मागणे

जगाच्या पाठीवर जेवढे म्हणून धर्म आहेत, जीवन पद्धती आहेत त्या प्रत्येकाची, 'प्रार्थना' ही मूलभूत गरज आहे. प्रार्थनेमुळे बळ मिळतं, अंतःकरण शुद्ध होतं, नव्या जाणीवेचा प्रकाश सभोवार पसरत जातो. वैर, द्वेष, असुया आणि अहंतेचे पापुद्रे गळून पडतात. प्रेमाचे, मायेचे, समर्पणाचे, औदार्याचे अगणीत दरवाजे हळूवारपणे उघडले जातात. माणूसपणाकडे जाण्याचा मार्ग खुला होतो. माणसाचा माणूसकीवरचा विश्वास दृढ होत जातो. छोटीशी प्रार्थना मानवजातीच्या कल्याणाचं महन्मंगल स्तोत्र बनून जाते. शशिकांत शिंदे यांची ‘कवितेमागची कथा’ ब्लॉगमालिका...
मागणे
रेखाचित्रे : ज्योती डेरेकर

प्रार्थनेत मोठी शक्ती असते. प्रार्थना मनाला दिलासा देते. वेद, उपनिषदे, ब्राह्मणे, आरण्यके या प्रार्थनाच आहेत. निस्वार्थ भावनेने जे 'मागणे' मागितले जाते त्याला आपोआपच प्रार्थनेचा पवित्र दर्जा प्राप्त होतो. पंचमहाभूतांची आळवणी करणाऱ्या आपल्या पूर्वजांची प्राचिन परंपरा अखिल मानवजातीच्या अणूरेणूत घट्टपणे रुजलेली आहे. जगाच्या पाठीवर जेवढे म्हणून धर्म आहेत, जीवन पद्धती आहेत त्या प्रत्येकाची, 'प्रार्थना' ही मूलभूत गरज आहे. प्रार्थनेमुळे बळ मिळतं, अंतःकरण शुद्ध होतं, नव्या जाणीवेचा प्रकाश सभोवार पसरत जातो. वैर, द्वेष, असुया आणि अहंतेचे पापुद्रे गळून पडतात. प्रेमाचे, मायेचे, समर्पणाचे, औदार्याचे अगणीत दरवाजे हळूवारपणे उघडले जातात. माणूसपणाकडे जाण्याचा मार्ग खुला होतो. माणसाचा माणूसकीवरचा विश्वास दृढ होत जातो. छोटीशी प्रार्थना मानवजातीच्या कल्याणाचं महन्मंगल स्तोत्र बनून जाते.

स्वार्थाची मात्रा मिसळून केलेल्या प्रार्थनेला शेवटी तडेच जातात. तो दुभंग मनात ठेऊन वावरणारी श्वापदं समाजात दुही पेरत राहतात. मानवतेला काळीमा फासणारी ही उगमस्थानं बेगडी आवरणांखाली अक्राळविक्राळ रूप धारण करतात. समाजाचं सर्वच पातळ्यांवर शोषण होत राहतं. प्रार्थनेचे कवच गळून पडल्याने शेवटी 'मागणे' संपून केवळ 'मागणी' शिल्लक राहते.

प्रार्थनेला मानवजातीच्या उत्थानाची तळमळ असते. आकाशस्वरूप प्रार्थनेच्या मंदिरात ॐकाराचा प्रतिध्वनी निनादत असतो. वृक्षांच्या गर्द राईत बसून गुजगोष्टी करणाऱ्या पाखरांच्या स्वरात सृष्टीदेवतेच्या प्रार्थनेचे सूर मिसळलेले असतात. समुद्राचं अथांगपण प्रार्थनेच्या गाभाऱ्यात सामावलेलं असतं. प्रार्थनेला मांगल्याचा सुगंध असतो. तेजाचं अधिष्ठान लाभल्याने काळोखाच्या कातळावर उजेडाची लेणी घडवत असते प्रार्थना. प्रार्थना नम्रता शिकवते, वैराग्याचे दर्शन करवते. प्रार्थनेच्या उदरात पराकोटीची क्षमाशीलता स्थानापन्न असते. हिमालयाच्या उंचीइतका स्वाभिमान असते प्रार्थना. अथांग सागर तरून जाण्याचा अमर्याद आत्मविश्वास असते प्रार्थना. पराभवाचे वार झेलणाऱ्या कणखर छातीत काळजाचा कोट करून उभी असते धैर्यशील प्रार्थना. कोसळल्यावर उभं राहण्याची आदिम प्रेरणा देत असते प्रार्थना. मंदिराच्या गाभाऱ्याहून पवित्र असणाऱ्या कणाकणातून जेव्हा उमटते प्रार्थना तेव्हा ती कर्णाच्या औदार्याला गवसणी घालते आणि मग आपोआपच अमर्याद गगनाचा गाभारा तिच्यासमोर थिटा वाटायला लागतो. शेवटी प्रार्थना म्हणजे सत्शील स्वरांची सुरेल दिंडी.

प्रार्थना, प्रतिज्ञेच्या परिपाठाने शाळेचे वर्ग सुरू व्हायचे. प्रार्थना म्हणताना हात नकळत जोडले जायचे. डोळे मिटून घेतले की मनःपटलावर निराकार असं काहीतरी साकार व्हायचं. त्या एकाग्रतेने, तल्लीनतेने वयाबरोबर वाढत गेलेला विखार मनाच्या खोल गहिऱ्या डोहातून उपसून काढला. नितळ झालेल्या मनाच्या तळाशी निद्रिस्त असलेल्या अक्षरांच्या राशी सजग झाल्या. शुद्ध विवेकाच्या लाटांवर हेलकावत हेलकावत त्या पृष्ठभागावर आल्या. प्रार्थनेच्या चैतन्यमयी स्पर्शाने त्यांना चिरपरिचित आकार दिला. तो चिरंतन आकार म्हणजेच 'मागणे' ही चिंतनशील कविता.

'मागणे' कविता 'किशोर' मासिकाच्या दिवाळी २००७ च्या अंकात छापून आली. त्या अगोदर कविता आवडल्यामुळे ती स्विकारत असल्याचे कार्यकारी संपादिका ज्ञानदा नाईक यांचे छोटेखानी पत्र आले. ज्ञानदा नाईक म्हणजे सुप्रसिद्ध साहित्यिक व्यंकटेश माडगूळकर तथा तात्यांची कन्या. ते पत्र वाचून मी भारावून गेलो. दिवाळी अंकाच्या आवरणपृष्ठावर आतल्या बाजूने कविता छापलेली होती. शेजारच्या पानावर हितगुज म्हणून ज्ञानदाताईंचं संपादकीय होतं. संपादकीय वाचून मी उडालोच.

'मागणे' कविता केंद्रस्थानी ठेऊन त्यांनी लिहिलं होतं, " शब्दांना मांगल्य असतं, उच्चारांना पावित्र्य असतं, पुन्हा पुन्हा उच्चारलेल्या शब्दांचे पडसाद आपल्या आचारांत आणि विचारांत उमटतात. ओठातून बाहेर पडणारी मंगलमय प्रार्थना हृदयाला कारुण्य आणि बुद्धीला प्रखरता देते. प्रार्थनेचं महत्व एकदा का समजलं, की ती आपला जीवनप्रवाह शुद्ध आणि सळाळता करते. शाळेत आपण एकत्र येऊन रोज प्रार्थना म्हणतो. देवळांत, चर्चमध्ये, मशिदीत प्रार्थना म्हटली जाते. रात्री झोपी जाण्यापूर्वी देवाची प्रार्थना करण्याची आपली परंपरा आहे. आजी, आजोबा अंथरुणात बसून, हात जोडून देवाची प्रार्थना करत असल्याचं तुम्ही पाहिलं असेल. तुम्ही झोपण्यापूर्वी काय करता? प्रार्थना.... विचार... मागणं... आपल्याला हवंहवंसं वाटतं ते मनापासून मागणं म्हणजेच प्रार्थना करणं. प्रार्थनेत आदर आणि विनवणी दोन्ही आहे, मात्र स्वतःपुरतं मागणं एवढा संकुचित अर्थ प्रार्थनेत नाही. तिला सामाजिक महत्वही आहे. वैयक्तिक प्रार्थनेमुळे आपल्या कार्यासाठी सामर्थ्य मिळतं. चांगलं, वाईट यांची जाण येते. चांगल्याचा ध्यास लागतो. मानसिक समाधान मिळतं. सामाजिक प्रार्थनेमुळे काय होतं, तर बंधुभाव निर्माण होतं. समाजातील एकी वाढते. समाज एकसंध होतो. जेव्हा मनाचं सामर्थ्य कमी पडतं, जेव्हा समाज विसकटू लागतो, तेव्हा प्रार्थना बळ देते."

'मागणे' कविता वाचून अनेकांची पत्रं आली. परंतु त्यातील सुप्रसिद्ध कवी कमलाकर देसले या मित्राच्या पत्राने विशेष लक्ष वेधून घेतलं. त्याने उत्कटतेने लिहिलं होतं, "तुझी 'मागणे' ही कविता पराकोटीची सुंदर वाटली. मी पसायदानासारखं तीचं पारायण करतोय. 'मागणे' माझ्यालेखी 'पसायदान' आहे. मी तीचं नामकरण माझ्यापुरतं 'पसायदान' केलेलं आहे. तुझ्या कवितेत माऊली ज्ञानेश्वरांची निरपेक्ष संवेदनशीलता व तुकोबांची आत्मकठोरता याचा अपूर्व-अभूतपूर्व संगम आहे. ज्ञानोबा ते तुकोबांच्या मांदियाळीतले सर्व संत तुझ्या कवितेत भेटतात. तुझ्या व्याकूळ कवितेने खरेच व्याकूळ केले."

महाविद्यालयाचा वार्षिक समारंभ सुरू होता. सुप्रसिद्ध अनुवादक डॉ. विद्या सहस्त्रबुद्धे आणि माझ्यावर सूत्रसंचालनाची जबाबदारी होती. विद्याताईंनी दीप प्रज्वलनाची घोषणा केली. पार्श्वभूमीला वाद्यसंगिताचे कोमल स्वर. त्या हळूवार स्वरांवर मी माझ्या धीरगंभीर आवाजात 'मागणे' कवितेचे शब्द ठेवून दिले. श्रोते कमालीच्या शांततेने कानात प्राण आणून ऐकत होते, सोहळा अनुभवत होते. विद्याताई कौतुकभरल्या नजरेने माझ्याकडे पाहतच राहिल्या. त्या नजरेत मला ज्ञानदाताईंच्या कृपाछत्राची सावली दिसली आणि कमलाकरच्या निरपेक्ष प्रेमाचं त्याच्यालेखी असणारं नितांतसुंदर 'पसायदान'...

मागणे

पाषाणाचे हृदय मला दे

कठीण असुनी पाझरणारे

मनास आणिक अथांगपण दे

समुद्रासही लाजवणारे.

पराभवाचे वार झेलण्या

अशी असू दे छाती कणखर

हिमालयाच्या उंचीइतका

स्वाभिमान दे मला निरंतर.

तरून जाईन सागर साती

असा आत्मविश्वास मला दे

कोसळल्यावर उभारण्याचे

पुन्हा पुन्हा आव्हान मला दे.

पवित्र असू दे कण कण माझा

मंदिरातल्या गाभाऱ्याहून

कर्णाचे औदार्य असे दे

गगनही थिटे उरेल व्यापून.

घडव असा मज म्हणतील सारे

मानवतेचा तू कैवारी

परंतु तुझिया पायाजवळी

राहीन होऊन सदा भिकारी.

शेवट मी मागतो तुला जे

तेच प्रभावी खरे मागणे

तुझ्या स्वरांच्या दिंडीमधला

शब्द होऊ दे मला सुखाने.

-शशिकांत शिंदे

(९८६०९०९१७९)

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com