निसर्ग साक्षात गुरू

निसर्ग साक्षात गुरू

घराघरांतील संवादाला किती महत्त्व आहे हे वेगळे का सांगायला हवे? एक आई ते आजी या प्रवासात बदलत जाणारे संवादाचे टप्पे धुंडाळणारे सदर...

मुलांची मानसिक व बौद्धिक अशी सर्व दृष्ट्या वाढ होण्यासाठी त्यांना मोकळ्या मैदानात खेळू द्या. त्यांना झाडांचे महत्त्व समजावून सांगा व त्याचबरोबर वृक्षरोपणाचेही महत्त्व सांगून विविध रोपे लावण्यास शिकवा. मोकळ्या मैदानात मुलांना भरपूर शुद्ध ऑक्सिजन मिळेल. याच ऑक्सिजनसाठी हॉस्पिटलमध्ये पैसे द्यावे लागतात. झाडे, फळे, फुले व एकूणच निसर्गाची त्यांना ओळख होऊ द्या.

संत तुकाराम महाराजांनी ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’ या अभंगात म्हटलेच आहे की,

आकाश मंडप पृथ्वी आसन

रमे तेथे मन क्रीडा करी.

आपण सारीच धरतीची लेकरे तिच्या आसनावर बसलो आहोत व छत तर प्रत्यक्ष विशाल आकाशाचा मंडपच आहे. इतक्या प्रसन्न ठिकाणी आपल्या निष्पाप बालकांना मनसोक्त बागडू द्या नि होऊ द्या त्यांची सर्वार्थाने वाढ.

झाडाबरोबरच मुलांना होईल ओळख प्राण्यांची नि पक्ष्यांची, निसर्गात धरती, पाणी व आकाश या तिन्ही ठिकाणी जीवसृष्टी आहे. त्यात आपण धरतीवरील जीव. आपला या सर्वांशी संबंध येतो. प्रातःसमयी पक्ष्यांच्या मधूर किलबिलाटाने जाग येते व मन प्रसन्न होते. कुत्रा, मांजरसारखे पाळीव प्राणी तर आपले मित्र. त्यात कुत्रा तर आपण घराच्या संरक्षणासाठीही पाळतो. मुलांना शिकवा या प्राण्यांमध्ये खेळायला व त्यांच्यावर प्रेम करून त्यांना गोंजारायलाही शिकवा. या मुक्या प्राण्यांशी खेळताना मुले त्यांच्याशी बोलूही लागतात. एवढेच नाही तर आपल्या मनातील भावनाही व्यक्त करतात. त्या मुक्या प्राण्यांना हे प्रेम समजते व तेही आपल्या जवळ सहजपणे येऊन बसतात.

अलका दराडे
अलका दराडे

एखाद्या मित्रासारखे नाते येथे निर्माण होते. ही मित्रत्वाची भावना विश्वव्यापी आहे कारण इंटरनेटमुळे जग फार जवळ आले आहे. आपली मुले भारताबाहेरील देशातील ओळखीच्या मुलांशी व नातेवाईकांशी संवाद साधू लागली आहेत. हा गोडवा त्यांना शिकवतो इतर देशातील ज्ञान व संस्कृती. भारतीय संस्कृतीची मूल्यही इतरांना समजतात. अमेरिकेतील नातेवाईकांकडून त्यांना समजते नासाचीही माहिती व आपली मुले निसर्गाच्या माहितीकडे वळू लागतात. अमेरिका हे प्रगतिपथावरील राष्ट्र आहे. आपलीही मुले अंतराळातील प्रगती पाहून बारकाईने अभ्यास करू लागतात. आपलीही अंतराळ क्षेत्रातील प्रगती खूप आहे व यशही नेत्रदीपक आहे. या अंतराळाच्या आकर्षणामुळे मुले अजून निसर्गाच्या जवळ येतात. निसर्ग तर सर्वांनाच साद घालतो. आपल्याला फक्त प्रतिसाद द्यायचा आहे. निसर्ग हा आपला खूप जवळचा मित्र आहे, हे मुलांना प्रत्यक्ष उदाहरणांनी समजावून द्या. जमिनीतील पिकांमुळे आपल्याला अन्न मिळते, हे मुलांना समजावून द्या. केवळ घरातील अभ्यासाने मुलांची सर्वांगीण प्रगती होत नाही. त्यांच्या बुद्धीची झेप उत्तुंग आहे. घेऊ द्या त्यांना उंच भरारी आकाशातील घारीसारखी. कदाचित यातूनच आपली मुले बनतील उद्याचे नील आणि आर्मस्ट्राँग. निसर्गातील मैदानावर खेळून आपली मुले होतील सर्वगुणसंपन्न असे उद्याच्या उज्ज्वल भारताचे नागरिक. हा निसर्गही त्यांना उत्कृष्ट संस्काराचे अमृत नि बाळकडू पाजून शिक्षण देत असतो कारण निसर्ग तर साक्षात आपला गुरूच आहे! मग गुरू तर आपल्याला प्रगतीचा चांगला मार्गच दाखवतो ना! नुसते सहज आकाशाकडे पाहिले तरी त्यातील क्षणोक्षणी बदलणारे रूपडे पाहून मन अचंबित होते. आम्ही तर ढगांचे बदलणारे आकार खूप वेळ पाहत राहायचो. कधी हत्तीप्रमाणे किंवा झाडांसारखे असे खूप आकार आम्ही उत्सुकतेने न्याहळत राहायचो. यातूनच आपण विचार करण्यासही प्रवृत्त होतो.

क्रमशः

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com