Friday, April 26, 2024
Homeब्लॉगBlog : पालकांनो, जागृत व्हा!

Blog : पालकांनो, जागृत व्हा!

नाशिक | तरुणा समनोत्रा

प्रिया एक मोठ्या शाळेत शिकत होती. दरवेळी शाळेत होणार्‍या पालक सभेला जायला तिची आई घाबरत असे. रात्रभर तिला झोप लागेना. तशीच परिस्थिती प्रियाची होती. उद्या आपल्याला शाळेत काय-काय ऐकावे लागेल, या विचाराने दोघीही धास्तावत. कारण प्रिया अभ्यासात इतर मुलांपेक्षा मागे होती. शिक्षकांच्या शब्दांत ती ‘आळशी’ व ‘कामचुकार’ होती…

- Advertisement -

वर्गातील मुले तिला ‘ढ’ समजत व तिची खिल्ली उडवत. मुले खिल्ली उडवत असल्याने ती सतत उदास राहत असे. आजारी पडे आणि शाळा चुकवत असे. घरीसुद्धा सगळ्यांचे बोलणे ऐकत व मार खात. आता तर स्वत:कडे बघण्याचा तिचा दृष्टिकोन नकारात्मक झाला होता. आपण सगळ्यांपेक्षा कमी आहोत, मागे आहोत असे तिला वाटत होते.

खरे तर ती संभाषणात खूप चांगली होती, पण आपल्या शैक्षणिक व्यवस्थेत हा विषय नसल्याने तिचे हे गुण काहीसे झाकले गेले आणि तिला स्वत:लादेखील याचा विसर पडला. तिच्या आईला मात्र ‘माझी मुलगी ‘ढ’ नाही.

कुठे तरी काही सुटत आहे’ असे वाटत असे. तिच्या आईने मन घट्ट केले व घरच्यांचा विरोध पत्करून मानसोपचार तज्ज्ञांची वेळ घेतली. तिचे सगळे बोलणे ऐकल्यावर मानसोपचार तज्ञांनी तिला बुद्ध्यांक (आयक्यू) आणि शैक्षणिक मूल्यांकन(एज्युकेशन असिसमेंट) करण्याचा सल्ला दिला. प्रियाचे बुद्ध्यांक मापन (आय क्यू लेव्हल) केल्यावर ते 140 आले.

त्या ‘विशेष देणगी’ (गिफ्टेड) असे मानले जाते. ते ऐकल्यावर तिची आई रडू लागली. कारण मुलीबद्दल असे सकारात्मक शब्द त्यांनी कधीच ऐकले नव्हते. ‘मग ती अभ्यासात मागे कशी?’ असे शांत झाल्यावर त्यांनी पटकन विचारले. तिला ‘डिस्लेक्सिया – लर्निंग डिसअ‍ॅबिलिटी’ आहे, असे त्यावर उत्तर आले. हा कोणताही आजार नसून अध्ययनात असलेली कमतरता आहे. ही मुले खूप हुशार असतात, पण शब्दरचना, शब्दस्वर समजणे याचा त्यांना त्रास होतो. या मुलांना वेगळ्या रितीने शिकवणे हाच त्यावरचा उपाय आहे.

ही मुले शालेय जीवनात प्रामुख्याने पुढील काही लक्षणे दाखवतात:

1) बुद्ध्यांक (आयक्यू) चांगला असून त्यांना लिहिता-वाचता येत नाही.

2) शब्द उलटे लिहिणे, वाचणे जसे: की ‘बी’ हा ‘डी’ काढणे, ‘पी’ हा ‘क्यू’ काढणे, 21 हा अंक 12 काढणे.

3) स्वर आणि शब्दोच्चारात गोंधळ होत असल्याने सोपे शब्द लिहिण्यात अडचण येणे.

4) सोपी गणिते सोडवण्यात अडचण येणे, चिन्हे समजताना गोंधळ होणे.

5) तोंडी सगळी उत्तरे, माहिती सांगता येते, पण लिहिताना अडचणी येतात.

योग्य (रेमेडियल ट्रेनिंग) घेतल्यास ‘डिस्लेक्सिया’सोबत जगणे सोपे जाते. प्रियाच्या आईला ते समजवण्यात आले. मग दोघींचा सुंदर प्रवास सुरू झाला. हळुहळू प्रियाला वाचन करता येऊ लागले. शब्द बनवून लिहिता येऊ लागले. तिचा हरवलेला आत्मविश्वास परत मिळाला.

माझी मुली इतर मुलांसारखी नाही. तिला डिस्लेक्सिया आहे, मला माहिती आहे. तिच्या अभ्यासात सुधारणा होण्यास वेळ लागेल, असे पालकसभेला न घाबरता तिची आई शिक्षकांना म्हणाली. घरीसुद्धा वातावरण आनंदी होण्यास सुरूवात झाली.

मग काय, प्रिया संभाषण स्पर्धेत भाग घेऊ लागली. त्यात ती राज्यस्तरावर पहिली आली. आज ती एमबीएचे महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे. याचे श्रेय मानसोपचारतज्ज्ञ, रेमेडियल ट्रेनिंगबरोबरच तिच्या आईलाही जाते. योग्य वेळी तिच्या कमतरतेचा स्वीकार करून तिच्या आइने त्यावर उपाय केले.

जितक्या लवकर मुलांमधील अक्षमता वा कमतरतेचा स्वीकार कराल आणि त्यावर योग्य ते मार्गदर्शन घेऊन उपाय कराल, तितक्या लवकर नक्कीच चांगला निकाल मिळेल हे पालकांनी समजून घेणे आवश्यक आहे.

लवकर लक्ष पुरवणे खूप फायद्याचे असते. आपल्या पाल्यात कोणतीही लक्षणे वा अडचणी दिसल्यास जाणकारांचा सल्ला घ्या. उशीर झाला तर नैराश्य, चिंता, आत्मविश्वास कमी होणे, शाळेत न जाणे असे परिणाम दिसून येतात. म्हणून वास्तवाचा स्वीकार करा आणि मुलांच्या प्रगतीची वाट मोकळी करा. पालकांनो, जागृत व्हा. चला शोधू डिस्बॅलिटीमध्ये अ‍ॅबॅलिटी!

– तरुणा समनोत्रा (लेखिका मानसोपचारतज्ज्ञ आणि ट्रेनर तसेच नाशिकच्या अ‍ॅबॅलिटी फाऊंडेशनच्या संस्थापिका आहेत.)

- Advertisment -

ताज्या बातम्या