Saturday, April 27, 2024
Homeब्लॉगरविवार ‘शब्दगंध’ : वेळीच ओळखा वेगळ्या वाटा!

रविवार ‘शब्दगंध’ : वेळीच ओळखा वेगळ्या वाटा!

मागील काही महिन्यांमध्ये दाक्षिणात्य चित्रपटांनी दणकून कमाई केली. या चित्रपटांच्या कमाईचा आकडा एक हजार कोटी रुपयांवर पोहोचला. दुसरीकडे हिंदी चित्रपट मात्र 200-300 कोटी रुपयांच्या क्लबपलीकडे जात मोठी कमाई करणे आवश्यक आहे. दाक्षिणात्य चित्रपटांशी स्पर्धा न करता स्वतःचे वेगळेपण जपत पुढे जाण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे जाणकारांचे मत आहे.

गेल्या काही महिन्यांपासून बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीदरम्यान मोठी चढाओढ पाहायला मिळाली. दाक्षिणात्य कलाकार हिंदीतल्या कलाकारांवर कुरघोडी करत असल्याचे दिसून आले. गेल्या महिन्यांमधल्या दाक्षिणात्य चित्रपटांनी हिंदी पट्ट्यामध्ये मोठे यश मिळवल्याचे दिसून आले आहे. यामध्ये खंड पडलेला नाही. दाक्षिणात्य चित्रपट आता देशव्यापी झाले आहेत. दक्षिणेसोबत हिंदी पट्ट्यातल्या प्रेक्षकांना आकर्षित करण्याचे गुपित त्यांना उलगडले आहे. प्रेक्षकांचे पूर्ण मनोरंजन व्हावे याची खबरदारी दाक्षिणात्य चित्रपटांकडून घेतली जात आहे. हे चित्रपट जगभरात जवळपास हजार कोटी रुपयांची कमाई करताना दिसत आहेत. हिंदी चित्रपटसृष्टी मात्र 200 ते 300 कोटी रुपयांच्या क्लबमध्ये अडकून पडली आहे. हिंदी चित्रपटसृष्टीने त्यापलीकडे जाऊन विचार करणे आवश्यक आहे. जगभरातल्या प्रेक्षकांना आकर्षित करणारे विषय हिंदी चित्रपटसृष्टीने हाती घेणे आवश्यक असल्याचे जाणकारांचे मत आहे. काही वर्षांपूर्वीपर्यंत एखाद-दुसरा दाक्षिणात्य चित्रपट हिंदीत डब होऊन येत असे. आता मात्र त्याचे प्रमाण बरेच वाढले आहे. ‘बाहुबली : द बिगिनिंग’पासून दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीने मोठी भरारी घ्यायला सुरुवात केली. या चित्रपटाने प्रभास नावाच्या अभिनेत्याची ओळख संपूर्ण जगाला, विशेषतः हिंदीतल्या प्रेक्षकांना करून दिली. आधी दक्षिणेतले एखाद-दुसरे कलाकार हिंदीत येत असत. त्यामुळे हिंदीतल्या प्रेक्षकांना तेवढीच नावे माहीत असायची. मात्र गेल्या चार-पाच वर्षांमध्ये परिस्थिती पूर्णपणे बदलली. हिंदी चित्रपटसृष्टीपुढे दाक्षिणात्य चित्रपटांचे आव्हान उभे ठाकल्याचे दिसून येत आहे. आज हिंदी पट्ट्यात फारशा माहीत नसलेल्या दाक्षिणात्य कलाकारांचे चित्रपट दणकून कमाई करत आहेत. ‘पुष्पा’ हे याचे उत्तम उदाहरण ठरला. अल्लू अर्जून हा कलाकार हिंदी पट्ट्यात फारसा परिचित नव्हता. मात्र त्याच्या ‘पुष्पा’ने हिंदी पट्ट्यात शंभर कोटी रुपयांहून अधिक गल्ला जमवला. ही गोष्ट बॉलिवूडसाठी अनपेक्षित म्हणावी लागेल. त्याच काळात रणवीर सिंहचा ‘83’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. मात्र प्रेक्षकांनी ‘83’ पेक्षाही ‘पुष्पा’ला पसंती दिल्याचे दिसून आले. अल्लू अर्जुनचे संवाद प्रेक्षकांच्या ओठी होते. ‘83’ हा बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित चित्रपट होता. भारताच्या 1983 मधल्या विश्वचषक विजयावर आधारित असलेल्या या चित्रपटाला क्रिकेटवेड्या भारतामध्ये भरपूर कमाईची अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात तसे होऊ शकले नाही. चित्रपट निर्मितीमूल्य वसूल करू शकला नाही. दुसरीकडे ‘पुष्पा’ सातत्याने चांगली कमाई करत होता. हिंदी चित्रपटसृष्टीला आपल्या विचारसरणीत आणि चित्रपटांच्या मांडणीत बदल करणे किती आवश्यक आहे हे ‘पुष्पा’च्या यशावरून लक्षात येते.

अक्षयकुमारचा ‘बच्चन पांडे’ आणि ‘पृथ्वीराज’ हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी चमक दाखवू शकले नाहीत. अक्षयकुमार हे खरे तर बॉलिवूडमधले खणखणीत वाजणारे नाणे. अक्षयकुमारचा परिसस्पर्श असलेले चित्रपट चालतात, असा सर्वसाधारण समज आहे. शाहरूख खान, सलमान खान, आमीर खान यांचे चित्रपट आपटत असताना अक्षयकुमारने बॉलिवूडला चांगले यश मिळवून दिले. मात्र आता अक्षयकुमारची जादू फिकी पडत चालली आहे की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. आपण पुन्हा हाऊसफुल्ल, राऊडी राठोडसारखे प्रेक्षकांचे धमाल मनोरंजन करणारे चित्रपट करणार असल्याचे वक्तव्य अक्षयकुमारने केले होते.

- Advertisement -

बॉलिवूडला सातत्याने अपयश येत असताना कार्तिक आर्यनच्या ‘भूलभुलय्या 2’ ने चांगले यश मिळवून दिले. याचा उल्लेख सातत्याने केला जात आहे. कार्तिक आर्यनसारख्या तरुण आणि उमद्या कलाकाराचा चित्रपट प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला. मात्र हा चित्रपट 200-250 कोटी रुपयांच्या मर्यादेत अडकून पडला. ‘पुष्पा’नंतर ‘केजीएफ चॅप्टर 2’ आणि ‘आरआरआर’ या चित्रपटांनी हिंदी पट्ट्यासह जगभरातच भरपूर कमाई करत बॉलिवूडला तोंडात बोटे घालण्यास भाग पाडले. ‘केजीएफ 2’ ने तर हिंदी पट्ट्यातच 300 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली. ‘केजीएफ’मुळे कन्नड अभिनेता यशला हिंदी पट्ट्यात ओळख मिळाली. त्यानंतर एस. एफ. राजामौली यांच्या ‘आरआरआर’नेही जवळपास हजार कोटी रुपयांहून अधिक कमाई केली. कमल हसनच्या ‘विक्रम’ या चित्रपटाने एकट्या तामिळनाडूमध्ये विक्रम केल्याचे दिसून आले. या चित्रपटाने अवघ्या 17 दिवसांमध्ये फक्त तामिळनाडूमध्ये 150 कोटी रुपयांहून अधिक रकमेची कमाई केली. त्याआधी ‘बाहुबली 2’ने एवढ्याच काळात तामिळनाडूमध्ये 150 कोटी रुपये कमावले होते. ‘विक्रम’ने ‘बाहुबली’ला मागे टाकले.

कंगना रणावतचा ‘धाकड’ हा चित्रपटही बॉक्स ऑफिसवर आपटला. हा एक बिगबजेट चित्रपट होता. या चित्रपटात कंगनाने एक वेगळी भूमिका साकारली होती. चित्रपटाबद्दल बरेच काही बोलले जात होते. पण प्रेक्षकांनी ‘धाकड’ला नाकारले. दुसरीकडे यंदा ‘गंगूबाई काठियावाडी’ आणि ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटांनी उल्लेखनीय यश मिळवले. ‘द काश्मीर फाईल्स’बद्दल बोलायचे तर हा प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा बॉलिवूडपट नव्हता. काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचाराचे चित्रण या चित्रपटात होते. हा काही सत्य घटनांवर आधारित चित्रपट होता. प्रेक्षकांकडून चित्रपटाला उदंड प्रतिसाद मिळाला. या चित्रपटात कोणतेही मोठे किंवा नावाजलेले कलाकार नव्हते. त्यामुळे हे बॉलिवूडला मिळालेले यश आहे, असे ठामपणे म्हणता येणार नाही.

बॉलिवूडने दाक्षिणात्य चित्रपटांकडून काही धडा घेणे अपेक्षित आहे. उगाचच अर्थहीन कथा आणि मोठ्या वयाचे नायक प्रेक्षकांच्या माथी मारण्याऐवजी काही तरी सकस आणि दमदार सादर करून त्यांनी बॉलिवूडची पत राखायला हवी. येत्या काळात मोठे हिंदी चित्रपट प्रदर्षित होणार आहेत. शमशेरा, ब्रह्मास्त्र, लालसिंग चढ्ढा, रक्षाबंधन अशी चित्रपटांची यादी मोठी आहे. आता या चित्रपटांना कसे यश मिळते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. हे चित्रपट तिकीट खिडकीवर अपयशी ठरले तर बॉलिवूडला वेगळा विचार करावा लागेल यात काही शंका नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या