Monday, April 29, 2024
Homeब्लॉगध्वज विजयाचा उंच धरा रे !

ध्वज विजयाचा उंच धरा रे !

यॉर्क टाऊनच्या चेसापीक उपसागरात फ्रेंच नौदलाने रॉयल नेव्हीला पाणी पाजले. त्याच्यवेळी एका उमदया तरूणाच्या नेतृत्वात अमेरिकन क्रांती सेनेने जमिनीवरील युद्धात धूळ चारली. १४ ऑक्टोबर १७८१ रोजी रात्रीच्या किर्र अंधारात ब्रिटिशांच्या छावणीवर हल्ला करण्याची योजना आखली गेली. त्याचवेळेस फ्रेंच सेना दुस-या एका ब्रिटिश छावणीवर चढाई करण्याच्या प्रयत्नात होता अमेरिकन क्रांती सेनेची कमान असलेला युवा सेनानायक अत्यंत कल्पक होता. त्याने ब्रिटिशांच्या छावणी नजीक पोहचल्यावर आपल्या सैन्याला बंदूकीतल्या गोळया काढून घेण्याचा आणि बंदूकांवर संगीन चढवण्याचा आदेश दिला.

अनावधानाने एकही गोळी सुटल्यास मोठा अनर्थ होण्याची शक्यता होती. अमेरिकन क्रांती सेनेच्या नायकाकडे बलाढय ब्रिटिश सेनेशी लढण्यासाठी केवळ चारशे सैनिक होते. तसेच त्याने ही जबाबदारी सरसेनापती जॉर्ज वॉशिंग्टन यांच्याकडे हट्ट धरून मिळवली होती. त्यामुळे रणकौशल्याची चमक दाखवणे आणि विजय खेचून आणणे त्याच्यासाठी अत्यंत महत्वाचे होते. यावरच त्याच्या भावी कारकीर्दीचा पाया रचला जाणार होता. हा सेनानायक आपल्या अवघ्या चारशे सैनिकांच्या तुकडीला घेऊन अत्यंत सावधपणे ब्रिटिश छावणीजवळ पोहचला. ब्रिटिश सैन्याने छावणीला भले उंच लाकडी कुंपण घालून किल्ल्याचे स्वरूप दिले होते. योजनेनुसार लाकडी कुंपण कु-हाडींनी तोडून,आत प्रवेश मिळवायचा होता.

- Advertisement -

नव्या रक्ताचा सेनानायक आणि स्वातंत्र्याची दुर्दम्य आस लागलेली सेना. अशा मिश्रणामुळे लाकडी कुंपणाजवळ पोहचल्यावर ते तोडत बसण्याचा धीर कोणालाच धरता आला नाही. ब्रिटिशांच्या पराभवासाठी आतुर क्रांती सैनिकांनी लाकडी भिंतीजवळ पोहचताच एकमेकांच्या खांदयावर चढून भिंतीचा अडथळा पार केला. त्याचवेळेस न्यूयॉर्कमध्ये असलेल्या ब्रिटिश सैन्यात सणाचा उत्साह ओसांडून वाहत होता. ब्रिटनचा सम्राट किंग जॉर्ज याचा १६ वर्षाचा मुलगा ‘प्रिन्स विल्यम’ न्यूयॉर्कला भेट देण्यासाठी आलेला होता. मदिरेच्या पूरात,मेजवान्यांच्या आयोजनात आणि मदिराक्षिंच्या नाचात युद्धाचे गांभीर्य वाहून गेले होते. न्यूयॉर्कमध्ये अशी मोजमजा चालली असतांना क्रांती सेनेच्या विरोधात प्रत्यक्ष रणभूमीवर असलेल्या ब्रिटिश सैन्याची उपासमार सुरू होती. संख्येने अधिक असले तरी लढण्याचे अवसान ब्रिटिश सैन्यात उरले नव्हते.

ब्रिटनचा प्रिन्स न्यूयॉर्कमध्ये रंग उधळत असतांना, कोलंबिया विद्यापीठाचा विद्यार्थी असलेला एक २४ वर्षाचा युवक यॉर्क टाऊनमध्ये ब्रिटिश सैन्याला धूळ चारण्यासाठी सेनानायक म्हणून चारशे सैनिकांसह जीवाची बाजी लावून निघाला होता. त्याचे नाव होते ॲलेक्झांडर हॅमिल्टन. एका युद्धात हॅमिल्टनचा पराक्रम आणि त्याचे कौशल्य वॉशिंग्टन यांनी हेरले. त्यांनी त्याला आपला स्वीय सचिव म्हणून नियुक्त केले. हॅमिल्टनवर वॉशिंग्टन यांचे पुत्रवत प्रेम जडले. संपूर्ण युद्धकाळात तो त्यांचा स्वीय सचिव होता. तरूण रक्ताच्या हॅमिल्टनला स्वीय सचिव म्हणून आपण सदैव कारकुनी काम करत रहाणे सहन होत नव्हते. प्रत्यक्ष युद्धात सहभागी होऊन कर्तबगारी आणि मर्दुमकी दाखवण्यासाठी तो अधिर झाला होता.

अखेर त्याने वॉशिंग्टन यांच्याशी भांडून प्रत्यक्ष लढाईत भाग घेऊ देण्याचा हट्ट धरला. त्यामुळे वॉशिंग्टन यांनी यॉर्क टाऊनजवळील ब्रिटिश तळ काबीज करण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपविली. हॅमिल्टन आणि त्याचे चारशे लढवय्ये लाकडी भिंत पार करून ब्रिटिश छावणीत दाखल झाले. कोणताही आवाज न करता अचानक छावणीत अवतरलेल्या क्रांती सेनेला बघून ब्रिटिश सैन्याची भंबेरी उडाली. काय झाले? आणि काय करावे? हे समजण्या पूर्वीच ब्रिटिश सैन्य गारद झाले. हॅमिल्टनच्या नेतृत्वात गनिमी काव्याचा वापर करत अमेरिकन क्रांती सेनेच्या छोटयाशा तुकडीने बलाढय ब्रिटिश सैन्याला पराभूत केले होते. त्याचवेळेस फ्रेंच सैन्याने ब्रिटिशांच्या दुस-या छावणीवर विजय प्राप्त केला होता.

हॅमिल्टनप्रमाणे अनेक अमेरिकन युवकांनी क्रांतीमध्ये आपल्या शौर्यातून,प्रतिभेतून आणि कल्पकतेतून योगदान दिलेले दिसते. तसेच सरसेनापती जॉर्ज वॉशिंग्टन यांनी अशा तरूणांना सदैव संधी देऊन, नव्याने जन्माला येणा-या अमेरिकेत युवा गुणवतांना संधी देणाऱ्या स्थायी भावाच्या निर्मितीत योगदान दिले. बोस्टनमधील एक पुस्तक विकेता युवक होता. हा युवक स्फोटके आणि दारूगोळयातील एक विशेषज्ञ देखील होता. त्याने क्रांती युद्धात सहभागी होऊन अत्यंत महत्वाचे योगदान दिले. भविष्यात हाच तरूण म्हणजे ‘हेन्री नॉक्स’ अमेरिकेचा पहिला संरक्षण मंत्री झाला. कनेक्टिच्या एका सामान्य शेतक-याचा मुलगा असलेला प्लंब मार्टिन. या धडाडीच्या तरूणाने स्वातंत्र्ययुद्धात महत्वाची भूमिका पार पाडली.

जल आणि थल अशा दोन्ही स्तरावर पराभूत ब्रिटिश सरसेनापती लॉर्ड कार्नवालिस याने १९ ऑक्टोबर १७८१ रोजी दुपारी दोन वाजता आपल्या हतबल आणि मरणासन्न ८४०० सैनिकांसह अमेरिकन क्रांती सेनेसमोर शरणागती स्वीकारली. असे असले तरी त्याच्यातील ब्रिटिश माज आणि अक्कड संपली नव्हती. युद्ध समाप्ती आणि शरणागतीच्या समारंभाला कार्नवालिस स्वतः हजर न रहाता,त्याने आपल्या एका कनिष्ठ अधिका-यावर ही जबाबदारी सोपवली. तो कनिष्ठ अधिकारी देखील ब्रिटिशच होता. त्याने आपण जॉर्ज वॉशिंग्टन यांच्यासमोर शरणागती पत्कारण्याऐवजी फ्रेंच सेनापती रोशांबेउ यांच्यासमोर शरणागती पत्कारू, अशी अट घातली. रोशांबेउ याने मात्र त्याची अट मान्य केली नाही आणि त्याला जॉर्ज वॉशिंग्टन यांच्यासमोरच शरणागती पत्कारावी लागेल असे स्पष्ट सुनावले.

अमेरिका आणि फ्रांस यांच्यातील युद्धकालीन अभेद्य युती यामधुन दिसून येते. यानंतर वर्षभर ब्रिटिशांनी आपला सुंभ जळाला; परंतु पीळ गेला नाही. अशा प्रवृत्तीचे दर्शन वेळोवळी घडवत काही किरकोळ प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. अखेर ३० सप्टेंबर १७८३ रोजी तहनाम्यावर शिक्कामोर्तब झाले. हा तह होण्यातही अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या. इंग्लंड आणि अमेरिकेतील तहाच्या बोलणीसाठी अमेरिकन काँग्रेसकडून पाच कमिशनर नियुक्त करण्यात आले. त्यामध्ये बेंजामिन फ्रँकलिन आणि जॉन जे यांचे योगदान महत्वाचे होते. जॉन ॲडम यावेळी हेग येथे डचांशी वार्ता करत होते तर जॉन जे माद्रिदमध्ये स्पेनला समजवण्याचा प्रयत्न करत होता. अखेर इंग्लंडशी बोलणी करण्याचा संपूर्ण भार बेंजामिन फ्रँकलिन यांच्यावर येऊन पडला. पॅरिसमध्ये तहाची बोलणी होणार होती. ब्रिटिश प्रतिनधी म्हणून स्कॉचचा व्यापारी असणारे ऑस्वल्ड नावाचे गृहस्थ काम पाहत होते.

ऑस्वल्ड आणि फ्रँकलिन यांची जुनी मैत्री होती,तसेच त्याच्या व्यापारामुळे अमेरिकेशी त्याचे जुने आर्थिक हितसंबंध होते. त्यामुळे या दोघांच्या वाटाघाटींमध्ये फारसे अडथळे आले नाही. आढेवेढे घेणा-या स्पेनची समजूत घालून जॉन ॲडम जेंव्हा पॅरिसला पोहचले तेंव्हा तहाची बोलणी पूर्ण झालेली होती. मात्र आत एक नवा पेच निर्माण झाला. स्वातंत्र्ययुद्धात अमेरिकेचा सर्वात पक्का मित्र फ्रांस तहाच्या वाटाघाटीत त्याचा सर्वात मोठा वैरी ठरला. फ्रांसचा सम्राट सोळावा लुई याचा कारभार पाहणारा वर्गनेस याने अमेरिकेला अत्यंत अडचणीत आणणा-या अटी घातल्या. दुस-या बाजूला अमेरिकन काँग्रेसने तहाची बोलणी करतांना वर्गनेसची सहमती आणि सल्ला घेतल्याशिवाय काही करायचे नाही. असा आदेश आपल्या कमिशनरांना दिला होता. फ्रांसचे सहकार्य मिळाले नसते, तर ब्रिटिशांनी अमेरिकन क्रांतीला सहज चिरडून टाकले असते. हे वास्तव नाकारता येत नाही. त्यामुळे फ्रांसने आता आपल्या सहकार्याची पुरेपुर किंमत वसूल करण्याची योजना आखली होती. वर्गनेसने अत्यंत चाणाक्षपणे खेळी खेळण्यास सुरवात केली. त्याला तहात अशी काही कलमे हवी होती की ज्यामुळे भविष्यात असे वाटले पाहिजे की अमेरिकेला स्वातंत्र्य फ्रांसनेच दान म्हणून दिले आहे.

अमेरिकन नेत्यांना आणि जनतेला हे कदापि सहन होणारे नव्हते. अमेरिकेचे उज्ज्वल भविष्य त्याच्या पश्चिम भागवर अवलंबून होते. तो हस्तगत करण्यासाठी वर्गनेसने दुसरा डाव टाकला. या भागासाठी स्पेन देखील इच्छुक होता. अमेरिका हा भाग कोणत्याही शर्तीवर हा भाग गमवण्यास तयार नव्हता,कारण त्याचा भावी विकास या भागातूनच मार्गस्थ होणार होता. त्यामुळे बेंजामिन फ्रँकलिन,जॉन ॲडम व जॉन जे यांनी त्याला स्पष्ट नकार दिला. फ्रांस आणि स्पेन यांची चाल पाहून इंग्लंडने संधी साधली. इंग्लंडने अमेरिकेच्या पश्चिम भागावर अमेरिकेचे स्वामित्व मान्य केले. त्यामुळे तहाचे चित्र पालटून गेले. यामुळे शत्रु मित्र झाला आणि मित्र शत्रु झाला. हे घडवून आणण्यात बेंजामिन फ्रँकलिन यांचा मित्र व इंग्लंडचे प्रतिनिधी ऑस्वल्ड यांनी अत्यंत महत्वाची आणि नेमकी भूमिका पार पाडली. बेंजामिन फ्रँकलिन,जॉन ॲडम व जॉन जे यांनी देखील अत्यंत चाणाक्षपणे अमेरिकन काँग्रेसचा आदेश गुंडाळून ठेवला आणि इंग्लंडशी अंतर्गत हातमिळवणी केली. अखेर इंग्लंडनेच अमेरिकेचे मित्रत्व पत्कारल्याने फ्रांस व स्पेन यांचा नाईलाज झाला. वर्गनेसचे सर्व डाव उलटले आणि तहावर शिक्कामोर्तब झाले. एक विजेता आणि स्वतंत्र राष्ट्र म्हणून जगाच्या भौगोलिक व ऐतिहासिक क्षितीजावर अमेरिेकेचा उदय झाला.

- Advertisment -

ताज्या बातम्या