कागदाने अमेरिका पेटवला…

jalgaon-digital
7 Min Read

स्टॅम्प अॅक्टच्या नावाखाली अमेरिकेवर व्यापारी नियंत्रण आणण्याचा प्रयत्न इंग्लंडने केला. अमेरिकन जनतेच्या दमन आणि शोषणावर समृद्धीचा उपभोग घेणा-या इंग्लंडला कायमचा धडा शिकविण्याची वेळ जवळ येऊन ठेपली. १ नोव्हेंबर १७६५ ला ब्रिटिश संसदेने स्टॅम्प अॅक्ट मंजूर केला. कागदाच्या माध्यमातून अमेरिकेवर नवीन कर लादण्याचा हा कायदा होता.

तसेच नकळतपणे अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करण्याचा छुपा प्रयत्न देखील होता. स्टॅम्प अॅक्टनुसार अमेरिकेत जे काही कागदावर छापण्यात येईल ते इंग्लंडवरून कर भरल्याचा शिक्का मारुन आलेल्या कागदावरच छापले जाईल. ईतर कोणत्याही कागदाचा उपयोग कोणताही मजकूर छापण्यासाठी करता येणार नाही. अमेरिकेतील सर्व कायदेशीर कागदपत्रे,वर्तमानपत्रे,मासिके अशा सर्व प्रकारच्या प्रकाशनासाठी इंग्लंडचा स्टॅम्प असलेला कागदच लागेल. आर्थिक शोषणाला आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याला जनहिताचा लेप देण्यात आला होता. अमेरिकन लोकांचे संरक्षण करण्यासाठी ज्या ब्रिटिश फौजा तैनात करण्यात आल्या होत्या,त्यांचा खर्च या करातून भागविण्यात येणार होता.

दुस-या शब्दात हा एकप्रकारचा संरक्षण कर होता. एका नवीन स्वतंत्र,स्वयंपूर्ण आणि समर्थ राष्ट्राची स्वप्न पाहणारा अमेरिकन समाज स्टॅम्प अॅक्टमुळे पेटून उठला. इंग्लंडच्या जबरदस्तीच्या कागदाने अमेरिका पेटवला. अशा जुल्मी आणि एकतर्फी कायदयाला विरोध करणारा एकही अमेरिकन प्रतिनिधी संसदेत नसतांना तो मंजूर करण्यात आला. तसेच विखुरलेल्या आणि दुबळया अमेरिकेला संसदेमध्ये स्वतःची बाजू मांडणे किंवा विरोध करणे शक्य नव्हते. विखुरलेल्यांना एकवटण्याचे आणि दुबळयांना सामर्थ्य देण्याचे कारण एखादा कायदा,घटना वा कृती ठरत असते. नेमके हेच अमेरिकेत घडले. अमेरिकन समाजाच्या मनात इंग्लंडच्या शोषण आणि जाचक बंधने यांच्याविषयी खदखदत असलेल्या ज्वालामुखीला स्टॅम्प अॅक्टमुळे तोंड फुटले. ईस्ट इंडिया कंपनीच्या चहाने बोस्टन जागे झाले आणि सर्व अमेरिकेत बोस्टनच्या चहाची वाफ पोचलीच होती. आता कागदाने वाफेचा वणवा झाला.

कागदाच्या वणव्यात अमेरिकेतील युनियन जॅक जळणार होता. सप्टेंबर १७७४ मध्ये फिलाडेलफीयाच्या पहिल्या महाद्विपीय कॉग्रेसने जोसेफ गॅलोवे याने मांडलेल्या एका महत्वाच्या प्रस्तावाला मंजूरी दिली. त्यानुसार ब्रिटनच्या सम्राटाने नेमलेल्या अध्यक्षाने अमेरिकन वसाहतींच्या संघाचे प्रशासन व संचलन पाहावे. तसेच ग्रंड कॉन्सिलची निर्मिती करण्यात यावी. त्यामध्ये सर्व वसाहतींमधून निवडून देण्यात आलेले प्रतिनिधी असावेत. वसाहतींच्या संबंधीत कोणताही कायदा लागू करण्यापूर्वी कॉन्सिल आणि संसद यांची त्याला मान्यता असावी. अमेरिकन वसाहती आणि त्यांची मातृभूमी इंग्लंड यांच्यातील दुवा म्हणजे ग्रंड कॉन्सिल असेल. या दोहोंमधील गैरसमज दूर करणे व सामंज्यस्य राखणे यासाठी ग्रंड कॉन्सिल जबाबदार राहिल. जोसेफ गॅलोवे याचा प्रस्ताव एका मताने नाकारण्यात आला. वसाहतीच्या कॉंग्रेसमध्ये जहाल व नेमस्त असे दोन गट तयार झाले होते.

जहाल कोणत्याही तडजोडीला तयार नव्हते. नेमस्त मात्र सम्राटाविषयी निष्ठा ठेवून सविनय आपल्या मागण्या मांडाव्यात यासाठी आग्रही होते. अखेर नेमस्तांच्या म्हणण्यानुसार एक याचिका सम्राटाकडे करण्यात आली. याचिकेत वसाहतींच्या मागण्यांचा आणि तकारींचा सहानुभूतीपूर्वक विचार करून,समाधानकारक तोडगा काढण्याची प्रार्थना करण्यात आली. परंतु त्याचबरोबर अत्यंत निर्भयपणे वसाहतींचे अधिकार आणि तक्रारींचे(Declaration of Rights and Grievances) घोषणापत्र सर्वानुमते संमत करण्यात आले. कॉन्टिनेन्टल कॉंग्रेस दुसरे महत्वाचे काम केले,ते म्हणजे महाद्विपिय संस्था अथवा संघटन (Continental Association ) ची स्थापना केली.

एका अर्थाने हा सर्व अमेरिकन वसाहतींनी ब्रिटिनशी असहकार करण्यासंदर्भात केलेला ठराव होता. असहकाराच्या ठरावानुसार १ डिसेंबर १७७४ नंतर अमेरिकन वसाहती ब्रिटन व आयरलँड यांच्याकडून कोणत्याही प्रकारच्या मालाची आयात होऊ देणार नाहीत. तसेच १० डिसेंबर १७७५ नंतर वसाहती त्यांच्याकडे उत्पादन झालेला कोणताही माल ब्रिटन व ब्रिटिश वेस्टइंडिज यांच्याकडे निर्यात करणार नाहीत. म्हणजेच महाद्विपिय संस्थेने आयात-निर्यात संबंधी असहकाराची घोषणा केली होती. अमेरिकेत स्वातंत्र्याचे वारे वाहू लागले होते. त्यामुळे सर्व वसाहतींमधून असहकाराला सहकार्य होण्यात कोणतीही बाधा आला नाही. आपल्या मागण्या,तक्रारी आणि असहकार यांच्या संदर्भात दक्षता घेण्यासाठी ठिकठिकाणी समित्या स्थापन झाल्या. बोस्टन शहर ज्या प्रातांत येत होते,त्या मॅसेच्युसेटस् मध्ये परिस्थिती गंभीर बनत चालली होती. सॅम्युअल अॅडम्स आणि अन्य ओजस्वी नेते इंग्लंडविरोधात जनतेला लढण्यासाठी तयार करत होते. मॅसेच्युसेटस्ला चिरडण्यासाठी गर्व्हनर म्हणून नेमण्यात आलेल्या जनरल गेजचे कोणही ऐकेनासे झाले होते. त्याच्या आदेश व आज्ञा यांना जनतेने धाब्यावर बसवले. एका क्रांतीकारी संघटनेचा जन्म प्रातांमध्ये झाला. हळूहळू क्रांतीसेना देखील तयार होऊ लागली. यामुळे जनरल गेजचे धाबे दणाणले. अशातच त्याला खबर मिळाली की बोस्टनपासून १८ मैलावर असणा-या कॉन्कोर्ड नावाच्या खेडयात क्रांतीकारक साधनसामुग्री जमा करत आहेत. त्याने या क्रांतीकारकांचा बंदोबस्त करण्यासाठी आणि त्यांनी जमवलेली साधनसामुग्री जप्त करण्यासाठी सैनिकांची एक छोटी तुकडी कॉन्कर्डकडे रवाना केली.

१९ एप्रिल १७७४ च्या पहाटे गेजचे सैन्य दल कॉन्कर्डच्या जवळील लेग्झिंगटन या गावी पोहचले. लाल गणेवश असलेल्या गेजच्या सैनिकांनी गावात प्रवेश केला,तर काही सशस्त्र क्रांतीकारक त्यांचा रस्ता अडविण्यासाठी उभे होते. गेजच्या सैन्य दलाच्या कमांडरने त्यांना शस्त्र खाली टाकण्याचे आदेश दिले. क्रांतीकारकांनी त्याच्या आदेशाला दाद दिली नाही. अचानक बंदूकीची गोळी सुटली. ही गोळी इंग्रज सैन्याने चालवली की क्रांतीकारकांनी यासंदर्भात कोणतीही नेमकी माहिती उपलब्ध नाही. ही एक गोळी मात्र अमेरिकन स्वातंत्र्य युद्धाची नांदी ठरली. दोन्ही बाजूचे सैनिक ऐकमेकांशी भिडले. चकमकीत दोन क्रांतीकारक शहिद आणि दोन जखमी झाले. येथे गेजच्या सैन्य तुकडीची सरशी झाली. त्यामुळे तुकडीने कॉन्कर्डकडे कूच केली. तेथे गेल्यावर इंग्रंज सैन्याने क्रांतीकारकांनी जमवलेली साधनसामग्री नष्ट केली. लेग्झिंगटनची घटना वा-यासारखी सर्वत्र पसरली. दोन क्रांतीकारकांना वीरमरण आले,ही वार्ता मिळताच जनता पेटून उठली. क्रांतीकारक आणि स्वयंसेवक चारी बाजूंनी गोळा होऊ लागले. जनरल गेजच्या सैन्याला चारही बाजूने घेरून,त्याच्यावर तटून पडण्याची योजना त्यांनी केली. ही योजन सफल झाली. परतीच्या प्रवासात गेजच्या लालसैन्याला बोस्टनपर्यंत अक्षरक्षः पळत सुटावे लागले. झाडांमागून आणि डोंगरांमधून त्यांच्यावर गोळयांचा वर्षाव सुरु होता.

दोन क्रांतीकारकांचे बलिदान व्यर्थ गेले नाही. त्यांच्या वीरमरणाने अमेरिकन जनतेचे रक्त उसळले. पाहता पाहता न्यू इंग्लंडच्या कानाकोप-यातून सशस्त्र क्रांतीकारक बोस्टनच्या दिशने जाऊ लागले. ब्रिटिश सरकारने बोस्टनला छावणीचे रुप दिले होते. बोस्टनवासीयांना चिरडण्यासाठी ठाण मांडून बसलेल्या इंग्रंज सैन्याला घेरण्यासाठी क्रांतीकारक निघाले होते. लेग्झिंगटनच्या घटनेने अमेरिकेतील सर्व वसाहती पेटल्या. प्रत्येक वसाहतीमध्ये अमेरिकन राष्ट्रभक्ती संदर्भात ठराव मंजूर करण्यात आले. तसेच ब्रिटिशांच्या विरोधातील युद्धाची जय्यत तयारी सुरु झाली. अमेरिकेच्या धरतीवर उभ्या असलेल्या १३ वसाहतींमधील भेदाच्या सीमा पुसल्या गेल्या आणि एक राष्ट्र ही भावना निर्माण झाली. शोषण,दमनशाही आणि पारतंत्र्य यांच्याविरुद्ध आता वसाहतींमधील प्रत्येक नागरिक पेटून उठला होता. वसाहती म्हणून त्यांची वेगळी ओळख गळून पडली आणि आता ते केवळ अमेरिकन होते. एका नव्या राष्ट्राच्या निर्मितीची ही रक्तरंजित पहाट होती.

_प्रा.डॉ.राहुल हांडे, भ्रमणध्वनी-८३०८१५५०८६

(लेखक धर्म,इतिहास व साहित्य यांचे अभ्यासक आहेत)

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *