..तरच सेंद्रिय शेतीची भरभराट!

..तरच सेंद्रिय शेतीची भरभराट!

सिक्कीमने देशातील पहिले सेंद्रीय राज्य होण्याचा मान मिळवला आहे. केरळनेसुद्धा सेंद्रीय शेतीला आपल्या राज्यात मोठे प्रोत्साहन दिले आहे. कारण या दोन राज्यांतील कृषीतज्ज्ञांना आणि विशेषत: शेतकर्‍यांना सेंद्रीय शेतीचे महत्त्व लक्षात आले आहे.

गेल्या पाच दशकांपासून देशाच्या लोकसंख्येत वाढ होत गेली. वाढत्या लोकसंख्येची अन्नाची गरज भागवण्यासाठी जास्तीत जास्त धान्य उत्पादन मिळवण्याच्या उद्देशाने नवनवीन शेतीत सुधारीत तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात केला गेला. त्यामुळे भरपूर धान्य उत्पादन होऊ लागले, पण त्या बदल्यात पर्यावरणाची मात्र मोठी हानी झाली. रासायनिक खते, कीटकनाशकांचा अतिरिक्त व अनियमित वापरामुळे आपल्या जमिनीचा पोत खराब झाला. हवा, पाणी व अन्न यांच्यातील प्रदूषणातही वाढ झाली. रासायनिक खते व कीटकनाशकांच्या अतिरिक्त व अनियमित मात्रा वापरल्या गेल्या. परिणामी बर्‍याच अन्नधान्यात लिंडेन, डीडीटी, अल्ड्रिन आदी रसायनांचा अंश आढळून आला आहे. या सर्व गोष्टी काळजी करण्यासारख्या आहेत.

चांगल्या प्रतीचे शुद्ध अन्नधान्य उत्पादनासाठी सेंद्रीय शेतीची गरज वाढली आहे. भारतात एकूण शेतीखालील क्षेत्रापैकी फक्त 30 टक्के क्षेत्र बागायती आहे. याच क्षेत्रात रासायनिक खते, संप्रेरके आणि कीटकनाशकांचा अतिरिक्त व अनियमित वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. उरलेले 70 टक्के क्षेत्र जिरायती आहे. या क्षेत्रात अशा गोष्टींचा फारच थोडा वापर केला जातो. दरवर्षी भारतात सुमारे 700 लाख टन शेतातील काडी-कचरा तयार होतो. आपल्याकडे मूलद्रव्यांचे व्यवस्थापन करण्याच्या 50 पद्धती उपलब्ध आहेत. त्यात व्हर्मिकंपोस्ट व जिवाणू खते यांचा समावेश होतो.

भारतात तर रासायनिक खते व कीटकनाशके यांचा अतिरिक्त व अनियमित वापर गेल्या 40 वर्षांत वाढला आहे. मग त्यापूर्वी भारतात शेती होत नव्हतीच का? शेतीची परंपरा 10 हजार वर्षांची आहे. म्हणजे रासायनिक खतांचा वापर न करताही शेती होऊ शकते. किंबहुना ती तशी 10 हजार वर्षांपासून होत आली आहे. ती शेती रसायनांचा वापर न करता केली जात होती. ती बिगर रासायनिक शेती आहे. तिलाच ‘सेंद्रीय शेती’ असे म्हटले जाते.

सेंद्रीय शेतीत उत्पादन काढण्यासाठी रसायनांचा वापर न करता निसर्गातून उपलब्ध झालेल्या सेंद्रीय पदार्थांचा वापर केला जातो. परंपरेने अनेक शेतकरी तसा वापर करत आले आहेत. खत म्हणून गुरांच्या शेणाचा, मलमूत्राचा वापर मोठ्या प्रमाणावर केला गेला, आजही केला जात आहे. पुन्हा एकदा त्याच जैविक साधनांचा वापर करून शेती करणे यालाच सेंद्रीय शेती म्हणतात. भारतानेसुद्धा सेंद्रीय शेतीमाल निर्यात करण्यासाठी युरोप, मध्य पूर्वेकडील देश व अमेरिका यांच्याबरोबर व्यापार सुरू केला आहे. सेंद्रीय शेतीतून तयार होणार्‍या शेतमालासाठी काय गुणवत्ता हवी, याविषयी जागतिक पातळीवर अनेक संस्था-संघटना कार्यरत आहेत. त्यामुळे सेंद्रीय शेती करण्याकडे जागतिक पातळीवर दिवसेंदिवस शेतकर्‍यांचा कल वाढत आहे. म्हणूनच जगात सेंद्रीय शेतीखालील क्षेत्र सुमारे 22 लाख हेक्टरपर्यंत वाढले आहे.

सेंद्रीय शेतीचे उद्देश आणि फायदे

1) सेंद्रीय पदार्थाने जमिनीचा सामू बदलण्यास अडथळा येऊन जमीन आम्ल, विम्ल व क्षारयुक्त होत नाही.

2) सेंद्रीय शेतीमुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यात मदत होते.

3) सेंद्रीय खतांमुळे स्फुरद व पालाश झाडांना विविध अवस्थेत उपलब्ध होते. झाडांमध्ये मुळांकडून शोषली जातात.

4) शेणखत, कंपोस्ट खत, पेंडी, वनस्पतीजन्य कीडनाशके व रोगनाशके आदींचा जास्तीत जास्त वापर करणे.

5) रासायनिक खते, कीटकनाशके यासारख्या बाह्य घटकांचा कमीत कमी वापर किंवा वापर न करणे किंवा पूरक घटक म्हणून वापर करणे.

6) नैसर्गिक उत्पादन प्रक्रियेशी वरचढ न करता उत्पादन घेणे.

7) जमिनीतील जैवविविधता टिकवण्यासाठी जिवाणू, वनस्पती, प्राणी यांचे संवर्धन करणे.

8) कृषी तंत्रज्ञानाचा वापर करताना कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होणार नाही याची काळजी घेणे.

9) उत्पादकांना त्याच्या शेती व्यवसायातून समाधानकारक आर्थिक लाभ मिळेल, असे निर्भय वातावरण तयार करणे.

10) उच्च प्रतीचे जास्तीत जास्त अन्नधान्य उत्पादन घेणे. 11) सेंद्रीय पदार्थ व अन्नद्रव्यांची गरज आहे त्याच शेती पद्धतीत वृद्धिंगत करून भागवणे.

12) आसपास वनस्पती व वन्यजीवांची जैवविविधता साधण्यासाठी पर्यावरणाशी निगडीत शेती पद्धती अवलंबणे.

सिक्कीमने देशातील पहिले सेंद्रीय राज्य होण्याचा मान मिळवला आहे. सिक्कीमखालोखाल केरळनेसुद्धा सेंद्रीय शेतीला आपल्या राज्यात मोठे प्रोत्साहन दिले आहे. कारण या दोन राज्यांतील कृषीतज्ज्ञांना आणि विशेषत: शेतकर्‍यांना सेंद्रीय शेतीचे महत्त्व लक्षात आले आहे. आज देशातले पहिले सेंद्रीय राज्य म्हणून सिक्कीमला मान दिला जात आहे. सिक्कीममधील 75 हजार हेक्टर क्षेत्रावर सेंद्रीय शेती सुरू करण्यात आली आहे.

शेती विषयाची माहिती असणार्‍या आणि नसणार्‍या त्याचबरोबर शेतीशी काही संबंध नसणार्‍या अशा अनेक लोकांना सेंद्रीय शेती करणारे राज्य म्हणजे नेमके काय याचा बोध होण्याची शक्यता कमी आहे. सद्यास्थितीत देशात सेंद्रीय शेती व शेतीमाल विक्रीपर्यंतचे तंत्रज्ञान उपलब्ध होण्याची गरज आहे. त्यासाठी सरकारी पातळीवर प्रयत्न व्हायला हवेत. संपूर्ण तंत्रज्ञान उपलब्ध करण्यासाठी योग्य त्या जमिनीची निवड, पिकांची निवड, जातीची निवड, मशागतीच्या पद्धती, सेंद्रीय पदार्थांची उपलब्धता, जिवाणू खते व जैविक कीडनाशकांची उपलब्धता तसेच वेगवेगळ्या पिकांसाठी विविध हवामानात चांगले उत्पादन मिळवण्यासाठी आवश्यक असणारे तंत्रज्ञान उपलब्ध होणे गरजेचे आहे.

त्याच प्रमाणे सेंद्रीय शेतीचे प्रमाणिकरण करण्यासाठी आवश्यक असणारी माहिती व शेतीमालाची गुणवत्ता याविषयी माहिती शेतकर्‍यांना उपलब्ध होणे गरजेचे आहे. हे सर्व घटक उपलब्ध झाले तरच सेंद्रीय शेतीचा झपाट्याने विकास होईल यात शंका नाही.

(लेखक मविप्र संचलित केडीएसपी कृषी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.)

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com