Saturday, May 11, 2024
Homeब्लॉगबंकर हिलवरून दिसलेला बोस्टनचा विजय

बंकर हिलवरून दिसलेला बोस्टनचा विजय

जनरल म्हणून जॉर्ज वॉशिंग्टन यांनी ३ जुलै १७७५ ला अमेरिकन क्रांतीसेनेचे नेतृत्व स्वीकारले. जगावर राज्य करणा-या ब्रिटिश साम्राज्याची सेना आणि रॉयल नेव्ही यांच्यासमोर वॉशिंग्टन यांची सेना म्हणजे १६००० शेतक-यांचा जमाव. कोणतेही सैनिकी प्रशिक्षण नसलेले, हे अमेरिकन शेतकरी म्हणजे स्वांतत्र्याची तीव्र आस मनात घेऊन, ”सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिले में है देखना है की जोर कितना बाजू -ए- कातिल में है’ अशा आवेशाने शस्त्र घेऊन निघालेली दिवानो की टोली.

त्यांचा सरसेनापती जॉर्ज वॉशिंग्टन म्हणजे सर्वात मोठा दिवाना म्हणावा लागेल. मॅसेच्युसेटस् प्रांतातील कॅब्रिजमध्ये त्यांनी बोस्टनजवळ जमेलेल्या जमावच्या जनरल पदाचा पदभार स्वीकारला. त्यानंतर पेनासिल्वेनिया, मेरीलॅड आणि व्हर्जिनिया येथून आणखी ३००० रंगरुट येऊन त्यांच्या क्रांतीसेनेत सामील झाले. वॉशिंग्टन यांच्यासमोर अशा अप्रशिक्षित सैन्याचे प्रशिक्षण ही सर्वात मोठी समस्या होती. अशा सैन्याच्या भरोश्यावर इंग्रजांचा पराभव करण्याची योजना करणे म्हणजे ‘दिवा स्वप्न’ याची पूर्ण कल्पना वॉशिंग्टन यांना आली होती.

- Advertisement -

जाहीरनाम्यातील मेघगर्जना

अमेरिकन सैन्य आणि त्यातले ‘मिनिटमन’ म्हणजे अमेरिकेच्या विविध प्रांतातून उत्स्फूर्तपणे आलेले लोक. कोणतेही लष्करी प्रशिक्षण नाही, तसेच कोणतीही शिस्त नाही, गणवेश नाही आणि सगळयात महत्वाचे चांगली हत्यारे देखील नाही. हे सर्व पाहता ही सेनाच नव्हती आणि तीचा जनरल होता जॉर्ज वॉशिंग्टन. वेगवेगळया प्रांतातून, नाना जमातींमधून आणि वेगवेगळया सामाजिक व आर्थिक स्तरातून आलेल्या या सैन्यात कोणाचा पायपोस कोणात नव्हता. स्वातंत्र्य आणि राष्ट्रप्रेम हा एक समान धागा मात्र त्यांच्यात होता. अशावेळी बचावात्मक पवित्रा घेणे जेवढे महत्वाचे होते, तेवढेच आपण लढत आहोत. हा सैन्याचा आणि जनतेचा जोश ही कायम ठेवणे देखील आवश्यक होते. पहिला विजय आणि पर्याप्त अवधी मिळवणे हया दोन्ही एकाच वेळी साधण्याचे आव्हान वॉशिंग्टन यांच्यासमोर उभे ठाकले. तसेच सरसेनापती म्हणून स्वतःची योग्यता सिद्ध करणे देखील आवश्यक होते.

वॉशिंग्टन यांनी सर्वप्रथम १३ ठाणी किंवा किल्ले आणि आजूबाजूच्या प्रदेशाची सुरक्षिता मजबूत करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सैन्यावर नियंत्रण मिळवण्यात त्यांना म्हणाव तसे यश मिळाले नव्हते. मात्र ठाणी अथवा किल्ले यांचे महत्व अधोरेखित करणारी घटना त्यावेळी बोस्टनमध्ये घडली होती. बोस्टनमधील ब्रिटिश सैन्याला बाहेर काढायाचे असले, तर बोस्टनजवळील कोणत्याही एका पहाडाचा किल्ल्याप्रमाणे वापर करावा लागणार होता. उंचावरून ब्रिटिश सैन्यावर गोळीबार करणे सर्वार्थाने सोयीस्कर होते. यामध्ये अप्रशिक्षित आणि संख्येने कमी सैन्याचा सुयोग्य वापर करता येणार होता.

रॉयल नेव्हीच्या वेढयातील न्यूयॉर्क

वॉशिंग्टन बोस्टनला पोहचण्यापूर्वी कर्नल विल्यम प्रेस्कॉट याच्या नेतृत्वात अमेरिकन क्रांतीसेनने चार्ल्सटाऊन येथील बंकर हिल व ब्रिडस हिलच्या टेकडयांवर हा प्रयोग करून पाहिला. कर्नल विल्यम प्रेस्कॉटच्या हालचाली लक्षात आल्यानंतर बोस्टनचा गर्व्हनर गेज याने प्रेस्कॉटच्या सैन्याला या टेकडयांवरून पळवून लावण्याचा निर्णय घेतला. जनरल गेजने दोन वेळा बंकर हिल व ब्रिडस हिलच्या टेकडयांवर हल्ला चढवला. अमेरिकन सैन्य उंचावर असल्याने त्याने गेजच्या सैन्याचा दोन्ही वेळा पराभव केला. जनरल गेज देखील लगेच हार खाणारा सेनापती नव्हता, त्याने पुन्हा तिसरा हल्ला करण्याच्या निर्णय घेतला. तिस-या वेळी मात्र अमेरिकन क्रांतीसेनेचा दारूगोळा संपल्यामुळे कर्नल विल्यम प्रेस्कॉटला सैन्यासह माघार घ्यावी लागली. ही लढाई झाली तो दिवस होता, १७ जून १७७५. हया तीनही लढाया प्रामुख्याने ‘ब्रिडस हिल’ वर लढण्यात आल्या होत्या, तरी इतिहासात त्यांची नोंद ‘बंकर हिल’ ची लढाई म्हणून झाली.

इतिहासात असे किस्से अनेकवेळा घडतात शौर्य दाखवणार व्यक्ती वेगळा असतो आणि काही कारणांमुळे इतिहासात नोंद दुस-याची होते. तसेच एखादी घटना जेथे घडते त्याच्या शेजारच्या स्थळाला महत्व प्राप्त होते. ब्रिडस हिलच्या नशिबात असेच काही तरी होते. त्यामुळे लढाईचे श्रेय बंकर हिलला मिळाले. बंकर हिलच्या लढाईत दारूगोळया अभावी अमेरिकन क्रांतीसेनला माघार घ्यावी लागली असली,तरी तिचा आत्मविश्वास वृद्धिंगत झाला रसद आणि शस्त्र-दारूगोळा यांची कुमक यांच्या अभावी जनरल जॉर्ज वॉशिंग्टन यांना शांत बसून प्रतिक्षा करावी लागली. लवकरच रसद व कुमक प्राप्त झाली. त्यामुळे इथान अॅलन आणि सेठ वार्नर या दोन अमेरिकन सेनांनी ब्रिटिशांना पराभूत करत चॅम्पलेन सरोवराच्या काठी असलेले टिकॉडरोगा आणि क्रॉऊन प्वॉईंट हे दोन किल्ले ताब्यात घेतले. त्यामुळे मोठया प्रमाणात गोळा-बारूद आणि काही तोफा त्यांच्या हाती लागल्या. ही सर्व लूट बोस्टनला रवाना करण्यात आली परिस्थितीचा नेमका लाभ जनरल जॉर्ज वॉशिंग्टन यांनी उठवला.

कागदाने अमेरिका पेटवला…

१७७६ च्या मार्च महिन्यात बोस्टनच्या दक्षिणेस असलेल्या डॉरचेस्टर डोंगरावर क्रांतीसेनेचे ठाणे निर्माण केले दरम्यान बोस्टनचा गर्व्हनर गेजच्या जागी जनरल होवे ब्रिटिश सैन्याचा सरसेनापती म्हणून दाखल झालेला होता. बोस्टन अमेरिकन क्रांतीचे मुख्य केंद्र असल्यामुळे जनरल होवे आणि त्याचा बंधू ॲडमिरल होवे यांनी बोस्टनमध्येच तळ ठोकला होता. बोस्टन शहर ब्रिटिश साम्राज्य आणि अमेरिकन क्रांतीसेना दोन्हींच्या प्रतिष्ठेचा प्रश्न झाला होता. अमेरिकन स्वातंत्र्याची चळवळ याच बॉस्टनच्या मातीत जन्माला आली होती. प्रारंभी बोस्टन चिरडले कि सर्व शांत होईल. असा कयास ब्रिटनने केला होता. त्यामुळे बोस्टनचा विजय अथवा पराभव संपूर्ण युद्धाला नवे परिमाण देणारा ठरणार होता. जनरल जॉर्ज वॉशिंग्टनची क्रांतीसेना आणि जनरल होवेच्या ब्रिटिश सेना डॉरचेस्टरच्या रणभूमीवर एकमेकांसमोर उभे ठाकले. तुबंळ लढाई झाली. क्रांतीसेनच्या वीरांनी अद्भूत शौर्याचा व पराक्रमाचा परिचय देत,ब्रिटिश सैन्याला धूळ चारली. घाबरलेल्या जनरल होवेने रणभूमीवरूनच नव्हे तर बोस्टन शहरातूनही पळ काढला. सरसेनापती जॉर्ज वॉशिंग्टन आणि त्यांच्या क्रांतीसेनेचा हा पहिला निर्णायक विजय होता. सर्वात महत्वाचे त्यांनी बोस्टन जिंकले होते.

बोस्टनचा विजय क्रांतीसेनेला नवसंजिवनी देण्यासाठी आणि अमेरिकन जनतेची अस्मिता-अभिमान फुलवण्यासाठी अत्यंत आवश्यक होता. सरसेनापती म्हणून संपूर्ण सैन्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी वॉशिंग्टन यांना देखील पहिल्या विजयाची नितांत आवश्यता होती. जनरल होवेचे बोस्टन सोडून पळणे म्हणजे जीव मुठीत धरून पळण्यासारख होते. तो आणि त्याचे ९०० सैनिक बोस्टन बंदरात उभया असलेल्या युद्धपोतांमध्ये बसून अक्षरशः धूम ठोकून पळाले आणि हॅलीफॅक्सला पोहचले. वॉशिंग्टन अमेरिकन क्रांतीमध्ये सरसेनापती म्हणून त्यांचा पहिला विजय नोंदवत असातांना ब्रिटनमध्ये हालचालींना वेग आला होता. ज्याचा प्रतिकुल परिणाम अमेरिकन जनमानसावर झाला. ब्रिटनचा सम्राट जॉर्ज तृतीय आणि त्याचे दरबारी यांनी अमेरिकन जनतेच्या भावना मनावर काय तर कानावर देखील घेतल्या नाही. कॉन्टिनेंटल काँग्रेसचे मानवतापूर्ण आणि समानतेची मागणी करणारे अंतिम निवेदन सम्राटासमोर मांडण्यात येणारच होते,त्याचवेळी त्याने अमेरिकन जनतेचा कायमचा बंदोबस्त करण्याचा ठराव मान्य केला.

ते २० काळे लोक…

अमेरिकेत आणीबाणी घोषित करण्यात आली. क्रांतीचे नेते व क्रांतीसेनेच सैनिक यांना अमेरिकन जनतेने पकडून न्यायव्यवस्थेच्या स्वाधीन करावे आणि प्रशासनाला सहकार्य करावे,असा आदेश देण्यात आला. क्रांतीत सहभागी असणा-या प्रत्येकाला कठोर दंडा करण्यात येईल अशी धमकी देण्यात आली. सम्राटाच्या आदेशातील शेवटचे वाक्य अत्यंत हास्यास्पद होते. तत्कालीन जगातील सर्वशक्तीमान व्यक्ती म्हणजे ब्रिटनचा सम्राट. असे असले तरी आदेशातील शेवटच्या वाक्य होते,’सम्राटाचे रक्षण परमेश्वर करो !’ त्याचवेळी ब्रिटिश संसदेने एक कायदा मंजूर करून अमेरिकेवर व्यापारी निर्बंध लादले आणि कोणत्याही प्रकारच्या आदान-प्रदान व संपर्कावर प्रतिबंध आणले.

आपलेच बांधव आपल्याला अशी वागणूक देत आहे, ही गोष्ट अमेरिकन लोकांच्या मनाला खोलवर जखम करून गेली. त्यामुळे कॉन्टिनेंटल काँग्रेससमोर युद्धाशिवाय कोणता पर्याय उरला नाही. तसेच अमेरिकेविरुद्ध लढण्यास ब्रिटिश सरकारने चालवलेल्या सैन्य भरतीला इंग्लंड, स्कॉटलंड आणि आयरलंडच्या जनतेने नाकारले. त्यामुळे सरकारने जर्मनीतील हेस कॅसिलच्या जमिनदाराकडून भाडोत्री सैन्य घेतले. आपल्याच मातृभूमीने आपल्याविरुद्ध लढण्यासाठी परक्या देशातील सैन्य भाडोत्री नेमावे ही अमेरिकेच्या दुःखाची व अपमानाची ही पराकाष्ठा होती. शांतता,संवाद व समझौता यांचे सर्व मार्ग मस्तवाल सत्ताधीशांनी बंद केले होते. त्यातच जनरल जॉर्ज वॉशिंग्टन यांच्या बोस्टनच्या विजयाने अमेरिकन जनता नव्या दमाने आणि अमर्याद आत्मविश्वाने संपूर्ण स्वातंत्र्यासाठी त्वेषाने पेटून उठली.

_प्रा.डॉ.राहुल हांडे, ८३०८१५५०८६

(लेखक धर्म,इतिहास व साहित्य यांचे अभ्यासक आहेत)

- Advertisment -

ताज्या बातम्या