नागपंचमी विशेष : सापांबाबतची ही रोचक तथ्ये आपण वाचलीत का?

नागपंचमी विशेष : सापांबाबतची ही रोचक तथ्ये आपण वाचलीत का?

श्रावण मास सुरू झाला की ऊन-पावसाचा खेळ नवीन रंगात रंगतो. वसुंधरा मातेला हिरव्यागार वस्त्रात पाहून सर्वांना आत्मिक शांती व सुखावणारा आनंद लाभतो. सगळीकडे आनंदाचे वातावरण असते. भारतीय संस्कृतीतील सण कृषिकर्म , ऋतुचक्र व ऋतूंमधील पारंपारिक आहारातील पदार्थ या त्रीसूत्रावर आधारलेले दिसून येतात. श्रावण मासाच्या सुरूवातीलाच नागपंचमी हा सण असतो. श्रावण शिरव्यांची नियमित हजेरी असते. या कालावधीमध्ये सर्पांच्या गतिविधि जास्त प्रमाणात दिसून येतात. अनेक ठिकाणी सर्प निघाला याविषयीच्या घटना माहित पडतात. तर काही ठिकाणी सर्पदंश झाला अशी बातमी कानावर येते. या घटनांचा आधार घेत नागपंचमी सणाला नागदेवतेची सदैव कृपा असावी , सापांपासून आपले रक्षण व्हावे या हेतूने घराघरात नागपंचमी सण साजरा केला जातो.

नागदेवतेचे चित्र , मातीची प्रतिकृती , भिंतीवर काढलेली नागदेवतेची चित्रे , देवघरातील नागाची प्रतिकृती इ .ची नैवेद्य व पूजन सामग्री अर्पण करुन प्रार्थना केली जाते. लहानथोर , शेतकरी - मजूर , महिलावर्ग सापाची बीळ शोधून त्या ठिकाणी दूध व पूजा अर्चा श्रद्धेने अर्पण करतात. खरेतर यामागे हिंदू धर्मिय सण साजरा करण्याच्या पद्धतीत विज्ञान दडले आहे. सापांचे अन्नसाखळीतील मोलाचे स्थान व महत्त्व या सणाद्वारे अधोरेखित होते. सापांचे संरक्षण व संवर्धन व्हावे हा भूतदया विचार व्यक्त होतो. निसर्गातील प्रत्येक सजीव हा मानव व इतर सजीवांशी घनिष्ठ संबंध राखतो हे संस्कार बीज यातून रुजते.परंतु सापांबद्दल आजदेखील जनमानसात काही समज व गैरसमज रूढ आहेत. त्यातील काही आपण समजून घेऊ.

1. नागास ठार केल्यास नागिन बदला घेते ? डूख धरते ?

कोणत्याही नागाची स्मरणशक्ती पूर्णतः विकसित नाही. त्यामुळे त्यास काहीही स्मरणात राहात नाही. खाद्य अथवा समागमोत्सुक मादीच्या शरीरातुन बाहेर पडणाऱ्या स्त्रावाचा गंधाचा मागोवा घेत नाग माग काढतात. प्रजनन कालावधी शिवाय नाग व नागिन कधीही सोबत राहत नाही. त्यामुळे नाग व नागिन कधीही एकमेकांचा बदला घेत नाहीत.

2. नाग पुंगीवर डोलतो कसा ?

नाग अथवा कोणत्याही सापाला कान नसतात. त्यामुळे कोणतेही संगीत , गाणे अथवा ध्वनी ऐकू शकत नाही. त्याऐवजी समोर दिसणारी व हलणारी वस्तूवर लक्ष राखून हल्ला करण्याच्या पावित्र्यात तो असतो. पुंगी ऐवजी इतर वस्तू जरी धरली तरी त्याकडे नाग आकर्षिला जातो. सर्प प्रजातीमध्ये फक्त नाग फणा काढू शकतो. म्हणून गारुडी खेळात बहुतांश वेळा नागच दाखवतात.

3. इच्छाधारी नाग अथवा नागिन खरच असतात का ?

नाग शंभर वर्षांपेक्षा जास्त जगला की तो इच्छाधारी होतो. तो स्वयम् शक्तिमान बनतो. या बाबी पूर्णतः अंधश्रद्धा आहेत. नाग अथवा इतर कोणताही साप शंभर वर्षे जगल्याची आतापर्यंत नोंद नाही. माणसाबरोबरच निसर्ग साखळीतील मुंगूस, गरुड , घार , मोर , ससाणा हे सापाचे मोठे शत्रू आहेत. अजगर जास्तीत जास्त 30 ते 35 वर्षे जगले याच्या नोंदी आहेत.

4. नागमणी खरच असतो का ?

नागमणी प्राप्त झाल्याने धनसंपदा येते. हा मोठा गैरसमज आहे. जर हे खरे असते तर सर्व गारुडी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती राहिले असते. नागमणी ही एक फक्त दंतकथा

म्हणून प्रचलित आहे. काचेचे मणी , बेन्ज़ाईनचे खडे नागमणी म्हणून भासवले जातात.

5. नागाला केस असतात...?

नाग सस्तन प्राणी नसल्याने त्याच्या अंगावर केस नाहीत. बऱ्याचदा गारुडी शेळी - मेंढी चे केस नागाच्या शरीरावर खाच पाडून खोटं दाखवतात.

6. साप दूध पितो ?

साप कधीही दूध पीत नाही. ते बळजबरी पाजल्याने सापाचे आतडे व फुफ्फुसे प्रभावित होतात.

7. मंत्र विधीने विष उतरवता येते का ?

आपल्याकडील बिग फोर ( नाग , मण्यार , घोणस ,फुरसे ) सोडून बहुतांशी सर्प प्रजाती बिनविषारी आहेत. सर्पदंश झालेली व्यक्ती अत्यंत घाबरलेली व मानसिक धक्का घेऊन असते. अश्या परीस्थितीत मांत्रिकाचे दावे प्रभाव टाकतात. फक्त योग्य वैद्यकीय उपचारच सर्पदंशावरती रामबाण उपाय आहे.

8. साप चावल्यावर मिरची व कडुलिंब देखील गोड लागतो ?

सर्पदंश हा विषारी सापाचा असेल तर जिभेला संवेदना राहत नाही. त्यामुळे प्रभावित झालेली व्यक्ती ला चव कळत नाही.

9. सर्व प्रकारचे सर्प विषारी असतात का ?

अजिबात नाही. सर्वसामान्यपणे आपल्याकडे चार जातीचे विषारी साप आढळतात. नाग , मण्यार , फुरसे व घोणस. याशिवाय इतर जाती बिनविषारी आहेत तर मोजक्या निमविषारी आहेत परंतु घातक नाहीत.

10. नाग धनाचे रक्षण करण्यासाठी तिथे फिरतो ?

भग्न इमारती , खूप जुनी घरे , अडगळीची ठिकाणे , पडक्या वास्तू अशा निर्मनुष्य ठिकाणी सर्प बिळात , तड्यांमध्ये लपून असतात. अशा ठिकाणी नवीन बांधकाम करताना प्राचीन कालावधीतील पुरलेले ऐवज जर आढळल्यास हा गैरसमज दृढ होतो.

11. धामण साप गाई-म्हशीच्या पायाला विळखा घालून दूध पितो ?

कोणत्याही सापाचे अन्न दूध नाही. त्यामुळे धामणच काय तर कोणताही प्रकारचा साप दूध पीत नाही.

12 . साप उलटा झाल्यावर विष चढते का ?

सापाचे दात आतील बाजूस वळलेले असतात. काही वेळा सापाचे दात चावल्यानंतर अडकतात. ते दात सोडवण्यासाठी साप उलटा होतो. साप उलटा जरी झाला नाही व तो विषारी असेल तर विष चढते.

13. काहीवेळा महादेवाच्या पिंडीवर नाग आढळून येतो ?

बऱ्याच मंदिराच्या जवळपास मंदिरातील निर्माल्य , वापरलेली पूजा सामग्री , उरलेले मिष्ठान्न लगतच्या परिसरात टाकलेले असते. तेथें उंदरांची सतत हजेरी असते. उंदीर हे सापांचे मुख्य खाद्य. यानिमित्त साप मंदिर परिसरात बऱ्याचदा आढळतात. गाभार्‍याच्या जल नलिकेतून बऱ्याच वेळेस नागपिंडी वर येऊन बसतात.

सापांपासून होणारे फायदे -

1 साप उपद्रवी उंदीर व घुशीवर नियंत्रण ठेवतात.

2 सापांच्या विषाचा उपयोग कॅन्सर , हृदय विकार , रक्तदाब ,

अनेस्थेशिया , वेदनाशामक औषधी बनवण्यासाठी होतो.

3 काही साप पाण्यावरील डासांची अंडी खाऊन डेंगू , मलेरिया सारखे आजारपासून आपले रक्षण करतात.

4 विषारी साप चावल्यावर दिले जाणारे औषध विषारी सापापासूनच तयार करता येते.

5 बऱ्याच प्रकारचे कीटक व पिकांवरील अळीवर साप नियंत्रण ठेवतात.

6 खापर खवल्या , वाळा, मांडूळ सारखे साप जमीन पोखरतात. त्यामुळे जमीन भुसभुशीत होवुन सुपीकता वाढते.

भारतीय नाग
भारतीय नाग

चार मुख्य विषारी सापांची माहिती -

1 भारतीय नाग -

वर्णन - शरीराचा रंग तपकिरी , काळा , राखाडी , पिवळसर गव्हाळ. डोळे मोठे व बाहुली गोल. फण्याच्या मागे काळ्या रंगाचा चष्मा आकृती किंवा मोडी लिपीतील दहाचा आकडा.

काहींमध्ये वरील आकृती नसतेच. खवले गुळगुळीत.फण्याच्या

समोरील बाजूस दोन काळे मोठे ठिपके दिसतात.

लांबी - सरासरी 3.5 ते 7 फूट.

प्रजनन - अंडज - एप्रिल-मे दरम्यान मादी 10 ते 15 अंडी

घालते.सुमारे 50 ते 70 दिवसांनी पिले बाहेर पडतात.

खाद्य - उंदीर , बेडूक , सरडे व इतर साप.

मण्यार
मण्यार

2 मण्यार -

वर्णन - अति विषारी. शरीराचा रंग काळा , गडद तपकिरी.

त्यावार पांढऱ्या ठिपक्यांचे जोड्यांचे पट्टे.ओठ पोटाकडे

रंग पांढरा. डोळे बारीक व काळे. खवले गुळगुळीत व चमकदार. आखूड शेपूट.

लांबी - 3 ते 5.5 फूट

प्रजनन - अंडज - मार्च ते मे दरम्यान मादी 7 ते 12 अंडी घालते.

खाद्य - छोटे सर्प , सरडे , पाली , उंदीर.

घोणस
घोणस

3 घोणस -

वर्णन - शरीराचा रंग तपकिरी , पिवळसर तपकिरी , गडद तपकिरी. त्यावर पांढरी किनार असलेला गडद तपकिरी गोल

ठिपक्यांच्या तीन रांगा. शरीराचा खालचा भाग पिवळसर.

स्थूल गोलाकार शरीर. डोके चपटे - त्रिकोणी , शेपूट आखूड , डोळे मोठे , डोळ्यातील बाहुली उभी.

लांबी - 3.5 फुट ते 6 फूट.

प्रजनन - जारज - मे ते जुलै दरम्यान मादी 10 ते 70 पिल्ले देते.

खाद्य - उंदीर , बेडूक , घूस व इतर लहान सस्तन प्राणी.

फुरसे
फुरसे

4 फुरसे

वर्णन - तपकिरी त्यावर पांढरी जाळीदार नक्षी. मानेपासून शेपटीपर्यंत पाठीच्या मध्यभागी तपकिरी पांढरे ठिपके. डोळे काहीसे त्रिकोणी , डोक्यावर पांढरी किंवा फिकट तपकिरी

बाणाकृती खुण. डोळे सोनेरी व मोठे. डोळ्यातील बाहुली

उभी व काळी.

लांबी - सरासरी दोन फूट.

प्रजनन - जारज- मादी एप्रिल ते ऑगस्ट दरम्यान 5 ते 17 पिलांना जन्म देते.

खाद्य - विंचू , पाल , सरडे , छोटे बेडूक , उंदीर.

सापांचे प्रकार तीन आहेत.

बिनविषारी , निमविषारी व विषारी.

1 बिनविषारी - या प्रकारच्या सापांमध्ये बिलकुल विष नसते.

विषारी सापांपेक्षा बिनविषारी सापांची संख्या खूप जास्त आहे. उदा- धामण , कवड्या , तस्कर , गवत्या , धूळनागीन इ .

2 निमविषारी - अंशतः विषारी असले तरी या सापांपासून मानवाच्या जीविताला धोका नाही. यांच्या दंशामुळे चक्कर येणे , मळमळ , डोकेदुखी यासारखी लक्षणे जाणवतात.

उदा- मांजऱ्या , रेती सर्प , हरणटोळ इ .

3 विषारी - या सापांचा दंश अतिशय धोकादायक असतो.

वेळेवर योग्य वैद्यकीय उपचार न झाल्यास जीवदेखील जाऊ शकतो.उदा - नाग , मण्यार , घोणस , फुरसे इ .

साप आणि वन्यजीव अधिनियम 1972 - वन्यजीवांना संरक्षण देणारा कायदा 1972 यावर्षी अमलात आला. याच सापांना देखील कायदेशीर संरक्षण मिळाले. साप पकडणे , ठार मारणे , प्रदर्शन करणे , तस्करीत करणे , जवळ बाळगणे , छळ करणे इत्यादी सर्व बाबी गुन्हे आहेत. त्याबाबतचे नियम अत्यंत कडक आहेत. तीन ते सात वर्षांची कैद व 10 ते 15 हजार रुपये दंड अथवा दोन्ही शिक्षा एकाच वेळेस होऊ शकतात. ऍनिमल क्रूएल्टी एक्ट मध्ये सुद्धा सापांना संरक्षण आहे.

सापांबद्दल काही रोचक तथ्य -

1 सर्प शीत रक्ताचा प्राणी असून 8 डिग्री पेक्षा कमी व 45 डिग्री पेक्षा जास्त तापमान सापांना सहन होत नाही.

2 साप अनेक दिवस अन्नाशिवाय राहू शकतात. भारतीय अजगर दोन वर्ष नऊ महिने काहीही न खाता जगण्याची नोंद आहे.

3 जगातील सर्वात विषारी साप बेलचर समुद्रसर्प असून त्याचे विष ब्लॅक मांबा पेक्षा देखील विषारी आहे.

4 मण्यार आशिया खंडातील सर्वात विषारी साप.नाग पेक्षा कितीतरी पट विषारी.

5 हरणटोळ हा भारतातील एकमेव आडवी बाहुली असलेला सर्प.

6 सापाच्या शरीरामध्ये 70 टक्के पाणी असते.

7 कोलूब्रीडी हे सर्पजगातील सर्वात मोठे कूळ असून जगातील

60 % जास्त सापांचा यात समावेश आहे.

8 व्हायपीरीडी हे सापांचे सर्वात विकसित कुळ आहे.

9 भारतात आढळणाऱ्या विषारी सापांपैकी घोणस सापाचे विषदन्त सर्वात मोठे आहेत.

10 काही साप अंडी तर काही पिल्ले जन्माला देतात.

11 सापाची दृष्टी कमजोर असून त्याला द्विमितीय प्रतिमा दिसते. परंतु हरण टोळ सापाला त्रिमितीय प्रतिमा दिसते.

सापांची संख्या कमी होण्याची कारणे -

मनुष्य जंगलावर करत असलेल्या अतिक्रमण आणि जंगलतोड.

महामार्गांची आणि वाहनाच्या संख्येने दरवर्षी फक्त महाराष्ट्रातच पाच लाखापेक्षा अधिक साप मृत्युमुखी पडतात.

मानवी वस्ती मध्ये आलेल्या सापांची भीती आणि अंध श्रद्धेपोटी होणारी हत्या.

प्रदूषणामुळे वातावरणात व पाण्यात होणारे बदल.

सापांची अंधश्रद्धेतून होणारी तस्करी व हत्या

रासायनिक खते व कीटकनाशकांमुळे सुद्धा सापांची संख्या घटत चालली आहे.

# हेमराज पाटील

पक्षी व वन्यजीव अभ्यासक ,

संस्थापक #सातपुडा निसर्ग संवर्धन संस्था , चोपडा.

केंद्रीय समिती सदस्य - वन्यजीव गुन्हे नियंत्रण विभाग , दिल्ली

आजिवन सदस्य - बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी , मुंबई.

संपर्क - 9922085434

email - satpudancschopda@gmail.com

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com