Thursday, April 25, 2024
Homeब्लॉगराऊंड द विकेट : या चिमण्यांनो, परत फिरा रे...!

राऊंड द विकेट : या चिमण्यांनो, परत फिरा रे…!

डॉ. अरुण स्वादी

चला, आमची टी-20 विश्वचषकाची (ICC T20 World Cup 2021) कहाणी संपली. ही कहाणी इतकी दर्दभरी दास्तान ठरेल, असे वाटले नव्हते. 2007 विश्वकप स्पर्धेचा पार्ट-2 वाटावा एवढे साम्य त्यात होते. तिथे नाक कापले गेले. इथेही तेच झाले. तिथे बोट दाखवायला ग्रेग चॅपेल होता. इथे कोणाकडे बोट करायचे? पराभवाचे खापर फोडायला कोणाचे डोके शोधायचे? आता खूप चिरफाड होईल. कोणावर तरी शेकेल. कोच तर चंबू गबाळे आवरून बसले आहेत. मेंटोरला दोषी ठरवतील. ढवळाढवळ केली म्हणतील आणि मागच्या दरवाजाने पुन्हा समलोचकाच्या भूमिकेत येतील. धोनी सर म्हणतील, मी फक्त युक्तीच्या चार गोष्टी सांगायला आलो होतो. मग उरले कोण? कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि त्याचा डेप्युटी रोहित! सगळा दोष त्यांच्या माथी मारला जाणार.

- Advertisement -

मला विचारलं तर मी एवढेच म्हणेन, शाहीन अफ्रिदीच्या त्या दोन अफलातून चेंडूंनी आमच्या ललाटी कपाळमोक्ष लिहिला. पहिल्या सामन्यात पहिली फलंदाजी करताना पहिल्या काही मिनिटांत त्याने भारताचे नशीब लिहिले. रोहित शर्मा आणि के. एल. राहुल तंबूत परतले आणि नशिबाने थट्टा मांडायला सुरुवात केली. हरलेल्या नाणेफेकीचा त्यात हात आहेच, पण असे सुरुवातीचे धक्के आम्हाला पचवता येतं नाहीत हे इतिहास सांगतो.

चॅम्पियन ट्रॉफी फायनल आणि 2019 चा किविजविरुद्धचा उपांत्य सामना आठवून बघा. आम्ही लगेच तलवार म्यान करतो. पाकविरुद्ध आम्ही ढेपाळलो. ठीक आहे. होतं असं कधी-कधी, पण न्यूझीलंडविरुद्ध तर टॉस हरलो म्हणून खेळण्याआधीच आम्ही पांढरे निशाण दाखवले. नंतर आम्ही धमाल खेळलो, पण ते कनिष्ठ संघांबरोबर. तोपर्यंत मतेल आणि तूप दोन्ही गेलं होतं. अफगाण सैन्याने किविजविरुद्ध हार पत्करल्यावर हाती धुपाटणे आले.

ऐनवेळी आम्ही कच खातो आहोत हे मात्र काळजी करण्यासारखे आहे. ही भीती अपयशाची आहे. अपेक्षांच्या दडपणाची आहे. कसोटी स्पर्धेत अंतिम सामन्यात आम्हाला फक्त ड्रॉ चालला असता, पण तेही आम्हाला जमले नाही आणि न्यूझीलंडने स्पर्धा जिंकली. असे का होते आहे यासाठी चांगल्या डॉक्टरला दाखवले पाहिजे. डॉक्टर धोनी साहेबांची मात्रा चाललेली दिसत नाही. आता सुपर स्पेशलीस्ट लागेल.

द्रविड साहेबांना ते जमेल? 2015 मध्ये इंग्लंड असेच सगळ्या विषयात नापास होत होते. त्यांनी काय केले? जुन्या खोडाना नारळ दिला. ताज्या दमाचे, व्हाईट बॉल खेळाडू घेतले. संघ बांधला आणि क्रिकेट खेळायचा ढंग बदलला. मग 2019 मध्ये विश्वचषक जिंकला. भारताला असे काही तरी करावे लागणार आहे.

2007 मध्ये त्यांनी असाच प्रयोग केला होता. बड्या खेळाडूंना आराम दिला आणि नव्या दमाचे खेळाडू आणले. नवा कॅप्टन धोनीच्या संघाने इतिहास घडवला. पुढचा टी-20 विश्वचषक दोन वर्षात आहे. मध्ये 50 ओवरचा विश्वकप स्पर्धा आहेच. त्याच्या तयारीला आता लागावं. सध्या मात्र मया चिमण्यांनो, परत फिरा रे… घराकडे अपुल्या… तिन्हीसांजा जाहल्या म एवढंच म्हणायचं.

- Advertisment -

ताज्या बातम्या