Tuesday, April 23, 2024
Homeब्लॉगनिर्विघ्न ओलांडून जाताना

निर्विघ्न ओलांडून जाताना

घरगुती कारणांमुळे नोकरीच्या ठिकाणापासून मला नेहमीच दूरवर राहावं लागलं. सुरूवातीची दहा वर्षे सोडली तर उर्वरित नोकरीच्या कार्यकाळात मी अपडाऊन केलं. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेने माझा संपूर्ण प्रवास सुखाचा झाला. कितीतरी लक्षवेधी पुस्तकांचं वाचन मी प्रवासातच केलं. वाहनाच्या गतीने माझ्या स्थितीशील विचारांना नेहमीच चालना दिली. त्यामुळे कवितेचे खूप सुंदर विषय मला सूचत राहिले. रोजच्या शे-सव्वाशे किलोमीटर अंतरामुळे माझा लक्षावधी किलोमीटरचा प्रवास झाला. प्रचंड थकून घरी आल्यावर पत्नीच्या, मुलींच्या चेहऱ्यावरील हास्य पाहून तो थकवा कुठल्याकुठे पळून गेला. पुन्हा पुन्हा जगण्याला नव्याने भिडत राहिलो. त्या उर्जेनेच माझ्यातील सळसळत्या कवितेला कायम जिवंत ठेवलं.

नदीच्या काठावर वसलेल्या त्या छोट्याशा गावात आम्ही सात-आठ वर्षे राहिलो. दोन खोल्यांचं आटोपशीर घर. समोर छानसा ओटा आणि पडवी. नव्याने राहायला आलो त्यावेळी नदी वाहताना दिसायची. सायंकाळच्या वेळी तिचा खळाळणारा प्रवाह पाहात काठावरच्या रुपेरी वाळूत आम्ही बसून राहायचो. नंतर कोल्हापूर पद्धतीचे बंधारे झाले आणि नदी कायमची आटली. तिचं ओसाड रूप काळजावर घाव घालत राहिलं. हळूहळू वाळूतस्कर आले. त्यांनी नदीला नागवं करून टाकलं. दोन्ही काठावर कचऱ्याचे प्रचंड ढीग साठत गेले. मधूनच कुणीतरी पेटवून दिल्याने मोकळा श्वास कोंडत राहिला. नदीला नदीचे रूप न राहिल्याने विश्वाचे स्वरूप पालटल्यागत झाले. येता जाता घडणाऱ्या नदीच्या विद्रूप दर्शनाने घायाळ होत राहिलो.

- Advertisement -

माझी कॉलेजची वेळ सकाळी साडेसात वाजताची होती. धावत पळत ती वेळ मी गाठत असे. साठ किलोमीटरवर असणाऱ्या नोकरीच्या ठिकाणी वेळेत पोहोचण्यासाठी मी सकाळी पावणेसहालाच घर सोडत असे. कितीही कंटाळा आला तरी पहाटे चार साडेचारलाच आम्ही दोघेही उठत असू. माझं आवरेपर्यंत तिचा जेवणाचा डबा तयार होई. अंधारातच बाहेर पडताना तिच्या चेहऱ्यावरील काळजी मला स्पष्ट दिसत असे. मुली साखरझोपेत असत. त्यांच्या कपाळावर हलकेच ओठ टेकवताना मला विलक्षण गलबलून येई. कूस बदलताना त्यांच्या बाळमुठी अधिकच घट्ट होत जात. बस पकडण्यासाठी रोजच नदी पार करावी लागे. खूप उंचीवर बांधलेला अरुंद पूल ओलांडून जाताना मनात धाकधूक असे. समोरून येणाऱ्या वाहनांच्या हेडलाईट्सने डोळे दिपून जात. दोन वाहनं क्राॕस करती झाली तर पुलाच्या कठड्यांना बिलगण्याशिवाय पर्याय नसे. समोरून येणारं वाहन दिसावं म्हणून रहदारीचे नियम मोडून मी उजवीकडून चालत जात असे. वाहनचालक साशंक नजरेने हेडलाईट्सचा माझ्यासाठी अप्पर डिप्पर असा वापर करीत. मी सुरक्षितपणे निघून जात असे.

माझा तो नित्यक्रम होता. एवढा प्रवास करून घरी येईस्तोवर पत्नी कासावीस असे. मुली लहान होत्या. मला पाहिल्यावर त्यांचा चेहरा आनंदाने फुलून येई. धावत येऊन गळामिठी घेत, घट्ट बिलगत. त्यांच्या उघडलेल्या मुठीत मला माझ्या भवितव्याची रेषा स्पष्ट दिसे. त्यांच्या हातांच्या वेढ्यात मी खूपच सुरक्षित असे. वर्तमानपत्रातील अपघाताच्या बातम्या वाचल्या की माझी अस्वस्थता वाढत जाई. क्षणकाल पत्नीचा, मुलींचा चेहरा डोळ्यासमोर तरळून जाई. त्यादिवशी जरा अघटितच घडलं. दिवसाउजेडी रस्त्यावर दोन जीव ट्रकखाली चिरडताना पाहिले. आणि काळजात धस्स झाले. कसाबसा सावरत घरी आलो. पत्नीला, मुलींना पाहिल्यावर डोळे भरून आले. अश्रूंना वाट मोकळी करून दिली. न बोलताही पत्नीला सारे कळून आले. ती थोपटत राहिली पाठीवर. तिच्या आश्वासक स्पर्शाने माझे जगण्याचे भान अधिकच तीव्र झाले. जीवनाची नदी निर्विघ्न ओलांडून जाण्याचे बळ खळाळत्या प्रवाहाप्रमाणे अंगागात भिनत गेले.

त्यादिवशी पाहिलेल्या अपघाताने आतून, बाहेरून हादरलो असलो तरी माझी भल्या सकाळची प्रवासाची बस चूकत नव्हती. घरून निघताना पत्नीच्या काळजातील कासाविशी आणि झोपेतच निरोप देणाऱ्या मुलींच्या बाळमुठीतील भवितव्याची रेषा मला अस्वस्थ करीत असे. प्रवासात डोळे मिटून घेतले की त्यांचे चेहरे समोर दिसत. सायंकाळी घरी परतल्यावर मन आनंदाने भरून जात असे. माझ्या अस्वस्थ होण्याच्या आणि आनंदाच्या मधे जी दरी होती त्यात सहजच डोकावून पाहिलं तर निर्विघ्न ओलांडून जाण्यासाठी लागणारी पत्नीच्या काळजातील कासाविशी आणि मुलींच्या बाळमुठीत वाढत जाणारी भवितव्याची रेषा आलेखासारखी वर चढत येताना दिसली. त्या रेषेनेच ‘निर्विघ्न ओलांडून जाताना’ ही कविता माझ्या हातून सुरक्षितपणे कागदावर उतरवून घेतली.

नोव्हेंबर दोन हजार तीनमध्ये ‘निर्विघ्न ओलांडून जाताना’ ही कविता लिहून झाली. पद्मगंधा, साधना, शब्दालय या दर्जेदार दिवाळी अंकांनी नाकारल्यावर मग ती कुठेच पाठवली नाही. जनशक्ती वाचक चळवळीचे श्रीकांत उमरीकर दरवर्षी गणेशोत्सवात अजिंठ्याजवळ असणाऱ्या उंडणगावात एक कविसंमेलन घेत असत. दोन हजार बारा साली त्यांनी मला कविसंमेलनासाठी निमंत्रित केलं होतं. त्यावेळी माझ्यासोबत दासू वैद्य, मनोज बोरगावकर आणि श्रीधर नांदेडकर या कविंनाही निमंत्रण होतं. सगळेच कवी चिंतनशील कविता लिहित असल्यामुळे कवितेची छानशी मैफिल जुळून आली. श्रीधरला माझ्या कविता खूपच आवडल्या. त्याने कवितांचं तोंडभरून कौतुकही केलं. त्यावेळी तो मराठवाडा साहित्य परिषदेचं मुखपत्र असणाऱ्या ‘प्रतिष्ठान’ या द्वैमासिकाचं कार्यकारी संपादक या नात्याने काम पाहात होता. कविसंमेलनात म्हंटलेल्या माझ्या सर्व कविता तो ‘प्रतिष्ठान’साठी घेऊन गेला. यथावकाश दोन हजार तेरा साली ‘प्रतिष्ठान’च्या नोव्हेंबर/डिसेंबर अंकात त्या प्रसिद्ध झाल्या. त्यात ‘निर्विघ्न ओलांडून जाताना’ ही त्याला आवडलेली कविता आवर्जून छापलेली होती. त्यानंतर दोन हजार चौदा साली आलेल्या ‘ताटातुटीचे वर्तमान’ या कवितासंग्रहात त्या कवितेचा आपोआप समावेश झाला.

अस्वस्थ होण्यातून निर्माण झालेल्या त्या कवितेने मला अपार आनंद दिला. श्रीधर नांदेडकर या सच्च्या कविमित्राच्या काळजात नेऊन बसवलं. पत्नीच्या काळजातील कासाविशीच्या आड दडलेलं प्रेम उघड केलं. मुलींच्या बाळमुठीत वाढत जाणाऱ्या भवितव्याच्या रेषेने जीवनाचं वर्तुळ परिपूर्ण झालं. आजही कधी, कुठे नदी पार करताना ती कविता सोबत असल्याचा मला भास होतो आणि मग मी जीवनाचा खळाळता आवेग निर्विघ्न ओलांडून जातो.

निर्विघ्न ओलांडून जाताना

पहाटेच्या धुसर प्रकाशात

रोजच पार करावा लागतो

नदीवरचा हा अरुंद पूल

येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना चुकवत

करावी लागते कसरत

कुठे कुठे कठडे ढासळण्याच्या तयारीत

हा एवढा लांबलचक

आणि वाहत्या पाण्यापासून किती उंचीवर बांधलेला पूल

रहदारीचे नियम मोडून मी चालत जातो –

सुरक्षित म्हणून उजव्या बाजूने

तर समोरून येणाऱ्या गाड्यांचे हेडलाईट्स

साशंक नजरेने फेकतात माझ्यावर प्रकाश

मी सराईतासारखा कठड्यांना बिलगत पार करून जातो

परवा समोरून येणाऱ्या ट्रकखाली

दिवसाउजेडी दोन जीव चिरडलेले पाहिले

आणि काळजात धस्स झाले !

पहाटेच्या धुसर प्रकाशात

अरुंद पूल निर्विघ्न ओलांडून जाताना

माझ्या सोबत असते

पत्नीच्या काळजातील कासाविशी

आणि झोपेतच निरोप देणाऱ्या मुलींच्या बाळमुठीत

वाढत जाणारी भवितव्याची रेषा

_शशिकांत शिंदे

(९८६०९०९१७९)

- Advertisment -

ताज्या बातम्या