Blog : अठरावे वर्ष सरले! मतदार यादीत नाव नोंदवले?

Blog : अठरावे वर्ष सरले! मतदार यादीत नाव नोंदवले?

नाशिक | सुरज मांढरे

काही महिन्यांपूर्वी ओटीटी प्लॅटफॉर्मवर ‘मंडेला’ नावाचा तमिळ भाषेतला सिनेमा पाहिला. या सिनेमातला नायक अजिबातच 'हिरो' या कॅटेगरीत न बसणारा, ना दिसायला ना वागायला! कसलेही कला-कौशल्य नसणाऱ्या या सिनेमातल्या नायकाने एका झाडाच्या बेचक्यात आपला सगळा संसार थाटला आहे.

व्यवसायाने नाभिक असणारा हा नायक अगदीच तुटपुंज्या, जुन्या साहित्यात व्यवसाय करतो. गावातील अडले-नडलेले गिऱ्हाईकच त्याच्याकडे येते. त्यामुळे त्याची बरेचदा उपासमार होते. मग तो गावकऱ्यांची पडेल ती कामी करतो. त्या बदल्यात त्यांनी दिलेले शिळेपाके खातो. असा हा नायक कुणाच्याही खिजगणतीत नसलेला, सामान्याहून सामान्य!

तरीही हा सिनेमा आपल्याला खिळवून ठेवतो. हवी तिथे उत्कंठा वाढवतो अन् संपताना विचार करायला भाग पाडतो. कारण या सामान्याहून सामान्य नायकाला मिळालेला मताधिकार आणि त्याने त्या अधिकाराचा गावाच्या विकासासाठी केलेला उपयोग या विषयाभोवती गुंफलेले सिनेमाचे कथानक तुमच्या-माझ्या आसपास घडणारे आहे. एका मतदानाचे मूल्य किती असू शकते याचे महत्त्व हा सिनेमा ठसवतोच. शिवाय मतदान किती विचारपूर्वक करायची गोष्ट आहे याचीही जाणीव करून देतो....

हा सिनेमा महत्त्वाचे वाटण्याचे आणखी एक कारण म्हणजे आपल्या पडद्यावर नायकाची एक गोष्ट सुरू असते आणि समांतरपणे प्रत्येक प्रेक्षकाच्या मनातही आपल्या आजूबाजूची भ्रष्ट व्यवस्था, त्या व्यवस्थेला कारणीभूत भ्रष्ट नेते यांचाही सिनेमा सुरू असतो, पण नुसता असा सिनेमा आपल्या मनात सुरू होणे आणि त्या दिवास्वप्नात रममाण होणे काहीच उपयोगाचे नाही; हे कुणाही विचारी माणसाला सांगण्याची आवश्यकता नाही. आपल्या आजूबाजूची व्यवस्था भ्रष्ट आहे आणि ती बदलायला हवी हे कुणीही मान्यच करेल, पण व्यवस्था एका रात्रीत तयार होत नाहीत; तशा त्या एका रात्रीत बदलताही येत नाहीत.

या बदलाची पहिली पायरी आहे. मतदार यादीत आपले नाव नोंदवणे. सिनेमातल्या व्यवस्था-बदलाची गोष्टही याच पायरीने सुरू झाली आहे तरुण मित्रांनो!

वयाची अठरा वर्षं पूर्ण झाली की, प्रत्येक भारतीय नागरिकाला मताधिकाराचा अधिकार प्राप्त होतो. नागरिक शास्त्राच्या पुस्तकात मी आणि तुम्हीही शिकलेलो आहोत, पण पुस्तकातून शिकलेले फक्त परीक्षेपुरते वापरायचे असते;

या संस्कारामुळे अठरा वर्षे झाली तरी आपण मतदार म्हणून नाव नोंदणी करीत नाही, या वयोगटाची अगदी आकडेवारीच समोर ठेवायची तर १८ ते १९ या वयोगटाची लोकसंख्येतील टक्केवारी साडेतीन टक्के आहे तर त्यांची मतदार नोंदणीतील टक्केवारी केवळ सव्वा टक्क्याच्या आसपास आहे.

२० ते २९ या वयोगटाच्या लोकसंख्येतील टक्केवारी १८ टक्के आहे, पण मतदार यादीतील या गटाची टक्केवारी फक्त १३.५ टक्केच आहे. तरुणांच्या टक्केवारीतील ही तफावत बरीच बोलकी आहे. तरुणांची लोकसंख्येची टक्केवारी शंभर टक्के मतदार यादीत प्रतिबिंबित होईल तेव्हाच आजच्या युवा पिढीने लोकशाही व्यवस्थेत सहभागी होण्याची पहिली पायरी पूर्ण केली आहे असे म्हणता येईल.

आजची पिढी मोठ्या प्रमाणात टेक्नोसॅव्ही आहे, तेवढे किंवा त्याहून अधिक तिने डेमोक्रसीसॅव्हीही व्हायला हवे. आता तर नाव नोंदणीची सुविधा ऑनलाइनही उपलब्ध आहे. आमच्या NVSP, Voter Portal या संकेतस्थळावर आणि Voter Helpline या अॅपवरही नाव नोंदणी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तुमच्याकडे इंटरनेटची सुविधा असेल तर तुम्ही घरबसल्या नोंदणी करू शकता.

ज्यांच्याकडे स्मार्ट फोन नाही किंवा इंटरनेटची सुविधा नाही, अशा तरुण-तरुणींना आपापल्या परिसरातील मतदार नोंदणी कार्यालयात जाऊन अर्ज क्र. ६ भरून नाव नोंदणी करण्याचा पर्याय उपलब्ध आहेच. तुम्ही ऑनलाइन किंवा प्रत्यक्ष कशाही प्रकारे नाव नोंदणीचा अर्ज भरताना, तुम्हांला काही अडचण आली, एखादा मुद्दा समजला नाही, तर तुम्ही CEO Maharashtra या यूट्युब चॅनलला भेट देऊन अर्ज क्रमांक ६ पाहू शकता. त्यात अर्ज कसा भरायचा याविषयी तपशिलात माहिती देण्यात आलेली आहे.

युवांनो, हे झाले नाव नोंदणीविषयी. आधी म्हटल्याप्रमाणे लोकशाही व्यवस्थेत सहभागी होण्याचा हा फक्त पहिला टप्पा आहे. यानंतरचा दुसरा टप्पा आहे, प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर जाऊन, आपल्याला योग्य वाटणाऱ्या लोकप्रतिनिधीला मत देणे! हे काय आम्हाला माहीत नाही का? असे कोणी म्हणेल.

नाव नोंदवले तर आम्ही मतदानही करणारच की!’ पण जसे आपल्या काही मित्रमैत्रिणींनी वयाची १८ वर्षे पूर्ण होऊनही नाव नोंदणी केलेली नाही, त्याप्रमाणे काही जण नाव नोंदणी करूनही प्रत्यक्ष मतदान मात्र करीत नाहीत. म्हणून तर आपली संसदेच्या किंवा विधानसभेच्या निवडणुकांमधील मतदान टक्केवारी ५०-६० टक्क्यांच्या आसपासच असते. आधीच्या पिढीप्रमाणे तुम्ही ही चूक करू नये आणि लोकशाही प्रक्रियेत पूर्णपणे सहभागी होण्यासाठी हा दुसरा टप्पा पूर्ण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

मतदार म्हणून नाव नोंदणी केली आणि मतदानाच्या दिवशी मत दिले की लोकशाही सक्षम होईल का? तर तसे अजिबातच नाही. लोकशाहीचं सक्षमीकरण ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे आणि ती आपल्या रोजच्या जगण्याशी संबंधित आहे. कशी? भारताचा प्रत्येक नागरिक, मग तो गावात-शहरात, बंगल्यात-झोपडीत कुठेही राहणारा असो, दररोज अनेक नागरी आणि राजकीय प्रश्नांशी सातत्याने जोडलेला असतो.

पाणी, सार्वजनिक स्वच्छता, खड्डे-मुक्त रस्ते, गुणवत्तापूर्ण शिक्षण, चांगली आणि परवडणारी घरे, गर्दीमुक्त रेल्वेप्रवास, प्रसन्न बागा, सुसज्ज आणि प्रसन्न इस्पितळे, पात्रतेनुसार रोजगार, अशा अनेक सार्वजनिक सुविधा नागरिकांना विनासायास मिळणे हे सक्षम आणि सुदृढ लोकशाहीचे लक्षण आहे. आपल्याला न्याय कायदे आणि नियम हवे असतील तर आपण संसदेत आणि विधानमंडळात योग्य प्रतिनिधी निवडून दिले पाहिजेत. त्यासाठी प्रत्येक नागरिकाने आपला मताधिकार बजावला पाहिजे.

तो बजावताना पैसे, वैयक्तिक वापराच्या वस्तू, तात्पुरत्या आमिषांना बळी न पडता आपल्या परिसराच्या कायमस्वरूपी विकासाला प्राधान्य दिला पाहिजे. अशा सुजाण नागरिकांनी बजावलेल्या मताधिकारामुळेच लोकप्रतिनिधींवर दबाव निर्माण होईल आणि खऱ्या अर्थाने लोकांनी लोकांची लोकांसाठी चालवलेली लोकशाही व्यवस्था अस्तित्वात येईल. अर्थात प्रत्येक नागरिकाने ही कर्तव्ये सातत्याने पार पाडायची असतात.

लोकशाही सक्षमीकरणाच्या प्रक्रियेत तरुणांनी सजग होऊन मोठ्या प्रमाणात भाग घेतला पाहिजे. यासाठी भारत निवडणूक आयोगाने प्रत्येक शाळा आणि महाविद्यालयामध्ये लोकशाही साक्षर स्थापन करण्याचे आदेश दिलेले आहेत. त्यानुसार महाराष्ट्रातील मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने सुचवल्याप्रमाणे शालेय विभाग आणि उच्च व तंत्र शिक्षण विभागाने त्यासंबंधीची परिपत्रकेही काढलेली आहेत.

तरुणांनो, लोकशाही व्यवस्थेत सहभागाची सुरुवात म्हणून तुम्हाला आपापल्या शाळा-महाविद्यालयातील निवडणूक साक्षरता मंडळामध्ये सक्रिय सहभाग घेता येईल. तुमच्या शाळा-महाविद्यालयामध्ये लोकशाही साक्षरता मंडळ स्थापन झालेले नसेल तर तुमच्या शिक्षकांशी चर्चा करून असे मंडळ स्थापन करण्यात पुढाकार घेता येईल. आपल्या देशाच्या लोकशाही सक्षमीकरणात युवा पिढी पुढाकार घेणार नाही, तोवर अशी मंडळे खऱ्या अर्थाने सक्रिय होणार नाहीत. आणि दुसरीकडे, अशी मंडळे सक्रिय होणार नाहीत, तोवर आपली शाळा-महाविद्यालयांत शिकणारी उद्याची पिढी लोकशाही साक्षर होणार नाही.

लोकशाही म्हणजे केवळ मतदान, निवडणुका, शासनव्यवहार, न्यायालय नव्हे; हे लोकशाहीचं केवळ राजकीय स्वरूप आहे. लोकशाही एक जीवनमार्ग व्हायचा असेल तर लोकशाही समाजाच्या विभिन्न क्षेत्रांत पोहोचली पाहिजे. अगदी आपल्या कुटुंबातसुद्धा! आज भारतीय लोकशाहीपुढे अनेक आव्हाने आहेत.

जातीय-धार्मिक राजकारण, राजकीय घराणेशाही, राजकारणाचे गुन्हेगारीकरण, भ्रष्टाचार आदी आव्हाने भारतीय लोकशाहीपुढे आ वासून उभी आहेत. या आव्हानांचा बीमोड करायचा तर नागरिकांनी लोकशाही मूल्ये म्हणजेच स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, शांतता, विकास, मानवतावाद या मूल्यांना प्राधान्य देणाऱ्या लोकप्रतिनिधीची निवड केली पाहिजे. तसे झाले तरच घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटल्याप्रमाणे राजकीय लोकशाहीचे सामाजिक लोकशाहीत रूपांतर होऊ शकेल.

• नाव नोंदणी करताना त्या वर्षीच्या १ जानेवारी रोजी तुमचे वय १८ वर्षे किंवा अधिक असले पाहिजे. सध्या भारत निवडणूक आयोगाचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम चालू आहे. त्यांतर्गत, ज्यांचे वय १ जानेवारी २०२२ रोजी १८ किंवा अधिक असेल, त्यांना १ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर २०२१ पर्यंत नाव नोंदणी करता येणार आहे.

• नाव नोंदवताना वयाच्या पुराव्यासाठी खालीलपैकी कोणताही एक दस्तावेज हवा:

➢ जन्म दाखला

➢ शाळा सोडल्याचा दाखला

➢ जन्मतारखेची नोंद असलेली पाचवी /आठवी /दहावी /बारावीयांपैकी एका इयत्तेची गुणपत्रिका

➢ पॅन कार्ड

➢ वाहनचालक परवाना

➢ भारतीय पासपोर्ट

➢ आधार कार्ड

• नाव नोंदवताना निवासाच्या पुराव्यासाठी खालीलपैकी कोणताही एक दस्तावेज हवा:

➢ बँक/किसान/टपाल यांचे चालू खातेपुस्तक म्हणजे पासबुक

➢ शिधावाटप पत्रिका म्हणजेच रेशनकार्ड

➢ भारतीय पासपोर्ट

➢ वाहनचालक परवाना

➢ अलीकडील भाडेकरार

➢ पाणी/टेलिफोन/वीज/गॅस यांचे अलीकडचे देयक म्हणजेच बिल (हे देयक तुमच्या स्वतःच्या नावे नसेल, तर तुमच्या जवळच्या नात्यातल्या व्यक्ती – आई/वडील/पती/पत्नी यांच्या नावे असले तरी चालू शकते. तृतीय पंथीयांच्या बाबतीत ही बिले गुरूच्या नावे असतील तरी चालू शकते.)

➢ प्राप्तीकर निर्देश पत्रिका म्हणजेच इन्कम टॅक्स असेसमेंट ऑर्डर

➢ भारतीय टपाल विभागाद्वारे तुमच्या सध्याच्या निवासस्थानाच्या पत्त्यावर तुम्हाला प्राप्त झालेले कोणतेही टपालपत्र.

सूरज दि. मांढरे, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, नाशिक

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com