मगच म्हणावे, अतिथी देवो भवः

मगच म्हणावे, अतिथी देवो भवः

सध्या भारतीय पर्यटक जसे परदेशी पर्यटनस्थळी सर्रास जातात, तसे ग्लोबल टुरिस्ट भारतात येतात का? खेड्यापासून मेट्रो शहरांपर्यंत देश डिजिटल झालाय. छोट्या गावातही ऑनलाईन पेमेंट सुविधा उपलब्ध आहे. मात्र या क्षेत्राच्या विकासासाठी वर्षानुवर्षे प्रयत्न करावे लागतात. इन्फ्रास्ट्रक्चर उभे करावे लागते, विश्वासार्हता कमवावी लागते. मगच ‘अतिथी देवो भव:!’ असे म्हणता येते. या पातळीवर भारतातले पर्यटन क्षेत्र नेमके कुठेय?

उदय निरगुडकर, अभ्यासक

एका इंग्रजी वर्तमानपत्रातल्या पहिल्या पानावर छापलेल्या बाजू-बाजूच्या दोन बातम्यांनी माझ लक्ष वेधले. एका बातमीमध्ये दिवाळीच्या सुट्टीत सहलीला जाण्याचे प्रमाण मध्यमवर्गात कसे कमालीचे वाढले आहे याची आकडेवारीसकट मांडणी केली होती. तर दुसर्‍या बातमीत या सरकारसमोरील सर्वात मोठे आव्हान हे दोन कोटी रोजगारनिर्मितीचे आहे अशी बातमी होती. अर्थव्यवस्थेतले जीडीपी, जीएसटी, एक्स्पोर्ट, एफडीआय, पीएमआय यासंदर्भातले आकडे चमकदार असले तरी रोजगारनिर्मिती क्षेत्रात करण्यासारखे अजून बरेच काही आहे. गंमत म्हणजे दुसर्‍या बातमीतल्या समस्येचे उत्तर पहिल्या बातमीच्या आकर्षकतेत आणि वाढी-वृद्धीत आहे. पर्यटन क्षेत्र सध्या जोमाने वाढतेय. कोविडनंतरच्या काळात भारतीय मध्यमवर्ग देशात आणि देशाबाहेर कुटुंबासह जोरदार फिरतोय.

भारत सध्या कधी नव्हे एवढा ग्लोबल झाला आहे. सर्वच अर्थाने. विशेषतः भारतीय पर्यटक देशाबाहेरील टुरिस्ट डेस्टिनेशनला जायला प्रचंड उत्सुक आहेत आणि त्यासाठी पैसेदेखील खर्च करत आहेत. इथे एक सवाल उभा राहतो. तो म्हणजे जसे भारतीय टुरिस्टची पसंती ग्लोबल ट्रॅव्हल डेस्टिनेशन ही आहे तशी ग्लोबल टुरिस्टची प्रथम पसंती भारत ही आहे का? जर तुम्ही अमेरिका, युरोप आदी देशातले आयटी उद्योजक असाल तर व्यवसायाच्या निमित्ताने केलेल्या प्रवासात भारत येणारच. आयटी सर्व्हिसेसमध्ये असाल तर तुम्हाला बंगळुरू, गुरगावला येण्याशिवाय पर्याय नाही. उत्पादन क्षेत्रात असाल तर चीनच्या खालोखाल (कोविडनंतर चीनच्या आधी) व्यवसायासाठी भारतात येण्याला पर्याय नाही. म्हणूनच इंडियन टूरिझम या विषयाची चर्चा या टूरिझम सिझनमध्ये व्हायला हवी. जागतिक पातळीवर हे क्षेत्र प्रचंड जोमान फोफावतेय. ग्लोबल जीडीपीच्या तब्बल 12 टक्के इतका वाटा या क्षेत्रातून येतो. भारतातले नैसर्गिक वैविध्य, इतिहास, अध्यात्म आदी बाबींचा विचार करता इथले टूरिझम दरवर्षी 15 टक्क्यांनी वाढून पुढच्या दशकात सव्वा कोटी नोकर्‍या उपलब्ध करून देऊ शकते, असे अनेक संशोधन अहवालातून पुढे आलेय. ज्याप्रमाणे शेती किंवा इतर उद्योगात अत्यल्प वेतन मिळते, तसे पर्यटनाच्या बाबतीत घडत नाही. तर अगदी अनस्कील्ड जॉबलाही इतर क्षेत्रांपेक्षा अधिक उत्पन्न सहज मिळते.

या क्षेत्रात उपलब्ध असलेल्या बहुतांश नोकर्‍यांसाठी प्रचंड प्रमाणावर प्रशिक्षित मनुष्यबळ लागते, असे काही नाही. अत्यल्प प्रशिक्षणाने यातले अनेक जॉब्स करता येतात, हाच अनुभव आहे. आणखी एक निरीक्षण म्हणजे नर्सिंग आणि आय.टी. क्षेत्राप्रमाणे या क्षेत्रातल्या विविध जॉबसाठी महिलांचा सहभाग पुरुषांच्या बरोबरीने आढळून येतो. म्हणूनच हे क्षेत्र सर्वच अर्थांनी अत्यंत महत्त्वाचे आहे. या क्षेत्रात सेवा-सल्ल्याच्या हजारो संधी उपलब्ध होऊ शकतात. टूर ऑर्गनाईझ करणारे ट्रॅव्हल एजंट, प्रत्यक्ष प्रवास करणारे टॅक्सीचालक, पर्यटनस्थळी मार्गदर्शन करणारे टुरिस्ट गाईड, हॉटेलमध्ये विविध प्रकारच्या सेवा देणारा कर्मचारीवर्ग, उत्तम आचारी या सगळ्यासाठी आवश्यक असणारे आय.टी. सेवांचे जाळे चालवणारे इंजिनिअर्स, मार्केटिंग करणारे विक्रेते एक ना अनेक व्यावसायिक इथे कार्यरत राहू शकतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोणत्याही वयोगटातल्या व्यक्तीसाठी या क्षेत्राची दारे खुली आहेत. इतर क्षेत्रातल्या सेवेचा अनुभव इथे उपयोगी पडतो. त्यामुळे इतर क्षेत्रातून इथे यायचे प्रमाण खूप मोठे आहे. प्रशिक्षित, अर्धप्रशिक्षित आणि अल्पप्रशिक्षित अशा सर्वांसाठी इथे संधी आहेत. म्हणूनच भारतीय अर्थव्यवस्थेत या क्षेत्राचा वाटा सात टक्क्यांच्या आसपास आहे. दरवर्षी आपल्याला सर्वसाधारणपणे 1.8 कोटी परदेशी पर्यटक लाभतात. पण या आकड्यांनी हुरळून जायचे काहीच कारण नाही. फ्रान्समध्ये नऊ कोटी तर इंग्लडंमध्ये चार कोटी पर्यटक येतात. 100 कोटी जागतिक पर्यटकांमध्ये आपला वाटा दोन टक्क्यांपेक्षा कमी आहे.

आपल्या देशातली नैसर्गिक विविधता, अद्भूत निसर्गाविष्कार, एकीकडे हिमालयाची उत्तुंग शिखरे तर दुसरीकडे विशाल समुद्रकिनारे, साहसी पर्यटनासाठी अनेक उत्तम स्थळे तर आत्मिक शांततेसाठी अनेक केंद्रे... इतकेच काय, धूमधडाक्यात लग्न करायची असली तरी एनआरआयसाठी भारत हेच डेस्टिनेशन असू शकते.

याव्यतिरिक्त देशांतर्गत प्रवास करणार्‍यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. नवनवीन आकर्षक टुरिस्ट डेस्टिनेशन्स तयार होत आहेत. गुजरात इथला सरदार वल्लभभाई पटेल यांचा जगातला सर्वात उंच पुतळा, काशी विश्वनाथ, अयोध्या अशी कित्येक आकर्षक पर्यटनस्थळे आता विकसित झाली आहेत. देशी पर्यटकांपेक्षा परदेशी पर्यटकांमधून जास्त फायदा होतो, असा सर्वच देशांचा अनुभव आहे. परंतु या स्पर्धेत अमेरिका, जपान, स्वित्झर्लंड, जर्मनी, फ्रान्स या देशांनी प्रचंड आघाडी घेतली आहे. याचा अर्थ त्या देशात अनेक देखणी नैसर्गिक स्थळे आहेत आणि आपल्याकडे नाहीत असा नसून अशा स्थळांभोवती पर्यटनसेवेचे जाळे आणि अफलातून अनुभव गुंफण्यात त्या देशांना यश आले आहे, ही वस्तुस्थिती आहे.

तिथल्या सरकारांनी पर्यटनाच्या विकासासाठी केलेली गुंतवणूक, दाखवलेली व्यावसायिकता, आखलेली धोरणे, त्यासाठी केलेली कालबद्ध अंमलबजावणी पर्यटन क्षेत्राच्या विकासाला कारणीभूत आहे. गंमत म्हणजे जवळपास प्रत्येक केंद्रीय अर्थसंकल्पात पर्यटन क्षेत्राला चालना देण्याची वार्ता केली जाते. तरीदेखील या क्षेत्रात करणे बाकी असलेल्या घडामोडींची यादी मोठी आहे.

भारतात पर्यटनाला येण्यासाठी लागणारा व्हिसा मिळवताना अनेक परदेशी पर्यटकांना येणारे अनुभव दाहक आहेत. पर्यटनासाठी आवश्यक असणारी विमानसेवा, देशांतर्गत प्रवास सेवा, उत्तम हॉटेल्स, स्वच्छता आणि चित्ताकर्षक अनुभव याबाबत करण्यासारखे भरपूर आहे. एकीकडे जागतिक पर्यटनाची मागणी वाढत आहे तर दुसरीकडे भारतातली देशांतर्गत टुरिस्ट डेस्टिनेशन्स खुणावत आहेत. तरीदेखील जागतिक पर्यटन नकाशावर भारताचा ठसा उमटत नाही.

याला आणखी एक कारण म्हणजे आपली छबी बदलणे आवश्यक आहे. पर्यटनभिमुखता केवळ पुस्तकात नव्हे तर आमच्या वागणुकीतल्या आदरातिथ्यात दिसायला हवी. परवा सहज गेट वे ऑफ इंडियावर फिरायला गेलो होतो. तिथे अनेक परदेशी जोडपी हिंडायला आली होती. मात्र आपल्याकडचे अनेक उत्साही त्यांच्याबरोबर फोटो, सेल्फी काढून भंडावून सोडत होते. मी जवळपास 60 देशांचा प्रवास केलाय. जगातल्या कोणत्याही पर्यटनस्थळी माझ्या ब्राऊन कातडीकडे पाहून कोणा स्थानिकाने फोटो काढल्याचा अनुभव नाही. मग ही गुलामी मानसिकता स्वातंत्र्यानंतर 75 वर्षे झाली तरी आमच्या हाडीमाशी अजूनही कशी रुजलेली?

सध्या जगभर पर्यटनात एक नवीन ट्रेंड आहे आणि तो म्हणजे ग्रीन टूरिझमचा. त्यासाठी विजेवर चालणारी वाहने, इकोफ्रेंडली हॉटेल्स, प्लॅस्टिकचा वापर वर्ज्य... एकूणच पर्यटनामुळे निसर्गस्थळांच्या मूळ विश्वात कोणताही बदल घडू नये यासाठी दक्षता घेण्याजोग्या अनेक गोष्टींना पर्यटक खूप महत्त्व देत आहेत. त्यासाठी जादा चार पैसे मोजायला तयार आहेत. आपल्याकडे अजून इतकी जागरुकता आलेली नाही. एका दशकापूर्वी लडाखमध्ये दरवर्षी 30 हजार पर्यटक यायचे. आज तोच आकडा चार-पाच लाखांवर जाऊन पोहोचलाय. ही बाब जितकी आनंदाची तितकीच चिंतेची. याचे कारण लडाखमधल्या अनाघ्रात निसर्गसौंदर्याला, शांततेला, पर्यावरणाच्या संतुलनाला धोका पोहोचतोय. व्हिएतनामसारखा छोटा देशही परदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी साहसी पर्यटन ते अलिशान पर्यटन अशी अनुभवांची रेंज अल्पावधीत तयार करू शकतो. आज जागतिक पर्यटनाच्या क्रमवारीत या देशाचा क्रमांक भारतापेक्षा खूप वर आहे. आपण 54 व्या क्रमांकावर आहोत. प्रश्न आहे, हे चित्र कसे बदलणार याचा.

देशात मेडिकल टूरिझम खूप वाढतेय. केरळमध्ये अनेक ठिकाणी परदेशी पर्यटकांसाठी विशेष विभाग राखून ठेवलेले दिसतात. वैविध्यामुळे या देशातले फूड टूरिझम परदेशात लोकप्रिय होतेय. त्याचे व्यवस्थित मार्केटिंग व्हायला हवे. एकट्या महिलेने प्रवास करण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. त्यांच्यासाठी सुरक्षितता आणि स्वच्छता ही प्राधान्याची बाब असते. या बाबतीत आपली अवस्था न बोललेलीच बरी. एका बाबतीत मात्र आपण पहिल्या क्रमांकावर आहोत आणि ते म्हणजे ग्रामीण भारतापासून मेट्रो शहरापर्यंत भारत डिजिटल झालाय. अगदी छोट्या गावातही ऑनलाईन पेमेंट सुविधा उपलब्ध आहे. पर्यटनात वेगवेगळ्या शाखा निर्माण होत आहेत. पुण्यातून राधिका नवरे यांनी अशीच हँडीक्राफ्ट टूरिझमची शाखा विकसित केलीय. परदेशी पर्यटकांचे ग्रुप्स घेऊन त्या देशभरात प्रत्यक्ष उत्पादनाचा, स्थानिक वास्तव्याचा अनुभव पर्यटकांना मिळवून देतात. या क्षेत्रामध्ये एका रात्रीत बदल घडत नाहीत. त्यासाठी वर्षानुवर्षे प्रयत्न करावे लागतात. इन्फ्रास्ट्रक्चर उभे करावे लागते, गुंतवणूक करावी लागते. विश्वासार्हता कमवावी लागते. मगच ‘अतिथी देवो भव:’ असे म्हणता येते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com