Thursday, April 25, 2024
Homeब्लॉगबालक जाणते सारे काही...

बालक जाणते सारे काही…

शिक्षण बालकांसाठी असते. मुलांचे शिक्षण सुरू राहाण्यासाठी शिक्षण प्रक्रियेत बरेच काही केले जाते. त्याच पध्दतीने घरात देखील बालकांच्या विकासाला केंद्रीभूत माणून बरेच काही करण्याचा प्रयत्न केला जातो. तरी सुध्दा बालकांसाठी जे काही केले जाते, जे कोणी करू पाहातात. तेथे तेथे मुलांना गृहित धरले जाते. ज्या बालकांसाठी केले जाते त्यांचा विचार मोठयाच्या विचार दृष्टीकोनातून केला जातो. बालकांच्या कल्याणांचा विचार सर्वत्र असला, तरी जे काही करणार आहोत ते सर्वच मोठयांच्या नजरेतून लहानांसाठी केले जाते.

आपण मोठी माणंस जेव्हा काही करू पाहातो तेव्हा ते लहानाना आवडेल का? त्याला रूचेल का? त्याच्या वयाला अनुरूप आहे का..? त्यात त्याचे भावविश्व आहे का? त्यांना काय हवे? हे तर आपणच ठरवतो. आपण जे ठरवतो त्यापेक्षा त्यांनाच काय हवे? हे ठरवून द्यायला हवे. घर, शाळा, समाज येथील प्रत्येक कृतीत बालकांना गृहित धरले जाते. बालकांसाठी जे करू पाहातो आहोत त्यात बालकाचा प्रत्यक्ष सहभाग, त्यांचा विचार कोठेच असत नाही. बालकांच्या विचाराची दखल घ्यावी.. त्यांना काही सांगायचे आहे.. त्यांना ऐकूण घ्यायला हवे असे आपल्या भोवताल मध्येच कोठेच घडतांना दिसत नाही. मुलांना गृहित धरण्यामागे मोठयांचा एक विचार असतो. इतक्या लहान वयात मुलांना स्वतःचे हित कशात आहे हे कसे कळणार? हा मोठयांचा प्रश्न आहे. त्याला विचार करता येतो हा विचारच मुळात येथील व्यवस्थेला मान्य नाही.

- Advertisement -

सांगा काय करायचे..?

अनेकदा मुलांच्या बाबतीत विचार करतांना गृहितकच अधिक असते. हे गृहितके मुलांच्या विकासावर परिणाम करीत असते. या गृहितकाने मुलांचे किती नुकसान होते यापेक्षा राष्ट्राचे किती नुकसान होते हे महत्वाचे आहे. आपण मुलांना जबाबदार घटक म्हणून जोपर्यंत स्विकारत नाही. त्याला काही कळते आहे असे जोवर स्वतंत्र्यपणे मानत नाही, त्यांना विचार करण्याची संधी दिली जात नाही. तोपर्यंत आपण समृध्द समाजाची वाटचाल चालू शकत नाही. समाजाला समृध्द आणि सृजनशील करण्याचा मार्ग मुलांवर काही लादून आपण कधीच निर्माण करू शकणार नाही. मुलांना विचार करता येतो.. मोठे जो विचार करतात त्यातील सत्व आणि तत्व देखील त्यांना ज्ञात असते. फक्त त्यांना स्वातंत्र्याचा अभाव असल्याने अभिव्यक्त होता येत नाही इतकेच. पण त्यांना सारे काही कळते हे कधीतरी स्विकारावेच लागेल.

बालक शाळेत शिकण्यासाठी येते. याचा अर्थ ते बाहेर काही शिकत नसते असे नाही. बालक शाळेत येण्यापूर्वी जगण्यासाठी लागणा-या ब-याच गोष्टी शिकलेले असते. बालकांने जगण्यासाठी लागणारे अनेक कौशल्य ते बाहयपरिसरातच प्राप्त करीत असते. त्यामुळे शाळेत आल्यावरच सर्व शिकते असे म्हणणे धाडसाचे ठरेल. बालक खरेतर निरिक्षणाने अनेक गोष्टी जाणत असते. बालकांना बोलता येते, ऐकता येते, निरिक्षण करता येते, विचार करता येतो. त्याला परीस्थितीचे भान असते. प्रत्येक बालक म्हणजे मोठयांची प्रतिकृती नाही तर ती स्वतंत्र्य व्यक्ती असते. मात्र त्याला व्यक्ती म्हणून न स्विकारता आपण मोठयाची प्रतिकृती म्हणून स्विकारात असतो. बालकाला विचार करता येतो हे आपण मान्य करीत नाही. बालकांना स्वातंत्र्य देणे मोठयांना मान्य नसते. त्यांना स्वातंत्र्य दिले तर ते पेलण्याची विवेक शक्ती त्यांच्यात नसते. त्याना चांगले काय आणि वाईट काय हे कळत नाही. कदाचित ही मोठयांची धारणा असू शकते. मात्र मुलांना स्वातंत्र्य देणे याचा अर्थ त्यांना अधिक जबाबदार नागरिक निर्मितीच्या दिशेने घेऊन जाणे असते हे आपण लक्षात घ्यायला हवे.

बहरू दे ना मजला आता…

मुलांसाठी मोठी माणंस जे करतात ते खरच त्यांच्यासाठी असते का? अगदी खेळणे निवडायचे म्हटले तरी बालकांना स्वातंत्र्य नसते. बालकांला जे हवे असते ते देण्याऐवजी मोठयांच्या मनात जे काही आहे त्या धारणेच्या दृष्टीने खेळणी निवडली जाते. ती खेळणी कदाचित श्रीमंतीचे दर्शन घडविणारी असेल पण ते बालकांच्या मनाला आंनद देणारे असेलच असे नाही. बालकांना सहका-यांसोबत खेळण्यासाठीचे साहित्य हवे असते. त्यांना आपल्या समवस्यक मित्रांसोबत खेळायचे असते. ते साहित्य मोडून, तोडून जोडता यायला हवे असते. मात्र मोठयांना खेळणी अधिक मजबूत आणि टिकाऊ हवी असते. मोठयांच्या दृष्टीने ती खेळणी त्यांने एकटयांने खेळणे अधिक सोईस्कर असते.

आपले ते इतरांना कशासाठी? रवीद्रनांथ टागोर यांची राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडयाच्या प्रारंभी एक गोष्ट लिहिली आहे. तीचा सारांश असा, खेळणी मुलांसाठी घेतली जाते. ती अधिक पैसे मोजून आणली जाते. मात्र ती इतकी किमंतीची असते, की मुलांच्या हाती द्यावी असे पालकांना वाटत नाही. त्या ऐवजी ते खेळणी कुलूप बंधिस्त कपाटात ठेवण्यास पालक पसंती देतात. मुळात खेळणी मुलांसाठी आहे. पण पैसे मोजल्यांने तीचे स्थान मुलांच्या हाती येण्याऐवजी कपाटात गेल्यांने त्याचा फारसा लाभ बालकांना होत नाही. तिच्यासोबत खेळायची संधी नाही म्हटल्यावर त्याला आनंदही नाही. त्यामुळे खेळणी आणून काय लाभ होणार? हा प्रश्न आहे. असे वर्तन पालकांनी केले तर पालकांनी मुलांची गरज भागविली नाही. खेळणी मुलांसाठी हवी आणि ती त्यांच्या पसंतीची हवी हे लक्षात घ्यायला हवे.

शिक्षण म्हणजे काय रे भाऊ ?

वर्गात मुलांना स्वातंत्र्य दिले गेले तर मुले उत्तम जबाबदारी निभावतात. अनेकदा मुलांना आज काय शिकायचे? असे विचारले तर बालके योग्य असेच उत्तर देतात. त्यांनाही कंटाळा, थकवा येत असेल. त्यामुळे त्यांच्या मनाचा विचार करून आपल्या ताठर वेळापत्रकात बदल करायला काय हरकत आहे. मुलांना भान असते… सकाळी शाळा सुरू झाल्यानंतर आपण त्यांना काय शिकायचे? असे विचारले तर ते अध्ययन अध्यापनाचे विषय सूचवतील. कोणी विद्यार्थी खेळ, कला असे नाही सूचवत. सकाळी शिकल्यानंतर आलेला कंटाळा लक्षात घेतला तर ते दुपारीच खेळ, कला सूचवितात. केव्हा काय शिकायचे हे त्यांना ज्ञात असते. त्यांनाही स्वतःच्या शिक्षणाची काळजी असते. फक्त त्यांना स्वातंत्र्य देऊन विश्वास दाखविण्याची गरज असते. बालकांना स्वातंत्र्य देणे म्हणजे अधिक जबाबदारीचे भान असते. त्यांना व्यक्ती म्हणून स्विकारले तर बरेच प्रश्न सुटू शकतात.

एखाद्या दिवशी शिक्षकांच्या मस्तकी ताण असेल, संताप असेल तर त्या दिवशी मुले वर्गात कधीच गोंधळ करीत नाही. मुलांना नेमके कारण माहित नसते? काय झाले ठाऊक नाही मात्र तरीसुध्दा मुले त्या दिवशी शिक्षकांचे असलेले वर्तन, आवाजातील चढउतार, चालणे, बोलणे लक्षात घेऊन शांत राहाणे पसंत करतात. त्यांचे निरिक्षणावरून अंदाज बांधत असतात आणि त्यानुसार प्रतिसाद देत असतात. मुले शिक्षक, पालक यांच्या प्रतिसाद, वर्णनावरून आपले विचार काय आहेत हे जाणत असतात. त्यामुळे मुलांना काही माहित नसते, कळत नसते असे म्हणून दुर्लक्ष करणे म्हणजे आपण मुलांना जाणून घेण्यात कमी पडलो असे म्हणण्यासारखे आहे. घरात देखील आपल्या मनिषा केव्हा पूर्ण होतात हे त्यांना पक्के ठाऊक असते. तेव्हा मार बसतो.. केव्हा कौतूक होते या जाणीवा असल्यांने ते घरात पाहुणे आल्यावर ठरतात कसे वर्तन करायचे. मागणी करतांना देखील केव्हा मागायचे, कसे मागायचे हेही त्यांना माहित असते.घरातील वातावारणांचा त्यांना अंदाज असतो.

आमच्या शिक्षणाचे काय..?

प्रसिध्द शिक्षणतज्ज्ञ गिजूभाई बधेका आपल्या एका कवितेत त्या संदर्भाने लिहितात.

मुलाला माहित आहे –

आपल्या डोळ्यात अमृत आहे की विष,

आपले शब्द गोड आहेत की कडू,

आपला स्पर्श मऊ आहे की रुक्ष,

आपले मन आदराने भारलेले आहे की तिरस्काराने,

मुलाला लगेच जाणवते,

त्याला सर्व काही माहित असते.

बालकांच्या भावना नेमकेपणाने गिजूभाई जाणून आहेत. प्रत्येक बालक मोठयांच्या नजरेतील भाव वाचत असते. मुलांना वाचता येते, जाणता येते. मोठयाच्या डोळ्यात अमृत आहे की विष आहे.. तुम्ही मुलांना कोणत्या स्वरात आणि कोणत्या भावनेने बोलता हे जसे कळते तसे तुमच्या डोळ्यात भाव देखील वाचत असतात. बालकांना शब्द वाचायला शिकवावे लागतात, मात्र डोळ्यातील भाव शिकविण्याची गरज नाही. ते कौशल्य स्वतःहून शिकत असतात. त्यामुळे डोळ्यात नेमके कोणते भाव आहेत याचा परिचय त्यांना असतो.. ते कधी अमृताचे असतील तर त्यांना त्यांचा आंनद असतो. विषारी भाव असतील तर त्यांची प्रतिक्रिया शांत राहाणे एवढीच असते. त्यांना मोठयांच्या डोळ्यात विष दिसले तर प्रतिक्रिया देण्याचे स्वातंत्र्य त्यांना नसते हे त्यांनी गृहित धरलेले असते. त्यांच्या मनात मोठयांबददलची भिती असते. त्यामुळे त्यांना माहित असूनही व्यक्त होता येत नाही.

श्रमाविना स्मार्ट शिक्षण..

मोठी माणंस जेव्हा बोलतात तेव्हा त्यातील भाव गोड की कडू आहेत हे लक्षात येण्याइतके शहाणपण त्यांच्यात निश्चित आलेले असते. मोठी माणंस जेव्हा कडू बोलतात तेव्हा बालक कदाचित अश्रूंनी बोलत असते. तेव्हा त्याचा प्रतिसाद म्हणून कधी कधी मोठयांपासून दूर जाणे घडते. सातत्याने कडू बोलण्याचा अनुभव असेल तर मुलाचा भावबंध तुटण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे मोठयांच्या प्रत्येक शब्दाचा अर्थ ते जाणत असतात आणि त्यानुसार स्वतःचा निर्णय घेत असतात. मात्र ते निर्णय त्यांच्यापुरते असतात इतकेच.त्याच बरोबर आपण जेव्हा मुलांना स्पर्श करतो तेव्हा त्या स्पर्शातील भावना त्यांना ओळखता येत असतात. त्यातील मऊ कि रूक्षता हे जाणण्याची क्षमता असते प्रत्येक बालकात.

बालकांच्या प्रति मोठयांच्या मनात आदर आहे की तिरस्कार हे देखील ते जाणत असतात. बालकांना सर्व काही कळत असते आणि त्यांना मोठयांच्या प्रत्येक वर्तनातील भाव ओळखता येतात हे जाणून घ्यायला हवे. आपण मोठी माणंस अनेकदा बालकांच्या प्रति हुशारीचे वर्तन ठेवतो, पण त्या वर्तनात शहाणपण अजिबात नसते. आपण बालकांपासून जे काही लपवत असतो ते त्यांना माहित नसते असे अजिबात नाही. त्यामुळे बालक जाणतात हे लक्षात घ्यायला हवे. त्यांना काही कळते हे लक्षात ठेवायला हवे. मुलांना सारे काही माहित असते. ते बोलत नाही. प्रतिसाद देत नाही याचा अर्थ त्यांना कळत नाही असे नाही. ते बोलत नाही याचे कारण ते मोठयांना जाणून असतात इतकेच! त्यांचे स्वातंत्र्य हिरावून घेतल्यांने जबाबदार नागरिक म्हणून घडविण्याचा प्रवास काहिसा खंडित होतो. त्यामुळे आपण राष्ट्र विकासाच्या प्रक्रियेला खीळ घालत असतो. त्यातून आपण समाज व राष्ट्राचे नुकसान करतो इतकेच

_संदीप वाकचौरे

(लेखक शिक्षण क्षेत्राचे अभ्यासक आहे.)

- Advertisment -

ताज्या बातम्या