचे लोक होते तरी ते म्हणाले माझ्या बंधु आणि भगिनो.. हा भाव प्रेमाचा होता. त्यांनी जी विचाराची मांडणी केली ती सर्व मांडणी अहं ब्रम्हास्मी.. त्वं ब्रम्हासी... या विचारावर आधारित होती. आपण सारे एकाच परमेश्वराची लेकरे आहोत हे लक्षात घ्यायला हवे. तो विचार जगातील सर्व धर्माच्या माणसांमध्ये पेरला तर जगातील संघर्ष उरणार नाही.

धर्माने जगायला हवे..
घर हीच शाळा...

जग एका अऩोख्या शांततेची अनुभूती घेईल. धर्म म्हणजे संघर्ष नव्हेच. धर्माचे तत्वज्ञानच मुळात अंतरिक आणि बाहय शांततेसाठी आस्तित्वात आले आहे. त्या अनुभूतीसाठी मात्र सर्व धर्म प्रेरकांनाच कार्यरत राहवे लागेल. धर्माचे तत्वज्ञान हे सांगण्यासाठी नाही तर आचरणात आणण्यासाठी आहे हे लक्षात घ्यायला हवे. आपण वरवर सोंगा ढोंगाचा धर्म वेश परीधान करून धर्म पाळत गेलो, तरी त्यातून काही साध्य होण्याची शक्यता नाही. आपण मुलांना धर्म शिकू शकत नाही. त्यामुळे आपल्याला मुलांमध्ये धर्म रूजवायचा असेल तर पालक आणि शिक्षकांनाच आपल्या व्यक्तीगत जीवनात धर्माचे आचरण करावे लागेल. जे सांगायचे ते व्यक्तीगत जीवनात प्रतिबिंबीत झाले तरच मुलांच्या मध्ये धर्म अधोरेखित होईल.

धर्म ही सांगण्याची नाही तर जीवन व्यवहारात प्रतिबिंबीत करण्याची गोष्ट आहे.त्यामुळे आपण केवळ धर्म सांगायचा म्हणून पुस्तकातील विचार सांगत बसलो आणि जे सिध्दांत कालबाहय झाले आहेत त्यांच्यामागे लागत राहिलो तर आपल्याला त्यातून खरा धर्म विचार कळणार नाही.मुळात धर्म तत्वज्ञान, विचार हे कधीच ग्रंथाच बंधिस्त नसतात. धर्म तर प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रतिबिंबीत होण्याची गोष्ट आहे.मुले अनुकरणाने शिकतात या तत्वानुसार पालक आणि शिक्षक हे जर धर्माने वागले तर मुले आपोआप त्या वाटेने चालू लागतील. ती वाट म्हणजे देखावा नाही तर अनुकरणाची धर्म वाट असायला हवी.

त्याबददल गिजूभाई म्हणतात, की

धर्माबददल बोलून किंवा धार्मिक कृत्ये करुन

किंवा पारंपारिक वेष परिधान करुन

आपण मुलांना धर्म शिकू शकत नाही.

धर्म पुस्तकात नाही की मृत सिध्दांता मध्ये नाही

धर्म आहे जीवनामध्ये.

पालक आणि शिक्षक जर धर्माने जगले तर

मुलांना आपोआपच धर्माचे ज्ञान होईल

_संदीप वाकचौरे

(लेखक शिक्षण क्षेत्राचे अभ्यासक आहे)

Related Stories

No stories found.