स्पंदन : येशील येशील येशील राणी पहाटे पहाटे येशील…

jalgaon-digital
6 Min Read

डॉ. प्रवीण घोडेस्वार

अलीकडेच मराठी चित्रपट-नाट्य सृष्टीतले अभिनेते अविनाश खर्शीकर हे जग सोडून गेले. तसे ते फार लोकप्रिय कलाकार नव्हते. पण त्यांनी मराठी नाटक,चित्रपट आणि मालिका या तिन्ही प्रकारांत काम केलं आहे. ते ज्या काळात कार्यरत होते तेव्हा अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, प्रशांत दामले या कलाकारांची चलती होती.

साहजिकच विनोदी अभिनेते असलेल्या खर्शीकर यांना कितीशी संधी मिळणार! मला त्याचं नाटक पाहण्याची संधी नाही मिळाली. पण टीव्हीवर त्यांच्यावर चित्रित झालेली गाणी मी पाहिलीयेत. मी अकरावीत असताना त्यांचा एक मराठी चित्रपट आला होता. अर्थातच विनोदी. ‘पोरीची धमाल-बापाची कमाल’ हे त्या चित्रपटाचं नाव. दत्ता केशव यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. मी चित्रपट पहिला नाही. मात्र एका वेगळ्या कारणासाठी हा चित्रपट माझ्या स्मरणात आहे. ते कारण म्हणजे यातलं एक गाणं. ‘येशील येशील राणी पहाटे पहाटे येशील, तुझिया माझिया प्रेमाची पावती साखरचुंबन देशील…’ कविवर्य वसंत बापट यांची ही रचना संगीतकार यशवंत देव यांनी स्वरबद्ध केली आहे. हे सिनेमात युगल गीत आहे. याला रवींद्र साठे, उत्तरा केळकर आणि सहकाऱ्यांनी आवाज दिलाय. आपल्यापैकी अनेकांनी हे गाणं बऱ्याचदा ऐकलं असेल. पण थांबा मित्रांनो तुम्ही जे गाणं ऐकलं आहे ते अरुण दाते यांच्या आवाजातलं आहे.

यशवंत देवांनी दिला भावगीताचा स्वरसाज

सोलो गाणं. हो की नाही? तर मुळात सिनेमासाठी युगल गीत म्हणून लिहिलेलं हे गाणं नंतर भावगीत म्हणून ध्वनिमुद्रित करण्यात आलं. गाण्यातले पहिले कडवे कायम ठेवून उर्वरित कडवे कवी बापट यांनी नव्याने लिहिलीत. मूळ चाल तशीच ठेवून संगीतकार यशवंत देवांनी त्यास भावगीताला साजेसा नवा स्वरसाज चढवला. गाणं सुपर-डुपर हीट झालं.’आकाशगंगा’ नावाच्या अल्बम मध्ये हे गाणं आहे. या अल्बम मधली सर्व गाणी अरुण दाते यांनी गायली असून यशवंत देव यांनी चालीत गुंफली आहेत. यात ग्रेस, कुसुमाग्रज, शांताबाई शेळके, सुरेश भट, विंदा करंदीकर अशा दिग्गज कवींच्या लेखणीतून साकार झालेल्या अप्रतिम रचना आहेत. वसंत बापटांचं हे गाणं मात्र तत्कालीन तरुणाईने तुफान उचलून धरलं होतं. आजही हे गाणं प्रत्येक तरुणाला आवडत असेल यात शंका नाही.

‘आकाशगंगा’ अल्बम का गाजला

सिनेमा लोकप्रिय झाला नाही म्हणून त्याची गाणी देखील रसिकांपर्यंत पोहचत नसतात. असं हिंदी चित्रपटांच्या बाबतीही बऱ्याचदा घडत असतं. वसंत बापट-यशवंत देव या जोडगोळीने मात्र त्यावर उपाय शोधून काढला. त्याबद्दल मराठी रसिकांनी त्यांचे आभारच मानायला हवेत. तसंही बापट- देव हे मराठी चित्रपटांमध्ये फारसे रमले नाहीत. भावसंगीत हा त्यांचा प्रांत. या क्षेत्रात त्यांनी केलेली कामगिरी लक्षणीय आहे. ‘आकाशगंगा’ या अल्बम मधली सर्वच गाणी सरस आहेत. त्यामुळे हा अल्बम प्रचंड लोकप्रिय झाला होता. कविश्रेष्ठ ग्रेस यांची एक अफलातून रचना यात समाविष्ट केलेली आहे. ‘’पाऊस कधीचा पडतो..झाडांची हलती पाने, हलकेच जाग मज आली..दु:खाच्या मंद स्वराने…’’ या मन कातर करणाऱ्या शब्दांना अतिशय समर्पक चाल यशवंत देवांनी लावली आहे. काही वर्षांनी हीच रचना यशवंत देव यांनी दुसऱ्या कलावंताच्या आवाजात रेकॉर्ड केली. गायिका पद्मजा फेणाणी-जोगळेकर यांनी आपल्या विशिष्ट शैलीत हे गाणं गाऊन दस्तुरखुद्द ग्रेस यांच्याकडून वाहवा मिळवली! रसिकहो, आपणही दोन्ही गाणी जरूर ऐका. आणि ठरवा कोणाचं गाणं तुम्हांला आवडतं ते ! मला मात्र पद्मजाबाईंच गाणं जास्त भावतं.

कुसुमाग्रजांची रचना दोन आवाजात

एकच रचना दोन वेगळ्या गायकांनी गायल्याची अनेक उदाहरणे आपल्याकडे सापडतात. हिंदीत आणि मराठीतही. असंच एक गाणं मला इथे आठवतं. तात्यासाहेब शिरवाडकर उपाख्य कुसुमाग्रज यांची ही कविता आहे. ‘काही बोलायचे आहे पण बोलणार नाही..देवळाच्या दारामध्ये भक्ती तोलणार नाही…’ अतिशय आशयसंपन्न ही रचना आहे. आधी गायक अरुण दाते यांच्या आवाजात संगीतकार यशवंत देव यांनी हे गाणं गाऊन घेतलं. रसिकांनी आनंदाने आपल्या पसंतीची मोहोर या गाण्यावर उमटवली. पुढे हेच गाणं देवांनी श्रीधर फडके यांच्या स्वरांत संगीतबद्ध केलं. चाल अर्थातच आधीचीच. फडके यांनी अतिशय हळुवार पद्धतीने गाऊन या गाण्याला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं. रसिकहो, हेही गाणं तुम्ही दोन्ही कलावंतांच्या आवाजात नक्की ऐका. कुसुमाग्रज-यशवंत देव-अरुण दाते-श्रीधर फडके अशा प्रतिभावंत कलाकारांच्या सर्जनशीलतेचा आस्वाद घेता येणं यासारखं दुसरं आनंददायी काय असणार आहे रसिकांच्या दृष्टीने !

तुला पाहिले मी नदीच्या किनारी…

आपल्यापैकी अनेकांना ज्ञात असेलच की श्रीधर फडके हे एक उत्तम संगीतकार तर आहेच त्याशिवाय सुरेल गायक देखील आहेत. संगीताचा वारसा त्यांना घरातूनच मिळाला आहे. त्यांना वडील सुधीर फडके यांच्या इतकी लोकप्रियता मिळाली नाही. मात्र त्यांनी केलेलं काम अत्यंत दर्जेदार आहे याविषयी कोणाचंही दुमत होणार नाही. गायक आणि संगीतकार म्हणून त्यांनी स्वत:ची अशी वेगळी ओळख प्रस्थापीत केली आहे. अगदी मोजक्या (हृदयनाथ मंगेशकर, यशवंत देव ) संगीतकारांनी कविवर्य ग्रेस यांच्या कविता संगीतबद्ध करण्याचे धाडस केलं आहे. त्यापैकी एक नाव म्हणजे श्रीधर फडके. त्यांनी ग्रेस यांची ‘’तुला पाहिले मी नदीच्या किनारी..तुझे केस पाठीवरी मोकळे…’’ या कवितेला चाल लावून रसिकांना विलक्षण अनुभव दिला आहे. आधी त्यांनी ही रचना स्वत:च्या आवाजात रेकॉर्ड केली. अत्यंत मुलायम स्वरांत नि शांत लयीत त्यांनी हे गाणं गायलं आहे. नंतर त्यांनी हेच गाणं ज्येष्ठ नि श्रेष्ठ लोकप्रिय गायक सुरेश वाडकर यांच्या आवाजात ध्वनिमुद्रित केलं. दोन्ही गायकांच्या आवाजातले हे गाणे मी अनेकदा ऐकलं आहे. ऐकत असतो. पण मला यात कोणाच्या आवाजातलं गाणं उजवं नि कोणाच्या आवाजातलं डावं हे आजपर्यंत ठरवता आलेलं नाहीये! आणि आणखीन पुष्कळदा ऐकूनही ठरवता येईल असं वाटत नाही! इतकी ती (दोघांच्याही आवाजात )भावपूर्ण झालेली आहेत. रसिकहो हे सुद्घा गाणं तुम्ही नक्की ऐका. श्रीधर फडके आणि सुरेश वाडकर या दोन्हींच्या आवाजात आणि ठरवा तुम्हांला कोणाचं गाणं जास्त आवडलं ते !

सहयोगी प्राध्यापक,

मानव्यविद्या व सामाजिक शास्त्रे विद्याशाखा,

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ,

नाशिक

मोबाईल : ९४०३७७४५३०

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *