Friday, April 26, 2024
Homeब्लॉगराऊंड द विकेट : आखाती देशात ‘यलो फिवर’

राऊंड द विकेट : आखाती देशात ‘यलो फिवर’

डॉ. अरुण स्वादी

या मोसमात आखाती देशात सगळीकडे ‘यलो फिवर’ (Yellow fever) होता. ही पिवळ्या रंगाची उधळण सुरू झाली ती चेन्नई सुपरकिंग्जच्या (Chennai Super Kings) विजयामुळे आणि आता ऑस्ट्रेलियाच्या (Australia) विजयाने तिथे सोन्याहून पिवळे झाले आहे. ऑस्ट्रेलिया संभाव्य विजेते नाहीत, असे फार क्वचित घडते, पण या स्पर्धेसाठी तसे झाले खरे. त्यातच त्यांची अडखळती सुरुवात, मग इंग्लंडविरुद्धचा (England) पराभव यामुळे कांगारूंना कोणी खिजगणतीत धरत नव्हते, पण पाकिस्तानला (Pakistan) धोबीपछाड दिल्यावर त्यांच्यात अठरा हत्तींचे बळ आले. किविज्ना त्यांनी चिरडले, असे म्हणायला आता हरकत नाही.

- Advertisement -

प्रथम त्यांनी किविज्ना 172 वर रोखले. म्हटले तर या धावा अंतिम सामन्याच्या दृष्टीने काकणभर जास्त होत्या, पण फींचने नावापुरती हजेरी लावल्यावर मग मात्र मिचेल मार्श व वॉर्नरने सूत्र हाती घेतली. टीम सौदी आणि अ‍ॅडम मिल्ने दोघांचा काल दिवस नव्हता. लेगस्पिनर सोधी तर टप्पा विसरला होता. मार्शने तो विसरायला लावला असेल. सँटनर आणि बोल्टने शर्थीचे प्रयत्न केले, पण आकाश फाटले होते. ठिगळे तरी किती लावणार? मार्शच्या झंझावातासमोर ते पालापाचोळा होऊन उडून गेले.

नाणेफेक या सामन्यात तरी निर्णायक नव्हती, पण पहिल्या सत्रात खेळपट्टी संथ वाटत होती आणि किंचित कमी-जास्त वेगात चेंडू येत होता. मात्र कांगारू खेळले तेव्हा विकेट फलंदाजांच्या प्रेमात पडली होती. तरीही असे वाटत होते. पहिल्या 10 ओव्हरमध्ये न्यूझीलंडचे फलंदाज अंतिम सामन्याच्या दडपणाखाली कांगारू गोलंदाजांना ज्यास्तच आदराने खेळले. तिथेच सामन्याची सूत्रे ऑस्ट्रेलियाच्या हातात गेली.

एकट्या केन विल्यम्सनने मात्र कडवी लढत दिली. कर्णधार म्हणून आणि एक फलंदाज म्हणून आज तरी केन विल्यमसन ‘परि या सम हाच’ आहे. खेळाडू म्हणून आणि माणूस म्हणून तो क्रिकेटचा खरा राजदूत आहे. एखाद्या चित्रकाराने चित्र काढून त्यात रंग भरावेत तसे अंतिम सामन्यात त्याने फटकेबाजी करीत रंग भरले.

त्याला म्हणावे तशी साथ मिळाली नाही. उलट आपल्या संथ खेळामुळे प्रथम गप्टील आणि मग फिलिप्सने गतिरोधक म्हणून काम केले. अर्थात ऑस्ट्रेलियाचा मारा निश्चित प्रभावी होता. हेजलवुडवर ‘टेस्ट मॅच बॉलर’ म्हणून शिक्का बसला होता. गेल्या वर्षात त्याने तो संपूर्ण पुसला आहे. आज तो झम्पाबरोबर ऑस्ट्रेलियाचा प्रमुख गोलंदाज ठरत आहे.

ऑस्ट्रेलिया सर्वात जास्त आयसीसी ट्रॉफी जिंकणारा देश आहे. गेली काही वर्षे त्यांना ट्रॉफीचा दुष्काळ पडला होता. तो या विजयाने संपला आहे. त्यांच्या या विजयात आयपीएलचा मोठा हात आहे. हेजलवुडला त्यांनी टप्पा शोधून दिला.

झंपाला फ्लॅट लेगस्पिनचे आणि कमिन्स व मॅक्सवेलला पोस्ट ग्रॅज्युएट शिक्षण त्यांनीच दिले. इतर देशातल्या खेळाडूंना आपल्या स्पर्धेत खेळवायचे, पण आमच्या खेळाडूंना कोठेही खेळू द्यायचे नाही. का तर आमची मोनोपली..आमचे मंडळ यातून काही धडा घेईल? आज मात्र दिवस आहे फिंचच्या संघाचा. नव्या ‘चॅम्पियन’ संघाचे अभिनंदन!

- Advertisment -

ताज्या बातम्या