Monday, April 29, 2024
Homeब्लॉगमिस्टर प्रेसिडेंट

मिस्टर प्रेसिडेंट

न्यूयॉर्कपासून २५० मैलांवर व्हर्जिनियाच्या उत्तरपूर्व भागात असलेल्या पोटोमेक नदीच्या काठावर माऊंट व्हेरनॉन नावाचे गाव वसलेले होते. या छोटयाश्या खेडयातून एक व्यक्ती न्यूयॉर्कसाठी घोडयांच्या बग्गीत निघाली होती. हा साधा प्रवास नव्हता. एका नव्या देशाला आपल्या कुशल हातांनी आकार देण्यासाठी निघालेल्या एका माणसाचा हा ऐतिहासिक प्रवास होता. न्यू यॉर्कला जाऊन भविष्यातील महासत्तेच्या रथाचे लगाम हातात घेण्यासाठी घोडयांची बग्गी या माणसाला घेऊन दौडत होती.

रस्त्यात लागणारी गावं मात्र बग्गीला वेग घेऊ देत नव्हते. त्यांना बग्गीतील माणसाला पाहायचे होते. त्याला अभिवादन करायचे होते. त्याने स्वातंत्र्ययुद्धात त्यांच्यासाठी केलेल्या अतुलनीय साहसासाठी आभार मानायचे होते. स्वतःच्या भावी उज्ज्वल आयुष्यासाठी त्याच्याकडून आश्वासन घ्यायचे होते. त्यासाठी त्याला शुभेच्छा दयायच्या होत्या. त्याचा हा २५० मैलांचा प्रवास नव्या अमेरिकेच्या स्वप्नांचा व आकांक्षाचा प्रवास ठरत होता. त्याच्या मनाची बग्गी आपल्या देशवासीयांच्या प्रेमाने, आदराने व विश्वासाने ओतप्रोत भरून गेली होती. प्रख्यात शायर साहिर लुधियानवी यांच्या भाषेत सांगायचे झाल्यास –

- Advertisement -

“आप क्या जाने मुझको समझते है क्या

मै तो कुछ भी नही |

इस कदर प्यार इतनी बड़ी भीड़ का मै रखूँगा कहाँ

इस कदर प्यार रखने के काबिल नही

मेरा दिल,मेरी जान

मुझको इतनी मुहब्बत ना दो दोस्तों,

मुझको इतनी मुहब्बत ना दो दोस्तों

सोच लो दोस्तों

इस कदर प्यार कैसे संभालूँगा मैं

मै तो कुछ भी नही ” |

कदाचित काहिश्या अशाच भावना या व्यक्तीच्या मनात येत असतील. कारण त्याला त्याच्या जीवनात या प्रवासापूर्वीच अपार यश व र्किती मिळालेली होती. अमेरिकन जनतेने आपल्या अमर्याद स्नेह,आदर व सन्मान यांनी त्याला जिंवतपणीच एखाद्या महाकाव्याचा नायक म्हणून आपल्या भावविश्वात अजरामर केला होता. तो आणि त्याचा जीवनसंघर्ष दंतकथांचा विषय झालेला होता. अमेरिकन जनेतचे त्याच्याविषयी असलेल्या झपाटलेपणाने तो भारावून आणि भांबावून गेला होता. अखेर ३० एप्रिल १७८९ रोजी त्याची बग्गी न्यू यॉर्कच्या फेडरल हॉलच्या दारासमोर जाऊन उभी राहिली. फेडरल हॉलच्या बाहेर अमेरिकन जननेचा अलोट सागर लोटलेला होता. बग्गीला ओढणा-या घोडयांच्या टापांच्या आवाजात त्यांनी नव्या देशाच्या निर्मात्याच्या आगमनाचा नाद ऐकला. बग्गीतील माणसाने जमिनीवर पाय ठेवल्यावर लाखो नजरांनी त्याला आपल्या हदयात कैद केला. अमेरिकन सिनेटरांनी खचाखच भरलेला फेडरल हॉल त्याच्या आगमनाने रोमांचित झाला. अभिवादनांचा स्वीकार करत दमदार पावले टाकत ही व्यक्ती हॉलमधील व्यासपीठावर पोहचली. तेथे पोहचल्यावर बायबलची (इंजिल) प्रत त्याच्यासमोर धरण्यात आली.

बायबलवर हात ठेवून त्याला शपथ देण्यात आली. शपथग्रहणाचा सोपस्कार पार पडताच चांसलर लिविंगस्टोन यांनी घोषणा दिली – ‘संयुक्त राज्य अमेरिेकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन जिंदाबाद’ फेडरल हॉलबाहेरील जनसागरात या घोषणेच्या लाटांवर लाटा उसळू लागल्या आणि भावी महासत्तेची गाजच जणू त्यातून ऐकू येऊ लागली. अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांनी विधिवत आपला पदभार सांभाळला होता. नवा देश,नवे संविधान आणि नवा राष्ट्राध्यक्ष अशा तिनही पातळयांवरून भविष्यात जगाच्या क्षितिजावर प्रारंभ होणा-या एका नव्या पर्वाची चाहूल मिळत होती. अमेरिकने संयुक्त राज्य अमेरिेका म्हणून नव्या संविधानाचा स्वीकार केल्यानंतर निवडणूकांची घोषणा करण्यात आली. १५ डिसेंबर १७८८ ते १० जानेवारी १७८९ या कालावधीत राष्ट्राध्यक्षासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. तत्कालीन ६९ सिनेटर संख्या असलेल्या अमेरिकन सिनेटमध्ये राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडीसाठी ३५ मतांची आवश्यकता होती.

जॉर्ज वॉशिंग्टन यांच्या बाजूने सर्वच्या सर्व म्हणजे ६९ सिनेटरांनी मतदान केले. म्हणजेच बहुमताने नव्हे तर एकमताने त्यांची निवड करण्यात आली. १५ डिसेंबर १७८८ ते १० जानेवारी १७८९ या कालावधीत या कालावधीत झालेल्या निवडणूकांमध्ये प्रथम सिनेटर निवडण्यात आले. ही निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ४ मार्च १७८९ रोजी देशाच्या नव्या काँग्रेसचे पहिले अधिवेशन बोलवण्यात आले. नव्या देशाच्या पहिल्या काँग्रेसच्या अधिवेशनासाठी न्यू यॉर्क शहर निश्चित करण्यात आले. हे सर्व घडत असतांना ज्या फ्रांसने अमेरिकन स्वातंत्र्य युद्धात अमेरिकेच्या बाजूने उभे राहून भक्कम व सक्रिय पाठिंबा दिला होता. त्या फ्रांसमध्ये ‘स्वांतत्र्य-समता-बंधूता’ या तत्त्वांना आधाराभूत मानत क्रांतीची पहाट उगवली होती. अमेरिका स्वतंत्र होऊन लोकशाही राष्ट्राची निर्मिती करण्यासाठी निश्चित पावले उचलत असतांना, फ्रांस लोकशाहीसाठी आपल्या राजेशाही सोबत लढत होता. हा एक योगायोग म्हणावा लागेल.

अधिवेशनासाठी ठरलेल्या ४ मार्च १७८९ या दिवशी सर्व दोन्ही सदनांचे सर्व सिनेटर पोहचू शकले नाहीत. दोन्ही सदनांचे सर्व सिनेटर पोहचण्यास जवळपास एक महिना लागला. त्यामुळे ६ एप्रिल १७८९ ला राष्ट्राध्यक्षासाठी मतदान घेण्यात आले. ज्यामध्ये जॉर्ज वॉशिंग्टन यांची एकमताने राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. या सर्व प्रक्रियेत राष्ट्राध्यक्ष म्हणून जॉन ॲडम यांचे नाव इतर उमेदवारांच्या तुलनेत अनेकवेळा पुढे होते. म्हणून त्यांना उपराष्ट्राध्यक्ष म्हणून घोषित करण्यात आले. राष्ट्राध्यक्ष म्हणून जॉर्ज वॉशिंग्टन आणि उपराष्ट्राध्यक्ष म्हणून जॉन ॲडम यांची नावं घोषित झाल्यानंतर त्यांना त्याबद्दल कळवण्यात आले. कारण निवडणूक प्रक्रियेच्या वेळी हे दोघेही न्यू यॉर्कमध्ये उपस्थित नव्हते. जॉन ॲडम न्यू यॉर्कला पोहचले तोपर्यंत वॉशिंग्टन पोहचलेले नव्हते. त्यामुळे त्यांचा शपथविधी आधी घेण्यात आला. जॉर्ज वॉशिंग्टन ३० एप्रिल १७८९ ला पोहचले. त्यामुळे त्यांचा शपथविधी त्या दिवशी घेण्यात आला. आजही अमेरिकेत उपराष्ट्राध्यक्षांची शपथ राष्ट्राध्यक्षांच्या आधी घेतल्या जाते. अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतल्यानंतर जॉर्ज वॉशिंग्टन यांनी पहिले दोन निर्णय घेतले. त्यापैकी पहिला होता राष्ट्राध्यक्ष म्हणून त्यांना जे २५००० हजार डॉलर्स वेतन म्हणून मिळणार होते. ते स्वीकारण्यास त्यांनी नकार दिला. म्हणजेच राष्ट्राध्यक्ष म्हणून वेतन घेणे नाकारले. त्यांनी दुसरा जो निर्णय घेतला तो एका लोकशाही देशातील लोकसत्तेची सर्वोच्चता अधोरेखित करणारा होता. तो निर्णय म्हणजे युरोपातील राजांना किंवा राष्ट्राध्यक्षांना माय लॉर्ड,हिज मॅजेस्टी इत्यादी संबोधने वापरली जात. ती त्यांनी साफ नाकारून ‘मिस्टर प्रेसिडेंट’ हे संबोधन स्वीकारले.

‘श्रीयुत राष्ट्राध्यक्ष’ या संबोधनातून त्यांना आपण जनतेच्यावतीने देशाची सुत्रं सांभाळतोय याची जाणीव कायम ठेवणे महत्वाचे वाटले. माय लॉर्ड किंवा हिज मॅजेस्टीमध्ये स्वतः राज्याचे ईश्वर किंवा मालक असल्याचा अहंकार आणि जे करत आहोत ते जणू काही जनतेवर उपकार हा भाव होता. अमेरिकेचा पहिला राष्ट्राध्यक्ष म्हणून वॉशिंग्टन जे करणार होते ती प्रत्येक गोष्ट परंपरा किंवा पायंडा म्हणून भविष्यात आचारधर्म ठरणार होती. अमेरिकन क्रांतीसेनेचा सरसेनापती म्हणून जॉर्ज वॉशिंग्टन यांनी बलाढय ब्रिटिश सेनेशी अथक परिश्रम केले होते. तसेच स्वातंत्र्यानंतर सेवानिवृत्त जीवनातून निवृत्ती घेऊन आपल्या राष्ट्रासाठी तो कंबर कसून उभा राहिला. स्वातंत्र्ययुद्ध संपल्यानंतर स्वातंत्र मिळाले होते; परंतु संपत्ती संपलेली होती. अशा अवस्थेत अमेरिका होती. राजा आणि रंक अशा दोन्ही अवस्थांचा अनुभव अमेरिका घेत होता. शासनाची तिजोरी रिकामी झाली होती. सैनिकांना अनेक वर्षे पगार मिळालेला नव्हता. सैन्य पोटावर चालते याची अनुभूती अमेरिकन नेत्यांना एव्हाना आली होती. कारण सैन्यात बंडाची मानसिकता जोर धरू लागली. सरसेनापती म्हणून जॉर्ज वॉशिंग्टन यांनी येथेही आपली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. त्यांनी काँग्रेसची सभा बोलावली आणि सैनिकांना पगारासोबत पाच वर्षांचा बोनस मिळण्याची व्यवस्था करुन घेतली. त्यामुळे सैन्यात होऊ घातलेले बंड होता होता वाचले. वॉशिंग्टनसाठी जीवाची बाजी लावून लढलेल्या या सैन्यावर त्यांनी सुद्धा जीवापाड प्रेम केले. त्यामुळेच ते सैन्याचे आणि जनतेच्या मनातील सरसेनापती ठरले. एका शांत जीवनाची आस वॉशिंग्टन यांना लागली होती. त्यांना सैनिकी पोषाख उतरवून शेतक-याची भूमिका साकारत सेवानिवृत्तीचे जीवन जगायचे होते. यामुळेच अखेर २३ डिसेंबर १७८३ ला सरसेनापती जॉर्ज वॉशिंग्टन यांनी सरसेनापती पदाचा राजीनामा दिला. माउंट व्हेरनॉनची माती त्यांना साद घालत होती. माउंट व्हेरनॉनचा हा शेतकरी उणीपुरी चार वर्षे आपल्या शेतीत रमला नाही, तर देशाच्या मातीने त्याला साद घातली.

-प्रा.डॉ.राहुल हांडे, भ्रमणध्वनी-८३०८१५५०८६

(लेखक धर्म, इतिहास व साहित्य यांचे अभ्यासक आहेत)

- Advertisment -

ताज्या बातम्या