प्रवासी भारतीय दिवस

प्रवासी भारतीय दिवस

उद्या 9 जानेवारी 2023 अर्थात भारतीय प्रवासी दिवस. गेल्या 16 वर्षापासून हा दिवस भारत सरकारकडून मोठया उत्स़ाहात साजरा केला जातो. यंदाचं हे 17 वे वर्ष आहे. 9 जानेवारी 1915 रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेहून मुंबईत परतले होते. त्या प्रित्यर्थ 9 जानेवारी 2003 पासून अनिवासी भारतीय नागरिकांच्या प्रगतीमधील योगदानासाठी प्रवासी भारतीय दिवस साजरा केला जातो. भारत सरकारच्या अनिवासी भारतीय कार्य मंत्रालय आणि उत्तर पूर्वी क्षेत्र विकास मंत्रालय, फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज आणि कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री यांच्याकडून 8 ते 10 जानेवारी 2023 या कालावधीत प्रवासी भारतीय दिवसाच्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. अशा या प्रवासी भारतीय दिवसाबाबतची ही माहिती....

9 जानेवारी हा दिवस खूप महत्त़्वाचा आहे. कारण आजच्या दिवशी महात्मा गांधी यांनी आफ्रिकेतून भारतात परतल्यानंतर भारतीय स्वातंत्र्य संग्रामाची धुरा सांभाळली आणि भारतीय स्वातंत्र्य संग्रामाला एक नविन वळण देत भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले.

प्रवासी भारतीय दिवस साजरा करण्याचा निर्णय भारत सरकारने एल.एम. सिंघवी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या भारतीय डायस्पोरावरील उच्चस्तरीय समितीच्या शिफारशींनुसार घेतला. भारताचे तत्कालीन पंतप्रधान श्री अटलबिहारी वाजपेयी यांनी 8 जानेवारी 2002 रोजी नवी दिल्ली येथील विज्ञान भवन येथे एका सार्वजनिक कार्यक्रमात सिंघवी समितीचा अहवाल स्विकारत 9 जानेवारी 2002 रोजी प्रवासी भारतीय दिवसाची घोषणा केली. 1915 मध्ये महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतल्याबद्दल हा दिवस निवडला गेला.

18 व्या शतकात भारतातील गुजराती व्यापारी केनीया, युगांडा, जिम्बाब्वे, जाम्बिया, दक्षिण आफ्रिका येथे व्यापार करण्यासाठी जात असत. तेथे त्यांना तेथील स्थानिकांकडून वेगळी वागणुक मिळत असे. त्यांना तेथे रंगभेदाचा सामना करावा लागत असे. याबाबत त्यांच्या मनात असंतोष निर्माण होत असला तरी त्याचा विरोध करण्याची हिंमत होत नसे. महात्मा गांधी अर्थात बॅरिस्टर मोहनदास करमचंद गांधी हे 1893 मध्ये व्यापारी दादा अब्दुला सेठ यांचे अधिकृत प्रतिनिधी म्हणून दक्षिण आफ्रिकेतील नटाल येथे काम पाहत होते. गांधींजीनी वकिलीचे शिक्षण घेतले होते.त्यांना काम हवे होते. अशातच पोरबंदरच्या एका मेमन पेढीकडून त्यांना काम मिळाले. दक्षिण आफ्रिकेत त्यांचा व्यापार व मोठी पेढी होती. त्याबाबत तेथील न्यायालयात एक मोठा दावा / खटला सुरू होता. दावा चाळीस पौंडाचा होता. त्यांच्याकडे उत्तमातील उत्तम वकिल, बॅरिस्टर होते.

या खटल्यात त्यांची बाजू मांडण्यासाठी तेथील वकिलांना बॅरिस्टर गांधीची मदत होईल. गांधीजींनाही नवा मुलूख पाहाता येईल आणि ओळखीही होतील या हेतूने त्यांच्या बंधूंनी गांधीजींना दक्षिण आफ्रिकेत पाठविले. तेथे ते दादा अब्दूलांचे भागीदार मरहूम शेठ अब्दूल करीम झवेरी यांच्याकडे गांधीजीची राहण्याची व जेवणाची सोय केली होती. दादा अब्दुलांनी गांधीजींना तेथे जाण्यासाठी प्रथम श्रेणीचे तिकिट, राहण्याजेवण्याच्या खर्चाखेरीज 105 पौंड देण्याचे कबूल केले. त्यानुसार गांधीजी दक्षिण आफ्रिकेत जाण्यास राजकोटहून मुंबईस आले. एजंटास बोटीचे / जहाजाचे तिकिट काढण्यास सांगितले.पण त्यांना जागा मिळेना. डेकवर तिकिट मिळत होते. तर जेवण्याची सोय सलूनमध्ये होणार होती. परंतू एका बॅरिस्टरने प्रथम श्रेणीतून प्रवास करण्याचे दिवस असतांना अशा डेकवरून जाणे गांधीजींना रूचले नाही. त्यांनी जहाजाचे वरिष्ट मालिमालाना भेटले. त्यांनी सांगीतले की त्यांच्याकडे एरवी गर्दी क्वचितच असते. मोझांविकचे गव्हर्नर- जनरल या बोटीतून जात असल्याने जागा नसल्याचे सांगितले.

आता ही बोट चुकली तर गांधीजींना एक महिना मुंबईतच थांबावे लागणार होते. त्यामुळे गांधीजींनी जहाजाच्या मालिमाला यांना काहीही कर पण एक जागा करून दे असे आर्जव केले. त्यांचे आर्जव पाहून मालिमालाने त्यांच्या केबीनमध्ये एक झोपाळा रिकामा असल्याचे सांगितले. ते गांधीजीनी मान्य करून तिकिट काढले. आणि 1893 च्या एप्रिला ते नशिबाची परिक्षा पाहण्यास आफ्रिकेस निघाले. दक्षिण आफ्रिकेत असलेल्या भारतीयांना जसा रंगभेद नितीचा सामना करावा लागला तसाच सामना मोहनदास गांधी यांनाही करावा लागला. स्वाभिमानी असलेल्या गांधीजींनी रंगभेद नितीचा विरोध करण्याचे ठरविले आणि प्रवासी भारतीयांना एकत्र करून संघर्ष करण्यास सुरवात केली.

येथेच गांधीजींच्या अहिंसा आणि सत्याग्रह या विचारांचा जन्म झाला. कोणत्याही प्रकारची हिंसा, जाळपोळ न करता अन्यायाचा वैचारिक विरोध करून त्यांना त्याची जाणिव करून देणे आणि अत्याचार, अन्याय थांबविण्यास भाग पाडणे, सत्याचा आग्रह करणे यासाठी त्यांनी तेथील प्रवासी भारतीयांमध्ये जागृती केली. याचा परिणाम असा झाला की आपल्यावरील रंगभेदाबाबत होत असलेल्या अन्यायाबाबत तेथील प्रवासी भारतीयांमध्ये एकजुट होऊ लागली. मघापासून मी प्रवासी भारतीय असा वांरवार उल्लेख करत आहे. परंतू प्रवासी भारतीय म्हणजे नेमके काय? असा प्रश्न आपल्या मनात आला असेलच. तर प्रवासी भारतीय म्हणजे अर्थात व्यापार किंवा शिक्षणासाठी किवा इतर काही कारणांसाठी काही काळासाठी त्या देशात वास्तव करत असलेले भारतीय म्हणजे अनिवासी भारतीय प्रवासी होत.

अनिवासी प्रवासी भारतीय असल्याने तेथील स्थानिकांकडून अशा भारतीय लोकांना रंगभेदावरून कमीपणाची वागणुक दिली जात होती. या विरोधात गांधीजींनी सत्याचा आग्रह म्हणजे सत्याग्रह करणे सुरू केले. 1893 ते 1915 असा तब्बल 22 वर्ष त्यांनी सत्याग्रह करून आफ्रिकेतील लोकांना पटवून दिले की हे प्रवासी भारतीय त्यांचे शत्रू नव्हेत तर मित्रच आहेत. जे काही काळासाठीच येथे वास्तव्य करून परत मायदेशी म्हणजे भारतात परत जाणार आहे. आता तुम्ही म्हणाल की, गांधीजींना हे सगळे करण्याची काय गरज होती. असाही विचार मनात येऊ शकतो. हो कारणही तसेच आहे. सत्याचे प्रयोग या पुस्तकात गांधींजीनी या रंगभेदाबाबत लिहीले आहे.

गांधीजींनी आयुष्याची 21 वर्षे दक्षिण आफ्रीकेत घालवली, जेथे त्यांनी त्यांचे राजकीय दृष्टीकोन नैतिक आणि राजकीय नेतृत्व कौशल्ये विकसीत केली. दक्षिण आफ्रीकेतील भारतीयांचे नेतृत्व असणार्‍या श्रीमंत मुस्लीमांनी आणि अतिशय कमी अधिकार असणार्‍या गरीब हिंदूनी गांधीजींना नोकरी दिली. भारतीयत्व सर्व धर्म आणि जातींमध्ये उतरले आहे असा दृष्टीकोन आयुष्यभर ठेवत गांधीजींनी या सर्वाना भारतीयच मानले. मुख्यत्वे धर्माच्या बाबतीत ऐतिहासीक भिन्नता आपण साधू शकू असा त्यांना स्वतःबद्दल विश्वास होता, आणि हा विश्वास घेऊन ते भारतात आले. येथे त्यांनी या विश्वासाची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न केला. दक्षिण आफ्रीकेत गांधींना समाजाच्या विकलांगाची ओळख झाली. भारतीय धर्म आणि संस्कृतीत असलेल्या गुंतागुंतीच्या समस्यांपासून आपण दूर आहोत याची त्यांना जाणीव झाली आणि दक्षिण आफ्रीकेतील भारतीयांना समजून घेऊन, त्यांचे नेतृत्व करून आपणास भारत समजला असे ते मानू लागले.

दक्षिण आफ्रीकेत गांधीना गौरेतर लोकांबद्दल असलेल्या भेदभावाला सामोरे जावे लागले, तेथील भारतीयांना दिली जाणारी असमान वागणूक अनुभवली.पहिल्या वर्गाचे तिकिट असतांनासुद्धा त्यांना पीटर मारत्झि बर्गमध्ये रेल्वे अधिकार्‍यांनी तृतीय वर्गाच्या डब्यात बसण्यास सांगितले. गांधीजीनी नकार देताच त्यांचा अपमान करून आगगाडीमधून ढकलून देण्यात आले. ती संपूर्ण रात्र गांधीनी फलाटावरील गेस्टरूममध्ये काढली. (7 जून 1893). गांधीनी ठरवले असते तर उद्दाम वर्तन करणार्‍या त्या रेल्वे अधिकार्‍यांस ते अद्दल घडवू शकले असते. पण सूडभावनेने कोणाला शिक्षा करविणे हा त्यांचा हेतू नव्हता तर अन्यायकारक व्यवस्था बदलवणे हा त्यांचा हेतू होता. पुढे एकदा, प्रवाशांना वाट करून न दिल्यामुळे वाहन चालकाने त्यांना मारले. पूर्ण प्रवासात त्यांना अनेक यातना सहन कराव्या लागल्या. अनेक हॉटेलमधून त्यांना हाकलून देण्यात आले. अशा अनेक घटनांपैकी अजून एक घटना म्हणजे, डर्बनमध्ये न्यायाधीशाने त्यांना त्यांची टोपी काढून ठेवण्याचा हुकूम दिला. गांधींनी तेव्हाही तक्रार करण्यास नकार दिला. या घटना त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणार्‍या ठरल्या. हे सर्व अनुभव घेतल्यावर गांधीनी स्वतःचे समाजातील स्थान आणि ब्रिटीश राज्यातील आपल्या लोकांची किंमत याबद्दल प्रश्न उपस्थित करण्यास सुरुवात केली.

अशाप्रकारे भारतीयांबद्दलच्या वंशभेद, असमानता यांना सामोरे गेल्यावर गांधींनी या अन्यायाविरूध्द आवाज उठवण्यास आणि समाजात स्वतःचे स्थान निर्माण करण्यास सुरुवात केली. तेथील भारतीयांचा मतदानाचा हक्क काढून घेणारा कायदा लागू करण्यात येणार होता, या कायद्याला विरोध करणार्‍या भारतीयांना मदत करण्यासाठी गांधींनी आपले दक्षिण आफ्रीकेतील वास्तव्य काही काळासाठी वाढवले. हा कायदा रद्द करण्यात जरी ते अयशस्वी ठरले तरी यामुळे भारतीयांवरील अन्यायाकडे लक्ष वेधण्यात त्यांची चळवळ यशस्वी झाली. त्यांनी इ.स. 1894 मध्ये नाताळ भारतीय काँग्रेसची स्थापना केली याद्वारे दक्षिण आफ्रीकेतील विखुरलेल्या भारतीयांना त्यांनी एका राजकीय पक्षात परावर्तीत केले. इ.स. 1897 मध्ये काही काळाच्या भारतातील वास्तव्यानंतर दरबानमध्ये उतरत असताना काही गोर्‍या लोकांच्या जमावाने त्यांच्यावर हल्ला केला. त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला.आणि केवळ पोलीस अधीक्षकाच्या पत्नीच्या सहकार्याने त्यांची सुटका झाली. या घटनेत त्यांच्या तोंडाला इजा होत त्यांचे दोन दात तुटले.

पण त्यांनी न्यायालयात तक्रार करण्यास नकार दिला. वैयक्तीक त्रासाबद्दल न्यायालयात जाणे त्यांच्या तत्त्वांमध्ये नव्हते. इ.स. 1906 मध्ये ट्रान्सवाल सरकारने एका नवीन कायद्याची घोषणा केली. या कायद्यानुसार तेथील प्रत्येक भारतीयाला स्वतःची नोंदणी करणे बंधनकारक झाले होते. याला विरोध करण्यासाठी बोलवलेल्या सभेमध्ये, त्या वर्षीच्या 11 सप्टेंबरला, गांधींनी पहिल्यांदा आपल्या अजूनही विकसीत होत असलेल्या सत्याग्रहाच्या व अहिंसात्मक कार्यप्रणालीला आपलेसे केले. त्यांनी भारतीय बांधवांना अहिंसक पद्धतीने या कायद्यास विरोध करण्यास सांगितले. असे करतांना झालेले अत्याचार सहन करण्यास सांगितले. तेथील समुदायाने या आवाहनाला साद दिली. आणि आगामी सात वर्षात हजारो भारतीयांनी हरताळ केल्यामुळे, नोंदणी करण्यास नकार दिल्यामुळे, नोंदणी पत्रक जाळून टाकणे आणि तत्सम अहिंसात्मक कार्यात सामील झाल्यामुळे लोकांनी तुरुंगवास भोगला, चाबकाचे फटके खाल्ले आणि बंदुकीच्या गोळ्याही खाल्या.

1906 मध्ये इंग्रजांनी नाताळमध्ये झुलू राज्यावरिुद्ध युद्ध पुकारले. इंग्रजांच्या बाजूने लढण्यासाठी भारतीयांना भरती करवून घेण्यासाठी गांधीनी इंग्रजांना प्रोत्साहीत केले. भारतीयांनी पूर्ण नागरिकत्वाच्या दाव्यास वैध ठरवण्यासाठी इंग्रजांना पाठींबा देणे गरजेचे आहे, असा युक्तीवाद त्यानी केला. ब्रिटीशांनी गांधींची ही मागणी मान्य केली. आणि 20 जणांच्या भारतीय स्वयंसेवकांच्या तुकडीला जाऊ दिले. जखमी सैनिकांना उपचार देण्यासाठी स्ट्रेचरवरून वाहून नेणे ही या तुकडीची जबाबदारी होती. ही तुकडी गांधींच्या नियंत्रणाखाली होती. दोन महिन्यांपेक्षाही कमी काळ या तुकडीने काम केले. या अनुभवातून ते असे शिकले की ब्रिटीशांच्या अपरिहार्य वाढणार्‍या मिलिटरी ताकदीस उघड उघड आवाहन देणे निराशादायी आहे. त्यांनी ठरवून टाकले कि याचा प्रतिकार हृदयातील पवित्र अश्या अहिंसात्मक पद्धतीनेच करता येईल.

नंतर जेंव्हा काळ्या लोकांचे बहुमत सत्तेत आले तेंव्हा गांधीना राष्ट्रीय नायक म्हणून विविध स्मारकात घोषित केले गेले. हा झाला गतइतिहास आता भारताला स्वातंत्र्य मिळाले आहे. गत इतिहासाची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून आणि जगात याबाबत नव्या पिढीत जागृकता राहावी म्हणून भारत सरकार हा दिवस मोठया उत्साहात साजरा करत आहे. आजच्या स्वातंत्र्यानंतर भारतीय प्रवासी दिवस साजरा करण्यामागे प्रवासी भारतीयांच्या मनात भारताबाबत विचार,भावनेबाबत अभिव्यक्ती जागृत करणे, देशातील नागरीकांसोबत सकारात्मक चर्चा करण्यासाठी व्यासपीठ उपलब्घ करणे, जगभरातील प्रवासी भारतीयांसोबत संपर्क राखणे, युवा पीढीला यासोबत जोडणे, तर विदेशात राहणार्‍या भारतीयांच्या समस्या सोडवणे हे उददेश्य आहेत. यावर्षाचा हा 17 वा भारतीय प्रवासी दिवस आहे. जो इंदोर मध्ये साजरा होत आहे. यासाठी (pbdindia.gov.in) ही वेबसाईटही भारत सरकारने सुरू केली आहे. या वर्षाच्या दिवसाची संकल्पना ‘डायस्पोरा: अमृत काल में भारत की प्रगति के लिए विश्वसनिय भागीदार’ ही आहे, याचे उदघाटन पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी साहेब यांच्या हस्ते आजच्या दिवशी म्हणजे 9 जानेवारी 2023 रोजी झाले. तर उदया 10 जानेवारी 2023 रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कारांचे वितरण होणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com