पुत्ररत्न

पुत्ररत्न

घराघरांतील संवादाला किती महत्त्व आहे हे वेगळे का सांगायला हवे? एक आई ते आजी या प्रवासात बदलत जाणारे संवादाचे टप्पे धुंडाळणारे सदर

भाग 4

मुलाचा जन्म झाल्यावर घरादारासह मित्र परिवाराचेही पेढ्याने तोंड गोड होते. मुलाचा जन्म म्हणजे ‘म्हातारपणाची काठी’ असेही म्हटले जाते. मुलगा म्हातारपणी नक्की सांभाळेल ही त्यामागील भावना. पण ही तर फारच लांबची गोष्ट. त्याचे संस्कारक्षम जीवन घडवणे सर्वात प्रथम महत्त्वाचे असते आणि अर्थातच ही जबाबदारी घरातील सर्वांचीच असते. बाळकृष्णाच्या बारशासाठी आख्खे घर सजते. फुलांची सजावट, गोडाचा स्वयंपाक, पाहुणे मंडळी अगदी आनंदी आनंद असतो. आत्या बाळाला पाळण्यात ठेवून मानाने बाळाचे नाव ठेवते. बाळाचे नाव ठेवताना आत्याचा मान मोठा म्हणून आत्याचा रूबाब असतो. पुढे या बाळकृष्णाच्या लीला वाढतात. त्यांचे तोंडभरून कौतुक होते. हट्टाने एखादी गोष्ट मिळवली की ते गोजीरवाणे रूपडेही हसू लागते. लहान बाळाचा हट्ट म्हटले की मला तर प्रभू श्रीरामचंद्रांचा बालहट्टच आठवतो. मग मी आपोआपच ग. दी. माडगूळकर लिखित गीतरामायणाकडे वळते. एकापेक्षा एक सरस अशी छप्पन्न गीते यात आहेत. कौसल्या महाराणीने आपल्या सावळ्या रामचंद्राच्या हट्टाबद्दल सांगितले आहे,

सावळा गं रामचंद्र, चंद्र नभीचा मागतो

रात जागवितो बाई, सारा प्रासाद जागतो.

लहानग्या रामचंद्रांचा प्रत्येक हट्ट कौसल्यादेवी पुरवतात. एकदा या सर्वांचीच पंचाईत झाली. रात्रीच्या वेळी रामचंद्रांनी आकाशातील सुंदर चंद्रमा पाहिला आणि मला आकाशातील चंद्र हवा असा हट्ट धरला. सर्वांनी खूप समजावले पण ते ऐकेनात. राजमहालातील सर्वजण रामचंद्रांचा हट्ट कसा पुरवणार या प्रयत्नात होते. अचानक माता कौसल्या राणीने दासीकरवी मोठा आरसा मागितला. रामचंद्रांना नभातील चंद्राची प्रतिमा आरशात दाखवली. साक्षात चंद्रदर्शन मिळाल्यावर त्यांना आनंद झाला. त्यांच्या चेहर्‍यावर हसू पसरले. कौसल्या मातेबरोबर सर्व प्रासादही धन्य झाला. असा हा बालहट्टांचा महिमा.

क्रमशः

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com