व्यक्तीपेक्षा स्वातंत्र्य श्रेष्ठ...

१९ सप्टेंबर १७९६ रोजी 'American Daily Advertiser' या अमेरिकन वृत्तपत्रात छापण्यात आलेल्या ३२ पानांच्या एका संदेशातील हा काही भाग आहे. अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांनी राष्ट्राध्यक्ष पद सोडतांना आपल्या देशवासीयांना दिलेला हा संदेश. आपल्या निरोपाच्या संदेशात वॉशिंग्टन यांनी एका प्रकारे अमेरिकेच्या भावी वाटचालीची रुपरेखाच निश्चित करून दिली होती... अभ्यासक प्रा.डॉ.राहुल हांडे यांची ‘बखर अमेरिकेची’ ब्लॉग मालिका...
व्यक्तीपेक्षा स्वातंत्र्य श्रेष्ठ...

"जगातील इतर देशांशी व्यवहार करतांना एक पहिला व प्रमुख नियम आपण कटाक्षाने पाळला पाहिजे. तो म्हणजे त्यांच्यासोबत यथाशक्ती व्यापार वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मात्र असे करतांना त्यांच्याशी कमीत कमी राजकीय संबंध ठेवले जावेत. युरोपातील देशांचे काही आधारभूत हित आहे. ज्यांच्यापासून आपल्याला दूरच राहावे लागेल.

युरोपीय देश त्यांच्या वाद-विवादांमध्ये अडकून पडणार आहेत. त्यांच्यासाठी अमेरिकेचे हित काहीही महत्वाचे नाही. त्यामुळे आपल्यासाठी देखील त्यांच्यासोबत संबंध ठेवणे म्हणजे अविवेकाचे ठरेल. त्यांच्याशी वरवरचे बनावटी संबंध ठेवून आणि त्यांच्या अंतर्गत राजकारणात अडकून चालणार नाही. अन्यथा आपण देखील त्यांच्या अंतर्गत मैत्री किंवा शत्रुता असल्या नको त्या झंझटींमध्ये ओढले जाऊ. अमेरिका म्हणून आपली खरी नीती ही असली पाहिजे की आपण जगातील कोणत्या ही देशाशी स्थायी स्वरूपाचे संबंध प्रस्थापित करायचे नाही."

व्यक्तीपेक्षा स्वातंत्र्य श्रेष्ठ...
आधुनिक जगाचा दिपस्तंभ..

१९ सप्टेंबर १७९६ रोजी 'American Daily Advertiser' या अमेरिकन वृत्तपत्रात छापण्यात आलेल्या ३२ पानांच्या एका संदेशातील हा काही भाग आहे. अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांनी राष्ट्राध्यक्ष पद सोडतांना आपल्या देशवासीयांना दिलेला हा संदेश. आपल्या निरोपाच्या संदेशात वॉशिंग्टन यांनी एका प्रकारे अमेरिकेच्या भावी वाटचालीची रुपरेखाच निश्चित करून दिली होती. अमेरिकेच्या विशुद्ध भांडवलशाहीची बीजं आपल्याला वॉशिंग्टन यांच्या उपरोक्त संदेशात दिसून येतील. त्याचप्रमाणे अमेरिकेच्या पराराष्ट्र धोरणाचा हा गाभाच म्हणावा लागेल. आजच्या अमेरिकेचे धोरण पाहिले तरी आपल्याला त्याची प्रचिती येऊ शकते. आपला व्यापार आणि समृद्धीसाठी कायम मित्र आणि शत्रु बदलत राहायचे. देशाचे हित पाहून निर्णय घ्यायचा. कोणाच्या कायम मैत्रीच्या मोहात अडकायचे नाही. तसेच कोणाशी कायमचे वैर पत्कारुन स्वतःचे नुकसान करून घ्यायचे नाही. हा विचार आपल्या भारतीय मानसिकतेला पटणारा नाही.

वैराचा असो वा मैत्रीचा अतिरेक एखाद्या भंपकाला कायमचे मातीत घालू शकतो. वैरासाठी शत्रुचा विचार करण्यात जीवनातील फार मोठा काळ व शक्ती यांचा अपव्यय होत जाऊन आपण कमजोर होत जातो. कारण आपल्या जीवनाच्या प्राधान्यांवर विचार व कृती करण्यावर लक्ष केंद्रित करता येत नाही. तसेच मित्रांवर अतिरिक्त अवलंबून असणारे मानसिक व वैचारिक दृष्टया पंगु होत जातात. मित्र धोका देणारच नाहीत अथवा सदासर्वकाळ सहकार्य करतील अशी खात्री देखील देता येत नाही. जगातील भल्या-भल्यांना त्यांच्या मित्रांनीच संपवल्याची अनेक उदाहरणे आहेत. शत्रुपेक्षा मित्रांमुळे संपलेल्यांचा इतिहास मोठा आहे. जॉर्ज वॉशिंग्टन यांनी दिलेला संदेश लक्षात घेता आणि अमेरिकेचा इतिहास पाहता अमेरिका कायम एकटा आणि इतरांपेक्षा वेगळा उभा राहिलेला दिसतो.

व्यक्तीपेक्षा स्वातंत्र्य श्रेष्ठ...
आम्ही संयुक्त राज्यांचे साधारण लोक..

येथे प्रख्यात लेखक रस्किन बाँड यांच्या 'अंतयात्रा' या कथेतील एक विधान महत्वाचे वाटते. ही कथा त्यांच्या स्वतःच्या जीवनावर बेतलेली आहे. आईने परपुरुषाशी विवाह केलेला आणि सहा-सात वर्षांच्या रस्किनचा त्याच्यावर जीवापाड माया करणारा पिता देखील जगाचा निरोप घेतोय. आपण आता जगात एकटे राहणार ही भावना लहानग्या रस्किनच्या मनात दाटून आलेली आहे. अशावेळी रस्किन बाँड यांच्या वडिलांनी त्यांना सांगितले होते की,'जो माणूस एकटा उभा राहू शकतो,तोच सगळ्यात ताकदवान असतो.' जॉर्ज वॉशिंग्टन यांनी आपल्या संदेशात नेमके हेच अमेरिकेला सांगितले. यासाठी पहिले असो की दुसरे महायुद्ध यामध्ये अमेरिकेची भूमिका बारकाईने तपासल्यास आपल्या हे सहज लक्षात येऊ शकते.

अमेरिका एकटा उभा राहिला त्यामुळे तो सदैव ताकदवान बनत गेला. कारण त्याने शत्रुवर अतिरिक्त शक्ती खर्च केली नाही किंवा मित्रांवर अवलंबून राहिला नाही किंवा मित्रांसाठी झळ सोसली नाही. याला कोणी स्वार्थीपणा किंवा कातडी बजावू वृत्ती अशा अनेक उपमा देऊ शकते. हे ज्याचे त्याचे स्वातंत्र्य आहे; परंतु आपल्या भोवतालच्या यशस्वी लोकांचे वर्तन व वाटचाल यांचे अवलोकन केल्यास आपल्याला याची जाणीव होऊ शकते. व्हितनामच्या युद्धात अमेरिका आपल्या राष्ट्रपित्याचा संदेश विसरला. त्याची किंमत त्याला कशी चूकवावी लागली. हे वेगळे सांगण्याची गरज नाही.

व्यक्तीपेक्षा स्वातंत्र्य श्रेष्ठ...
संविधान हाच धर्म

मार्च १७९७ ला जॉन ॲडम्स यांच्याकडे अमेरिकेची सुत्रं सोपवेपर्यंत जॉर्ज वॉशिंग्टन यांनी जे काही वर्तन केले. त्याच्यातच आजच्या अमेरिकेची बीजं दिसून येतात. असीम धैर्य आणि साहस यांचे प्रदर्शन त्यांनी आपल्या राष्ट्राध्यक्ष म्हणून दोन्ही कार्यकाळात दाखवले. एक शुरयोद्धा आणि सेनानायक असलेल्या वॉशिंग्टन यांनी देशातील प्रत्येक स्तरातील उग्रता व निरकुंशता यांच्यावर अंकुश ठेवला. यामध्ये त्यांची महानता दिसून येते. या माणसाच्या मनात आपल्या देशाचे स्वातंत्र्य आणि त्याचा सन्मान याविषयी एक तीव्र तळमळ होती. वॉशिंग्टन यांनी चूकीचे पाऊल उचलणे तर दूरच योग्य निर्णय देखील अत्यंत विचारपूर्वक उचललेले दिसते. अत्यंत सहज-साधे आचरण आणि नम्रता हा त्यांचा एक आणखी विशेष सांगता येतो. आपल्या पदाची प्रतिष्ठा आणि गरीमा सांभाळण्यासाठी ते सदैव सर्तक राहिले.

एकदा फ्रांसचा राजदूत 'जेनेट' याचा काही कारणामुळे वॉशिंग्टन यांना खूप राग आला होता. एखाद्या राष्ट्राध्यक्षाने त्याचे स्वागतच केले नसते. वॉशिंग्टन यांनी शिष्टाचार मोडला नाही. मात्र अत्यंत औपाचारिक थंडपणाने त्याचे स्वागत केल एवढेच. थॉमस जेफरसन आणि अलेक्झांडर हॅमिल्टन या टोकाचे विरोधी विचार असणा-या लोकांना सांभाळत. त्यांच्या बुद्धिमत्तेचा व दुरदर्शीपणाचा नेमका वापर अमेरिकेसाठी करण्यात वॉशिंग्टन यशस्वी झाले. कायदेनिर्मिती समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी कोणत्याही वाद-विवादाला एका मर्यादेत ठेवले. वादविवादाच्या गोंधळापेक्षा राष्ट्रहितकारक कायदयांच्या निर्मितीला प्राधान्य दिले. सार्वजनिक जीवनात धीरगंभीर आणि वैयक्तिक जीवनात दिलखुलास असे आपल्या व्यक्तिमत्वाचे दोन्ही पैलूंचा समतोल त्यांनी यशस्वीपणे सांभाळला.

व्यक्तीपेक्षा स्वातंत्र्य श्रेष्ठ...
स्वातंत्र्याची अस्वस्थ पहाट

अमेरिकेचा हा राष्ट्रपिता १७९७ ला वसंत ऋतुत कायमचा राजकीय संन्यास घेऊन आपल्या गावी म्हणजे माऊंट व्हेरनॉनला परतला. तिस-यांदा राष्ट्राध्यक्ष होण्याचा कमालीचा आग्रह तेवढयाच कमालीच्या विनम्रतेने नाकारत वॉशिंग्टन पुन्हा शेतक-याच्या भूमिकेत परतले. त्यामुळेच एक अपरिहार्य परिस्थिती म्हणून फ्रँकलिन रुझवेल्ट यांचा अपवाद वगळता आजवर कोणतीही व्यक्ती दोनपेक्षा अधिक वेळा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पद भूषवू शकली नाही. आपला कार्यकाळ संपवतांना अत्यंत कार्यक्षम व द्रष्टया लोकांकडे वॉशिंग्टन यांनी अमेरिकेची धुरा सोपवली. शांतता,कर्जपरतफेडीचे व्यवस्थापन आदी योजना नीट आखल्या होत्या आणि अमेरिका संपन्नता आणि समृद्धीच्या मार्गावर पुढे जात होती. माऊंट व्हेरनॉनचा एक संपन्न शेतकरी सर्वार्थाने कृत्यकृत्य जीवनाचा मजेत आनंद घेत होता. अशातच सूर्यास्ताची वेळ जवळ येऊन ठेपली.

डिसेंबर १७९९ च्या कडाक्याच्या थंडीत हा शेतकरी आपल्या घोडयावर स्वार होऊन शेतीचा फेरफटका मारण्यास गेला. भर हिमवर्षावात त्याने शेतीची पाहणी केली आणि सूचना दिल्या. ओलेचिंब कपडयांनी अखेर तो घरी परतला आणि थकव्यामुळे लवकरच झोपण्यासाठी गेला. दुस-या दिवशी सकाळी म्हणजे १२ डिसेंबर १७९९ ला तो उठला तेंव्हा त्याला घशाच्या आजाराने ग्रासले होते. त्या दिवशी कोणाला न सांगता त्याने विश्रांती घेतली. १४ डिसेंबरला पहाटे ३ वाजता आपली पत्नी मार्थाला आपली तब्बेत ढासळत असल्याचे सांगितले. १४ डिसेंबर १७९९ ला सायंकाळी जॉर्ज वॉशिंग्टन नावाचा अमेरिकेचा हा सूर्य कायमचा अस्ताला गेला. त्याच्या अस्ताची खबर जणू काही वा-यानेच संपूर्ण अमेरिकेत पोहचवली. अखंड अमेरिका शोकसागरात बूडाला. अमेरिकेतील प्रत्येक शहरात-खेडयात त्याच्या प्रतिमात्मक अंतयात्रा निघाल्या. त्याच्या अंतिम ईच्छेनुसार त्याच्या मृत्यू पश्चात ३ दिवसांनी माऊंट व्हेरनॉन येथे तो कायमचा त्याच्या गावच्या मातीत विसावला.

व्यक्तीपेक्षा स्वातंत्र्य श्रेष्ठ...
विजयापूर्वीचा हलकल्लोळ

अफाट कर्तृत्व आणि अमर्याद लोकप्रियता लाभलेले जॉर्ज वॉशिंग्टन मनात आणले असते तर अमेरिकेचा राजा होऊ शकले असते. मात्र त्यांनी एक सामान्य नागरिक ते राष्ट्राध्यक्ष आणि राष्ट्राध्यक्ष ते सामान्य नागरिक हे वर्तुळ पूर्ण केले. अमेरिकेच्या येणा-या प्रत्येक पिढीसमोर चिरतंन आदर्श उभा केला. अन्यथा त्यांचा ही नेपोलिअन बोनापार्ट झाला असता. आजचा अमेरिका जॉर्ज वॉशिंग्टन यांच्या कर्तबगारीवर आणि विचारांवर उभा आहे. हे सा-या जगाने मान्य केले असले तरी वॉशिंग्टन यांच्या विनयशील व्यक्तीमत्वाने हे कधीच मान्य केले नाही. आपल्या काळात त्यांनी राष्ट्राध्यक्षांचे अधिकार जसे अधोरेखित केले तसेच त्याची कर्तव्ये देखील स्पष्ट केली. ' माणसाचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य हिरावून घेतल्यास त्याची अवस्था कसायाकडे कापण्यासाठी नेण्यात येणा-या शांत व मुक मेंढयांपेक्षा वेगळी असू शकत नाही.' या शब्दात माणसाच्या स्वातंत्र्याचे महत्व सांगणा-या जॉर्ज वॉशिंग्टन यांनी आपल्या मृत्युपत्राद्वारे आपल्या २०० हून अधिक नीग्रो गुलामांची गुलामीतून कायमची मुक्तता केली. आयुष्यभर मनात गुलामी प्रथेचा विरोध करणारा हा महापुरुष अखेर आपल्या मृत्युपत्रातून व्यक्त झाला. आयुष्यभर माणसाच्या स्वातंत्र्याला श्वास मानलेल्या महात्म्याचा अखेरचा श्वास नीग्रोंच्या गुलामीविरूद्ध लढयाला बळ देऊन गेला.

प्रा.डॉ.राहुल हांडे, भ्रमणध्वनी-८३०८१५५०८६

(लेखक धर्म,इतिहास व साहित्य यांचे अभ्यासक आहेत)

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com