आजाराचा बाजार...

आजाराचा बाजार...

रोहित खैरनार

सध्या कोवीडची दुसरी साथ आटोक्यात येते आहे. अनेक डॉक्टर्स मंडळी जीव धोक्यात घालून रुग्णांना बरे करीत आहेत. सेवाभावाचे उत्तम उदाहरण दिसत आहे. मात्र काही डॉक्टर मंडळी अशा बिकट स्थितीतही आपल्या सेवा व्यवसायाचा धंदा मांडत आहेत. दुदैवाने अशी उदाहरणे जिकडे तिकडे दिसत असल्याने समाजमन व्यथित झाले आहे. खऱ्या अर्थाने सेवाभाव करीत असलेल्या देवदुतांप्रति आदरभाव कायम ठेऊन मला आलेला कटू अनुभव आपल्या समोर ठेवत आहे. हेतू हाच की अशा समाज विघातक प्रवृत्तींवर वेळीच कारवाई झाली पाहिजे...

नाशिकमधील एका कोवीड रुग्ण हॉस्पिटलमध्ये दाखल होतो. वय सुमारे 80 च्या आसपास. ऑक्सिजन लेव्हल 90 व एचआरसीटी स्कोअर 12. परंतु तरी देखील तेथील डॉक्टर पेशंट तपासण्याआधीच नातेवाईकांना वारंवार रुग्ण गंभीर आहे असे सांगतो. पेशंटची रवानगी त्वरीत आयसीयुमध्ये केली जाते. आयसीयू नावालाच, तिथे साधी एसीची सुविधाही नाही. तशातच हॉस्पिटलला शिरस्त्याप्रमाणे ऍडव्हान्स व मेडीकल दुकानात ऍडव्हान्स जमा करावा लागतो. ऍडव्हान्स दिल्यावर औषधांचा भडीमार सुरू.

दुसर्‍या दिवशी रेमडीसिवीरचे दोन इंजेक्शन दिले जातात. तिसर्‍या दिवशी परत रेमडेसिवीर व चौथ्या दिवशी टॉसिलिझुमॅब इंजेक्शन लिहून दिले जाते. मेडीकल दुकानात 47000 सांगतात. परंतु गावात रू.43000 ला इंजेक्शन मिळते ते दिले. सदर इंजेक्शनची एमआरपी 52000 असते. पाचव्या दिवशी पुन्हा रेमडेसिवीर व प्रोटीन्स देण्यासाठी रू.6000 चे इंजेक्शन देण्यात येते. तोपर्यंत पेशंटच्या कोणत्याही नातेवाईकास भेटण्याची परवानगी नाही. पाचव्या दिवशी संध्याकाळी अचानक ऑक्सिजन लेव्हल 60 वर येते व बायपॅप लावले जाते. त्यावेळी डॉक्टरांना विनंती केली जाते की पेशंटला नातेवाईकांना भेटू द्या. खूप विनंत्या केल्यावर परवानगी मिळते.

पेशंटला भेटल्यावर पेशंटचे फक्त डोळे उघडे बाकी काहीच रिस्पॉन्स नाही. 6 व्या दिवशी पुन्हा रेमडेसीवीर व टॉसिलिझुमॅब इंजेक्शनची चिठ्ठी येते तोपर्यंत पेशंटची तब्बेत निम्मी झालेली असते. कारण तीन दिवसांपासून पेशंटला नाष्टा, जेवण नसते फक्त इंजेक्शनचा भडीमार... रोज 14000 चे इंजेक्शन वेगळे दिले जात होते. परंतु त्याची कल्पना पेशंटच्या नातेवाईकांना दिली गेली नाही.

मेडीकल दुकानदार रोज आवाज द्यायचा (बील 80,000 झाले पाचव्या दिवशी) 6 व्या दिवशी 1,40,000 झाले. शिवाय टॉसिलिझुमॅबचे 43000 वेगळे. 6 दिवसात मेडीकल बील 1,83,000 व हॉस्पिटल बील 56,600 अधिक लॅबचे बील 20,650 वेगळे. 6 दिवसात हॉस्पिटलचे बील रू.260,000 व 7 व्या दिवशी पेशंट इहलोकात....

पेशंटचे नातेवाईक पेशंटला दररोज नाष्टा व जेवणाचे डबे द्यायचे ते डबे सुध्दा तसेच भरलेले परत आले म्हणजे पेशंटला जेवण भरवण्याची सुध्दा काळजी घेतली जात नव्हती. फक्त औषधांचे डोस दिले जात होते.

दोन-तीन डॉक्टरांनी सदर हॉस्पिटल भाड्याने घेऊन कोवीड सेंटर सुरु केले आहे. एक एमबीबीएस, एम.डी. झालेला डॉक्टर मानधनावर आहे. ते रोज सकाळी एक ते दिड तास येऊन पेशंट तपासून पेशंटची तब्येतीची माहिती नातेवाईकांना देणे व औषधांची यादी मेडीकलला देणे अशी दिनचर्या असते

सुरूवातीस तीन-चार दिवस पेशंट ओके आहे. स्टेबल आहे आणि काळजी करण्यासारखे नाही असे सांगितले गेले व पाचव्या दिवसापासून अचानक पेशंट क्रिटीकल आहे, आपण त्यांना घरी किंवा इतर हॉस्पिटलला घेऊन जाऊ शकता असाही निरोप दिला गेला. पेशंटचा वयाचा विचार न करता भरमसाठ औषधांचा मारा करणे व रोजी सरासरी 25 ते 30 हजाराची औषधे देणे असा उपक्रम सुरु होता. शिवाय पीपीई किटचे दररोज 1200 रू. बिलात लावले गेले. एकाच पीपीई कीटवर आयसीयु मधील सर्व पेशंट तपासतात. परंतु प्रत्येक पेशंट कडून रू.1200 ही फसवणूक नाही तर काय म्हणायचे?

शिवाय हॉस्पिटलच्या बीलासोबत मेडीकल दुकानाचे बील डॉक्टरच फायनल करतात. म्हणजे मेडीकल दुकानात सुध्दा हॉस्पिटलची भागीदारी आहे असा अर्थ काढायचा का?

एवढा लाखोंनी खर्च करून 6 दिवसात पेशंटला संपवतात. याची खंत नक्कीच आहे. डब्ल्यूएचओने रेमडेसिवीर वर बंदी आणली तरी हेच इंजेक्शन देतात. या रोगावर कोणतेही खात्रीशीर औषध नसतांना एवढ्या इंजेक्शनचा भडीमार का केला जातो? नाशिकमध्ये आज 188 कोवीड डॉस्पिटल आहेत. अगदी गल्ली बोळात चहाच्या दुकानासारखे हॉस्पिटल आहेत. काही ठिकाणी तज्ज्ञांचा पत्ताच नाही, व्हिजिटींग लेक्चरर सारखे डॉक्टर एक दोन तासासाठी हजेरी लावतात आणि धंदेवाईक अननुभवी डॉक्टर्स खोर्‍याने पैसे लुबाडतात.

दोन-चार डॉक्टर एकत्र येतात, एखादी बिल्डींग, हॉटेल भाड्याने घेतात. त्यात ऑक्सीजनची तोडकी मोडकी व्यवस्था करतात, इतर साहीत्य आणतात व कोवीड सेंटरचा बोर्ड लावून महानगर पालीका आरोग्य विभागाची परवानगी घेऊन सुरू करतात. एखादी चहा टपरी सुरु करण्याएवढे हे सोपे करुन ठेवले आहे मात्र रुग्णांचा हकनाक बळी जातो याकडे लक्ष द्यायला कुणाकडेच वेळ नाही. पेंडामिकच्या नावाखाली सर्व खपवले जात आहे.

पेशंटकडे पाहून नातेवाईक घर, शेती, जमीन विकून हॉस्पिटलची बीले भरतात व शेवटी हातात काय पडते? आपल्या माणसाचे शव... काल, परवाच नाशिकमधील दोन हॉस्पिटलला बंद करण्याची कार्यवाही केली. भरमसाठ बील आकारल्यामुळे त्यांची मान्यता रद्द करण्यात आली. असा प्रकार 90 टक्के हॉस्पिटलमध्ये सुरु आहे. फक्त मोजक्या हॉस्पिटमध्ये योग्य बील आकारले जाते. बाकी सगळीकडे आजाराचा बाजार भरवला गेलेला आहे. जागरुक लोकप्रतिनिधी, कर्तव्यदक्ष अधिकार्‍यांनी ही दुकानं ताबडतोब बंद केली पाहिजेत. अन्यथा आपल्यांचा जीव व पैसा गमावून बसलेल्यांचा उद्रेक होईल आणि परिस्थिती हाताबाहेर जाईल.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com