Friday, April 26, 2024
Homeब्लॉगस्पंदन : ‘टीस’मधील ते दोन वर्षे...

स्पंदन : ‘टीस’मधील ते दोन वर्षे…

मुंबईच्या सुविख्यात टाटा सामाजिक विज्ञान संस्था अर्थात Tata Institute of Social Sciences (TISS/ टीस) इथं मी माझं पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण केल्याचा संदर्भ मागील ‘स्पंदन’ मध्ये येऊन गेला. १९९२ ते १९९४ ही दोन वर्षे माझ्या आयुष्यातली खूप महत्वपूर्ण ठरलीत. देशाच्या आणि राज्याच्याही पातळीवर ह्या दोन वर्षांत खूप महत्वाच्या घटना घडल्या. बाबरी मस्जिदचे पतन, मुंबईत झालेले बॉम्बस्फोट, त्यानंतर उसळलेल्या दोन दंगली, उस्मानाबाद-लातूर जिल्ह्यात झालेला भीषण भूकंप आणि औरंगाबादच्या मराठवाडा विद्यापीठाचा झालेला नामविस्तार इत्यादी घटना दूरगामी परिणाम करणाऱ्या ठरल्या. याच काळात आपल्या केंद्र सरकारने उदारीकरणाचे धोरण स्वीकारून जागतिकीकरणाची प्रक्रिया गतिमान केली. कोकण रेल्वे मार्गावर पहिली प्रवासी गाडी देखील याच दरम्यान धावली. अशा सर्व ठळक घटना आणि घडामोडींनी ओतप्रोत भरलेली ही दोन वर्षे होती. हिंदी सिनेदुनियेतला किंग खान शाहरुखचा पहिला सुपरहिट चित्रपट ‘दीवाना’ याच सुमारास म्हणजे १९९२ मध्ये प्रदर्शित झाला होता. आपल्या सौदर्य नि अभिनयाने अल्पावधीतच ठसा उमटवणाऱ्या दिव्या भारती या हिंदी आणि तेलुगु सिने अभिनेत्रीचा संशयास्पद मृत्यू १९९३ मध्ये झाला. तिचं वय अवघं १९ वर्षे होतं. तिच्या अकाली जाण्याने असंख्य चित्ररसिकांना धक्का बसला होता.

इतक्या घटना-घडामोडींचा सामना करत, त्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सोसत पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करताना प्रचंड कसरत करायला लागली. हिंदू-मुस्लीम दंगली झाल्यानंतर माझं मुंबईच्या नागपाडा परिसरातले फिल्ड वर्कचे ठिकाण ( नागपाडा नेबरहूड हाऊस) बदलण्यात आलं. नागपाडा हा मुस्लीम बहुल परिसर. इथून मला चेंबूर जवळच्या शिवाजी नगर-गोवंडी परिसरात फिल्ड वर्क साठी जायला लागलं. या ठिकाणी ‘अपनालय’ नावाच्या स्वयंसेवी संस्थेत. ह्या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये सचिन तेंडुलकरच्या सासूबाई होत्या. ही माहिती मला नंतर मिळाली. या परिसर देखील मुस्लीम बहुलच होता. पण याठिकाणी फिल्ड वर्क करताना कोणत्याही अडचणी आल्या नाहीत. याचं कारण म्हणजे या परिसरात ‘अपनालय’ने इथल्या रहिवाशांशी विश्वास नि सौहार्दाचे संबंध प्रस्थापित केले होते. हा संपूर्ण परिसर झोपडपट्टीचा. लोकं अत्यंत दयनीय अवस्थेत राहत. अठरा विश्व दारिद्रय म्हणजे काय याचा प्रत्यय इथल्या लोकांचं जगणं बघून यायचा. मूलभूत सोयी-सुविधांचा अभाव, घाणीचे साम्राज्य, अस्वच्छता, अत्यंत निमुळत्या पायवाटा अशा अत्यंत विपन्नावस्थेत लोकं इथं राहत होते. दंगली दरम्यान त्यांना आलेले अनुभव अंगावर शहारे आणणारे होते.

- Advertisement -

बाबरी मस्जिद पडल्यानंतर परिस्थितीत फार बदल झाले. आमचं फिल्ड वर्क काही आठवड्यांसाठी स्थगित करण्यात आलं. मुंबई शहरात संचारबंदी लागू झाल्याने जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुद्धा मर्यादित झाला. होस्टेल मध्ये भीती-ताण-तणावाचे वातावरण निर्माण झालं. विद्यार्थी आपापल्या प्रदेशातल्या मुलांसमवेत जास्त राहू लागले. ही एक नैसर्गिक प्रतिक्रिया होती. या निमित्ताने, दिल्लीत वास्तव्याला असलेल्या पण मराठी मातृभाषक एक-दोन सिनिअर विद्यार्थ्यांचा परिचय झाला. घरून शिकायला येणाऱ्या विद्यार्थांना होस्टेलमध्ये राहण्याची परवानगी देण्यात आली होती. त्या काळात आजच्यासारखे मोबाईल फोन उपलब्ध नव्हते. त्यामुळे घरी आई-वडिलांना आम्ही इथे सुखरूप आहोत असं कळवण्यासाठी ‘टीस’ने फोन लावण्याची व्यवस्था केली. तेव्हा दूरचित्रवाहिन्यांचा सुळसुळाट नव्हता. बातम्या जाणून घेण्याचे महत्वाचे साधन म्हणजे रेडीओ आणि दूरदर्शन होते. या काळातही आमच्या ग्रंथालयात /होस्टेलमध्ये वर्तमानपत्रे न चुकता यायची. वृत्तपत्रे वाचून शहरातल्या परिस्थितीचा अंदाज यायचा. एक सर्वस्वी वेगळ्या प्रकारचा अनुभव आम्ही घेतला. होस्टेल चे व्यवस्थापक आणि वार्डन यांनी सर्व विद्यार्थ्यांची पुरेपूर काळजी घेतली. शिवाय ‘टीस’चे संचालक, विभाग प्रमुख आणि कॅम्पसमध्ये राहणारे प्राध्यापक वेळोवेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधून धीर देत होते.

पहिल्या वर्षी आमच्या batch च्या विद्यार्थ्यांनी बाबरी मस्जिद पाडण्याची घटना अनुभवली. त्यानंतर बॉम्बस्फोट झाले. ज्या दिवशी मुंबईत बॉम्बस्फोट झालेत त्या दिवशी मी फिल्डवर्क साठी नागपाडा परिसरात होतो. दुपारी चार नंतर काम आटोपल्याने मी मुंबई सेन्ट्रल परिसरातून शहरबसने (बेस्ट) ‘टीस’ मध्ये यायला निघालो. या दिवशी मला इथून थेट ‘टीस’ पर्यंत जाणारी बस मिळाली होती. नागपाडा ते ‘टीस’ हे अंतर जास्त असल्याने थेट बस कधीतरीच मिळायची. एरवी दादरहून दुसरी बस घ्यायला लागायची. कॅम्पसमध्ये पोहचल्याबरोबर मुंबईत बॉम्बस्फोट झाल्याची बातमी समजली. मुंबई सेन्ट्रल परिसरात देखील बॉम्बस्फोट झाल्याचं समजलं नि अंगावर काटा आला. आपण थोडक्यात बचावलो याची जाणीव झाली. लगेचच समोरच्या STD बूथवर धाव घेऊन घरी सुखरूप असल्याचं सांगितलं. इथंही रांग लागली असल्याने बराच वेळ वाट पाहावी लागली.

१९९३ ची अनंत चतुर्दशीची रात्र. आमची टर्म एन्ड परीक्षा सुरु होती. त्यामुळे मी आणि माझा रुममेट आम्ही दोघे रात्रभर अभ्यास करायचो. पहाटेचा सुमार. साधारणतः चार वाजत आले असावेत. तेवढ्यात आमच्या रुममधले गोदरेजचे कपाट जोरात हलायला लागले. रूम पार्टनर म्हटला कपाट कशाला हलवत आहेस? पण लागलीच त्याच्या लक्षात आलं की मी खुर्चीवर बसलोय आणि कपाट आपोपाप हालतय. काही सेकंदात हे थांबलं. आम्ही दोघे रुमच्या बाहेर आलो. अजून एक विद्यार्थी बाहेर आला नि त्याने पण सांगितलं की त्याचाही कॉट हलत होता. तेव्हा आम्ही कयास केला की भूकंप झाला आहे. यातच सकाळचे सहा कधी वाजले ते कळलंचं नाही. ट्रांझिस्टर सुरु करून बातम्या ऐकू लागलो. महाराष्ट्रच्या लातूर आणि उसमानाबाद जिल्ह्यात तीव्र भूकंप आल्याची पहिलीच बातमी कानावर पडली.

‘टीस’ मध्ये संचालक आणि इतरांची आपत्कालीन बैठक झाली. यात तेव्हा सुरु असलेल्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी एक टीम जाणार असल्याचेही समजलं. राज्य सरकार सोबत देखील ‘टीस’ ची बोलणी सुरु झाली. काही दिवसांनी महाराष्ट्र सरकारने भूकंपाने झालेल्या सर्व प्रकारच्या नुकसानीचे सर्वेक्षण करण्यासाठी ‘टीस’ची निवड केली. या सर्वेक्षणावर आधारित पुनर्वसन करण्यात येईल असं सरकारकडून जाहीर करण्यात आलं. आमच्या हिवाळी सुट्या कमी करून सर्वेक्षण करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या अनेक टिम करण्यात आल्या. प्रत्येक टिम १० दिवस काम करून ‘टीस’ मध्ये परतेल असं नियोजन करण्यात आलं. ‘टीस’ चा रुरल कॅम्पस तुळजापूर इथं असल्याने तिथं एक मोठे मंगल कार्यालय भाड्याने घेऊन सर्वेक्षण करण्यात आलं. या निमित्ताने मला लातूरच्या ‘किल्लारी’ आणि उसमानाबादच्या ‘सास्तूर’ या दोन भूकंपाचे केंद्रबिंदू असलेल्या गावांना (आणि इतरही काही गावांना) भेटी देता आल्या.

पदव्युत्तर पदवीच्या दुसऱ्या वर्षात फिल्ड वर्क साठी मी डोंगरी इथल्या निरीक्षण गृहात जात असे. चार जानेवारी १९९४. मी लंच ब्रेक मध्ये निरीक्षणगृहाच्या बाहेर पडलो. तेव्हा मुंबईत प्रतिष्ठीत दैनिकांची सायंदैनिकेही प्रकाशित व्हायची. हिंदी सिनेदुनियेतला प्रतिभावंत संगीतकार राहुलदेव उर्फ आर.डी. बर्मन जग सोडून गेल्याची बातमी समजली नि फार हळहळ वाटली. आवडता संगीतकार अकाली गेल्याचं फार दु:ख झालं. या वर्षीची परीक्षा मार्च मध्ये पार पडून आम्ही सर्व विद्यार्थी एक महिन्याच्या ‘ब्लॉक प्लेसमेंट’ करिता मुंबईबाहेर पडलो. मी यासाठी हैद्राबाद इथल्या कारागृहाची निवड केली होती. एप्रिलच्या रणरणत्या उन्हात मी हैद्राबादसारख्या उष्ण शहरात एक महिना काढला. उन्हापेक्षाही इथल्या जेवणाने फार त्रास दिला. रोज दोन्हीवेळा भात खाऊन कंटाळलो होतो. मग इथलं एक महाराष्ट्रीयन हॉटेल शोधून काढलं. तिथे जाऊन भरपेट जेवलो. हॉटेल मालक अर्थातच मराठी होते. त्यांना ओळख दिली. पण आडनाव ऐकून ते फार आपुलकीने बोलले नाहीत. पण तरीही मी जिभेच्या गरजेपोटी याच हॉटेलात पुन्हा एकदा गेलो, ते पुरणपोळी खाण्यासाठी!

एक महिन्याचे ‘ब्लॉक प्लेसमेंट’ संपून मुंबईला परतलो. १० मे १९९४ रोजी ‘टीस’चा पदवी प्रदान सोहळा संपन्न झाला. माझं ‘टीस’ मधलं दोन वर्षाचं वास्तव्य संपुष्टात आलं. या दोन वर्षात खूप काही शिकायला मिळालं. अभ्यासाचं नि अभ्यासाबाहेरचंही ! भारतातल्या सर्व प्रांतातले विद्यार्थी भेटले. त्यांच्या चालीरीती, जीवनशैली यांचा परिचय झाला. या दोन वर्षांनी जे दिलं ते संपूर्ण आयुष्यभर पुरणारं आहे. असं म्हटलं जातं की ज्या व्यक्तीने ‘टीस’ मध्ये दोन वर्षे पूर्ण केलीत ती जगाच्या पाठीवर कोठेही समायोजन (adjustment) करू शकते. १९९२ ते १९९४ ही दोन शैक्षणिक वर्षे म्हणजे माझ्या जीवनाला अमूलाग्र कलाटणी देणारा कालखंड होय !

सहयोगी प्राध्यापक,

मानव्यविद्या व सामाजिक शास्त्रे विद्याशाखा,

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ,

नाशिक

मोबाईल : ९४०३७७४५३०

- Advertisment -

ताज्या बातम्या