नव्या पिढीचे वाचन माध्यम

नव्या पिढीचे वाचन माध्यम

सुश्राव्य गाणे ऐकण्यासाठी कानसेनांची जशी गरज असते तशीच कसदार साहित्य वाचण्यासाठी तसा वाचकही गरजेचा आहे. वाचकाविना साहित्याचे वर्तुळ अपूर्ण आहे. म्हणूनच माझ्या मते वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने उत्तम वाचक या श्रेणीचे पुरस्कार सुरू केले पाहिजेत. तसेच नव्या पिढीचे वाचन कमी होत नसून त्यांचे वाचन माध्यम बदलले आहे, हेही लक्षात घ्यायला हवे.

देशाचे माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने साजरा केला जाणारा ‘वाचन प्रेरणादिन’ हा एक स्वागतार्ह प्रयत्न आहे. वाचन, श्रवण, चिंतन-मनन, लेखन या सगळ्यांनी व्यक्तिमत्त्व घडत जाते. पुस्तकी शिक्षण पोटाचे गणित शिकवते; परंतु कविता, कथा, कादंबरी, प्रवासवर्णने, चरित्र, आत्मचरित्रे यांचे वाचन आणि त्यातून मिळणारा आनंद जगण्यातील ‘अगणित’ शिकवते.

डॉ. अब्दुल कलामांचे आत्मचरित्र मी वाचले आहे. अवघ्या दहा-अकरा वर्षे वयाचा हा मुलगा भल्या पहाटे रेल्वेतून येणार्‍या एका पार्सलची वाट पाहत थांबायचा. त्यांच्या गावात रेल्वे थांबत नव्हती. परंतु त्या रेल्वेतून वर्तमानपत्रांचे पार्सल फेकले जायचे आणि हा छोटा मुलगा ते पार्सल घेऊन जगभरात घडणाण्या घटनांचे भावविश्व असणारे वर्तमानपत्र लोकांच्या वाचनासाठी घरोघरी नेऊन द्यायचा. त्या वर्तमानपत्रातील वाचनातून त्यांचे बालपण घडत गेले. पुस्तकांनीच त्यांचे आयुष्य घडवले होते. ‘द लॉ ऑफ सक्सेस’ हे त्यांचे आवडीचे पुस्तक होते. राष्ट्रपती बनल्यानंतरही दिवसाला 100 पाने वाचल्याखेरीज डॉ. कलाम झोपायचे नाहीत. वाचनाचा ध्यास लागल्यानंतर वाचनगती वाढत जाते. डॉ. कलामांसारख्या प्रतिभावंतांना अख्खे पान पाहून त्यातील आशय चटकन समजतो. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मोठ्या अभिमानाने स्वत:च्या वाचनाबद्दल लिहून ठेवले आहे. परिस्थिती वाईट असताना ते नवनवे ग्रंथ वाचायला कसे मिळतील यासाठी उत्सुक असत. धनंजय किर यांनी डॉ. आंबेडकरांच्या या वाचन वेडाविषयी लिहिले आहे ‘ग्रंथ विकत घेण्याची डॉ. आंबेडकरांची भूक न शमता ती वाढतच होती. वेळ मिळेल तेव्हा ते जुन्या ग्रंथांच्या दुकानातून भटकत असत. ग्रंथ विकत घेण्याच्या वेडामुळे सुमारे दोन हजार जुन्या ग्रंथांचा त्यांच्याजवळ संग्रह झाला होता.’

वाचनाने व्यक्तिमत्त्वात होणारे बदल चमत्कार वाटावे असे असतात. वाचनाचा विषय निघाला की नव्या पिढीतील वाचन संस्कृतीबद्दल बोलले जाते. ही पिढी वाचनापासून दुरावत चालल्याची टीका केली जाते. परंतु माझे याबाबतचे मत वेगळे आहे. नव्या पिढीवर वाचनापासून दूर चालल्याचा शिक्का मारताना त्याची दुसरी बाजूही विचारात घेतली पाहिजे.

माझ्या सुदैवाने ग. प्र. प्रधान, एस. एम. जोशी, यशवंतराव चव्हाण यांसारख्या असंख्य जणांना जवळून पाहण्याची संधी मला मिळाली. अटलबिहारी वाजपेयी यांना पहिल्यांदा भेटीचा योग आला तेव्हा त्यांनी मला पहिला प्रश्न विचारला की, कुसुमाग्रजजी कैसे है? अटलजी हे भारतरत्न होते, प्रतिभावंत कवी होते. परंतु कुसुमाग्रजांच्यात आणि त्यांच्यात जोडणारा दुवा वाचनाचा होता. यशवंतराव चव्हाण यांच्याशी भेट झाली तेव्हा त्यांनी ग. दि. माडगूळकर आणि गीतरामायण यांच्यातील नात्याविषयीची सखोल माहिती मला सांगितली होती. हे जोडले जाणे वाचनातून आहे.

आज आपल्याकडे वाचणारे राजकारणी किती आहेत? वाचणारे पालक किती आहेत? वाचणारे शिक्षक किती आहेत? आम्ही शाळेमध्ये असताना ऑफ तासाला एखाद्या पुस्तकाचे अभिवाचन केले जायचे. आज ऑफ तासाला मुलांना खेळायला सोडले जाते. बाह्य वाचन, चिंतन आणि मनन हे ज्या शिक्षण पद्धतीत ‘ऑप्शन’ला ठेवले जाते तिथे नवनिर्मितीक्षम मने तर जाऊद्याच, पण उत्तम वाचक तरी कसा घडणार? रियाजाने ज्याप्रमाणे गायकाचा गळा तयार होत जातो त्याचप्रमाणे वाचनाच्या सातत्याने आंतरिक संवेदनांनाही अधिकाधिक तरलता येत जाते. पण त्यासाठी पूरक वातावरण तयार केले जायला हवे. साहित्य बालपणी, ऐन तरुणपणी मनापर्यंत पोहोचले तरच युवा पिढीचे भावनिक पोषण होऊ शकेल. समाजाला फक्त कवी आणि साहित्यिक इतकेच नको आहेत. कसदार वाचकही लेखकाचा पालक असतो. वाचकाशिवाय लेखकाचे लेखकपण कसे पूर्ण होणार?

दुसरी गोष्ट म्हणजे नव्या पिढीचे वाचनाचे माध्यम बदलले आहे. आजची पिढी कानांचा डोळा करून वाचणारी आहे. मध्यंतरी, मी रेल्वेतून प्रवास करत असताना समोर एक मुलगा कानामध्ये हेडफोन लावून बसला होता. काही वेळाने न राहावून त्याला विचारले की, आठ-दहा तासांचा प्रवास असताना तू एखादे पुस्तक सोबत का नाही ठेवलेस? यावर त्याने एक हेडफोन काढून माझ्या कानात घातला. तेव्हा असे लक्षात आले की, तो टॉलस्टॉयचे पुस्तक ऐकत होता. आज माझी मुलेही इंटरनेटवर ओशो, रजनीशांपासून स्वामी विवेकानंदांपर्यंत अनेकांची पुस्तके ऑडिओ रूपात ऐकत असतात. त्यामुळे या पिढीमध्ये वाचनवेड कायम आहे; फक्त माध्यम बदलले आहे.

काही दिवसांपूर्वी अहमदनगरमध्ये एका कार्यक्रमाच्या निमित्ताने गेलो होतो. अशा ठिकाणी मी एखाद्या गरजू मुलाला माझ्या पुस्तकांच्या विक्रीसाठी घेऊन जातो. त्या कार्यक्रमामध्ये जमलेल्या मुलांनी पाच-पाच रुपये एकत्र करून अनेक पुस्तके विकत घेतली. मी त्यांना ही पुस्तके विनामूल्यही देऊ शकलो असतो; परंतु त्यांना वाचनाचे मूल्य कळणे गरजेचे होते. मोफत मिळाले की जगणेही फुकट जाते.

आजच्या पिढीचा जगण्याचा संघर्षच आपण इतका तीव्र करून ठेवला आहे की त्यातून त्यांना वाचनासाठी वेळ देणे दुरापास्त होत चाललेय. शालेय-महाविद्यालयीन परीक्षांसाठी अभ्यास करूनही सीईटीसारखी परीक्षा दिल्याशिवाय प्रवेश मिळत नाही. मुंबईसारख्या महानगरांमध्ये भरगच्च गर्दीतील प्रवासामध्येच दिवसातले काही तास खर्ची झाल्यावर वाचनाला वेळ तरी कसा उरणार? त्यामुळे वाचन प्रेरणादिन साजरा करणार्‍या शासनाला माझे सांगणे आहे की, या पिढीला जगायला वेळ द्या. उमलायला वेळ द्या. वाचनातील समृद्ध करणारे प्रवाह जर त्यांच्या संवेदनापर्यंत पोहोचले नाही तर आयुष्य बहरून टाकणार्‍या गोष्टी केवळ कर्मकांड स्वरुपातच उरतील.

राज्यभरात विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने उपस्थित राहताना, पुरस्कार प्रदान करताना मला नेहमी एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे खेळाडू, कलाकार, लेखक आदी सर्वांसाठी जसे पुरस्कारांचे आयोजन केले जाते तसे उत्तम वाचकासाठी पुरस्कार का ठेवला जात नाही? आजवर कुठल्या शाळेने वाचनात प्राविण्य असणार्‍या विद्यार्थ्यासाठी पुरस्कार दिल्याचे का दिसत नाही?

सुश्राव्य गाणे ऐकण्यासाठी कानसेनांची जशी गरज असते तशीच कसदार साहित्य वाचण्यासाठी तसा वाचकही गरजेचा आहे. वाचकाविना साहित्याचे वर्तुळ अपूर्ण आहे. म्हणूनच माझ्या मते शासनानेही वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने उत्तम वाचक या श्रेणीचे पुरस्कार सुरू केले पाहिजेत. अशा प्रकारच्या प्रोत्साहनातून ‘वाचनदैना’ कमी होण्यास निश्चित मदत होईल.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com