Saturday, April 27, 2024
Homeब्लॉगमैदानांची वाट हवी..

मैदानांची वाट हवी..

मुले ही प्रत्येक देशाची संपत्ती असते. आपण आपल्या मुलांना स्वतःची खाजगी मालमत्ता मानत आलो आहोत. त्यामुळे त्यांच्या विकासाची वाट आपणच निर्माण करणार आहोत. त्यांची गरज काय आहे? यापेक्षा पालक म्हणून आपल्याला काय हवे हे महत्वाचे. मुलांच्या विकासासाठी त्यांच्या आवडी निवडी, कल महत्वाचा असतो.

घर हीच शाळा…

- Advertisement -

मात्र त्यांच्या एकूण विकासात त्यांना गृहीत धरले जाते. आपल्याला त्यांच्या व्यक्तीमत्वाचा विकास हवा आहे. त्यांना त्या वाटेने जाऊन देण्याचे अनेक मार्ग आहेत; पण मुलांचा खरा विकास जेथे घडतो त्या वाटा बंद करण्यातच आपल्याला आपले हित आहे असा भास होतो आहे का? अशी स्थिती आहे. विद्यार्थ्यांच्या व्यक्तीमत्वाला आकार जो मिळतो तो केवळ मैदानावर. मुले मैदानावर केवळ खेळ खेळत नाहीत. मुले मैदानावरती एकत्रित खेळतात तेव्हा ते तेथे एकमेकाचा विचार करायला शिकतात. पराभव आणि विजय देखील पचवायला शिकतात. जगण्यासाठी लागणारे समायोजनही तेथेच शिकतात.

शारीरिक विकासाबरोबर मानसिक, भावनिक विकास देखील तेथेच घडत असतो. जिंकायचे असेल तर आपल्या सर्वांनाच एकत्रीत काम करावे लागेल. त्यातून संघ भावनेचा विकास होत असतो. एकूणच मैदानावर त्यांच्या व्यक्तीमत्वाला आकार दिला जात असतो म्हणूनच राष्ट्राचे उत्थान घडविण्यासाठी आणि समाजातील संघर्ष संपविण्यासाठी देशात मैदाने हवी आहेत. मैदानांना मोकळा श्वास घेता आला तरच देशाला भविष्य आहे. शेवटी मैदाने असतील तर तरूणाईचे आरोग्य उत्तम राहील आणि उत्तम आरोग्यसंपन्न तरूणाई हिच विकासाची वाट आहे.

तुम्ही फक्त इतकेच करा..!

शिक्षण हक्क कायदा आस्तित्वात आला तेव्हा कायद्याने शाळा म्हणून या सामाजिक संस्थेने किमान काही निकष पूर्ण करण्याची अपेक्षा जाहिर करण्यात आली होती. त्या 13 निकषापैकी मैदान हा एक महत्वाचा निकष आहे. मैदाने नसतील तर शाळांची मान्यता देखील काढली जाऊ शकते. शाळेत शिक्षण दिले जाते. ज्ञानाची पेरणी केली जाते. मग मैदाने आणि शाळा यांचा काय संबंध? असा प्रश्न विचारला जातो. मुले तर चार भिंतीच्या आत शिकतात. तेथे ते ज्ञानाची प्रक्रिया घडते त्याकरीता वर्ग चांगले हवीत. मैदानाची अट कशाला हवी? असे म्हणणारी माणसंही त्यावेळी व्यवस्थेत होती.

शिक्षण म्हणजे काय? असा प्रश्न विचारला गेला तर त्याचे उत्तर शोधताना जगभरातील विविध शिक्षण तज्ज्ञांनी म्हटले आहे; की “शारीरिक, मानसिक आणि भावनिक विकास म्हणजे शिक्षण”. याप्रकारे विद्यार्थ्यांच्या समग्र विकासासाठीचे आव्हाने शिक्षणाने पेलायची असतात. विद्यार्थ्यांचा व्यापक व समग्र विकास घडावा याकरीता शाळांमध्ये विविध विषयांचा समावेश करण्यात आला आहे. शिक्षणातून केवळ एकांगी स्वरूपाचा विकास अपेक्षित नाही. वर्तमानात आपण बौध्दिक विकासावर भर देत आहोत. मात्र शिक्षण म्हणजे केवळ बौध्दिक विकास नाही हे ही लक्षात घ्यायला हवे.

आत्मनिर्भयतेच्या दिशेने..

आपल्या सर्व शिक्षण प्रक्रियेत बौध्दिक विकासाला प्राधान्य आणि प्रतिष्ठा आहे.त्यात पालकांचा ओढाही बौध्दिक शिक्षणाकडेच आहे. मुलाला बौध्दिक विषयांच्या अनुषंगाने किती मार्क मिळाले हे पाहिले जाते; पण शारीरिक शिक्षणात मुलाला “क” श्रेणी मिळाली तर त्याची खंत वाटत नाही. किंबहूना तो केवळ एक विषय आहे इतकेच त्याचे महत्व आहे. मुलांनी मैदानावरती खेळणे म्हणजे पालकांना टाईमपास वाटतो. शाळेतही जेव्हा विविध प्रकारच्या शिष्यवृत्ती परीक्षा सुरू असतात तेव्हा अतिरिक्त मार्गदर्शनसाठी खेळाचे तास उपयोगात आणले जातात. अनेकदा खेळाचे तास मैदानावर होण्याऐवजी वर्गात करणे पसंत केले जाते. याचे कारण आपली शालेय संस्कृतीचे नाते अजून मैदानाशी जोडले गेलेले नाही. त्यामुळे मैदाने म्हणजे केवळ टाईमपास असा समज शाळा आणि पालकांचा झाला आहे.

त्यामुळे आपण विद्यार्थ्यांचे नुकसान किती करतो त्यापेक्षा देशाचे अधिक नुकसान करीत आहोत हे लक्षात घ्यायला हवे. आपल्याकडे ऑलंपीकमध्ये पराभव झाला, पदके कमी मिळाली की चिंता व्यक्त होते. त्याच बरोबर मग सरकारच्या क्रीडा धोरणांची आठवण होते. सरकारही मग काही घोषना करते. काही दिवस त्यासंबंधाने बरेच काही बोलले जाते; मात्र काही काळ निघून गेला की हाती फार काही लागत नाही. खेळाला जोवर प्रतिष्ठा आणि जीवन विकासातील महत्वाचा विषय म्हणून आपण त्याकडे पाहत नाही तोवर आपल्याला निरामय वृत्तीचा समाजही निर्माण करणे शक्य नाही. खेळामुळे आपण आनंददायी समाज निर्माण करीत असतो हे लक्षात घ्यायला हवे. आनंददायी समाज म्हणजे नवनिर्मितीची पाऊलवाट आहे.त्यातून सृजनशीलतेची वाट चोखाळली गेली तर देशाचे भले काही घडू शकेल.

आपण मुलांना गृहित का धरतो?

मुले मैदानावर जेव्हा येतात तेव्हा त्यांच्या शारीरिक विकासाची प्रक्रिया अधिक गतीमान होण्यास मदत होत असते. मैदानावरती मुले जितकी खेळतात तितके ते बौध्दिक विकासासाठी असलेल्या विषयात रममान होतात. मैदानावर शरीर सैल होते त्याच बरोबर मनही अधिक हलके होते. मैदानावर संवाद होतो. शरारीबरोबर मनावरील ताणही संपतो. त्यामुळे चेतना जागृत होऊन नवा विषय शिकण्यासाठी लागणारी मानसिक क्षमता तयार होत असते. अनेकदा आपल्याकडे शालेय वेळापत्रक नियोजनातही बौध्दिक तासांचा क्रम सलग असतो. त्या सलग तासांमुळे मेंदूला थकवा येत असतो. तो थकवा घालविण्यासाठी शाळांना मैदाने हवी असतात. कला, कार्यानुभवासारख्या विषयांकरीता कृतीवर्ग हवेत. मुलांना मुक्त श्वास घेण्यासाठी मैदाने आणि कृतीवर्गाची गरज असते.

मैदाने म्हणजे मुलांना नवे काही शिकण्याची तयारी करणारी व्यवस्था असते. मैदानांमुळे काय घडते? असा प्रश्न जेव्हा पडतो. तेव्हा मैदानावर जय, पराजय पचविण्याची क्षमता विकसित होत असते. त्याच बरोबर संघीय दृष्टीने खेळण्यासाठी समन्वयाची भूमिका, अंदाज घेण्याची वृत्ती विकसित होत असते. सहकार्याची वृत्तीचे विकसन घडते. भाषेचा विकास, संवाद कौशल्याचे विकसन होण्यास मदत होते. शालेय वयात मुलांची शारीरिक विकास घडत असताना त्यांच्यात उर्जाही साठवलेली असते. अशावेळी ती उर्जा जर योग्य कामी आली नाही तर ती इतरत्र वाममार्गी जाण्याची शक्यता असते.

मुलं हाच आरसा..

त्यातून मुले बेशिस्त होण्याची शक्यता अधिक निर्माण होते. त्याउलट विद्यार्थ्यांचे मैदानाशी नाते पक्के झाल्याने मुलांची उर्जा योग्य मार्गाने खर्ची होण्यास मदत होते. त्यातून त्यांच्या विकासाची प्रक्रिया अधिक गतीमान होते. मैदानावर खेळल्याने मुलांची विकास प्रक्रिया होण्याबरोबर त्याना अधिक एकाग्रहतेने काम करण्याची सवय लागते. मुलांना उत्तम शिक्षणासाठी व संस्कारासाठी शिकवणी नको आहेत; तर त्यांना मैदानावर खेळू देण्याची गरज आहे. मुले जितकी मैदानावर खेळतील तेवढे त्यांचे व राष्ट्राचे उज्वल असणार आहे. आपण मुलांच्या विकासाबाबत फारसे जागृत नाही आहोत.

त्या संदर्भाने गिजूभाई म्हणतात की, आपल्या अवतीभोवती असलेल्या घाणेरडया आणि असुरक्षित असलेली रस्ते पाहिल्यावर मुलांना त्या रस्त्यावरून फिरू देणार काय? मुळात मुलांचे भावविश्व जपण्याची निंतात गरज आहे. आपण मुलांच्या अधिकारा बददल कायदे केले आहेत.त्यांच्या अधिकाराबददल बोलत असलो तरी त्याचे जतन व बालकांना हक्क देण्यासाठी फारशी काळजी घेत नाही हे वास्तव आहे. त्यांना आपण भटकू देणार का? असा प्रश्न विचारल्यावर त्याचे उत्तर तेच देतात. ते उत्तर आहे नाही. आपण मुलांच्या भविष्यासाठी त्यांना घरे देणार; पण ती उबदार असतील. ती उब मुलांसाठी प्रेमाची असेल. त्यांच्यावरती वात्सल्याचा मायेचा झरा असेल. तेथे त्यांच्या अधिकार, हक्काचे जतन केले जाईल. त्यामुळे ती मुले आपल्या सर्जनशीलतेच्या वाटा चालत राहणार आहेत. मुलांना गावात नाही तर चौकाचौकात खेळाची मैदाने असतील असा आशावादही त्यांच्या विचारात आहे.

फुकाची बडबड हवी कशाला?

खरेतर बालकांच्या विकासाची जबाबदारी शासनाबरोबर समाजाची देखील आहे. जेथे जेथे सोसायटी असेल तेथे तेथे मुलांसाठी मैदाने विकसित करण्याची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थानी घेण्याची गरज आहे. उत्तम विकसित मैदानांशिवाय आपल्याला चांगला समाज कसा निर्माण करता येईल? मुलांच्या शरीर व मनाचा विकास जेथे होईल अशा गोष्टी आणि साधने निर्माण करण्याची गरज व्यवस्थेची आहे. त्याकरीता त्यांना फार महाग असलेल्या सुविधांची माध्यमे नको आहेत. त्यांना फक्त आपण मैदाने उपलब्ध केल्यांने त्यांच्या विकासाची वाट आपोआप तुडवली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे किमान इतके तरी करूया.. म्हणजे त्यांच्या विकासाबरोबर शैक्षणिक गुणवत्तेची स्तर उंचवण्यासाठी देखील मैदाने कामी येणार आहेत. म्हणून मुलांच्या विकासासाठी मैदानाची जबबादारी पालक, शाळा व सरकारने स्विकारल्याशिवाय आपण उन्नत समाज निर्माण करू शकणार नाही.. म्हणून थोडासा विचार करायला हवा.

गिजूभाई आपल्या भावना व्यक्त करतांना लिहितात, की

मैदाने

घाणेरड्या आणि असुरक्षित रस्त्यांवरुन

आपण आपल्या हजारो मुलांना भटकू देणार काय?

नाही.

आपण त्यांना ऊबदार घरे देणार..

जेथे ती त्यांच्या सर्जनशीलतेमध्ये मग्न आहेत.

प्रत्येक चौकात खेळायला मैदानेसुद्दा देणार

जेथे विकास होईल त्यांच्या शरीर आणि मनाचा.

मुलांच्या विकासासाठी सर्वाधिक महत्त्वाची आणि स्वस्त माध्यमे ही मैदाने!

मी स्वस्थ कसा बसू?

शिक्षण प्रक्रियेचा व्यापक अर्थ जाणून घेतल्याशिवाय विद्यार्थ्यांच्या जीवनाला समग्र अर्थ प्राप्त करता येणार नाही. त्यामुळे मैदानाशी नाते जोडण्यासाठी पालक आणि शाळांनी भूमिका घेण्याची गरज आहे.

_संदीप वाकचौरे

(लेखक शिक्षण क्षेत्राचे अभ्यासक आहे)

- Advertisment -

ताज्या बातम्या