Wednesday, April 24, 2024
Homeब्लॉगBlog :नाशकात ‘प्राणवायू’च यमाच्या रुपात आला

Blog :नाशकात ‘प्राणवायू’च यमाच्या रुपात आला

करोना सारख्या दुर्धर आजारावरील जे काही मोजके उपचार आणि उपाय आहेत, त्या उपायात प्राणवायू हा महत्वाचा आहे, याच प्राणवायूने २२ जणांचे प्राण घ्यावे, हे खरोखरीच दुर्दैवी आहे,करोनाच्या दुर्धर आजारात जगण्याची किंमत “कवडीमोल” झाली आहे, तर मृत्यूला “मोल” आले आहे, राज्यातील विविध शहरांमध्ये करोनाच्याच रुग्णालयांना आग लागण्याच्या घटना घडून त्यात शेकडो बळी गेले असतांनाच नाशकात ही अशीच घटना घडली, मृत शरीराना अंतिमसंस्कार करण्यासाठी स्मशाने कमी पडत आहेत, म्हणून तर “यमदेव” ने रुग्णालयात येऊन या दुर्दैवी जीवांना आपल्यातून,त्यांच्या कुटुंबियातून नेले नाहीना एवढे हृदयद्रावक दृश्य झाकीर हुसेन रुग्णालयात होते.

साधारणतः एक ते दीड वर्षांपूर्वी करोना नामक विषाणूचे जगाची भ्रमंती करत-करत देशात आगमन झाले, या करोनाची देशात येण्याची अनेक कारणे सांगितली जातात, त्यावरून राजकारण ही रंगले, पण करोना या कोणताही उपचार नसलेल्या विषाणूने भारतात प्रवेश केला, आणि प्रेतांच्या राशी च्या राशी स्मशानभूमीत जमा होऊ लागल्या,जानेवारी महिन्यात करोना आटोक्यात येतो आहे, असे वाटू लागले, त्यावरील लस ही उपलब्ध झाली, रुग्णांची संख्या आटोक्यात येऊ लागली, आणि अचानक पहिल्या लाटे पेक्षाही भयावह, जीवघेणी, साक्षात “यमदेवा”ला ही आव्हान देणारी दुसरी लाट येऊन धडकली, या लाटेत अनेक कुटुंब, संसार उध्वस्त होत आहेत, हे कमी की काय म्हणून करोना रुग्णालयालाच आग लागणे, ऑक्सिजन गळती होणे आणि त्यात बळी जाणे अशा घटना घडत आहेत.

- Advertisement -

करोना ची दुसरी लाट पहिल्या लाटेपेक्षा ही भयावह आहे, अनेक संसार उध्वस्त होत आहेत, त्याचवेळी मानव निर्मित म्हणा, अथवा तांत्रिक चुकांमुळे म्हणा, कोविड रुग्णालयात कधी आग लागून तर कधी ऑक्सिजन च्या गळती मुळे जगण्याची “आस” असलेल्या रुग्णांना,अचानक येणाऱ्या “यम” देवाला सामोरे जावे लागते आहे, यात त्या बिचाऱ्या उपचार घेणाऱ्या रुग्णाची काय चूक सुखी, समाधानी संसाराची स्वप्ने रंगवित,आपल्या कुटुंबाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी झटणाऱ्या, परिश्रम घेणाऱ्या अनेकांना अचानकपणे करोनाला सामोरे जावे लागते, त्यावेळी या आजारावर आपण मात करूच असा विश्वास त्यांना असतो, पण त्याच वेळी,वेगळ्याच कारणाने मृत्यू त्यांना कवटाळतो, तेव्हा त्यांचे कुटुंबीय सुन्न होते, जणू त्यांच्या भावनाही मरून जातात, कारण समोर असतो, तो फक्त अंधकार,हाच अंधकार आज झाकीर हुसेन रुग्णालयात होता, सूर्य माध्यान्ही तळपत असतांना ,आपल्या भाऊ, वडील, मुलगा, मुलगी, आई यांना करोना मुक्त करून घरी नेण्याचे स्वप्न नातेवाईक रंगवीत असतांनाच अचानक काळोख झाला, आणि ज्या “प्राणवायू”ने नवे आयुष्य द्यावयाचे, तोच “प्राणवायू”यमाच्या रुपात येऊन २२ जणांचे प्राण घेऊन गेला, या “प्राणवायू”रुपी यमाने केवळ २२ प्राण घेतले नाहीत, तर २२कुटुंब उध्वस्त केले आहेत.

या घटनेचे अनेक पैलू समोर आणण्याचे प्रयत्न आता सुरू होतील, कोण जबाबदार, कोण बेजबाबदार याची उजळणी केली जाईल, सत्ताधारी-विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोप यांच्या फैरी झडतील,मंत्री, आमदार, खासदार आपणच किती जबाबदार हे दाखविण्यासाठी माध्यमांसमोर झळकतील, नागपूर, मुंबई येथे घडलेल्या घटनांनंतर असेच घडले होते दुर्दैवाने नाशकात त्याचीच पुनरावृती घडली आहे, मृतांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळेल, सर्वच थरातून त्यांचे सांत्वन होईल, पण,,,, हा पण च मोठा गहन आहे, कारण मृत व्यक्तीला अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानात नेले जाते, यमाच्या स्वाधीन केले जाते, पण आपणच कधी मानवनिर्मित तर कधी तांत्रिक कारण देत यमालाच आमंत्रण देत आहोत, करोनावर तर आपण मात करूच पण विविध कारणांनी यमाला आमंत्रण देणे आपण थांबवू तेव्हाच, प्राणवायू रुपी यमाच्या विळख्यात गेलेल्या मृतांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या प्रति संवेदना व्यक्त करण्याचा अधिकार आपल्याला असेल.

- Advertisment -

ताज्या बातम्या