Wednesday, April 24, 2024
Homeब्लॉगस्पंदन : रजनीगंधा फूल तुम्हारे...

स्पंदन : रजनीगंधा फूल तुम्हारे…

डॉ. प्रवीण घोडेस्वार,

माझ्या लहानपणीची घटना. आजही लख्ख आठवते. तेव्हा मी दुसरीत होतो. त्यावेळी वडिलांची बदली ‘दोंडाईचा’ (तालुका- शिंदखेडा, जिल्हा- धुळे) नामक गावात नुकतीच झालेली असावी. बहुदा रविवार किंवा कुठला तरी सुट्टीचा दिवस असावा. सकाळीच रेडीओवर एक गाणं ऐकलं होतं..रजनीगंधा फूल तुम्हारे..मी गाण्याच्या ह्या ओळी गुणगुणत होतो.

- Advertisement -

दुपारची वेळ होती. बहुतेक चार-साडेचारची. आमच्या परिसरात राहणारा आणि परिचित असलेला एक पाचवीतला मुलगा दूध घेऊन घरी परतत होता. तेव्हा मी सकाळी ऐकलेलं गाणं गुणगुणत होतो. पण का आणि कसे, त्या दूध घेऊन जाणाऱ्या मुलाला भलतच काही तरी ऐकू आलं. घरी जाऊन त्याने त्याच्या आईकडे माझी तक्रार केली. मी त्याला ‘सुऱ्या बेटा…’ असं म्हटल्याची. त्या मुलाचं नाव सुरेश होतं. त्याची आई ही तक्रार घेऊन माझ्या आईकडे आली. आईने माझं काहीही ऐकून न घेता मला फटके लगावले. मला काहीच कळेना. मी कधी असं काही म्हटलं. आणि इतक्या लांबून त्याला माझा आवाज कसा काय व्यवस्थित आणि स्पष्टपणे ऐकायला आला कोण जाणे! पण मला मात्र न केलेल्या चुकीबद्दल विनाकारण आईच्या हातचा मार खावा लागला. लताच्या आवाजातले हे गाणे आजही जेव्हा-जेव्हा ऐकायला मिळतं तेव्हा मला माझ्या लहानपणीचा हा प्रसंग हमखास आठवतो.

नवापूर महाराष्ट्रातलं शेवटचं स्टेशन

वडील रेल्वेत नोकरीला होते. त्यातही पश्चिम रेल्वेत. मुळात आपल्या राज्यात पश्चिम रेल्वेचं जाळं फारच मर्यादित. मुंबईचा थोडासा भाग आणि खान्देशमधली काही गावं, एवढाच काय तो पश्चिम रेल्वेचा विस्तार. जळगाव सोडलं की पश्चिम रेल्वेची हद्द सुरु होते. धरणगाव-नरडाणा-अंमळनेर-शिंदखेडा-दोंडाईचा-नंदुरबार-नवापूर ही या मार्गावरची काही महत्वाची रेल्वे स्थानके. जळगाव-धुळे-नंदुरबार याच तीन जिल्ह्यातून हा रेल्वे मार्ग जातो. याला ताप्ती लाईन असंही म्हटलं जातं. नवापूर ( जिल्हा- नंदुरबार) महाराष्ट्रातलं शेवटचं स्टेशन. यानंतर गुजरात सुरु होतो.

(गुजरात आणि राजस्थान या राज्यांमध्ये पश्चिम रेल्वे जास्त प्रमाणात आहे.) नवापूर रेल्वे स्टेशनचा एक platform आपल्या राज्यात तर दुसरा गुजरातमध्ये! सूरत-भुसावळ हा रेल्वे मार्ग तसा बऱ्यापैकी प्रसिद्ध आहे. ब्रिटीशांच्या काळात अस्तिवात आला असल्याने. सुरुवातीला याचा उपयोग ब्रिटीशांनी माल वाहतूक करण्यासाठीच केला होता. कालांतराने प्रवासी गाड्या सुरु करण्यात आल्या. आमच्या लहानपणी या मार्गावर सुरु झालेली पहिली लांब पल्ल्याची गाडी म्हणजे अहमदाबाद- चेन्नई (तेव्हाचे मद्रास) नवजीवन एक्सप्रेस. या गाडीचे आम्हांला फार अप्रूप वाटायचं. आकर्षण वाटायचं. कारण ही गाडी तेव्हा दोंडाईचा इथं थाबंत नसे. तसेच या गाडीच्या डब्ब्यांचा रंगही वेगळा होता. निळ्या रंगाची ही गाडी आम्हा मुलांना बघायला फार मौज वाटायची. शिवाय गाडीला डीझेल इंजिन होतं. तोवर या मार्गावर धावणारी सूरत-भुसावळ ही passenger गाडी कोळशाच्या इंजिनवर धावायची. नवजीवन एक्स्प्रेस नंतर सुरु झालेली दुसरी लांब पल्ल्याची गाडी म्हणजे अहमदाबाद-हावडा एक्स्प्रेस. पुढे मग अनेक गाड्या सुरू झाल्या. मोठे झाल्यावर यापैकी अनेक गाड्यांमधून प्रवास करण्याची संधी मिळाली. माझ्या नोकरीच्या निमित्ताने मी भुसावळ-जळगाव-अंमळनेर या ठिकाणी काही कालावधीसाठी राहिलो. त्यामुळे या मार्गावर अनेकदा रेल्वे प्रवास करता आला.

सूरत- मुंबई प्रवाशाचे आकर्षण

माझी दुसरी झाल्यावर वडिलांची दोंडाईचा येथून बदली झाली. नंदूरबारला. हे सूरत-भुसावळ या रेल्वे मार्गावरील सर्वात मोठे स्टेशन. जंक्शन नसले तरी जंक्शन सारखेच. १८९९ मध्ये हे स्टेशन कार्यन्वित झाले. म्हणजे हे स्टेशन शंभर वर्षांपेक्षाही जास्त जुने आहे. लवकरच सव्वाशे वर्ष यास पूर्ण होतील. लहानपणी अनेकदा वडिलांसमवेत या स्टेशनावर जायची संधी मिळाली आहे. पदव्युत्तर पदवी शिक्षणासाठी मी मुंबईला गेलो. तेव्हा रेल्वेनेच येणं-जाणं असायचं. रस्ते मार्गे म्हणजे नाशिक मार्गाने क्वचितच मुंबईला गेलो असेल. आमचा मुंबई प्रवास सूरत-गुजरात कडूनच व्हायचा. लहानपणी अजून एक आकर्षण होतं. ते म्हणजे सूरत- मुंबई सेन्ट्रल प्रवासाचं. याचं कारण म्हणजे ‘फ्लाइंग राणी’ ही गाडी. ‘डबल डेकर’ हे या गाडीचं वैशिष्ट्य. यातून प्रवास करताना आगळा आनंद व्हायचा. या मार्गावरील ‘डहाणू’ रेल्वे स्टेशनावर मिळणारे चिकू फार आवडायचे. त्याचप्रमाणे पालघर-सफाळा इथं मिळणारे पाणीदार फळ (त्याचं नाव आता आठवत नाही. पण त्याचा रंग कच्च्या बोरासारखा आणि आकार चिकुपेक्षा थोडा लहान असतो.) देखील चवदार असल्याने खूप आवडायचे.

आता कार्यालयीन-खासगी कामानिमित्त अनेकदा मुंबईला जाणं होत असतं. पण सूरत- मुंबई सेन्ट्रल हा ‘फ्लाइंग राणी’ एक्स्प्रेस ने केलेला वडिलांसमवेतचा प्रवास आजही स्मरणात आहे. त्याची तुलना न करता येणारीच. फ्लाइंग राणीने केलेला शेवटचा प्रवास करून थोडा-थोडका नव्हे तर तब्बल तीन दशकांपेक्षाही जास्त काळ लोटला आहे. इतक्या वर्षात पुन्हा हा प्रवास करण्याचा योग आला नाही. बघू या नजीकच्या काळात अशी संधी येते का! करोना संकट काळात अकारण फिरणे तसे दुरापास्तच झालं आहे. आशा करू या २०२१ हे वर्ष २०२० च्या तुलनेत कमी त्रासदायक असेल! नवीन वर्षाच्या सगळ्यांना मन:पूर्वक शुभेच्छा !

सहयोगी प्राध्यापक,

मानव्यविद्या व सामाजिक शास्त्रे विद्याशाखा,

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ,

नाशिक

मोबाईल : ९४०३७७४५३०

- Advertisment -

ताज्या बातम्या