Friday, April 26, 2024
Homeब्लॉगब्लॉग : या गावांची रितच न्यारी सदा सुहागण इथली नारी

ब्लॉग : या गावांची रितच न्यारी सदा सुहागण इथली नारी

बला जीवन हाय तुम्हारी यही यही कहानी, आंचल में हैं दूध और आंखों में पानी’. असे राष्ट्रीय कवी मैथिलीशरण गुप्त यांचे स्त्रियांच्या व्यथे बाबतचे वाक्य सुप्रसिद्ध आहे. तिच्या रक्त मासाचे आणि दुधाचे वाटेकरी तिची लेकरं असतात पण तिचे अश्रू मात्र तिलाच गिळावे लागतात. असे म्हटले जाते यावरुन आपल्या समाजातील स्त्रियांच्या वेदनांची व्यथा अपार आहे. या वेदना कमी करण्यासाठी स्वत: महिलेपासुनच सुरुवात करत व्यक्ती आणि समाजाला महिला स्नेही शिकवण, लिंगसमभाव आणि त्यातून महिलांचे सक्षमीकरण आवश्यक आहे.

संयुक्त राष्ट्र संघाने स्विकारलेल्या एकूण 17 विकास ध्येयापैकी एक ॠशपवशी र्र्एिींरश्रळीूं म्हणजे लिंग भाव समानता हा शाश्वत विकास ध्येयातील 5 व्या क्रमांकाचे शाश्वत विकास ध्येय असून जगात लिंगभाव समानता साध्य करणे आणि महिला व मुलींना सक्षम करणे हे ब्रिदवाक्य आहे.

भारताने या ध्येयासाठी आपली वैश्विक भागिदारी स्विकारली आहे. तर पंचायती राज मंत्रालयाने यासाठी 18 विकास ध्येयांना संयुक्त स्वरूपात नऊ संकल्पनांच्या रुपाने स्विकारून आगामी पाच वर्षाकरिता कृती कर्यक्रम हाती घेतला आहे. या नऊ विषय संकल्पनेतील नववि संकल्पना म्हणजे लिंग समभाव पोषक गाव.

- Advertisement -

या संकल्पना राबविण्यात महाराष्ट्र देखील आपल्या समाजिक सुधारणा वारशाने आणि प्रागतीक कृतीशीलतेने अग्रस्थानी कार्यरत आहे. महिलांना लिंगभेदावरून दुय्यम प्रतिसाद देणार्‍या सर्व प्रथा कमी करून स्त्री-पुरुष यांना व्यक्ती विकासाच्या सर्व संधी समान स्वरुपात उपलब्ध करुन देणार्‍या व्यक्ती, कुटुंब, समाज आणि देश आणि त्यातून विश्व भेदविरहित जगण्याला लायक व्हावे असा हा ध्येय प्रवास अपेक्षित आहे. याची सुरुवात प्रत्येक स्त्री-पुरुषा पासून होते याची जाणीव आपल्याला निर्माण करायची आहे. त्यासाठी आपल्या स्वत:च्या मनमस्तिष्कात, कुटुंबात, समाजात, गावात आणि भाषा व्यवहारात अस्तित्वात असणारा महिला विषयक दूजाभाव ओळखून तो प्रयत्नपूर्वक कमी करायचा आहे. यासाठी करायचे प्रयत्न हे मानसिक, वैचारिक आणि सामाजिक आहेत. त्यामुळे याला आर्थिक संपत्ती नाही तर विचार संपत्तीची गरज आहे. ती निर्माण करणे म्हणजे हा संकल्प साध्य करण्याची कार्यवाही आहे. जगात काही प्रगत देश आहेत आणि भारतातही काही कॉर्पोरेट क्षेत्र आहेत जिथे महिलांना मासिक पाळीत रीतसर सुट्टी दिली जाते. पाळीचे दिवस आणि स्त्रीचे मानसिक शारीरिक आरोग्य जिथे स्वस्थमनाने स्वीकारले तिथे या स्त्रिस्नेही धोरणांची अंमलबजावणी झाली. आपल्याकडे कामाच्या ठिकाणी महिलांच्या या बाबींकडे अजून निरोगी, निकोप आणि मानवी चेहरा असलेली धोरणे स्वीकारणे आवश्यक आहे. म्हणजेच महिला स्नेही वाटचाल करायला आपल्याकडे अजून खूप मोठा अवकाश आहे.

मध्य युगात जेंव्हा कुठे पुरुषसत्तेने बदमाशी करत आपल्या समाजाची अर्धी शक्ती असलेल्या महिला या घटकावर अन्यायी पद्धतीने काही बंधणे लादली त्याच्या ओझ्याखाली आजही जगभरातला महिला वर्ग पिचल्या जात आहे. त्या वर्गाची सुटका व्हावी आणि त्यांनीही मुक्त श्वास घेत जीवन जगावे यासाठी जगभरातल्या देशांनी एकत्र येत 2015 साली काही चांगले संकल्प केले आणि ते साध्य करण्यासाठी 2030 ही समय सीमा निश्चित केली. त्यातला एक महत्वाचा संकल्प जो आपल्या प्रत्येकाच्या जीवनाला आपल्याच घरात स्पर्श करतो तो म्हणजे लिंगसमभाव.

मध्ययुगीन काळात स्वत:ला सभ्य म्हणवणार्‍या जगातील अनेक भागातील समुदाय, जाती, धर्मात महिलांवर बंधणे आणणार्‍या प्रथा परंपरा अभिमानाने राबविल्या गेल्या. वर्षानुवर्षांची मानसिक सवय झाल्याने या प्रथांचे ओझे आपला सांस्कृतिक दागिना म्हणून वागविण्यात महिलाही मागे राहिल्या नाहीत. इतकी मानसिक स्विकार्यता अशा प्रथांना मिळत गेली. मागास म्हणवल्या जाणार्‍या समाजात मात्र त्या तेवढ्या जाचक नव्हत्या आणि आजही पहायला मिळत नाहीत.

भारतात मात्र महिलांना दुय्यम मानत अनेक धार्मीक प्रथा परंपरांनी जखडून टाकलेले. त्यातून बाहेर पडण्यासाठी धर्म क्षेत्रातून सुधारणा होईल ही अपेक्षा नव्हतीच. म्हणून तर आपल्याकडे महाराष्ट्रातून ़फुले दांपत्यांनी सामाजिक स्तरावरून स्त्री शिक्षण देत यात सुधारणेला सुरुवात केली, महर्षी कर्वे यांनी विधवा विवाहासाठी कार्य केले, रखमाबाई राउत, पंडिता रमाबाई यांचे बाल विवाहा विरोधात केलेले कार्य अनमोल आहे. तर बंगाल मध्ये राजाराम मोहन राय यांनी पतीच्या निधनानंतर त्याच्या चितेत प्राण देण्याची प्रथा कायद्याने बंद करण्यासाठी सामाजिक संघर्ष केला. सती जाणे थांबल्यावर विधवांच्या विवाहासाठी बंगाल मध्येच इश्वरचंद्र विद्यासागर यांनी काम केले. रुढी प्रिय समाजात मरणारा मरुन जातो मात्र त्या वैधव्याच्या रुढी मागे राहिलेल्या स्त्रीचे जगणे दुष्कर बनवितो.

याच महाराष्ट्रातून कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्याच्या हेरवाड ग्रामपंचायतीने आता पुढाकार घेत नवी सुरुवात केली आहे. हेरवाड मध्ये चर्मकार समाजातील पुरुषाच्या देहांतानंतर त्या कुटुंबाचे सांत्वन करत त्यांच्या पत्नीने पतीच्या माघारी स्वत:ला दुय्यम ठरविणार्‍या प्रथा पाळू नयेत यासाठी तिथल्या सरपंचाने विनंती केली. गावातील समाजाने त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला आणि ग्राम पंचायतीने तर त्यासाठी ठरावच केला. या ठरावाच्या सुचक अनुमोदक महिला भगिनी ठरल्या हे त्यातले आणखी विशेष. याचे अनुकरण करत कोल्हापूरच्याच हातकणंगले तालुक्यातील माणगावातही असाच ठराव घेण्यात आला तर त्यापुढे जात नागपूर जिल्ह्यातील बनवाडी येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी कृतीशील पाऊल उचलले. पतीच्या निधनानंतर मंगळसूत्र किंवा काळ्या मण्यांची पोत तोडणे, कुंकू पुसणे, हातातल्या बांगड्या फ़ोडणे हा प्रकार प्रत्यक्ष अंत्यसंस्कारावेळी थांबवला.

छत्रपती शाहू महाराजांच्या जिल्ह्यातून याची सुरुवात त्यांच्याच स्मृती शताब्दी वर्षात व्हावी हा आणखी चांगला योग. याचा आणखी शक्तीदायी योगायोग म्हणजे महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री याच जिल्ह्यातले. त्यांनी आपल्या विभागामा़र्फत एक अधिकृत परिपत्रक काढून हेरवाड ग्रामपंचायतीच्या सुधारणावादी भुमिकेला उचलून धरत राज्यभराच्या पंचायतीराज संस्थांना उद्देशून असेच महिला स्नेही धोरण अंगिकारण्याच्या सूचना केल्यात.

लिंगसमभाव स्त्री पुढाकाराने का? तो खेड्यातून का? असा प्रश्न काहीवेळा पडू शकतो. त्याला उत्तर असे की भारत अजूनही मोठ्याप्रमाणावर खेड्यात राहतो. खेड्यातील व्यक्ती विशेषत: महिला सामाजिक रुढींच्या ओझ्यात अधिक दबलेली असते. तिच्या वेदना तिला सर्वाधिक अनुभवाला येतात. अजूनही निरक्षरतेचे आणि त्यातही महिलांचे प्रमाण ग्रामीण भागात अधिक आहे. महिला परावलंबी आहेत. त्या पुरुषावर अवलंबित्व असल्याने घरात आणि दारातही त्याना दुय्यम वागणूक पदोपदी मिळत असते. मालमत्तेची हाताळणी किंवा मालमत्ता मालकी किंवा आर्थिक व्यवहार आणि घरातील दैनंदिन निर्णय प्रक्रिया यात आजही महिलांना बरोबरीने सामावून घेतले जात नाही. यात त्या वंचितच असतात. हे आपल्यापैकी बहुतांश घरातले अनुभवाचे चित्र. दुय्यम वस्तूंची नावे स्त्रिलिंगी (उदा खिडकी आणि दरवाजा) किंवा मानहानीकारक बोलताना (स्त्रीलिंगीवाचक शिवी) ते शब्द स्त्रीवाचक असतात किंवा स्त्रिभाव उल्लेखून असतात. यातून व्यक्ती आणि समाजाच्या जाणीवेत हा दुय्यम भाव जन्मजात पेरला जातो.

कुठल्याही सामाजिक सुधारणेत स्त्रीचा वाटा मोलाचा असतो. महिला विषयक कुप्रथांबाबत तर महिलांच्याच मनात प्रथम याची ज्योत प्रज्ज्वलित होणे आवश्यक आहे. कारण महिलेचा विचार सर्वाधिक उत्पादक असतो. तो यासाठी की, समाजातले मूल असो अथवा मुलगी जन्मल्यानंतर त्याच्यावर सर्वात आधी संस्कार घडतो तो आई म्हणून एका स्त्री कडूनच. इतकेच काय बाळ जन्माला येण्याआधी नऊ महिन्याची सोबत आई म्हणून स्त्रीचीच असते. म्हणूनही लिंगसमभावाची जाणीव सर्वप्रथम महिला वर्गात रुजू होणे महत्वाचे आहे. हेरवाड ग्रामपंचायतीने आपल्या गावात पारंपारिक विधवा प्रथा बंदीच्या घेतलेल्या भुमिकेचे अनुकरणीय पडसाद राज्यभर उमटताहेत.

समाजात प्रचलित असलेल्या जीवनपद्धती व व्यवहार जेव्हा सदोष होऊ लागतात, तेंव्हा समाजाला पुन्हा बुद्धी आणि विज्ञाननिष्ठ पद्धतीने जागृत करण्याच्या प्रक्रियेला प्रबोधन म्हणतात. तो या महराष्ट्राच्या ग्रामीण भागातून होतोय हे या विकास ध्येयाच्या दिशेने पडणारे सकारात्मक पाऊल आहे. हेरवाड, माणगाव ते गानपूरच्या बनवाडी ची संख्या आज कमी असली तरी सद्भावना त्यांच्या पाठीशी सर्वाधिक आहे.

या गावांनी महिला विरोधी एक प्रथा मोडीत काढण्याचा पुढाकार घेतला. यासोबतच स्त्री-पुरुष लिंगसमभाव रुजविण्यासाठी आपल्या प्रत्येक पंचायत संस्थेत राबविण्याचा कार्यक्रम व्यापक असायला पाहिजे. त्यासाठी गावाच्या ध्येय दृष्टीत प्रत्येक गावामध्ये लिंगसमभाव स्थापन करण्यासाठी महिलांना समान संधी उपलब्ध करुन देणे, महिलांचे सक्षमीकरण करणे आणि मुलींना सुरक्षित वातावरण उपलब्ध करुन देणे. संवैधानिक मूल्यांचा आणि व्यक्ती स्वातंत्र्याच्या मूल्यांचा जागर करणे आवश्यक आहे.

भारतीय संविधानाच्या 14 व्या कलमान्वये देशातील सर्व नागरिकांना कायद्यापुढे समानता प्रदान करणेत आली असून धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थानाच्या आधारे भेदभाव करणेस मनाई करण्यात आली आहे. याची प्रत्यक्ष अंलबजावणी करताना गावात हाती घ्यावयाचे उपक्रम आणि त्यांचा प्राधान्यक्रम देखील ठरविणे आवश्यक आहे. त्याकरिता 1) 100% मुलींची शाळांमध्ये नोंदणी आणि त्यांचे शाळागळतीचे प्रमाण रोखणे. 2) सायबर गुन्हे आणि व्यसन/ अंमली पदार्थांचे सेवन, या विरोधात विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी मार्गदर्शन सत्रांचे आयोजन करणे. 3) महिला सभांचे नियमित आयोजन करणे. 4) सामाजिक स्तरावर महिला आणि मुलींच्या विरोधात घडणार्‍या हिंसा, लैंगिक भेदभाव यासारख्या मुद्द्यांवर चर्चा करणे. 5) लिंगसमभावास पूरक अर्थसंकल्प तयार करणे. 6) गरजू महिलांना मोफत कायदेविषयक सल्ला आणि सुरक्षा सेवा उपलब्ध करुन देणे. 7) स्वयंसहय्यता गटांमा़र्फत आर्थिक उपक्रमांमध्ये महिलांचा सहभाग. 8) महिलांबाबतच्या कायदेविषयक तरतुदी 9) बाल विवाह थांबविणे आणि बालविवाहामुळे शारिरिक व मानसिक आरोग्यावर होणारे दुष्परिणाम याबाबत जागृती निर्माण करणे. 10) बाल तस्करीला नकार. आपल्या गावात असे प्रकार होणार नाहीत अशी सामाजिक सुरक्षा व्यवस्था करणे. 11) लिंग परिक्षण, लिंग निवडीवरून गर्भपात करणे यांसारख्या लिंगभेद करणार्‍या प्रथांबाबत जागरूकता निर्माण करणे. 12) किशोरवयीन मुलींचा उपजीविका आणि कौशल्य विकास कार्यक्रमात सक्रिय सहभाग आणि समावेशन. 13) महिला-मुलींच्या स्थलांतरावर लक्ष ठेवणे व त्याबाबतच्या नोंदी ठेवणे. यासाठी सर्वात महत्वाचे पहिले पाऊल म्हणजे आपल्या गावात याबाबत जनजागृती निर्माण करणे. कारण व्यक्ती असो अथवा गाव जागे तो सवेरा.

हेरवाडसह या मार्गावर निघालेल्या गावांबद्दल नव्याने कौतुक करायचेच तर असे म्हणता येते की, ‘या गावांची रीतच न्यारी, सदा सुहागन दिसते इथली नारी’. आता पुरोगामी म्हणवणार्‍या गावागावात यातील अनुकरण व्हायला हवे.

- Advertisment -

ताज्या बातम्या