तेलबियांची चिंता

तेलबियांची चिंता

आपले तेलबियांचे उत्पादन धोकादायक स्थितीत आहे. यंदाच्या रब्बी हंगामाकडे पाहिल्यास महाराष्ट्रात तेलबियांचा पेरा कमी झाल्याचे दिसत आहे. राज्यात मराठवाडा आणि विदर्भात तेलबियांची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. यामध्ये भुईमूग, करडई, सूर्यफूल आणि जवस ही रब्बीतील तेलबियांची पिके आहेत. दोन दशकांपूर्वीचा विचार केल्यास 2000-2001 मध्ये राज्यात करडईचे क्षेत्र सुमारे तीन लाख हेक्टर होते, पण यंदा करडई फक्त 26 हजार हेक्टरवर येण्याची शक्यता आहे. शेतकरी तेलबियांकडे का पाठ फिरवतोय याची मिमांसा करून धोरणात्मक उपाययोजना करणे गरजेचे आहे.

आर्थिक विकास या शब्दाचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा प्रामुख्याने आपल्या डोळ्यांसमोर औद्योगिक विकासच असतो. शेतीचा विकासही आर्थिक विकासात समाविष्ट आहे, याचे आपल्याला विस्मरण होते. शेतीवर अवलंबून असणारी लोकसंख्या प्रचंड वाढल्यामुळे जमिनीचे विभाजन मोठ्या प्रमाणावर झाले आणि शेती परवडण्याजोगी राहिली नाही, हे खरे आहे. त्यामुळे औद्योगिक विकासास चालना देऊन शेतीवरील लोकसंख्येचा भार हलका करणे योग्यही आहे. तथापि आजच्या आधुनिकीकरणाच्या जमान्यात स्वयंचलित यंत्रांची संख्या वाढत असल्यामुळे औद्योगिक क्षेत्रातील रोजगारनिर्मितीचा दर खूपच घसरला आहे. विकास होताना दिसतो; परंतु मोठ्या संख्येने लोक या विकास प्रक्रियेबाहेर फेकली जातात, असे व्यस्त चित्र दिसून येते. शेतीतसुद्धा पिकांच्या बाबतीत समतोल आढळून येत नाही. सिंचनाचा लाभ केवळ नगदी पिकांसाठी घेतला गेल्याने हा असमतोल निर्माण झाला आहे. या असमतोलाचा एक गंभीर परिणाम म्हणजे तेलबिया आणि कडधान्यांच्या बाबतीत कधीकाळी स्वयंपूर्ण असणारा आपला देश आता मोठ्या प्रमाणावर आयातदार बनला असून त्यावर मोठ्या प्रमाणावर परकीय चलन खर्ची पडत आहे. प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ आणि रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांनी भारतासारख्या देशाने परकीय बाजारपेठेकडे नजर ठेवून उत्पादन प्रक्रिया राबवू नये, असा सल्ला दिला होता. चीन अथवा अन्य पौर्वात्य देशांप्रमाणे जगाच्या बाजारपेठेत स्थान निर्माण करणे भारताला एवढ्यात शक्य होणार नसल्यामुळे भारताने देशी बाजारपेठेचा विचार करून उत्पादन प्रक्रिया राबवावी, असे त्यांचे म्हणणे होते.

आजमितीस भारत खाद्यतेलाच्या आयातीसाठी कोट्यवधी मूल्याचे परकीय चलन खर्ची पडते. या पार्श्वभूमीवर तेलबियांच्या उत्पादनास प्रोत्साहन दिले तर परकीय चलनाची बचत होऊ शकेल. त्याचबरोबर शेतकर्‍यांना योग्य भाव मिळून त्यांची आर्थिक स्थिती सुधारू शकेल; परंतु यंदाच्या रब्बी हंगामाकडे पाहिल्यास महाराष्ट्रात तेलबियांचा पेरा कमी झाल्याचे दिसत आहे. राज्यात मराठवाडा आणि विदर्भात तेलबियांची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. यामध्ये भुईमूग, करडई, सूर्यफूल आणि जवस ही रब्बीतील तेलबियांची पिके आहेत. दोन दशकांपूर्वीचा विचार केल्यास 2000-2001 मध्ये राज्यात करडईचे क्षेत्र सुमारे तीन लाख हेक्टर होते, पण यंदा करडई फक्त 26 हजार हेक्टरवर येण्याची शक्यता आहे. सूर्यफुलाच्या क्षेत्रातही वेगाने घट होत असून यंदा जेमतेम सहा हजार हेक्टरवर पेरा होण्याची शक्यता आहे. जवसाची लागवड नगण्य राहील. मागील काही वर्षांपासून रब्बी हंगामात तेलबियांच्या लागवड क्षेत्रात वेगाने घट होत आहे. कमी उत्पादकता, मजूरटंचाई आणि उत्पादन खर्चात झालेली वाढ ही यामागची कारणे आहेत.

कडधान्ये आहारात असणे उत्तम प्रकृतीसाठी आवश्यक आहे. आहारात कडधान्यांचा समावेश नसल्यामुळे गरीब लोक कुपोषित राहतात. कडधान्यांचे उत्पादन कमी झाल्यामुळे आयात वाढली आहे. परिणामी, कडधान्ये महाग झाली असून ती गरिबांना परवडत नाहीत. अनेकांना रास्त दरात कडधान्ये उपलब्धच होत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. दुसरीकडे सिंचीत शेती क्षेत्रात उसासारखी नगदी पिके मोठ्या प्रमाणावर घेण्यात येतात.

महाराष्ट्रात तेलबियांचे उत्पादन करण्यात जळगाव जिल्हा पूर्वीपासून आघाडीवर आहे. मात्र, सध्या या जिल्ह्यातील तेलबियांचे क्षेत्र नाममात्र उरले असून उत्पादन जवळजवळ संपुष्टात आले आहे. भुईमुगाची लागवड या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर होत होती. आता भुईमुगाची लागवड फार थोड्या प्रमाणात होते. जळगावसह संपूर्ण राज्यातच भुईमूग, तीळ, जवस, कारळा, सूर्यफूल ही पिके कमी होत आहेत.

भुईमूग हे तेलबियांपैकी प्रमुख पीक असून खरीप आणि रब्बीबरोबरच उन्हाळी हंगामातही भुईमुगाची लागवड होऊ शकते. तीनही ऋतूत येणारे हे पीक आता अत्यल्प प्रमाणात घेतले जाते. तेलबियांच्या पिकांचा दुहेरी फायदा होतो. एकतर तेलबियांची पिके मध्यम कालावधीची, जिरायती जमिनीत येणारी आणि आंतरपीक पद्धतीस पोषक ठरत असल्यामुळे शेतकर्‍यांना फायदा होऊ शकतो. पूर्वी गावपातळीवर तेलाचे घाणे असत आणि तेथे तेलबिया गाळून तेल काढण्यात येत असे. शेतकर्‍यांना घरचे तेल वर्षभर वापरायला मिळत होते आणि उर्वरित तेलाची ते विक्रीही करू शकत होते. देशी घाण्यातून काढलेले तेल आरोग्यवर्धक असते. या घाण्यांमधून निघणारी पेंड हा दुभत्या जनावरांसाठी पोषक चारा म्हणून वापरला जात असे, तेही जवळजवळ बंद झाले.

एकीकडे आपण गहू आणि भाताचे उत्पादन आपल्या गरजेपेक्षा अधिक करत आहोत आणि जगाला याचा पुरवठा करत आहोत, तर दुसरीकडे आपले तेलबियांचे उत्पादन कच्च्या तेलासारखेच धोकादायक स्थितीत आहे. सर्वाधिक खाद्यतेल आयात करणार्‍या देशांमध्ये भारताचा क्रमांक लागतो. आपल्या गरजेच्या तुलनेत 70 टक्के खाद्यतेल आयात केले जाते. त्यातसुद्धा पामतेलाचे प्रमाण सर्वाधिक असते. पण तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, हे तेल लोकांच्या आरोग्यासाठीही चांगले नाही आणि देशाच्या अर्थव्यवस्थेसाठीही! सध्याची परिस्थिती कायम राहिली तर काही वर्षांतच आपले खाद्यतेलाच्या आयातीवरील अवलंबित्व 80 टक्क्यांवर पोहोचेल. अशा परिस्थितीत तेलबियांचे उत्पादन वाढवण्याबाबत धोरणात्मक प्रयत्न व्हायला हवेत. गेल्या काही दशकांमध्ये गहू आणि तांदळाचे उत्पादन वाढले आहे. त्याचे प्रमुख कारण या पिकांना मिळणारा हमीभाव हे आहे. आपल्या उत्पादनाचा काही हिस्सा तरी चांगल्या किमतीवर खरेदी केला जाईल, याची खात्री शेतकर्‍यांना असते. या पार्श्वभूमीवर सरकार तेलबियांच्या उत्पादनाच्या बाबतीत खरोखर गंभीर असेल तर सरकारने एक व्यावहारिक रस्ता शेतकर्‍यांना दाखवला पाहिजे. जो पाहून शेतकरी स्वतःच तेलबियांच्या शेतीकडे वळतील, असे काहीतरी केले पाहिजे. त्याही बाबतीत पिकाच्या हमीभावात गाडे अडेल. शेतकर्‍यांचा कल तेलबियांऐवजी गहू आणि भाताच्या पिकाकडे का आहे, याचा विचारही केंद्र आणि राज्य सरकारांनी केला पाहिजे. याचे उत्तर अगदी साधे सोपे आहे. तेलबियांचे पीक शेतकर्‍यांना नेहमीच हमीभावापेक्षा खूप कमी किमतीत विकून तोट्याचा सौदा करावा लागतो. वास्तविक तेलबियांची शेती गहू आणि भाताच्या शेतीपेक्षा सोपी आणि स्वस्त आहे. अधिक फायद्याचीही आहे. हे लक्षात घेता आणि एकंदर तेलाची आयात पाहता तेलबियांच्या बाबतीत एखादे प्रोत्साहनात्मक पॅकेज देण्यासारख्या पर्यायावर तातडीने विचार व्हायला हवा. जेणेकरून शेतकरी गहू आणि तांदळासारखी पिके सोडून तेलबियांची शेती करण्याकडे वळू शकतील. यासाठी सहकारी शेतकरी बाजारांनी अशी एखादी यंत्रणा तयार केली पाहिजे, ज्याद्वारे पिकाला मिळत असलेल्या बाजारभावाचा थेट फायदा शेतकर्‍याला मिळू शकेल.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com