गरज नव्या विचारांची

गरज नव्या विचारांची

80 टक्के लोकांच्या शिक्षणाचा विचार करायचा असेल तर नवीन तंत्राचा वापर करून वेगळा मार्ग अनुसरता येईल. प्रत्येकाच्या हातातल्या फोनमध्ये गुगल आले आहे. त्याचा वापर करून आपण पैसा कमवून देणारे कौशल्य आत्मसात करू शकतो. युवावर्ग मोठ्या प्रमाणात बेरोजगारीचा सामना करत आहे. त्यांना नव्या तंत्राद्वारे आधुनिक व्यावसायिकांशी जोडता आले तर उत्तम पैसा मिळू शकतो.

स्वातंत्र्यानंतर भारतीय शिक्षणाचा आढावा घेऊन सुधारणा करण्यासाठी दोन महत्त्वाची कमिशने नेमली गेली. त्यात राधाकृष्णन आणि कोठारी कमिशन महत्त्वाची समजली जातात. या कमिशनमुळे त्यावेळचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी आपली शिक्षण पद्धती आणि मनुष्यबळ तयार करण्यासाठी जागतिक स्तरावरील चार संस्था निर्माण केल्या. 550 एकरावर मुंबईमध्ये पवई इथे तसेच दिल्ली, कोलकाता, मद्रासमध्ये तांत्रिक शिक्षणाचा पाया भक्कम करण्यासाठी आयआयटीची निर्मिती झाली. आज भारताने अंतराळ क्षेत्रात मोठी प्रगती केली आहे, चंद्रावर यान पाठवले आहे. त्याचा पाया या चार संस्थांनीच घातला. नेहरूंनी मुंबईमध्ये होमी भाभा यांच्या मदतीने अ‍ॅटोमिक एनर्जी कमिशन निर्माण केले. त्यावेळी ते तंत्र केवळ अमेरिका आणि रशियाजवळ होते. पण यानिमित्ताने भारतात त्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. दुर्दैवाने डॉ. भाभा यांचा विमान अपघातात अंत झाला. तरीही विक्रम साराभाई आणि डॉ. अब्दुल कलाम यांच्यासारख्या शास्त्रज्ञांनी भारताची ध्वजा पहिल्या पाच अणुऊर्जेने सज्ज राष्ट्रांमध्ये फडकत ठेवली.

हे खरे असले तरी इतर शिक्षणाकडे मात्र काहीसे दुर्लक्ष झाले. उदाहरणार्थ, शेती शिक्षणाचा मुद्दा घेतला तर देशामध्ये अन्नधान्याचा तुटवडा निर्माण झाल्यानंतर लालबहाद्दूर शास्त्रींना ‘जय जवान, जय किसान’ ही घोषणा द्यावी लागली. त्यानंतर अमेरिकेच्या धर्तीवर भारतात कृषी विज्ञापीठे निर्माण झाली. परंतु अमेरिकेच्या विद्यापीठांनी घडवून आणली तशी क्रांती भारतीय कृषी विद्यापीठे अद्याप घडवू शकलेली नाहीत. आजही अमेरिका अन्नधान्याच्या क्षेत्रात जगात क्रमांक एकचा देश मानला जातो, तो केवळ तिथल्या संशोधनामुळे. याच पद्धतीने भारतात ट्रायमिस्टर (तीन महिन्यांचा अभ्यासक्रम), सेमिस्टर (सहा महिन्यांचा कोर्स) अशा पद्धती भारतीय विद्यापीठांनी स्वीकारल्या. टक्केवारी गुणांऐवजी ‘ग्रेडिंग’ पद्धत सुरू झाली. व्यवस्थापन अभ्यासक्रम सुरू झालेे. पण हे करताना त्यांचे उद्देश वेगळे होते हे आपली विद्यापीठे विसरली. त्यांनी ‘बिग इज ब्यूटीफुल’ या तत्त्वाप्रमाणे औद्योगिक क्षेत्रात मोठमोठे कारखाने उभे केले. मात्र त्यांची उत्पादन क्षमता घसरत चालली होती.

हे लक्षात घेत यावर मात करण्यासाठी पीटर ड्रकर या व्यवस्थापन शास्त्रज्ञाने व्यवस्थापन विद्यालये निर्माण केली आणि उद्योगधंद्यांची समस्या सोडवली. बंगळुरू आणि पुणे ही माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातली भारतातली महत्त्वाची केंद्रे समजली जातात. मात्र जागतिक श्रेणीतले शिक्षण-संशोधन आणि या शहरांमधले संगणकीय प्रशिक्षण यातल्या कौशल्याच्या अभावामुळे दर्जात फरक पडला. त्यामुळे व्हॉटस्अ‍ॅप, ट्विटर, फेसबुकसारखी जग व्यापून टाकणारी अ‍ॅप्स निर्माण करणारी संशोधने किंवा शिक्षण पद्धती अमेरिका, द. कोरिया, जपान, चीन या देशात झाली. एक मोबाईल क्षेत्र घेतले तरी आपल्याकडे मुकेश अंबानींची ‘जिओ’ वगळता अन्य कोणतीही मोठी कंपनी निर्माण होऊ शकली नाही. यामागील महत्त्वाची त्रुटी प्रशिक्षणामध्ये आहे.

जगामधल्या पहिल्या 500 उत्तम विद्यापीठांमध्ये भारतातले एकही विद्यापीठ नाही. याचे कारण जग शिक्षण क्षेत्रात बदल करत होते आणि सध्याही करत आहे, पण आपल्याकडे परंपरागतच राहिले. व्हिजिटिंग प्रोफेसर म्हणून 80 देशांमध्ये केलेल्या प्रवासात शिक्षण प्रणालीतील दोष मला प्रकर्षाने जाणवले. इथे एकच उदाहरण देतो. परदेशातली विद्यापीठे केवळ नेमलेल्या प्राध्यापकांवरच अवलंबून राहत नाहीत. त्यांनी फार पूर्वीपासून या क्षेत्रात करार पद्धतीचा अवलंब केला आहे. त्यामुळेच आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांना तिथल्या विद्यापीठांमध्ये प्राध्यापक म्हणून सहज समाविष्ट करून घेता येते. उदाहरणार्थ, आणीबाणीच्या काळात भारतातले प्रसिद्ध विधिज्ञ राम जेठमलानी यांना अमेरिकेत जावे लागले होते. त्यावेळी एका विद्यापीठाने प्राध्यापक म्हणून त्यांची करार पद्धतीने तत्काळ नेमणूक केली. हे एकच उदाहरण मुद्दा स्पष्ट करण्यास पुरेसे आहे. मुंबई विद्यापीठ हे भारतातले नावाजलेले विद्यापीठ आहे. पण तिथे परीक्षेचा घोटाळा होतो आणि सगळे कटकारस्थान चव्हाट्यावर येते.

पण यावरही उपाय आहे. उदाहरणार्थ, भारतातल्या 80 टक्के गरीब लोकांचा विचार केला तर या वर्गातल्या युवकांना आजकालचे महागडे शिक्षण परवडत नाही. हे सध्याचे पैसे कमावण्याचे क्षेत्र ठरले आहे. यावर उपाय म्हणून आपले विद्यार्थी फिलिपिन्स, युक्रेन आदी देशांमध्ये स्वस्तातले आणि आवाक्यातले शिक्षण घेण्यास जाऊ लागले आहेत. आता मात्र या 80 टक्के गरीब लोकांच्या शिक्षणाचा विचार करायचा असेल तर नवीन तंत्राने मार्ग दाखवून दिला आहे.

आज प्रत्येकाच्या हातातल्या फोनमध्ये ‘गुगल’ आले आहे. त्याच तंत्राचा वापर करून आपण पैसा कमवून देणारे कौशल्य आत्मसात करू शकतो. आज आपल्या शिक्षण पद्धतीमुळे शास्त्र-कला-वाणिज्य अशा परंपरागत शिक्षण शाखेतून आलेल्या युवकांची संख्या मोठ्या प्रमाणात बेरोजगारीचा सामना करत आहे. त्यांना आधुनिक व्यावसायिकांशी कौशल्याद्वारे जोडता आले तर या विद्यार्थांनाही पैसा मिळू शकतो. उदाहरणार्थ, काही युवक बंगळुरू आणि पुण्यातल्या घरात बसून इंग्लंड-अमेरिकेतल्या व्यावसायिकांचे काम मोठ्या प्रमाणावर करत आहेत. भारतात आणि जगात कौशल्यप्राप्त पण निवृत्त झालेले अनेक लोक त्यांच्याकडील कौशल्य स्मार्टफोनद्वारे गरजू लोकांना फुकट देण्यास तयार आहेत. अर्थातच त्यासाठी वेगळे प्रोजेक्ट तयार करावे लागतील, अ‍ॅप्स तयार करावी लागतील. नवे व्यासपीठ अभ्यासावे लागेल. निवृत्त झालेल्या लोकांकडून कौशल्यज्ञान वापरणे ही तशी अभिनव कल्पना नाही. पण त्याकडे दुर्लक्ष का केले जाते, हे मात्र समजत नाही.

एकीकडे गरीब वर्गासाठी आवश्यक त्या तंत्रज्ञानाचा अभाव तर दुसरीकडे आपल्या सोयीने फुकट तंत्रज्ञान शिकवण्यास तयार असणारा वर्ग याची सांगड घातली तर अपेक्षेपेक्षा वेगळे व्यवसाय उभे राहिल्याचे चित्र काही काळातच दिसू शकेल. साधे उदाहरण देतो, आपल्याकडे आता पर्यावरण आणि वनीकरणाबाबत जागरुकता निर्माण झाली आहे. पण झाडे वाचवण्याकडे कोणाचे लक्ष नाही. फळझाडांचा विचार करता आजोबाने लावलेल्या झाडाची फळे नातवंडे खातात. म्हणजेच या कामाला किंमत आहे. आंबा ही भारताने जगाला दिलेली देणगी आहे. पण ‘भिरूड’ या किडीमुळे भारतातली आंब्याची झाडे धोक्यात येऊ लागली आहेत. पूर्वी भारतात आंब्याच्या एक हजार जाती होत्या. खेड्यापाड्यातही गावठी आंबे म्हणून हे फळ खाता येत होते. म्हणूनच ही परिस्थिती टिकवण्यासाठी भिरूड नष्ट करण्याचे कौशल्य गावच्या तरुणांना स्मार्टफोनद्वारे शिकवले गेले तर करार पद्धतीने सेवा देऊन त्यांना पैसा मिळवता येईल. कौशल्याअभावी असे अनेक उद्योग अडगळीत पडले आहेत. ते सुरू करायचे तर कौशल्याची कवाडे खुली करण्याची आवश्यकता आहे. एक मोहीम उघडण्याची गरज आहे. त्यासाठी वेगळी अ‍ॅप्स आणि व्यासपीठे निर्माण करण्याची गरज आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com