पती-पत्नीच्या परस्परात समर्पणाचा महामंंत्र देणारे श्रद्धेय भवरलालजी!

पती-पत्नीच्या परस्परात समर्पणाचा महामंंत्र देणारे श्रद्धेय भवरलालजी!

ज्येष्ठ विचारवंत, उद्योगपती, समाजसेवी आणि गांधीवादी श्रद्धेय भवरलालजी जैैन तथा ‘मोठे भाऊ’ यांचा आज दि. 12 डिसेंबरला जयंतीदिन. या निमित्ताने मोठे भाऊंच्या वैचारिक आणि आचरणविषयक आठवणींचे जागरण करण्याचा दिवस. मोठे भाऊंचे चरित्र वारंवार वाचले की, त्यातून आनंदी व समाधानी सहजीवनाची दिशा देणारी शाश्वत जीवनमूल्ये समोर येतात. ती जीवनमूल्ये कालौघात सतत टवटवीत व अनुकरणीय आहेत.

दिलीप तिवारी

(ज्येष्ठ पत्रकार)

मोठे भाऊ हयात असताना विविध कामांच्या निमित्ताने त्यांच्या संपर्कात मी आलो. पत्रकार असल्यामुळे मोठे भाऊंची भाषणे, मुलाखती आणि त्यांच्याशी झालेल्या गप्पांमधून जन हिताचा, जन उपदेशाचा आशय मिळवून बातम्या, लेख व मुलाखती लिहिल्या. जळगाव येथून प्रकाशित होणार्‍या दैनिक मदेशदूतफ ने मोठे भाऊंच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त मशब्दगंधफ ही 16 पानांची विशेष पुरवणी प्रसिद्ध केली होती. या पुरवणीत मोठे भाऊंची दीर्घ मुलाखत होती. या मुलाखतीसाठी मोठे भाऊ सलग तीन तास बोलत होते. मुलाखत ध्वनीमुद्रित केलेली आहे. मुलाखतीचे सविस्तर वृत्तांकन मी केले होते. सहजीवनाशी संबंधित अनेक प्रश्नांची सविस्तर उत्तरे मोठे भाऊंनी मुलाखतीत दिलेली आहेत.

पुरवणीच्या निमित्ताने मोठे भाऊंविषयी लेख करण्यासाठी जैन कुटुबियांतील अशोकभाऊ, अतुलभाऊ व चारही सुनांशी मला संवाद करता आला होता. अनिलभाऊ, अजीतभाऊ यांनीही लेख लिहून पाठवले. मोठे भाऊंसह इतरांच्या सहवासात असताना कुटुंबाने अंगिकारलेला एकमेकांप्रती समर्पणाचा अमीट संस्कार अनुभवला आला. सुनांनी स्वीकारलेले कौटुंबिक अलिखित नियम आणि कुटुंब जोडून ठेवायची समज, सजगता भावली. काही नियम पुढील काळात तर मी स्वतःही माझ्या कुटुंबात कटाक्षाने आचरणात आणले.

व्यापार, उद्योग आणि व्यवसायातील प्रगतीसाठी मोठे भाऊंनी भगवान महावीर आणि महात्मा गांधी यांच्या वैचारिक सिद्धांतावर आधारलेली नैतिक, मानविय आणि सामाजिक मूल्ये आचरणात आणली. तीच मूल्ये मोठे भाऊंच्या नंतर तिसर्‍या पिढीतही रुजलेली आहेत. विस्तारत आहेत. मोठे भाऊंचे चरित्र उद्योजक, समाजसेवी आणि विचारवंत म्हणून उत्तुंग आहे. नितळ स्पटिकातून सूर्य किरण गेल्यानंतर दृष्टीगोचर होणार्‍या सप्तरंगाप्रमाणे त्यात मनोहारी छटा आहेत. त्या एकापेक्षा एक सरस आहेत. विविध पुस्तक रूपात उपलब्ध असलेले मोठे भाऊंचे विचारधन त्या छटांचा परिचय करून देतात. मोठे भाऊंचे कौटुंबिक चारित्र्य मला नेहमी भारावून टाकते. कुटुंबातील लहान, मोठ्या सदस्यांविषयी स्नेह, प्रेम, माया, अपेक्षा, आदर, शिस्त आणि मर्यादा याचे आचरणासह आदर्श पारायण म्हणजे मोठे भाऊ आणि स्व. कांताबाई यांचे दाम्पत्य सहजीवन होय.

विवाह झालेली सर्व जोडपी दाम्पत्य असतात. पण ती सहजीवन जगत नाही. सहजीवनात असली तरी ती परस्पराप्रती समर्पित नसतात. एकमेकात गुंतलेली नसतात. मोठे भाऊंनी स्वतःचे आत्मकथन वा आत्मचरित्र लिहिले नाही. पण त्यांनी स्व. कांताबाईंसोबत संसाराची स्वानुभव कथा आवर्जून शब्दांकित केली. त्याचे शिर्षक आहे ‘ती आणि मी’. या कथेचे मुखपृष्ठ आगळेवेगळे आहे. पृष्ठाला ‘ती’ शब्दाची खाच आहे. त्याच खाचेतून दुसरा शब्द ‘मी’ साकारतो. पत्नीच्या अस्तित्वात पतीचे पूर्णतः समर्पण दर्शवणारे हे जगभरातील एकमेव मुखपृष्ठ असावे. पुस्तकातील प्रत्येक पानावरील आशय हा जैन कुटुंबियांच्या प्रगतीसह एकजूट असलेल्या स्नेहबंधाची कहाणी उलगडत जातो.

मोठे भाऊंच्या स्वानुभव कथनात काही प्रसंगात अडचणी आहेत पण संघर्ष नाही. मत प्रवाहाची खळखळ आहे पण वादांचा धबधबा नाही. कठोर शिस्त आहे पण स्वीकारायची आगतिकता नाही. पर्याय आहेत पण दुराग्रह नाही. उद्योगाविषयी पतीचे निर्णय कार्यालयात आहेत पण त्याचा तणाव कुटुंबात नाही. कुटुंबात दुरान्वये भेद नाहीत पण पत्नीकडे समन्वयाचा अधिकार आहे. ‘ती आणि मी’ पुस्तकाचे वाचन मी स्वतः किमान 10 वेळा केले आहे. मोठे भाऊ आणि स्व. कांताबाई यांच्या परस्पर समर्पित सहजीवनाने दिलेला कृतिशील महामंत्र म्हणजे, मी स्वतः पत्नीशी समर्पित भावनेतून वागायला आणि कृती करायला लागलो. तेच समर्पण पुत्र आणि सुनबाईत रुजते आहे.

मोठे भाऊंनी स्व. कांताबाईंच्या आठवणीतून पती-पत्नीच्या परस्परात समर्पण भावनेचा कुटुंंबवत्सल महामंंत्र दिला आहे. मोठे भाऊ काही वेळा स्व. कांताबाईत तर स्व. कांताबाई काही वेळा मोठे भाऊंच्या व्यक्तिमत्वात समर्पित दिसतात. ही अवस्था सामान्यतः मानवी नाही. ती दैवी देणगी आहे. दैवत्वाला नेणारी आहे. पती पत्नीच्या परस्परातील समर्पणाची तीन सर्वोत्तम उदाहरणे धर्मग्रंथ आणि अध्यात्मिक कथांमध्ये आहेत. जैन धर्मियांच्या वृषभदेव भगवानच्या कथेत देवाचे एक रूप ‘अर्धनारीश्वर’ दर्शविले आहे. वेद-पुराणातील कथांमध्ये भगवान शंकर व माता पार्वतीच्या मिलनाचे रूप ‘अर्धनारी नटेश्वर’ आहे. भगवान वृृषभदेेव व भगवान शंकर ही एकच रूपे मानली जातात. पुरूषात स्त्रिचे अस्तित्व सामावलेले असले तरच निसर्गातील समतोल आणि ऊर्जा टिकून असते हा संदेश अर्धनारीश्वर रूपातून मिळतो. पंढरपुरातील विठोबाच्या अध्यात्मिक स्तुतित ‘माऊली विठाई’ आणि ‘बा पाडुरंगा’ अशी रूपे आहेत.

ही तीनही रूपे पती पत्नीच्या परस्परातील समर्पणाची सर्वोत्तम उदाहरणे आहेत. अर्धनारीश्वर होणे म्हणजे पुरूषाने किंवा स्त्रीने एकमेकांचे तत्व परस्परात सामावून घेणे. काही प्रसंगात पुरूषाने आईची हळवी भूमिका निभावणे आणि काही वेळा आईने पुरूषाची कठोर जबाबदारी पूर्ण करणे. मोठे भाऊ व स्व. कांताबाई यांच्या सहजीवनातून असाच समन्वय व संयमाचा आत्मबोध व आत्मसंवाद होताना दिसतो. हा आत्मसंवाद शब्दांंसह आहे आणि काही वेळा शब्दावीण आहे.

मोठे भाऊ उद्योगात आणि कुटुंबात असताना कधीही ‘मी पणात’ गुंतले नाहीत. स्वतःची ओळख ‘कांताबाईचा पती’ अशीच राहावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. पत्नी विषयी समर्पणाचा महामंत्र हाच आहे. पत्नीमुळे पतीची ओळख. सहजीवनातील परस्पर संवादाचाही महामंत्र मोठे भाऊंनी सांगितला आहे. ते म्हणाले, ‘आपापसातील मौखिक संभाषण फार कमी झाले पण नजरेचा संवाद दीर्घ होता आणि तो प्रगल्भ होता.’ या विषयी आणखी स्पष्टीकरण देताना मोठे भाऊ म्हणाले, ‘ज्यावेळी आंतरिकरित्या दोन जीव एकत्र येतात तेव्हा भाषेला विराम मिळतो. शब्दांना विराम मिळतो. फक्त शांततेत हे घडते. ती शांतता आम्ही आयुष्यभर अनुभवली’. दुुर्धर आजारपणामुळे कांताबाई पलंगावर खिळल्या. वाचा गेली. शरीरही निपचित झाले. अशावेळी संपूर्ण कुटुंबाने कांताबाईशी केलेला ‘पापण्यांचा संवाद’ वाचताना मनाची घालमेल होते. ‘हो’ किंवा ‘नाही’ हे उत्तर जाणून घ्यायला तासंतास मुले आणि सुनांनी दिलेला वेळ गलबलून टाकतो. आज कुटुंब व्यवस्थेत पती पत्नीच्या तात्कालिक भेदाचे विसंवादी सूर चार भिंतींच्या पलिकडे जातात तेव्हा मोठे भाऊंनी सांगितलेल्या नजरेच्या संवादाचे पावित्र्य व महत्त्व ठळक होते. शब्दावीण एकमेकांंची नजरच वाचायची तर आत्मा, मन, मेंदू यासह हृदयाच्या स्पदनांनी परस्पराप्रती एकरूप व्हायला हवे.

स्वानुभव कथनातून मोठे भाऊंनी स्व. कांताबाई यांंना नायिका म्हणून समोर आणले. मोठे भाऊ स्वतः पाठीमागे थांबून सूत्रधार ठरले. यशस्वी पुरूषामागे कर्तृत्ववान स्त्री असते, हे वास्तव मोठे भाऊ खूप साध्या सोप्या भाषेत सांगतात. संसाराचे विविध मूलमंत्र मोठे भाऊंनी अनेेक प्रसंगातून उलगडून दाखवले आहेत. सप्तपदीनंंर सहजीवनाचा उंबरा ओलांडण्यापूर्वी नव दाम्पत्याने ‘ती आणि मी’ वाचायलाच हवे. बहुधा वयाच्या 50शी नंतर आणि विवाहाच्या 20 वर्षानंतर पती पत्नीचे परस्पराप्रती समर्पण हा मोठ्या भाऊंच्या सफल, सुफल आणि संपूर्ण आयुष्याचा महामंत्र दाम्पत्ती जीवन सुरू होण्याअगोदर समजूून घ्यायला हवा. मला इतर सुभाषिते वा सूविचारांपेक्षा मोठे भाऊंचे महामंत्र जास्त कृतीशिल व आचरण प्रवण वाटतात. मोठे भाऊ आणि स्व. कांताबाईंच्या परस्परातील समर्पणाची कहाणी सफल आणि संपन्न सहजीवनाचा मार्ग आहे. त्याच प्रमाणे दोघांनीही कुटुंब प्रमुख म्हणून एकत्रित कुटुंबासाठी ठरवून दिलेले नियम व मर्यादा या सामुहिक समर्पणाचे उत्तम उदाहरण आहे.

उद्योगाशी संबंधित निर्णय पुरूष मंडळी कार्यालयातील टेबलावर घेणार. घरात जेवणाच्या टेबलावर शक्यतो घरातलेच विषय असणार. गेल्या काही वर्षांत उद्योगाशी संबंधित इतर सामाजिक सेवा, विश्वस्थ संस्थांच्या व्यापात चारही सुना, तिसरी पिढी जबाबदारी सांभाळू लागली आहेत. त्यामुळे निर्णय प्रक्रियेत सुना, मुले-मुलींचा सहभाग वाढला आहे.

जैन कुटुंबाच्या विस्तारात विवाह जुळणी हा विषय फार सावधतेने हाताळला जातो. या संदर्भातील अंतिम निर्णय थोरले बंधू अशोकभाऊ घेतात. विवाह कार्यात सर्व नाते संबंधाचा सहभाग व मान सन्मान हा कार्यभार अशोकभाऊंकडेच असतो. वर्षभरात कौटुंबिक एकत्रित स्नेह भेटीचे दोन-तीन कार्यक्रम होतात. यासाठी एकत्रित पर्यटन हा पर्याय असतोच.

मात्र अलिकडे वाकोद (ता. जामनेर) येथील जुने घरही वापरात आले आहे. दाम्पत्यांचे आणि कुटुंबाचे परस्परप्रती समर्पणाचे अलिकडचे एकमेव घराणे बहुधा जळगावचे विस्तारित जैन कुटुंब असावे. श्रद्धेय मोठे भाऊंच्या वाढदिवसानिमित्त केलेले हे आत्मचिंतन मित्र परिवारासाठी उपयुक्त ठरावे.

मो. 9552585088

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com