Friday, April 26, 2024
Homeब्लॉगसांगा काय करायचे..?

सांगा काय करायचे..?

खरतर प्रत्येक मुलं अव्दितीय असतं. त्या मुलाला प्रत्यक्षात जाणून घेणे. त्याच्यावरती प्रेम करणे. त्याला जगण्यासाठी बळ देणे. त्याच्या सुयोग्य वाढ आणि विकासाकरीता सतत प्रोत्साहन देत राहाणे. मुलांना शिकण्यासाठी काही करून पाहण्यासाठी प्रेरणा देत मनगट आणि मस्तकाचे भरण करणे. मुलांना प्रत्यक्ष अनुभवाने काही शिकू देणे हे शिक्षण असते. मुलांना मुके बनविणे नव्हे तर अधिक विचार संवादक बनविणे महत्वाचे आहे. विचार करण्यास प्रवृत्त करणे. शिकण्यास सक्षम करणे.. जीवनाच्या वाटचालीत आनंदक्षम प्रवास घडविण्यासाठी त्याच्या जीवनात पाऊलवाट निर्माण करण्याची जबाबदारी पार पाडणे म्हणजे पालकत्व असते.

आपण खरच पालकत्व निभावतो का? असा प्रश्न पडावा अशी परीस्थिती आहे. घरात मुलांना काही करून पाहाण्याचे स्वातंत्र्य नाही.. आणि शाळेत पुस्तकातील आशयाच्या बाहेर जाण्याची वाट नाही. करून पाहणे आणि त्यात काय येते आणि काय येत नाही याची परीक्षा नाही. प्रश्न आणि उत्तरे यापलिकडे शिक्षणातील मूल्यमापन जात नाही. पदवी कोणती आणि पदविचे मार्क किती यापुढे आमची गुणवत्ता जात नाही. मात्र ते मार्क व्यक्तिच्या जगण्यासाठी सक्षमता प्रदान करीत नाही. घर आणि शाळा प्रत्येक गोष्ट करून पाहात शिकण्याची वाट सक्षम करण्याची संधी असते. बालकाचे करू पाहाण्यासाठी मन धजावत असताना देखील काही न करणे हाच संस्कार बनतो आहे. त्यामुळे मुलांचे आयुष्य बंधिस्त होत आहेत. शिकणे म्हणजे शब्दांचा पसारा असतो. मात्र त्याचा परिणाम जीवनाकडे एका मुक्त नजरेने पाहात, निसर्गाचा आस्वाद घेत उंत्तुग भरारी घेण्याची शक्ती गमावणे घडत असते.

- Advertisement -

बहरू दे ना मजला आता…

शिक्षणाचे कृतीशी असणारे नाते हळूहळू तुटत चालले आहे. काही करून पाहाण्यापेक्षा न करण्याकडे शिक्षण आणि घरातील संस्कार झुकता आहेत. त्यामुळे मुले अधिक मुकी आणि सांगकामे होता आहेत. घरात मुले काही करू लागली म्हणजे करू नका असे सांगत आपण मोठी माणंस पालकत्व निभावत असतो. मुलांनी काही करणे म्हणजे नुकसान करणे असते. घरात साफ सफाई करणे देखील अडचणीचेच ठरते. स्वयंपाक घरात काहीच न करू देण्याकडे कल असतो. मुलांनी स्वतःहून काही करण्याचा प्रयत्न केला तरी अनेकांची अडचण असते. अगदी शाळेत मुलांना अनेकदा प्रकल्प करण्यास सांगितला जातो, पण तो करणे म्हणजे पालकांना नुकसान वाटत असते. एकतर मुलांना जमणार नाही किंवा अधिक मार्क हवेत म्हणून पालकच त्या गोष्टी करीत असतात. त्यामुळे मार्क मिळत असतील पण शिकणे होण्याची शक्यता नाही.

एकदा लहान वर्गातील मुलांना वर्तमान पत्रातील येणा-या बोधकथांचे संकलन करण्याचा प्रकल्प देण्यात आला होता. मुल रोज सकाळी घरी येणा-या वर्तमानपत्रातील कथा वाचत होते. कथा समजून घेत होते आणि ती कापून चिकटवहीत चिकटवत होते. असे महिनाभर चालले होते. एक दिवस पालक आले आणि म्हणाले गोष्ट वाचते हे चांगले आहे; पण मुलं वर्तमानपत्रातील कथा कापून ती कात्रणे वहीत चिटकवते हे काही चांगले नाही. कारण विचारले तेव्हा म्हणाले “कात्रण कापल्यामुळे वर्तमानपत्राची रददी कमी भावात विकावी लागते. कात्रण कापल्यांने कमी येणारे भाव ही चिंतेची गोष्ट आहे”. पालक म्हणून ही वाटणारी चिंता मुलांच्या आयुष्याची कमी आणि रददीच्या भावाची अधिक होती. मुलांच्या बाबतीत आपण घेत असलेली काळजी त्याला ख-या शिक्षणापासून दूर नेणे आहे. त्याची काळजी म्हणजे जगण्यासाठीची सक्षम वाट शोधणे आहे. मुलांच्या शिक्षणासंबंधीने अधिक जागृकता दर्शवायला हवी आहे. मुलांच्या आयुष्यापेक्षा पेपरच्या रददीचा विचार जेव्हा अधिक महत्वाचा वाटतो तेव्हा पालक म्हणून किती जागृकता पेरण्याची गरज आहे याची जाणीव समाजात पेरण्याची गरज आहे. मुलांसाठी फार महाग वस्तू आणि अधिक स्मार्ट वस्तूची गरज नसते.

शिक्षण म्हणजे काय रे भाऊ ?

आपण महागाच्या घेतलेल्या वस्तू मुलांसाठी असल्या तरी त्या मोडू नये. नुकसान होऊ नये म्हणून त्याच्या हाती देण्यापेक्षा शोभेच्या ठिकाणी ठेवण्यात अधिक रस असतो. त्यात प्रतिष्ठा सामावलेली आहे. मात्र मुलांना अशा वस्तूच मुळात नको असतात. त्यांना प्रत्येकवेळी करून पाहाण्याची, मोडून, तोडून, जोडून पाहाण्याची मानसिक गरज असते. हाताची घडी तोंडावर बोट या पारंपारिक संस्कार आणि शिक्षणातून बाहेर पडण्याचा प्रयत्न वेगाने होण्याची गरज आहे. मुलांकडे पाहाण्याच्या दृष्टीकोनात पालकांना देखील बदल घडवायला लागणार आहे. जगाच्या पाठीवर आई आणि बाबा होणे नैसर्गिक असले तरी त्यासाठीचे शहाणपण जोपासण्यासाठी शिक्षणांची निंतात गरज आहे. आज दुर्दैवाने मुलांच्या विकासात सर्वाधिक अडचण मोठयांनी स्वतःच निर्धारित केलेली विचारधार वाटू लागली आहे. बालकांच्या आय़ुष्यात प्रत्येकवेळी मोठयांचा हस्तक्षेप हा स्पीडब्रेकर आहे. मोठी माणंस आपल्या पारंपारिक कल्पनाना घेऊन मुलांकंडे पाहातात. तसे संस्कार करू पाहातात.

काळ बदलतो आहे, संकल्पना बदलता आहेत. वर्तमानही बदलत असते त्याप्रमाणे आई, बाबा, शिक्षकांनी देखील परिवर्तनाची पाऊलवाट चालण्याची गरज आहे. अन्यथा मुले शिकल्यासारखी करतील पण तो आभास असेल. शिकणे म्हणजे केवळ वाचन, लेखन नाही तर त्यापलिकडे विचार करणे, सदसदविवेकाची पाऊलवाट चालणे असते, म्हणून मुलांना काही करून शिकू देण्याची गरज असते. प्रत्येक बालकाला शिकण्यासाठी स्वातंत्र्य हवे असते. अहो हेच पाहाना मुलांना जेव्हा स्वातंत्र्य मिळते तेव्हा त्यांचे खेळ ते कोणत्याही साधनाशिवाय खेळत असतात. त्यांचे नियम तेच तयार करतात. त्यांचे मूल्यमापन तेच करीत असतात. आजही पुस्तकात नसलेली अनेक खेळ मुलांचे गावोगावी खेळत असतात. मात्र मुलांचे स्वातंत्र्य म्हणजे मोठयांसाठी अडचणच ठरते. आज बालकांच्या जीवनप्रवासात स्वातंत्र्य हरवत चालले आहे. स्वातंत्र्य हरवणे म्हणजे गुलामीचा प्रवास आहे. कोणतीही गुलामी म्हणजे विचाराची शुन्यता असते. ही विचार शुन्यताच जीवनाच्या पराभवाच्या दिशेचा प्रवास घडवित असते.

आमच्या शिक्षणाचे काय..?

व्यवस्थेला धक्का देणारे विचार नकोच असतात. विचाराची पेरणी म्हणजे व्यवस्थेला प्रश्न विचारण्याची हिम्मत पेरणे असते. प्रश्न विचारण्याचे स्वातंत्र्य घेतलेले कोणालाही आवडत नाही. प्रश्न हा ज्ञानाचा प्रवास असला तरी ते प्रश्नच अनेकाची अडचन असते. महिलांचे स्वातंत्र इतिहासात हिरावले गेले याचे कारण विचाराने विचारलेले प्रश्नच होते. ज्ञानाचा प्रवास नेहमीच प्रश्नसंवादातून होतो आणि तो प्रश्नसंवाद ही आपली अडचण असते. भगवान रजनीश यांनी म्हटले आहे की, शिक्षणातून नवे काही बंडखोरपणाचा विचार पेरण्याची प्रक्रिया अपेक्षित नाही. ते पेरले जाऊ नये आणि ही गतीहिन असलेली व्यवस्था अशीच कासव गतीने चालू ठेवण्याचे काम शिक्षण व्यवस्था करते. या अपेक्षा जी माणंस अधिक चांगल्यापध्दतीने करतात त्यांना व्यवस्था आदर देत असतात. शिक्षकांनी प्रश्न विचारण्याची हिम्मत आणि बंडखोरीची प्रेरणा शिक्षणातून पेरली तर त्यांचा आदर टिकेल का? तर त्याचे उत्तर नाही असेच आहे.

सारे कसे स्थिर आहे ते टिकविणे व्यवस्थेला हवे असते.. भ्रष्टाचार सुरू असताना हे सुरूच असते.. कोणी काम चूकार पणा केला तर हे घडणारच.. कोणी लाच घेतली तर कामासाठी द्यावीच लागते असे समर्थन करणारी माणंस निर्माण होतात. याचा अर्थ शिक्षणातून वाईट व्यवस्थेच्या विरोधात बंड करण्याची शक्ती देण्याऐवजी आहे त्यात जगण्याची वृत्ती जोपासण्याकडे कल निर्माण केला जातो. शिक्षणातून विचार करण्यासाठी निर्माण करावी लागणा-या कृतीशिलतेच दर्शन घडत नाही म्हणून कृतीशुन्यता निर्माण होते आहे. काहीच न करणे सुरू राहाते आणि केवळ शब्दांच्या भोवती शिक्षण फिरत राहाते.. त्यांने मनात पेरणी होत नाही आणि मनही कोरडेच बनत जाते. त्यामुळे शिक्षण प्रश्नाची उत्तरे देते पण प्रश्न विचारण्याचे स्वातंत्र्य देत नाही. ते स्वातंत्र्य जेव्हा मिळेल तेव्हा शिक्षणाचा प्रवास गतीमान होईल.. आणि त्यातून माणंस घडतील. तो प्रवास सुरू ठेवण्यासाठी मुलांशी असणारे नात्यात बदल घडवावाच लागेल.

श्रमाविना स्मार्ट शिक्षण..

आपण मुलांना काहीच करू देण्यामुळे त्याच्या मनात काही प्रश्न निर्माण होतात.. त्या संदर्भान गिजूभाईंनी त्यांच्या सांगा मला या कवितेतून मुलांच्या भावनाचे दर्शन घडविले आहे. ते म्हणतात…

सांगा मला मी कुठे खेळायच?

उडी कुठे मारायची?

मी कोणाशी बोलायच?

मी आईशी बोलतो तेव्हा व्यत्यय आणतो,

बाबाशीं खेळायला जातो तेव्हा ते वैतागतात,

मी उड्या मारतो तेव्हा मला बस म्हणून सागंतात,

गाणे म्हणतो तेव्हा गप्प करतात.

सागां मला मी कोठे जायच?

आणि मी काय करायचे?

मुलांसाठी आई बाबांशी घडणा-या गप्पा देखील शिक्षण असते.. पण त्या गप्पा मोठयांसाठी व्यत्यय ठरतो. मुल जेव्हा नाचते, गाणे म्हणते, नकला करते तेव्हा तो मोठयांच्या प्रतिष्ठेसाठी अप्रतिष्ठा असते. मुलांना घरात काही करावे तरी अडचण.. मैदानावर खेळायला जावे, स्वयंपाक घरात काही मदत करावी.. कागदाचे काम करावे.. घरातील भिंती रंगवाव्यात… झाडाची पाने तोडून त्याचे काही करावे… रांगोळीने घराच्या बाहेर रांगोळी काढावी.. स्वतःच स्नान करावे.. झाडून घ्यावे.. काही पण करा.. तर ते न करणे हाच मोठयांचा घोका असतो.. मुलांच्यासाठी घरात एकच संस्कार.. नको..नको…. फक्त शांत बैस हेच शिक्षण बनले आहे.. मग मोठेपणी त्यांनी काहीच न केले तर मनात प्रश्नाचे काहूर उठते आणि मग पराभव झाल्यासारखे वाटते.. म्हणूच शिक्षणाच्या वयात कृतीशीलतेवर भर देण्याची गरज आहे.. अन्यथा.. ऐकण्याची सवय लागेल.. आणि विचारायचे विसरून जाण्याचा धोका आहे..

_संदीप वाकचौरे

(लेखक शिक्षण क्षेत्राचे अभ्यासक आहे)

- Advertisment -

ताज्या बातम्या