नंदी बैलवाला

नंदी बैलवाला

मराठी मुलखाला लोककलांचा समृद्ध वारसा आहे खरा, पण कालौघात त्यातील अनेक कला लोप पावत चालल्या आहेत. त्या लोककलांची आणि ती पुढे नेणार्‍या अनोख्या परंपरांची ओळख करून देणारे नवे कोरे सदर..

संजय मुलांना घेऊन जत्रेमध्ये फिरत असतानाच मुलांना सजवलेला बैल अर्थात नंदी दिसला. रंगीबेरंगी कपड्यांची झुल, पाठीवर लहान लहान भिंगांची गोल, चौकोनी तुकडे असलेली लाल-निळ्या मण्यांची माळही झुलीवर. मानेच्या उंचवट्यावर लहानशी आकर्षक झुल. शिंगे रेशमी रंगीबेरंगी कापडांनी कलात्मकरीतीने गुंडाळून पितळी शेंब्या घालून रंगीत गोंडे लावलेले. मस्तकावर त्रिकोणी बाशिंग, मध्यभागी छोटेसे शिवलिंग, त्या शिवलिंगावर फणा काढून बसलेला नाग, गळ्यात घुंगरांच्या, कवड्यांच्या माळा, शेपटीच्या खाली छोट्या घुंगरांची माळ, पाठीवर उंचवट्याजवळ मोरपिसांचे तुरे तसेच दोन शिंगांमध्ये मोरपिसांचे तुरे. हे सर्व पाहत मुले विचारू लागली बाबा, याला नंदीबैल म्हणतात ना? याचे वैशिष्ट्य काय?

संजय सांगू लागला मुलांनो, तुम्ही सजवलेला नंदी पहिला. असा सजवून तो राजाप्रमाणे गावोगाव फिरत असतो. ही गावोगाव फिरणारी जमात आहे. नंदीबैलाला काही भागात पांगुळ बैल असेही संबोधले जाते. त्याला रंगवून, सजवून प्रत्येक घराच्या दारापुढे अंगणात आणले जाते. बैलाचा खेळ दाखवून लोकांची करमणूक करून ते पोट भरतात. हे शिवभक्त आहेत. ते महाराष्ट्रात कोठून? कसे? आल्याचे निश्चित कारण उपलब्ध नाही. नंदीचा अर्थ प्रसन्नता, आनंद. कोणताही प्रश्न विचारला की तो हो किंवा नाही असे साचेबद्ध उत्तर देतो. नंदी महादेवाचा आहे का? असे विचारताच होकार देतो. मुलांनो, पूर्वीच्या काळात करमणूक साधने खूप कमी होती. त्यावेळी लोकांची करमणूक करणारे हे फिरस्ते हवेहवेसे वाटायचे.

गोल गोल चामड्याला

दांडकं हे घासतंय

बघ बघ सखे कसं

गुबू गुबू वाजतंय ।

असे बोल वाजवत हे फिरस्ते गावागावांत हजेरी लावतात. घराच्या अंगणासमोर हे बैल आणले जातात. लयदार आवाजातील संबळीचा सूर, पिपाणी, तुणतुणे किंवा ढोलके वाजवले जाते. गुबूगुबू असे वाद्य वातावरणात आणखी रंग भरतात.

दान देवाच्या नावानं

आपल्या देवाच्या नावानं

भोळ्या भकतानं केलं दान

दहा बोटानं कमवून

पाच बोटांनी केलं दान

रवळनाथाच्या देवाच्या नावानं

असा पैसा दिला दान

तुझा पैसा कुठे गेला

रवळनाथ देवाच्या पायाला

तुझा दान पावन झाला

गुबू ऽऽ गुबू ऽऽ गुबू ऽऽ

त्यांची पारंपरिक लोकगीते गुणगुणत बैलांसह हे फिरस्ते घराघरांत पोहोचतात. पांगुळ बैलाला प्रशिक्षण दिले जाते. त्यांची मातृभाषा तेलगूसदृश असून मराठी, हिंदी शब्दांचे मिश्रण आढळते. पाटील नंदीवाला, ढवळा नंदीवाले, कोमटी नंदीवाले आणि भांडी विकणारे नंदीवाले अशा काही प्रकारात फिरस्ते नंदीवाले विभागलेले आहे. ते कन्नड व मराठी भाषाही बोलतात.

सुगीच्या हंगामापासून माघ महिन्यापर्यंत ते गावोगाव फिरतात. या समाजातील महिला सुया, पिना, दाभण, दातवन, कुंकू, काळे मणी, सागरगोटे, कंगवा, फणी विक्री करतात. सध्या फिरता व्यवसाय संकटात सापडला आहे. काळ बदलला, काळानुरूप टीव्ही, टेपरेकॉर्ड, रेडिओ, चित्रपट, मोबाईल आले आणि लोकसंस्कृतीचे मुख्य घटक हद्दपार होताना दिसतात.

सांग सांग भोलानाथ

पाऊस पडेल काय?

या बालगीताची आठवण करून देणारा हा नंदीबैल म्हणजे महादेवाचे वाहन, शेतकर्‍यांचा सोबती. मात्र औद्योगिकीकरणाने यांची संख्या कमी होत आहे. हा नंदी झंकार करत दारोदार फिरतो. अंगणात आल्यावर स्वतःभोवती प्रदक्षिणा घालतो. तुळस असेल तर तुळशीभोवतीही प्रदक्षिणा घालतो.

आताच्या काळात बैल खरेदी करावा लागतो, त्याच्या चारापाण्याची व्यवस्था करणे, हे शक्य नसल्यामुळे पांगुळ बैलांची भ्रमंती कमी झाली आहे. नंदीबैलांची भटकंती कुटुंबानुसार आखलेली असते. एकनाथांनी एका भारुडात धर्म उद्धारासाठी अवतार धारण करणारा लीलालाघवी परमेश्वर नंदीच्या रूपात नटवला आहे. नंदी हे शंकराचे वाहन असल्याने आपल्या खळावर साक्षात परमेश्वर शंकर आल्याची भावना शेतकर्‍यांमध्ये होते.

पांगुळ बैल उपलब्ध नसल्यास कधी हातात केवळ तुणतुणे घेऊन ही परंपरा जपण्याचे कसोशीने प्रयत्न केले जातात. महाराष्ट्रातील लोकसंस्कृतीची संकल्पना म्हणून नंदीबैलाकडे पाहिले जाते. ही परंपरा अद्यापि खेड्यापाड्यातून लोकप्रिय आहेत.

संजयशी बोलताना नंदीबैल लोककलाकार समस्या सांगतांना म्हणाले, पूर्वीची भविष्य ऐकणारी पिढी राहिली नाही. धान्य पूर्वीप्रमाणे जमत नाही. यामुळेच नवीन पिढीतील मुले या व्यवसायात येण्यास तयार नाहीत.

हे सर्व संजय आपल्या मुलांना प्रत्यक्ष दाखवत होता. आपल्या लोककला आणि त्यांच्या समस्या मुले बघत होते. या लोककला आपण आपल्या मित्रांना सांगू असे म्हणत ते पुढील लोककलाकाराकडे वळाले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com