Wednesday, April 24, 2024
Homeब्लॉगनदीबाई

नदीबाई

लहानपणापासून नदीची अनेक रूपे पाहत आलोय. जन्म नदी नसलेल्या गावात झालेला असला तरी आजोळ नदीने कवेत घेतलेलं. त्यामुळे नदीशी जीवाभावाचं नातं जडलेलं. संथ वाहताना तिच्या पृष्ठभागावर पसरलेली स्निग्ध शांतता, दगडगोट्यातून मार्ग काढताना तिचं खळखळून हसणं, डोहाच्या गूढतेत दंतकथांनी ओतलेल्या अगम्य शक्यता, काठावरील झाडांच्या हिरव्या प्रतिमांच्या गडद छाया, पाखरांच्या अविट सुरावटीवरचं तिचं पाणेरी नर्तन, करड्या-पांढऱ्या उदंड वाळवंटावर विखुरलेलं शंख-शिंपल्यांचं साम्राज्य, घाटावरच्या प्राचीन मंदिरात घणघणणाऱ्या घंटानादात बुडत चाललेली सायंकाळ, सूर्याला अर्घ्य देऊन शूचिर्भूत होण्यासाठी गजबजलेला नदीकाठ अशा कितीतरी विलोभनीय प्रतिमा माझ्या मनःपटलावर कोरलेल्या.

उन्हाळ्याच्या सुट्टीची मी आतुरतेने वाट पहायचो. प्रवरेच्या काठावर वसलेलं संगमनेर हे माझं आजोळ. दिल्ली नाक्यावर उतरून जोर्वे रोडवरच्या मेहेत्रे मळ्यापर्यंतचा रस्ता भर दुपारच्या गरम फुफाट्यातही आल्हाददायक वाटायचा. मामांच्या घराला सावली देणाऱ्या चिंच आणि कवठीच्या झाडांचं दूरूनच होणारं दर्शन फारच सुखावह असायचं. मामांच्या घरापासून नदी दोन हाकांच्या अंतरावर. सकाळी सकाळी संधिप्रकाशातच आजोबा नदीकडे निघायचे. आम्हीही त्यांच्या पाठीमागे. जीर्ण काळोखाला बाजूला सारत पूर्वा फटफटत असायची. सप्तरंगांची मुक्तहस्ते उधळण. कुबेराने खजिनाच खुला केलेला. पाण्याच्या थंडगार स्पर्शाने अंगभर पसरत जाणारी गोड शिरशिरी. आणि मग संथ प्रवाहाच्या स्वाधीन होणं. शरीराला वेटाळून नदीचं वाहणं; आतल्या नदीला प्रवाहीत करणारं. मग नदीचं वेगळेपण जाणवत नसे. शरीराचा एक प्रवाही भागच जणू. काठावर आजोबा सूर्याला अर्घ्य देत असायचे. नदीच्या कुशीतून दूर होताना काहीतरी हरवल्याची चुटपुट मनाला बिलगून असायची.

- Advertisement -

नदी म्हणजे आरस्पानी सौंदर्याची पाणीदार रेषा. नदी म्हणजे अखंड वाहणारं जीवन. नदी म्हणजे समृद्धीचा अथांग आशय. नदी म्हणजे समर्पणाची कृतिशील साधना. नदी म्हणजे चैतन्याची निळीशार शलाका. नदी म्हणजे आनंदाचं झुळझुळणारं गाणं. नदी म्हणजे शुद्ध, निर्मळ अंतःकरण. नदी म्हणजे सौख्याचा परमोच्च बिंदू. नदी उगम पावते दूर डोंगरकपारीत आणि वाहत येते लोकजीवनात. व्यापून टाकते जगण्याचा अधिकांश भाग. होऊन जाते आदिमाता. तिच्या आश्रयाने नांदत राहते संस्कृती सुखेनैव. भरभराट होत राहते. उत्कर्षाच्या लाटेवर हेलकावताना स्थिरावत राहतं जीवन.

सुट्टी संपताना मी खूप बेचैन व्हायचो. आता उद्यापासून नदी दिसणार नाही. अस्वस्थ वाटायचं. निघताना जड झालेल्या पावलात नदीच घुटमळत असायची. परतीच्या प्रवासात तिच्याशी केलेल्या निःशब्द संवादात हरवून जायचो. तिच्या स्पर्शाने मोहोरलेलं शरीर आणि तिच्या गंधाने पुलकीत झालेलं मन पुढच्या सुट्टीची वाट पाहत आठवणींच्या हिंदोळ्यावर झुलत रहायचं.

मधला खूप मोठा काळ पाखरांचे पंख लेवून अलगद पसार झाला. जगण्याच्या लढाईत नदी थोडी विस्मरणात गेली. धावपळीच्या पावलांनी उडवलेली धूळ तिच्यावर हळूवारपणे साठत गेली. तरीही ती देत राहिली दर्शन अधूनमधून. मीही उचंबळत राहिलो बेहोष होऊन. नोकरीच्या निमित्ताने फिरत फिरत प्रवरेच्या काठावर कोल्हारला स्थिरस्थावर झालो. आतल्या नदीने उसळी खाल्ली. धावतपळत नदीवर गेलो. नदीच्या दर्शनाने प्रचंड निराश झालो. कोरडीठाक पडलेली नदी. वाळूउपशाने जागोजागी निर्माण झालेल्या खड्ड्यातून साचलेलं गढूळ पाणी. गावातलं सांडपाणी वाहत येऊन नदीपात्रात सडू लागलेलं. विसर्जनानंतर भंगलेल्या गणेशमुर्तींचे असंख्य सांगाडे. जागोजागी नदीपात्रात पेटवून दिलेला कचरा. चमचमणारी रेती परागंदा झालेली. नदीकाठावरचा हिरवागार आशय करपून गेलेला. दशक्रिया, तेराव्याच्या निर्माल्यखुणा इथेतिथे ठळकपणे उमटलेल्या. शोधू म्हंटलं हरवलेलं बालपण तर एकही शंख-शिंपला सापडेना. खिन्न झालो. उदास झालो. व्याकूळ होऊन हुडकत राहिलो काहीबाही. पूर्वस्मृतींवर उमटलेल्या सगळ्याच प्रतिमा धुसर होत गेल्या. निघताना तिला ‘नदीमाय’, ‘नदीबाई’ म्हणून काळजाच्या देठापासून हाक मारली आणि हंबरडा फोडला. त्या हंबरड्याचीच ही कविता ‘नदीबाई’.

‘नदीबाई’ कविता यथावकाश पुरवणीत छापून आली. कवितेच्या खाली मोबाईल नंबर दिलेला होता. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून दिवसभर कविता आवडल्याचे फोन येत होते. प्रत्येकाच्या मनातली अस्वस्थता, कोलाहल मी त्या कवितेत मांडला होता. त्यामुळे प्रत्येकाला ती कविता आपली स्वतःची कविता वाटत होती. प्रत्येकजण काहीतरी हरवल्याची खंत व्यक्त करीत होता. पुढील आठवडाभर फोन येतच होते. त्या कवितेने पुन्हा एकदा तो भूतकाळ जसाच्या तसा माझ्यासमोर उभा केला. मला भूतकाळात रमायला आवडतं. त्यामुळे बरेचदा वर्तमानातले काही क्षण माझ्या हातून निसटून जातात. त्याची खंत न बाळगता मी पुन्हा पुन्हा त्या सुरम्य भूतकाळाला बिलगत राहतो.

‘नदीबाई’ कवितेने माझ्या प्रवाहात खूप साऱ्या मित्रांचं प्रेम नकळतपणे मिसळून दिलं. मी आणखी प्रवाही झालो. परंतु अजूनही मनात एक खंत जागी आहे. कोरड्या पडलेल्या नद्या बारोमास वहाव्यात म्हणून माझ्या अंतरंगातली नदी माझ्या पापण्यांच्या आड मी कोंडून धरली आहे.

नदीबाई

नदीबाई नदीबाई का गं अशी दुःखी?

क्षीण झाली धार तुझी म्हणून का मुकी?

डोंगराच्या पलीकडे तुझे घर-दार

सोडताना कासावीस होतेस ना फार?

वाट तुझी नागमोडी गर्द रानातून

शीळ येते कानी ऐकू धुंद पानातून

फुसांडत होती जेव्हा, होता तुझा धाक

आता तिथे मर्तिकाची उडे फक्त राख

काठावर दोन्ही तुझ्या उदंडशी वाळू

नेली कुणी उचलोनी रेती चाळू चाळू

शंख-शिंपल्यांची सृष्टी तुझ्या पुळणीत

बाळमुठीतून आले स्वप्न पापणीत

आता तुझे बघताना मलूलसे मुख

डोळ्यावाटे चंद्रभागा, काळजात दुःख

येतील का परतून प्रवाही ते दिस?

नदीबाई तुझ्यासाठी जीव कासावीस!

-शशिकांत शिंदे

(९८६०९०९१७९)

- Advertisment -

ताज्या बातम्या