साधूमहात्म्यांच्या सानिध्यातून सनातन समरसतेचे दर्शन

साधूमहात्म्यांच्या सानिध्यातून सनातन
समरसतेचे दर्शन

महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांच्या संकल्पनेतून व नेतृत्वाखाली सतपंथ चॅरिटेबल ट्रस्ट फैजपूर व अखिल भारतीय सनातन सतपंथ परिवार यांच्यातर्फे 29 ते 31 डिसेंबर 2022 दरम्यान फैजपूरजवळील वढोदे येथे नव्यानेच उभारण्यात आलेल्या निष्कलंक धाम परिसरात समरसता महाकुंभ पार पडला. देशभरातील साधूमहात्म्यांचे सानिध्य, दर्शन व आशीर्वचनातून विविध संप्रदायांमधील सनातन समरसतेचे दर्शन घडले

महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांच्या संकल्पनेतून व नेतृत्वाखाली सतपंथ चॅरिटेबल ट्रस्ट फैजपूर व अखिल भारतीय सनातन सतपंथ परिवार यांच्यातर्फे 29 ते 31 डिसेंबर 2022 दरम्यान फैजपूरजवळील वढोदे येथे नव्यानेच उभारण्यात आलेल्या निष्कलंक धाम परिसरात समरसता महाकुंभ पार पडला. देशभरातील साधूमहात्म्यांचे सानिध्य, दर्शन व आशीर्वचनातून विविध संप्रदायांमधील सनातन समरसतेचे दर्शन घडले धार्मिक व अध्यात्मिक दृष्टिकोनातून सर्वच साधूमहात्म्यांनी एकतेची व समरसतेची गरज पटवून दिली. एकूणच बंधुभाव, प्रेम, समानता, धर्मरक्षण, वात्सल्य यांच्या एकत्रिकरणातून किंबहुना अमृतमंथनातून हा समरसता महाकुंभ यशस्वी ठरला.

भव्य शोभायात्रा

समरसता महाकुंभाच्या शुभारंभप्रसंगी पिंपरूड फाटा ते वढोदे येथील निष्कलंक धामपर्यंत तब्बल तीन किलोमीटर काढण्यात आलेल्या शोभायात्रेच्या माध्यमातून श्रीविष्णू परमात्म्याच्या दशावतार कथेत असलेल्या विविध अवतारांचे सजीव देखाव्याचे दर्शन घडविण्यात आले. तसेच यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद आणि ऋग्वेद अशा चार वेदांसह विविध ग्रंथांचे सजीव दर्शन ग्रंथाच्या प्रतिकृती होत्या. इतर देवीदेवतांचे देखील सजीव दर्शन झाले. श्रीरामाचा सचिव देखावा साकारताना लक्ष्मण, सीता, हनुमान यासह विविध पात्रांचे सजीव देखावे साकारण्यात आले. श्रीकृष्ण, परशुरामाची वेशभूषा धारण केलेले सजीव देखावे शोभायात्रेचे मुख्य आकर्षण होते. सुरूवातीला कलशधारी बालिका व महिला, त्यानंतर विविध भजनी मंडळ संतांचे अभंग गात आणि पावली खेळत चालत होते. संपूर्ण भारतभरातून आलेले संतमहंत यांची अश्वारूढ रथातून मिरवणूक काढण्यात आली. प्रत्येक रथात चार ते पाच संत अशा पद्धतीने सुमारे 25 रथ एका मागोमाग शोभायात्रेत सहभागी झाले होते. सोबतच सतपंथाचा ध्वज होता.

निष्कलंक धाम लोकार्पण

फैजपूरजवळील वढोदे येथे नव्यानेच उभारण्यात आलेल्या निष्कलंक धामचे लोकार्पण यासह सतपंथ मंदिर संस्थान फैजपुरचा चतु:शताब्दी रौप्य महोत्सव, अखिल भारतीय संत संमेलन फैजपूरचा दशाब्दी महोत्सव, महामंडलेश्वर श्रीजनार्दन हरीजी महाराज यांचा साधूदीक्षा रौप्य महोत्सव, श्रीजनार्दन हरीजी महाराज यांचा महामंडलेश्वर पट्टाभिषेक दशाब्दी महोत्सव, परमपूज्य ब्रह्मलीन गुरूदेव जगन्नाथजी महाराज यांची 21 वी पुण्यतिथी, तुलसी हेल्थ केअर सेंटरचा लोकार्पण समारंभ आणि श्रीजगन्नाथ गौशाला भूमिपूजनाचा समारंभ समरसता महाकुंभात पार पडला.

संतवाणी व आशीर्वचन

महाकुंभात तीनही दिवस देशभरातून आलेल्या शेकडो साधूमहात्म्यांचे सानिध्य, दर्शन व आशीर्वचनातून आध्यात्मिक ऊर्जा मिळाली. त्यातील जगद्गुरु शंकराचार्य वासुदेवानंद सरस्वती महाराज, ज्ञानेश्वरदासजी महाराज, ज्ञानदेवसिंहजी महाराज, अविचलदासजी महाराज, धर्मदेवजी महाराज, जितेंद्रानंदगिरी महाराज, पंकजदासजी महाराज, राजेंद्रदासजी महाराज, ब्रह्माकुमारीज रामनाथ भाई, स्वामी अद्वैत अमृतानंदजी महाराज, जितेंद्रनंदजी महाराज, आचार्य मानेकर शास्त्री महाराज, बाळकृष्णदासजी महाराज, अनंत देवगिरीजी महाराज, रवींद्रगिरीजी महाराज, पुरुषोत्तमदास महाराज, गोपाल चैतन्यजी महाराज, देवेंद्रानंदगिरीजी महाराज, महंत बालकादासजी महाराज, पद्मश्री ब्रम्हेशानंदजी महाराज, गौरीशंकरदासजी महाराज, चिदानंदगिरीजी महाराज, स्वामी वेदानंदजी महाराज, कमलनयनदासजी महाराज, अविचलदासजी महाराज, फुलोबिहारीदासजी महाराज, जगद्गुरु रामानंदाचार्य रामराजेश्वराचार्यजी महाराज, आचार्य संदेश श्रवणजी, दिव्यानंदजी महाराज, ईश्वरदासजी महाराज, हरिचैतन्य महाराज, नरसिंहदासजी महाराज, भक्ती किशोरदासजी महाराज, शरणदासजी महाराज, ज्ञानेश्वरदासजी महाराज, सुरेश सदाशिव भैयाजी जोशी यांनी मार्गदर्शन केले. राधे राधे बाबा महाराज तीनही दिवस उत्कृष्ट सूत्रसंचालन केले.

हिंदू जागृत होण्याची गरज

अनंत देवगिरीजी महाराज यांनी आपल्या मनोगतातून हिंदू जागृत होण्याची गरज असल्याचे सांगितले. समरसता शब्दाला समानार्थी शब्द मानवता आणि मानवतेला समानार्थी शब्द हिंदुत्व आहे. कायद्यातील काही नियमांमुळे हे राष्ट्र विभागले जात आहे. 370 कलम हटवावे अशी मागणी पूर्वीपासून होती, ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्ण केली आहे. आता कलम 30 देखील हटवावा आणि देशात समान नागरी कायदा आणला जावा, जेणेकरून देश हा विविध तुकड्यांमध्ये विभागला जाणार नाही. त्यासाठी हिंदू जागृत होण्याची गरज आहे, असे ते म्हणाले. त्यांच्यानंतर अनेक महाराजांनी त्यांचे हे मुद्दे उचलून धरले.

ब्रह्मभोजन

समरसता महाकुंभात आलेल्या सर्वांसाठी तिनही दिवस ब्रह्मभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. त्याचा लाभ सुमारे लाखो भाविकांनी घेतला. सकाळी नाश्ता, दुपारी व संध्याकाळी जेवण अशा पद्धतीने अत्यंत नियोजनपूर्वक आणि उत्कृष्ट भोजनाचा आस्वाद देण्यात आला.

दानदाता सन्मान समारंभ

वढोदे येथे बांधण्यात आलेल्या श्रीनिष्कलंक धाम, तुलसी हेल्थ केअर सेंटर व श्रीजगन्नाथ गौशाला या प्रकल्पाला जनार्दन हरीजी महाराज यांच्यावर विश्वास व श्रद्धा असलेल्या भाविकांनी तन-मन-धनाने भरभरून सहकार्य केल्याने त्यांना जगद्गुरु व साधूमहात्म्यांचे हस्ते सन्मानपत्र देऊन आशीर्वाद दिले. तसेच तीन दिवसाचे जेवण, नाश्ता, मिनरल वाटर, बॅनर, स्टिकर, ड्रायफ्रूट, स्टेज, साऊंड सिस्टिम, फोटो, व्हिडिओ, मंडप, फुल माळा, निमंत्रण पत्रिका अशा वेगवेगळ्या कामांसाठी दान मिळाले.

आयुर्वेदाचार्य श्रीधन्वंतरी याग

महाकुंभात अखंड नामजप व नामसंकीर्तन करण्यात आले. तसेच जळगाव येथील श्रीकांत रत्नपारखी यांच्या नेतृत्वाखाली आयुर्वेदाचार्य श्रीधन्वंतरी पार पडला. यात पहिल्या दिवशी मंडप प्रवेश, देवता स्थापन व हवन, दुसर्‍या दिवशी प्रातःपूजन, हवन, अर्चन, दीपोत्सव तर तिसर्‍या दिवशी बलिपूजन व पूर्णाहुतीने सांगता झाली.

वैद्यकीय उपचारावर भर

समरसता महाकुंभामध्ये संजीवनी ब्लड सेंटर फैजपूर यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात 305 रक्तदात्यांनी रक्तदान केले. मोफत वैद्यकीय तपासणी शिबिरात गुजरात येथील डॉक्टरच्या टीमकडे 700 रूग्णांनी तपासणी करून औषधोपचार घेतले तर महाराष्ट्रीयन डॉक्टर टीम यांच्याकडे 1200 रूग्णांनी औषधोपचार घेतले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोविड वॅक्सिनेशन शिबिरात 66 जणांनी लसीकरण करून घेतले.

लाखो भाविकांचा सहभाग

समरसता महाकुंभासाठी उभारण्यात आलेला सभामंडप भव्य दिव्य स्वरूपाचा होता. यात हजारो भाविक बसतील अशी व्यवस्था होती. दुरून व्यासपीठ दिसणार नाही म्हणून एकाच सभामंडपात सात डिजिटल बोर्ड लावण्यात आले होते. समोरच ध्वजारोहणाचा उंच स्तंभ सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होता. फक्त महाराष्ट्रच नव्हे तर गुजरातसह इतर राज्यातून किंबहुना देशाच्या कानाकोपर्‍यातून शेकडो साधूमहात्मे आणि लाखो भाविक समरसता महाकुंभाचा लाभ घेण्यासाठी आले होते. महाराष्ट्रासह बाहेरील राज्यातील भाविकांची देखील संख्या जास्त होती. गुजरात राज्यातून तर सुमारे 30 लक्झरी, चार चाकी वाहने आणि आगगाडीने भाविक समारंभात सहभागी होण्यासाठी दाखल झाले होते. तिनही दिवस त्यांच्या निवासाची व ब्रह्मभोजनाची उत्कृष्ट व्यवस्था करण्यात आली.

उत्कृष्ट व्यवस्थापन - महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या समरसता महाकुंभाचे व्यवस्थापनही उत्कृष्ट असे होते. सभामंडप, ब्रह्मभोजन, पार्किंग, निष्कलंक धाम, विविध स्टॉल यासह अनेक ठिकाणची शिस्तबद्ध व्यवस्था स्वयंसेवकांनी सांभाळली. विशेष म्हणजे प्रत्येक ठिकाणची व्यवस्था एकेका गावच्या स्वयंसेवकांना सोपवून देण्यात आली होती, त्यांनी ती अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडली.

महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज भावुक

तीनदिवसीय समरसता महाकुंभात महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज ब्रह्मलीन गुरूवर्य जगन्नाथ महाराज यांचे स्मरण, वडील लहेनसिंग कट्यारसिंग चव्हाण व आई सौ. कांताबाई लहेनसिंग चव्हाण यांचा त्याग व समर्पणाची भूमिका आणि महाकुंभात अहोरात्र सेवा देणारे स्वयंसेवक यांच्याविषयी बोलताना भावुक झाले व त्यांचे डोळे अश्रूंनी डबडबले. महाकुंभात वेळोवेळी बोलतांना त्यांनी सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले. तसेच समारोपात बोलतांना ते म्हणाले की, गायरान जमिनीवर मस्जिद अथवा मंदिर नाही तर गायींसाठी ती जमीन असावी, यासाठी पुढाकार घेण्याचे काम सध्या सुरू आहे. गायरानची जमीन खाली होत नसेल तर अखिल भारतीय संत समितीचे 180 आखाडे आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला. गाय हा आमच्या श्रद्धेचा भाग आहे. अनधिकृत गोवंश वाहतूक बंद करावी, गोहत्या व कत्तलखाने बंद करावे, वर्षानुवर्षे गावोगावी असलेली गायरान जमीन ही मस्जिदच काय परंतु मंदिरासाठी पण कोणाला देऊ नये. ती फक्त आणि फक्त गायींसाठीच राखीव ठेवावी, असा कायदा शासनाने करावा, ही अखिल भारतीय संत समितीची मागणी त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केली.

पादत्राणेविना नियोजन

समरसता महाकुंभ नियोजन झाल्यापासून आयोजन होईपर्यंत व संपूर्ण महाकुंभ पार पडेपर्यंत अखिल भारतीय संत समितीचे खजिनदार सतपंथरत्न महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांनी पादत्राणे न घालता अनवाणी राहून सर्व कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन केले. त्यांचा संकल्प पूर्णतः सिद्धीस गेल्याने सौ. ज्योत्स्नाताई ठोंबरे व महाराजांच्या मातोश्री सौ. कांताबाई लहेनसिंग चव्हाण यांच्या हस्ते पुरोहित रत्नपारखी महाराज जळगाव यांच्या मंत्र उपचाराने विधिवत पाद्यपुजन करून पादत्राणे पायात घातली. यावेळी महाराजांसह सर्वांच्या डोळ्यात आनंदाश्रू वाहू लागले. यावेळी त्यांचे उत्तराधिकारी एकदंत महाराज यांच्यासह उपस्थित सर्व गद्गदीत झाले.

धर्मध्वज, सभामंडप व अग्नी पूजेने समरसता महाकुंभाची सांगता

धर्माध्वजाची पूजा करून सन्मानपूर्वक खाली उतरविण्यात आला. त्याचबरोबर भव्य सभामंडप व रसोई घरातील अग्नीची पूजा करून त्यांना नमन करून शांत करण्यात आले.

स्वच्छतेने समारोप

समरसता महाकुंभातील प्रत्येक गोष्ट नोंद घेण्यासारखी आहे. लाखो भाविकांची उपस्थिती लाभल्यानंतर परिसरात उभारण्यात आलेला सभामंडप, ब्रह्मभोजन व पार्किंगची सुविधा आदी ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात लावण्यात आलेले मंडप काढून तेथील परिसराची स्वच्छता करण्यात आली. परिसरातील शेतकर्‍यांनी महाकुंभासाठी शेती उपलब्ध करून दिली. त्यामुळे त्यांच्या शेतीत जमा झालेला कचरा तसेच प्लास्टिक व इतर वस्तू जमा करून स्वच्छता मोहीम देखील राबविण्यात आली. जमा झालेला कचरा खड्ड्यात पुरणार असून कुठेही नदी, नाले या ठिकाणी फेकला जाणार नाही. सुमारे दीडशे स्त्री-पुरुष स्वयंसेवकांनी परिसरातील कचरा, फुलमाळा, प्लास्टिक, कागद, कॅरीबॅग व अन्य निरूपयोगी वस्तू एकत्र करून त्यांची विल्हेवाट लावली.

दहा वर्षाआधी पार पडलेल्या अखिल भारतीय संत संमेलनाप्रमाणे हा समरसता महाकुंभ हा इतिहासाचा साक्षीदार राहणार आहे. निसर्ग, नियती व प्रकृती सोबत असल्याने कोणतीही अडचण आली नाही. तरूणांचे मोठ्या प्रमाणात संघटन होऊन त्यांच्या हातून देशधर्माचे कार्य झाले. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी याच महाकुंभाची चर्चा आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com