ऑलराउंडर रिशिका

आपल्या पाल्यानं अभ्यासाबरोबरच इतर कलेतही पारंगत व्हावं, अशी पालकांची इच्छा असते.त्यासाठी ते प्रयत्नशील असतातच. प्रत्येक बालकात काहीतरी सुप्त गुण असतात. कोणी अभ्यासात हुशार, तर कोणाचा अभिनय चांगला, कोणी खेळात पारंगत, तर कोणाची चित्रकला उत्तम, कोणाला गायन प्रिय, तर कोणाला नृत्याची भारी आवड... सुप्त गुण प्रत्येक बालकांत असतात. मात्र, त्यांच्या या गुणांच्या सुप्ततेला संधीची जोड गरजेची असते.
ऑलराउंडर रिशिका

अनेक बाल कलाकारांचे गुण समाजाला समाजण्यास अनेकदा खूप कालावधी लागतो. काहींचे गुण संधीअभावी तसेच राहतात. काही जण अल्पावधीत समाजात नावलौकीक मिळवतात. आज आपण अशाच एका बाल कलाकाराला भेटणार आहोत जिचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. त्या बाल कलाकाराचं नाव आहे रिशिका तुषार देशमुख. वय वर्षे 10. महाराष्ट्र बालक मंदिरची इयत्ता चौथीची विद्यार्थिनी. तिला चित्र काढण्याचा भलताच छंद. मातीपासून वेगवेगळ्या वस्तू तयार करायला तिला खूप आवडते. नृत्य आणि गायनातही ती मागे नाही. या सर्व छंद अन् कलांची प्रेरणा तिला आतेबहीण संस्कृतीकडून मिळाली. रिशिका तिला गुरुस्थानी मानते.

अबॅकसमध्ये पुणे येथे झालेल्या स्पर्धेत रिशिकाला 3 बक्षिसे मिळाली. त्यासाठी शशिकला मॅडमची खूप मोठी मदत झाली, असं ती सांगते. शाळेतील विविध स्पर्धांतही तिचा सहभाग असतोच. शालेय फॅन्सी ड्रेस स्पर्धेत अतिशय कल्पकतेने बनलेल्या ‘डस्टबिन’साठी तिला प्रथम बक्षीस मिळाले. नृत्य स्पर्धेतही तिने प्रथम पारितोषिक पटकावले. विविध खाद्य पदार्थ बनविण्यासाठी ती पुढाकार घेते. केक ही तिची आवडची रेसिपी. केक बनवण्यासाठी तिची आई सविता तिला मार्गदर्शन करतात. कला आत्मसात करण्याच्या गुणामुळे व्हिडिओ पाहून ती नृत्य शिकायचा प्रयत्न करते. वाचन व चित्रकलेची तिला विशेष आवड आहे. निसर्गचित्र, सण-उत्सवांवर चित्रे रेखाटण्यात रिशिकाचा हातखंडा आहे. यासाठी तिला वडील तुषार यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळते. आई-वडिल तिच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी कायम प्रयत्नशील असतात. विविध क्षेत्रांतल्या मान्यवरांची भेट घालून देतात.

शाळेतही तिचे वर्गशिक्षकही तिच्याकडून विविध स्पर्धा आणि कार्यक्रमाची चांगली तयारी करून घेतात. अ‍ॅबॅकस, नृत्य, फॅन्सी ड्रेस, चित्रकला आदी विविध स्पर्धांत तिने आतापर्यंत अनेक बक्षीसे मिळविली आहेत. गणित ऑलम्पियाड व रोटरी ऑलम्पियाडमध्येही रिशिकाने यशस्वी सहभाग नोंदविला आहे. (पुण)े येथे यशस्वी सहभाग नोंदवला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांना ती आपला प्रथम आदर्श मानते. नगरचे कलेक्टर राहुल द्विवेदी यांचे लॉकडाऊनमधील काम तिला खूप प्रेरणा देते. मोठेपणी सर्वात अगोदर चांगला व्यक्ती व नंतर कलेक्टर होण्याची रिशिकाची इच्छा आहे. ‘स्वप्न पहा व पूर्ण करा, लहान असण्याचा मनमुरादआनंद घ्या’ असं ती तिच्या वयातल्या मित्र-मैत्रिणींना सांगू इच्छिते. बहुकलांमध्ये ऑलराउंडर असलेल्या उत्साही रिशिकाला भावी आयुष्यासाठी खूप शुभेच्छा...

- सागर खिस्ती

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com