आता ‘बेबी’ हाक ऐकू येणार नाही!

jalgaon-digital
4 Min Read

विक्रमच्या जाण्याने माझी वैयक्तिक हानी झाली आहे. तो फक्त माझा सहकलाकार किंवा नायक नव्हता तर माझ्या कुटुंबातलाच एक होता. तो मला ‘बेबी’ म्हणायचा. त्याची ही आपलेपणाची हाक आता पुन्हा ऐकू येणार नाही. आमचे कौटुंबिक ऋणानुबंध होते.

आशा काळे, ज्येष्ठ अभिनेत्री

विक्रमच्या जाण्याने माझी वैयक्तिक हानी झाली आहे. तो फक्त माझा सहकलाकार किंवा नायक नव्हता तर माझ्या कुटुंबातलाच एक होता. तो मला ‘बेबी’ म्हणायचा. त्याची ही आपलेपणाची हाक आता पुन्हा ऐकू येणार नाही. आमचे कौटुंबिक ऋणानुबंध होते. चित्रपटसृष्टीत येण्याआधीपासूनची आमची ओळख. माझा भाऊ अनिल काळे आणि विक्रम गोखले एकत्र शिकत होते. भावाचा मित्र असल्यामुळे विक्रम आमच्या घरी यायचा. ‘बेबी’ हे माझे टोपण नाव होते. घरातले मला याच नावाने हाक मारायचे. त्यामुळे विक्रमही मला बेबीच म्हणायचा. कला क्षेत्रात एकत्र काम करू लागल्यानंतरही तो मला याच नावाने हाक मारायचा आणि यामुळेच तो अगदी घरचा वाटायचा. मी अभिनेत्री झाले, कलाकार झाले तरी मला बेबी म्हणणारा आज या जगातून कायमचा निघून गेला आहे. ही माझ्यासाठी खरेच खूप मोठी पोकळी आहे. एक कलाकार, अभिनेता म्हणून तो महान होता, जबरदस्त होता. त्याच्याबरोबर काम करताना मिळणारा आनंद शब्दात मांडता येणार नाही. ‘वाहतो ही दुर्वांची जुडी’ या नाटकात तो माझा नायक होता. त्यातल्या आमच्या भूमिका खूप गाजल्या. ते नाटकही खूप गाजले. मी त्या नाटकाचे 900 प्रयोग केले. तो 1968-69 चा काळ असावा.

त्याचे आमच्या घरी येणे, आई-वडिलांसोबत गप्पा मारणे हे सगळेच वेगळे होते. त्यावेळी मी कुणीच नव्हते. नृत्य शिकणे, शाळेत जाणे असे माझे सुरू होते. त्यामुळे अन्याची बहीण हीच त्याच्यासाठी माझी ओळख होती. शिक्षण लवकर संपले म्हणून मी विक्रमच्या आधी रंगभूमीवर आले. पण माझ्या मागून कला क्षेत्रात येऊनही विक्रम अभिनयात खूप पुढे गेला. तो अभिनय सम्राट झाला. अभिनयापुढे त्याला काहीच सुचायचे नाही. त्याचे घराणेही खूप मोठे.

आज तो आपल्यामध्ये नसला तरी अभिनयाचे संचित मागे ठेवून गेला आहे. त्याची कोणतीही भूमिका बघितली तरी तो नेहमीचा विक्रम गोखले वाटायचा नाही. तो ती व्यक्तिरेखाच वाटायचा. ते भूमिकेत शिरणे विक्रमला साध्य झाले होते. तो रंगमंचावर गेला किंवा कॅमेर्‍यासमोर आला की विक्रम नसायचाच. तो ती भूमिकाच होऊन जायचा आणि हेच त्याचे मोठेपण होते. अरे, तू कसे करतो रे हे सगळे, असे मी त्याला विचारायचे. त्यावर अगं, काय सांगू मी तुला, कसे करतो म्हणजे काय… असे म्हणत तो विषय गंमतीवारी न्यायचा.

आम्ही दौरे संपवून घरी यायचो ते फक्त चार-पाच दिवसांसाठी. बाकी दौर्‍याच्या निमित्ताने सर्व कलाकार एकत्रच असायचो. त्यामुळे अर्थातच जिव्हाळ्याचे, आपलेपणाचे नाते निर्माण व्हायचं. मध्यंतरी पुण्यात बालगंधर्व रंगमंदिरात एक कार्यक्रम होता. त्यावेळी जॅकी श्रॉफ पण आला होता. मीही गेले होते. अजूनही बरीच मंडळी होती, विक्रमही होता. विक्रम रंगमंचावर भाषणासाठी उभा राहिला. भाषणादरम्यान त्याने जॅकी श्रॉफचा उल्लेख केला. तसेच अन्य कलावंतांचीही नावे घेतली. प्रत्येक नावाला टाळ्या पडल्या. माझेही नाव घेतले. म्हणाला, माझी नायिका, बेबी इथे आली आहे. बेबी म्हटल्यावर कोण टाळ्या वाजवणार? मग त्याने त्याचा तो जगप्रसिद्ध पॉज घेतला आणि म्हणाला, बेबी म्हणजे, प्रसिद्ध अभिनेत्री आशा काळे! असे खास स्टाईलमध्ये तो बोलला आणि लोकांनी टाळ्या वाजवल्या. मी तिला बेबी म्हणतो, असे त्याने त्या जाहीर कार्यक्रमात सांगून टाकले. विक्रमच्या निधनामुळे कुठेतरी आत, खोलवर काहीतरी गमावल्याची जाणीव बळावली आहे. विक्रमच्या निमित्ताने घरातला, आपला माणूस गेला आहे. आता ‘बेबी’ ही हाक पुन्हा ऐकू येणार नाही, याचे शल्य वाटतेय…

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *