Blog : रॉकेट्री : द नंबी इफेक्ट, एक सुन्न करणारा अनुभव…

jalgaon-digital
9 Min Read

गेल्याच आठवड्यात दोन टोकाचे सिनेमा पाहिले. 200 हल्ला हो (200: Halla Ho) आणि रॉकेट्री : द नंबी इफेक्ट (Rocketry: The Nambi Effect) एकात वर्षानुवर्ष होणाऱ्या अत्याचाराला कंटाळून भर न्यायालयात गुडांची हत्या…

दुसऱ्यात एका शास्त्रज्ञाला व्यवस्थेचा बळी शोधण्यापासून वाचवण्यात सीबीआय व सुप्रीम कोर्टाचे यश… या विद्वत्तेबद्दलचे मला प्रचंड आकर्षण आहे.

रॉकेट्री द नंबी इफेक्ट या सिनेमाबद्दलचे जास्त वर्णन न करता त्याची पार्श्वभूमी सांगण्याचा माझा हा प्रयत्न.

एका विद्वान शास्त्रज्ञाचे सत्य लोकंपर्यंत पोहोचवण्याचं काही अंशी माझा छोटासा प्रयत्न…

भारतीय मातीतील एका विद्वान तामिळी शास्त्रज्ञाची त्याच्या बुद्धीमत्तेची ही यशोगाथा, व्यवस्थेने (भारतीय) दिलेले त्याला क्रूर चटके, क्रूर चेष्टा, इतके की आत्महत्येपर्यंतचे विचार, कुटुंबाची झालेली वाताहत, मिडीया व जनमानसाने दिलेली गद्दार ही उपाधी, CBI ने दिलेली क्लीन चीट व तब्बल 24 वर्षानंतर सुप्रीम कोर्टाने केलेली सुटका, केरळ सरकारला दिलेले भरपाईचे आदेश ते नुकतेच भारत सरकारने दिलेला “पद्मभूषण” पुरस्कार, असा हा थरारक मनाला हादरवून टाकणारा, सुन्न करणारा अनूभव..

नंबी नारायण या ईस्त्रोच्या शास्त्रज्ञाची ही कहाणी.

सिनेमाची सुरुवातच आर्थिक परिस्थितीवर भाष्य करणारी. साध्या वस्तीतील साधे घर, घरात ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही व ईस्त्रीचे पैसे वाचावे म्हणून लग्न समारंभात घालणाऱ्या शालूलाही नंबीची पत्नी स्वतः इस्त्री करताना दाखवलेली. सोबतच बसने जाणारा त्याचा मलगा, एकाच फटक्यात मध्यमवर्गीय परिस्थिती ठसठसीत दाखवणारा आससपानी आरसा.

एकदम मार्मिक

नंबी नारायण हा ईस्त्रोमधील नामांकित एरोस्पेस इंजिनियर. विक्रम साराभाईंच्याच नजरेने हेरलेला. अब्दुल कलाम यांचा सहकारी. इस्त्रोचे नामांकित माजी चेअरमन सतिश धवन यांच्याही तालमित तयार झालेला. अफाट बुद्धिमत्ता, प्रचंड मातृभूमीचे प्रेम व स्वदेशी बनावटीचे क्रायोजेनिक इंजिन बनवण्याच्या ध्येयाने पछाडलेला. त्यावेळेस सॉलिड प्रोपेलंटच उपग्रह सोडण्यासाठी वापरत असे.

नंबी हा काळाच्या पुढचा विचार करणारा

साराभाईंनी नंबी यांना Princeton युनिव्हर्सिटीमध्ये लिक्विड प्रोपेलंटच्या अभ्यासासाठी पाठवले. ख्यातनाम शास्त्रज्ञ ‘क्रोको’ यांच्याकडूनच दिक्षा घ्यायची होती. त्यांनी तर विद्यार्थी घेणे बंद केलेले. तरीही त्यांना वश करून तीन ते पाच वर्षाचा अभ्यासक्रम हा अवघ्या 10 महिन्यातच पूर्ण करून त्यांनी शिफारस केलेली नासामधील गलेलठ्ठ पगाराची नोकरी (भारतात पाच वर्षाचा पगार फक्त एका महिन्यात देणारी) सोडून साराभांईसाठी मायदेशात परतणारा हा अवलिया. (त्यांना फक्त 7300 इतका तुटपुंजा पगार होता.)

अत्याधुनिक पाहिजे त्या साधनांनी युक्त अशा नासामध्ये त्यांच्या प्रतिभेस मुक्त वाव असताना अत्यंत तुटपुंजा साधनसामग्रीत कस पणाला लावण्यासाठी मायदेशी परत आलेला. ईरेनेच पेटलेला. नामांकित ‘रोल्स राईस’च्या मालकाकडून गाडीच्या इंजिनाची फॅक्टरी त्यांच्याकडून फुकटमध्ये इस्त्रोमध्ये आणणारा, फ्रान्समध्ये 40 जणांची टीम नेऊन “व्हायकिंग” या राॅकटचे तंत्रज्ञान आपल्या हुशारीच्या जोरावर त्यांच्या नकळत आत्मसात करून संपूर्ण भारतीय बनावटीचे “विकास” हे रॉकेट तयार करणारा नंबी.

अशा शास्त्रज्ञाला 1994 मध्ये हेरगिरीवरून केरळ पोलिसांकडून अटक काय होते, अट्टल गुन्हेगारासारखा अनन्वित छळ काय होतो, थर्ड डिग्री पण दिली जाते. ती ही इतकी की हॉस्पिटलमध्ये जिवंत राहील की नाही याची शाश्वती पण नव्हती. पन्नास दिवस तुरुंगातून काढल्यावर CBI च्या निष्पक्ष तपासामुळे जामिनावर सुटतो व तब्बल 25 वर्षाच्या संघर्षानंतर सुप्रिमकोर्टाकडून त्याची निर्दोष सुटका केली जाते.

मनाला अत्यंत उद्वेग आणणारी, ऊबग आणणारी, व्यथित करणारी ही व्यवस्था व त्याचा नंबी बळी. ईस्त्रोसारख्या भारतातील मानबिंदू संस्थेत काम करणाऱ्या शास्त्रज्ञाची ही पिळवटून टाकणारी कहाणी.

काय असतील बरं यामागची कारणे?

पहिले म्हणजे अस्तंगत (विघटन) होत चाललेला रशिया. अत्यंत ताकदवान अमेरिका. त्यामुळे भारतातील ही प्रगती रोखण्यासाठी असेल का?

परंतु असेही अमेरिकेने रशियाला इस्त्रो खरेदी करणार असलेल्या क्रायोईंजीन दबावाने देऊ दिले नाही आणि अशा अवकाश यानात उपग्रह सोडणाऱ्या इंजिनाचा आणि युद्धासाठी लागणाऱ्या मिसाईलचा काहीही संबंध नसतो हे अमेरिकन लोकांना कळणार नाही का?

एवढेच काय याचा अण्वस्त्राशीही दुरान्वयानेही संबंध नसतो हे त्यांना माहीत असणारच की!! एवढेच काय भारतीय शास्त्रज्ञ क्रायोईंजीन काही एका दिवसात तयार करू करणे शक्यच नव्हते (अजूनही करू शकले नाही). त्यामुळेच ही आंतरराष्ट्रीय कट आहे हे काही पटत नाही.

मग दुसरे कारण काय?

ते जास्ती पटण्यासारखे आहे.

भारतीय व्यवस्था हे त्याच्या मागचे उत्तर.

केरळमध्ये करूणाकरण यांचे सरकार होते व त्यांना त्यांचेच तरूण सहकारी मि. क्लीन म्हणून प्रसिद्ध असणारे ए.के. अँथनी यांचे कडवे आव्हान होते. दोघेही मुख्यमंत्रीपदासाठी प्रतिस्पर्धी होते. ही स्पर्धा राजकारणामध्ये नैसर्गिकच आहे आणि यात काहीही गैर नाही. परंतु याचा फायदा मात्र नोकरशाही उचलते. त्यांच्यातही गट असतात.

कोण एक इन्स्पेक्टर विजयन मालदीवमधून आलेली गरजू-मरियम- अर्थात काम शोधण्यासाठी, स्वतःच्या उपचारासाठी व बहूदा मुलांच्या भवितव्यासाठी आलेली. VISA साठी इन्स्पेक्टर विजयला भेटते काय, इन्स्पेक्टरची वैषयिक विकृतनजर तिच्यावर पडते काय ! ती त्याला नकार देते. खुर्चीच्या मस्तीत वावरणारे हे मग नकार सहन होऊन तिला तुरुंगात टाकतात. तिला ना कोणाचा आगा ना पिछा. ना पैसा. पडली मग तुरूंगात खितपत. (इतकी की 94 मध्ये अटक व सुटका 98 मध्ये.).

हा खेळ कुठे जाऊन पोहोचतो..सगळेच अतर्क्य! किळसवाणे.

काही काळानंतर ए के अँटोनीच्या जवळच्या पोलीस अधिकाऱ्यांना यात संधी दिसते. करूणाकरण यांचे अत्यंत विश्वासू केरळ पोलिसप्रमुख रमण श्रीवास्तव यांना पदच्युत करण्यासाठी. पर्यायाने करूणाकरण यांच्यावर ठपका ठेवण्यासाठी.

केरळचे आयबी (Intelligence Bureau) डायरेक्टर जॉन मॅथ्यूज, श्रीयुत आर बी श्रीकुमार (गुजरात कॅडरचे परंतु डेप्युटेशनवर केरळमध्ये आलेले व नुकतेच तिस्ता सेटलवाड बरोबर गुजरात मध्ये अटक झालेले) आणि आयपीएस मॅथ्यूज यांनी हा बनाव रचला.

मरीयमच्याजवळ नंबी चा ज्युनिअर सायन्टिस शास्त्रज्ञ शशीकुमारन यांचा फोन नंबर होता. त्याचे कारण त्याची बायको. मरियम वैद्यकीय मदत त्यांच्याकडून घेत होती हे नंतर सिद्ध झाले. मग या अधिकाऱ्यांनी ईस्त्रोविरुद्ध फास आवळला. शशीकुमारन, एक लेबर काॅन्ट्रक्टर व नंबी नारायण आणि अजून दोघे.

कोठडीत नंबीचा अनन्वित छळ. कबूली करून घेण्यासाठी वाटेल ते प्रयत्न, वरिष्ठांचीही नावे घेण्यासाठीचा छळ. सगळंच लाजीरवाणे. लाय डिटेक्टर टेस्टस.

उच्च विद्याविभूषित मध्यमवर्गीय माणसं या छळाला कंटाळून तपास यंत्रणेला पाहिजे ते लिहूनही देण्यात तयार होतात…अशा स्थितीतही नंबीचा कणखरपणा कोलमडून पडला नाही हे नशीबच.

सुदैवाने पंतप्रधान नरसिंह रावांनी याचे गांभीर्य ओळखून तपास सीबीआयकडे सोपवला. सीबीआयने मग बारकाईने तपास करून केरळ IB व तपास यंत्रणेचे वाभाडे काढून या तत्सम Honey Trap, हेरगिरी यात काहीही तथ्य नसल्याचा निर्वाळा दिला.

यात मिडियाने कुठल्याही प्रकारची शोधपत्रकारिता केली नाही. एक खंतही वाटते की ईस्त्रो सारखी संघटना व इतर शास्त्रज्ञांनी मात्र यात नंबीसाठी काही ठोस प्रयत्न केल्याचे कुठेही दिसून येत नाही. टिपिकल पांढरपेशा वृत्तीच कारणीभूत असणार. दुसरे काय?

सुप्रीम कोर्टाने त्यांची निर्दोष मुक्तता करून त्यांना 50 लाख रू भरपाईचे आदेश दिले. केरळ सरकारने 1.3 कोटीची भरपाई जाहीर केली. तर मोदी सरकारने 2019 मध्ये ‘पद्मभूषण’ दिला.

प्रश्र एकच आहे की, झालेला त्रास, आर्थिक आणि शारीरिक नुकसान, मानसिक छळ, तुरूंगाची हवा, याचे मोजमाप कसे करणार? याला कोणती फूटपट्टी वापरणार?

जी प्रतिष्ठा धुळीस मिळाली त्याची किंमत कशी करणार? ही कपोकल्पित कहाणी रंगविणाऱ्या यंत्रणांचे काय? यंत्रणेच्या बेफिकिरीबद्दल काय?

हेरगिरी, गद्दार, माहिती पाकिस्तानला विकणे अशा आरोपांची राळ, ती सहन करणं इतकी मोठी किंमत भारतातील एका शास्त्रज्ञाला का मोजावी लागते?

त्यातच इस्त्रो ही अवकाश यानाची व उपग्रहनिर्मिती व संशोधन यासाठीची संस्था. ना की कुठली गुप्त मिसाईल तयार करणारी अथवा अण्वस्त्र तयार करणारी.

ती अतिशय पारदर्शक असून इंजिनाचे डिझाईन्स कॉन्ट्रॅक्टर कडेही असतात. एक संशोधनात्मक केंद्र असून मंगळावर केवळ 450 कोटीत – जो कि RRR या एका चित्रपट निर्मितीचा खर्च आहे.

उपग्रह पाठवणारी भारताची मानबिंदू असणारी संस्था असून 1994 मध्ये नुसता क्रायो इंजिन तयार करण्याच्या कल्पनेने पछाडलेला हा शास्त्रज्ञ होता. जे इंजिन अजूनही आपण तयार करू शकत नाही त्याची गुप्त माहिती हा शास्त्रज्ञ 25 वर्षापूर्वी विकत होता हा आरोपच किती खरे!

अमेरिका कायम मोठी होत जाते याचे कारण सतत संशोधनाला सतत दिले जाणारे प्रोत्साहन व त्यासाठी अमाप खर्च करण्याची तयारी व त्यासाठी लागणारी बुद्धी जगातून कोठूनही आयात करून राष्ट्रीय संपत्ती म्हणून त्यांना जपवणारी ही अमेरिकन संस्कृती आहे.

शास्त्रज्ञांची काय किंवा कलाकारांची काय, त्यांची बौध्दिक संपदा ही राष्ट्राची संपत्ती मानून तिला असे पूरक वातावरण कधी तयार झाले तरच आपले रॉकेट खऱ्या अर्थाने उड्डाण करेल.

– डाॅ. अभय सुखात्मे, स्त्री रोग व प्रसूती शास्त्र तज्ञ, नाशिक.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *