Monday, April 29, 2024
Homeब्लॉगब्लॉग : नकळत घडले सारे...शिक्षण

ब्लॉग : नकळत घडले सारे…शिक्षण

किरण वैरागकर | तो म्हणाला, अरे आम्ही कंचे, मोठ्या काडीने, काठीने खेळायचो. रिंगण, एका बिद्दी, तीन बिद्दी, भाला हे सर्व खेळ आम्ही सर्व काठीने खेळायचो. कधी जमिनीवर, कधी फरशीवर तर कधी खोलीत. त्यामुळे जाम मजा यायची. प्रत्येक वेळेस नवा अनुभव! आधी जमीन, मैदान बघून आमचा काडीचा धक्का, जोर कमी-जास्त व्हायचा. खूप मजा यायची. तेच मी वापरले इथे पंधरा वीस वर्षानंतर. नकळत घडलेले त्याचे शिक्षण चक्क बिलियर्ड्ससारख्या आंतरराष्ट्रीय खेळात वापरले होते. त्यांनी सांगितल्यावर सर्वांनीच आपली ‘नकळत घडले सारे…’ शिक्षणाची पोतडी उघडली…

परवा एका मैत्रिणीने तिचा बिलियर्ड्स खेळतानाचा फोटो पाठवला. ती प्रथमच खेळत होती, पण एकंदरीत अगदीच नवशिकी वगैरे अजिबात वाटत नव्हती. ते बघून डोक्यात आली एक जुनी आठवण आणि विचार आला….

- Advertisement -

अरे ही पण कंचे, काचेच्या गोट्या झाल्याची की काय? त्याचे कारण पण तसेच. अस्मादिक अगदी सुरुवातीच्या काळात नोकरी लागल्यावर, आमच्या कंपनीचे भले मोठे क्लब, तिथे तरण तलाव सोडला तर बाकी सर्व सोयी सुविधा होत्या.

टेनिस, बॅडमिंटन, बिलियर्ड्स आणि तमाम मंडळी मैदानावर अथवा क्लबमध्येच असायची, पण आम्ही बिलियर्ड्सच्या वाटेला कधी गेले नाही आणि जे खेळतात त्यांना पण उगीचच मायकेल परेरा, गीत सेठी आदी तेंव्हाच्या चॅम्पियन्सच्या नावाने संबोधायचो.

असेच एकदा बॅडमिंटन खेळणे झाल्यावर बिलियर्ड रूममध्ये कोण आहे म्हणून डोकावलो तर आमचा एक मायकेल परेरा एकटाच खेळत होता. आम्हा तीन-चार जणांना बघून म्हणाला, अरे या ना! आम्ही एका जात बोललो ‘नाही रे, आपल्याला नाही जमत त्या गोट्या काडीने ढकलणे. त्या बिचार्‍याला पार्टनर हवा होता. मग आमच्यातलाच हेमंत म्हणाला, ‘चल मी कंपनी देतो. लेकिन मुझे हसने का नाही हा!’

मग आमच्या हेमंतभाऊला त्यांनी नियम, गुण पद्धती वगैरे समजावले. हा म्हणाला, ‘ते गुण, मार्क वगैरे जाऊ दे. पहिले जमते का ते बघू दे!’ आणि सुरूवात झाली. आम्ही मात्र गंमत बघायला थांबलो… हा हेमंत काय खेळणार म्हणून, पण चला करमणूक म्हणून थांबलेलो आम्हाला काय माहीत; अजून एका मायकेल परेरा उगवतोय ते. पहिला डाव हा चाचपडत होता. क्यू स्टिकस म्हणजे चेंडू ढकलायची काठी त्याचे पण प्रकार होते.

क्रॉस स्पायडर म्हणजे काठीला आधार द्यायचे वेगवेगळे ठोकळे, क्रॉस आदींचा बघून, अंदाज घेऊन वापर करू लागला. आणि महाराज पाचव्या सहाव्या गेमनंतर हेमंत महाराज एकदम सराईताप्रमाणे खेळू लागले. त्याचे अंदाज, रिबॉउंड, स्ट्रोक्स, आमच्या मायकल परेराला अचंबित करून गेले. शेवटी हेमंत चक्क पुढे गेला त्याच्या आणि जिंकलासुद्धा! त्याला विचारले, काय रे तू तर बोलला की पहिल्यांदाच खेळाला म्हणून? मग एकदम एवढा सराईत कसा काय?

तो म्हणाला अरे नाही रे बाबा, खरंच बिलियर्ड्स पहिल्यांदा खेळतोय, पण लहानपणी यापेक्षा कठीण खेळ खेळायचो. आम्ही चमकलो. तो काय तर म्हणतो कंचे. गोट्या! आम्हाला कोणालाच संदर्भ लागेना. कारण आम्ही पण खेळलेलो गोट्या, कंचे पण बिलियर्ड्सशी तुलना? साधर्म्य??

तो म्हणाला, अरे आम्ही कंचे, मोठ्या काडीने, काठीने खेळायचो. रिंगण, एका बिद्दी, तीन बिद्दी, भाला हे सर्व खेळ आम्ही सर्व काठीने खेळायचो. कधी जमिनीवर, कधी फरशीवर तर कधी खोलीत. त्यामुळे जाम मजा यायची. प्रत्येक वेळेस नवा अनुभव! आधी जमीन, मैदान बघून आमचा काडीचा धक्का, जोर कमी-जास्त व्हायचा. खूप मजा यायची. तेच मी वापरले इथे पंधरा वीस वर्षानंतर.

नकळत घडलेले त्याचे शिक्षण चक्क बिलियर्ड्ससारख्या आंतरराष्ट्रीय खेळात वापरले होते आणि त्यांनी सांगितल्यावर सर्वांनीच आपली नकळत घडले सारे… शिक्षणाची पोतडी उघडली. कदाचित विज्ञान, शास्त्राची जाणीवपूर्वक सांगड नव्हती, पण बरेच काही अंगीकृत झाले. त्याचा अर्थ मात्र अधिक उलगडत गेला…नकळत घडलेल्या शिक्षणाचा.

आठवीत असताना, बहुतेक शाळांना तेव्हा प्रचंड मोठी पसरलेली इमारत, मैदान आणि इथेच चौकीदार असायचा. मैदानावर आमचा वावर जास्तच. त्यामुळे चौकीदार आणि अख्खे कुटुंब यांच्याशी फारच सौदार्हपूर्ण संबंध! खेळताना पाणी वगैरे लागले तर ते पण मागायचो. एकदा असेच खेळून पाणी प्यायला गेलो तर तिथे एका हॅन्ड ब्लोअर.

त्याचे निमुळते तोंड एका छोटाशा भट्टीपाशी. भट्टीत दगडी कोळसा. त्यावर एका भांडे ठेवलेले आणि त्यात पितळेचे तुकडे टाकलेले. बाजूला काळी रेतीसदृश माती आणि एक चौकोनी पेटी होती. हे सर्वच नवे होते. आम्ही चौकस किंवा भोचक म्हणा, मग रमलो तिथेच.

पितळेचे जुने जिन्नस, वस्तू, भांडे वितळून नवे जिन्नस करणे जसे गणपतीची मूर्ती, चिमटा, सांडशी. कोळशाची धग दुरूनसुद्धा जाणवत होती. भांड्यातले पितळ हळूहळू द्रव स्वरूपात झाले. पिवळे आणि लाल असे दिसू लागले.

प्रथमच कुठलाही धातू द्रव्य स्वरूपात बघत होतो. इकडे त्या पेटीत काळी मातीसदृश्य रेती घट्ट भरून दोन भागात विभागली होती. त्यात चिमटा किंवा सांडशी यांच्या दोन भागाचे दोन्ही पेटीतील मातीत ठसे निर्माण केले. दोन मोठे खालून वरपर्यंत दोन्ही ठशांना छिद्र केले. एक जाड तारेने काही अगदी बारीक छिद्रे केली.

काम करणारे काका काम अगदी निगुतीने आणि मन लावून करीत होते. काम-करता करता आमच्या शंकांना उत्तरेही देत होते. बारीक छिंद्रांतून विटलेल्या धातूंमधील वाफ, हवा निघायला ते छिद्र, दोन मोठे भोक म्हणजे धातू ओतायला आणि केलेल्या पोकळीतून पूर्ण भरून यायला.

त्यानंतर तब्बल आठ वर्षांनी अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकताना कळले की ती पेटी आणि तिचे दोन भाग म्हणजे कोप आणि ड्रॅग! मोठे भोके म्हणजे रनर आणि रायझर. बारीक छिद्र म्हणजे वेन्ट होल्स! जे मी शिकत होतो त्याचे प्रात्यक्षिक लहानपणी होऊन गेले होते. त्या काकांनी अनुभवांनी आत्मसात केले होते.

असाच काहीसा प्रकार घडला प्लास्टिक वेल्डिंगबाबत. आपण भारतीय कुठलीही वस्तू सहसा आणि सहज फेकत नाही. तिला काही ना काही करून दुरुस्त करून त्याचे आयुष्य वाढवतो अथवा त्याचा पर्यायी उपयोग शोधतो.

प्लॅस्टिक युगाच्या सुरुवातीला प्लास्टिक बदली, टब, अगदी चप्पल तुटली तर रत्यावर एक छोटीसी भट्टी, त्यात काही निमुळते चपटे पेचकस, स्क्रू ड्राइवरसारख्या पट्टीने गरम करून जोडायचा. डाग देणे म्हणायचे या प्रक्रियेला. मात्र ठराविक प्लॅस्टिकच्या वस्तू तो जोडायचा. इतर शक्य नाही म्हणायचे. नंतर कळले की थर्मोसेट आणि थर्मोप्लास्टिकमधला फरक. असे बरेच काही घडले आहे.

संप्लवन/सब्लिमेशन हा प्रकार कल्हई करताना कळले. घन स्वरूपातला नवसागर गरम झाल्यावर वायू रूपात जातो म्हणून. नंतर मात्र हेही कळले की तोच घन पदार्थ काही विशिष्ट प्रसिद्ध द्रव स्वरूप तयार करताना वापरतात. भिंगाने कागद जाळायला खूप लवकर शिकलो, पण फोकल लेंग्थ, किरणांचे ध्रुवीकरण आणि निर्माण होणारी ऊर्जा याची सांगड फार उशिरा स्वतःच घातली.

प्रत्येक उपहारगृहातल्या तेलाच्या कढईवर आचारी एक भाजे. वाड्याचा घाना काढल्यावर दुसरा होईपर्यंत शेगडीची धग, ज्योत कमी करून पाणी का मारतो आणि भजे, वडे यांच्या अगदी सारखे तळण्यात, खरपूस होण्यात असते हे नंतर मेटॅलर्जी/धातूशास्त्रात हिट ट्रीटमेंटमध्ये क्वेन्चिंग मीडियाचे तापमान मेंटेन करणे का आवश्यक असते हे लगेच कळले. हे नकळत घडलेले शिक्षण, अशा प्रत्येकाच्या जीवनात खूप वेळा घडले असेल, पण क्वचितच शैक्षणिक अध्यापनात कुणी याची सांगड घातली.

पूर्ण भौतिक विज्ञान आपल्या आजू बाजूला घडत आहे. किंबहुना त्यातून ते तयार झाले आहे गणित. काळ, काम, वेग, डिफरेन्शियल इक्वेशन या बाबींशी दैनिक जीवनाशी नाही कोणी सांगड घालून देत शिकवत. म्हणूनच आम्ही विद्यार्थी असण्यापेक्षा परीक्षार्थी जास्त झालो होतो.

- Advertisment -

ताज्या बातम्या