ब्लॉग : गरज इमोशनली स्टेबल होण्याची!

- प्रा. शर्मिला भावसार, नाशिक
ब्लॉग : गरज इमोशनली स्टेबल होण्याची!

भावनांचे व्यवस्थापन व्यवस्थित न झाल्यास भावनिक अस्थिरता निर्माण होते, ज्यामुळे अनेक मानसिक व्याधी बळावतात.

भावनिक स्थिरता आपले मानसिक आरोग्य चांगले राखण्यास मदत करते. आजच्या धकाधकीच्या जीवनात आपण आपल्या भावनांचं व्यवस्थापन जितक्या चांगल्या प्रकारे करू शकू तितकं जीवन जगणं सोपं होतं आणि त्याचा आनंदही घेता येतो.

शेजारच्या घरातून विकास आणि मधू चा भांडणाचा आवाज येऊ लागला, आणि मी आमच्या घराच्या गॅलरीत येऊन ऐकण्याचा प्रयत्न करू लागले. जवळपास अर्धा तास दोघांचे भांडण चालू असेल. नंतर विकास घराचा दरवाजा जोरात आदळून घराबाहेर पडला, तो सायंकाळीच घरी परतला. प्रसंग घडल्यापासून सायंकाळपर्यंत असंख्य प्रश्नांनी माझ्या मनात घर केलं होतं.

काय झालं असेल दोघांत? घरातून बाहेर निघून जाण्याइतपत काय कारण असू शकेल? मधू आणि विकासला काय वाटत असेल? खरंच इतकं होण्याची गरज होती का? मग विचार केला मधू आणि विकास प्रमाणे आपल्याही आयुष्यात अशा अनेक घटना घडतात मग त्या घरातील असो किंवा कामाच्या ठिकाणी असो किंवा मित्रांमध्ये असोत जीवन जगत असताना अनेक चांगल्या वाईट प्रसंगांना आपल्याला सामोरे जावे लागते. चांगले प्रसंग आपल्याला आनंद देऊन जातात, सारखे आपल्या आयुष्यात टिकून रहावेसे वाटतात. परंतु वाईट प्रसंग दुःख देतात तर ते कधीच आपल्या आयुष्यात येऊ नये असे वाटतात. पण ऊनसावली प्रमाणे ते येतच राहणार.

आयुष्यात आलेल्या अशा प्रसंगांमुळे आपणही डिस्टर्ब होतो म्हणजेच भावनिक दृष्ट्या खचतो. आपलं जवळच्या व्यक्तीशी भांडण होणं, जवळच्या व्यक्ती आपल्यापासून दूर निघून जाणं, अपमान होणं, मतभेद होणं, राग अनावर होणं अशा अनेक प्रसंगातून नकारात्मक भावनांची निर्मिती होते.अशा भावनांचे मनावर खोलवर ठसे उमटतात आणि त्याचा परिणाम आपल्या दैनंदिन जीवनावर होतो.

'आज माझा मूडच नाहीये', 'काम करण्याची इच्छाच होत नाहीये', 'कंटाळा आलाय', 'कुठे तरी निघून जावंसं वाटतंय' अशी वाक्ये आपण सहजच बोलून जातो पण त्याचं खरं कारण असतं ते घडलेल्या प्रसंगांमुळे निर्माण झालेल्या भावना.

असे प्रसंग घडतच राहणार आणि भावनाही निर्माण होतच राहणार, अशा वेळी गरज असते ती 'इमोशनली स्टेबल' होण्याची. कठीण परिस्थितीत भावनिक संतुलन राखण्याची क्षमता म्हणजेच भावनिक स्थिरता किंवा इमोशनल स्टॅबिलिटी. अशी भावनिक स्थिरता आपण आपल्यात निर्माण करू शकलो की बऱ्याच समस्यांचे समाधान होते.

भावनिक स्थिरता निर्माण करण्यासाठी आपला दृष्टिकोन बदलणे गरजेचे आहे. नकारात्मक विचारांचे परिवर्तन सकारात्मक विचारांत केले पाहिजे. घडणारी घटना आणि प्रसंगाची चांगली बाजू बघावी. स्वतःला सकारात्मक विचार करण्याची सवय लावून घ्यावी, जेणेकरून आपल्या मनात सकारात्मक भाव निर्माण होतील.

अडचणींच्या परिस्थितीत काळजी करण्यापेक्षा आपण काय उपाययोजना करू शकतो याचा विचार केला पाहिजे. अपयश आल्यास निराश न होता, त्याला अपयश न मानता स्वतःमध्ये आत्मविश्वास जागृत करून त्या अपयशाला एक आव्हान समजून सामोरे जायला पाहिजे.

अनुभव हा माणसाचा गुरु आहे असे आपण नेहमी म्हणतो पण ते कृतीतही दिसले पाहिजे. आपण केलेल्या चुकांचे विश्लेषण करून त्यावरून शिकता आलं पाहिजे. स्वतःच्या गरज ओळखून त्याच व्यक्त केल्या पाहिजे.

स्वतः च्या धनात्मक गुणांकडे लक्ष देऊन आपण नवीन काय करू शकतो ते बघितले पाहिजे. आपल्या चांगल्या गुणांचा वापर कोणत्या चांगल्या कामासाठी करता येईल याचा विचार केला पाहिजे. तणावाच्या परिस्थितीत त्वरित प्रतिक्रिया न देता शांत राहून विचार केला पाहिजे.

भावनांचे व्यवस्थापन व्यवस्थित न झाल्यास भावनिक अस्थिरता निर्माण होते, ज्यामुळे अनेक मानसिक व्याधी बळावतात. भावनिक स्थिरता आपले मानसिक आरोग्य चांगले राखण्यास मदत करते. आजच्या धकाधकीच्या जीवनात आपण आपल्या भावनांचं व्यवस्थापन जितक्या चांगल्या प्रकारे करू शकू तितकं जीवन जगणं सोपं होतं आणि त्याचा आनंदही घेता येतो.

( प्रसंगातील पात्रे काल्पनिक आहेत.)

- प्रा. शर्मिला भावसार, नाशिक

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com