ब्लॉग : मलाही कळले...!
ब्लॉग

ब्लॉग : मलाही कळले...!

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

नाशिक | किरण-अर्चना वैरागकर

मला पण कळले की, मी घरातल्या घरात घरबंदी, घरघुशा, घरकोंबडा होऊ शकतो. विनातक्रार...! मला पण कळले की, घरातल्या तमाम इतर, सटर-फटर गोष्टी संपवायला दोन आठवडे लागतात...(बिस्कीट, फरसाण, वेफर्स, नाचोस इत्यादी) आणि अत्यावश्यक गोष्टींची यादी चतकोर पानावरसुद्धा मावते आणि तेवढेच लागते....

दुकान अगदी दोनच तास सुरु असेल तरी शांतपणे सर्व घेता येते. मला पण कळले की, मी अक्षरशः दोन कपड्यांच्या जोडीवर महिना काढू शकतो. एक दोरी वर आणि एक अंगावर राहू शकतो.

मला पण कळले की घरात गोळा केलेला पसारा हा घराच्या एरियाच्या किमान दुपटी-तिपटीत असतो. शिवाय हेही कळले की, बसूनसुद्धा झाडता येते आणि कंबर दुखत नाही. (हा जिव्हाळ्याचा आणि परिसंवादाचा विषय होऊ शकतो) आणि घरात ओसामा बिन लादेन, पण लपू शकणार, अशा काना-कोपर्‍यात जाळे-जळमटे जमतात.

हे पण कळले की, प्रत्येक पर्यटनाच्या ठिकाणी हौशीने घेतलेल्या शोभिवंत वस्तूवर पण धूळ बसतेच बसते. त्यांच्याकडे कोणीही कधी ढुंकूनही नाही बघत.

मला कळले की, पलंगाखालील बॉक्समध्ये ठेवलेल्या कपड्यांना, वस्तूंना फक्त ऐतिहासिक महत्त्व असते. मी लग्नात घातलेली 30 वर्षांपूर्वीची साडी, शालू, माझ्या बाबांनी घेतलेला कोट, मण्यांचे दागिने....!

मला कळले की एकाच कपाटात असंख्य पर्सेस, शॉपिंग बॅग्स, साड्या आणि तमाम ड्रेस फारच गुण्यागोविंदाने नांदत असतात. मात्र माणसांच्या कपाटात अति-अतिरेकी कारवाया होऊन त्याची अर्धी जागा बळकावली असते.

मला कळले की, कोट नुसतेच हँगरवर ठेवले की, त्याच्या खांद्यावर पण धूळ जमते आणि ती सहज निघत नाही. माझ्याकडे चक्क चार कोट आहेत आणि त्यातील काही निम्मे मी दशकापासून घातलेले नाहीत आणि मला होत पण नाहीत. मी चक्क बारीक झालोय. लॉकडाऊन रेव्हिलेशन ...!

बारीकपणावरून कळले की, आपल्या घरातच जॉगिंग पार्क, योगा क्लासेस, ऐरोबिकस सर्व करता येते. घरातसुद्धा दोरीवरच्या उद्या मारता येतात. ठरवले तर मी घरात पण पळू शकतो. हेही कळले की, वेळ नाही, वेळ नाही म्हणणे फार सोपे असते आणि वेळ हातात असला की काय करायचे सुचत नसते.

मला हे पण कळलं की ‘वर्क फ्रॉम होम’ हे खरोखरीच्या ‘वर्क’पेक्षा कठीण असते. घरच्यांना पण आपण काम काय करतो ते कळत नसले तरी दिसत असते. व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये इतरांना आपले घर अधिक छान दिसते. मात्र घरोघरी तीच बोलणी आणि तीच बॅकग्राऊंड असते.
मला पण कळले की, ‘यू-ट्यूब’वरून शिकणे अगदीच तेवढे कठीण नाही, पण ‘यु-ट्यूब’वर सुंदर दिसणारा संजीव कपूरसारखा व्यवस्थित दिसणारा पदार्थ आमच्या ताटात येईपर्यंत पार अगदी आमच्यासारखाच झाला असतो.

मला कळले की, पेपर नाही वाचला तरी, टी.व्ही. नाही बघितला तरी अगदी व्यवस्थित चालते. मुख्य म्हणजे अख्खं घर एका वेळेस जेऊ पण शकते. झोमॅटो, स्वीगीविना जग चालत होते आणि चालू पण शकते.

विथड्रॉवल सिम्प्टम हा एक भ्रम आहे भल्या-भल्यांना कळले की मद्य, तंबाखू, गुटका, सिगारेटविना सर्व व्यवस्थित चालते आणि होते. तर अशा कळलेल्या बर्‍याच गोष्टी पण, आता कळत नाही की, नंतर काय होईल? कळलेले विसरेन सर्व आणि ‘पुन्हा ये रे माझ्या मागल्या’ होईल का? याची खात्री नाही...

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com